How Made in India Weapons Attacks in Pakistan : २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर राबवीत पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील (PoK) दहशतवाद्यांचे अनेक तळ उद्ध्वस्त केले. या कारवाईला १०० हून अधिक दिवसांचा कालावधी लोटला आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर भेदलेल्या पाकिस्तानने भारतीय लष्करप्रमुखांना फोन करून युद्धविरामाची झोळी पसरली होती. शुक्रवारी (१५ ऑगस्ट) स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा उल्लेख केला. पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान वापरलेल्या देशी बनावटीच्या शस्त्रांमुळे भारताची ताकद जगाला दिसली, असे पंतप्रधान म्हणाले. दरम्यान, भारताने पाकिस्तानवर कोणकोणत्या शस्त्रांनी हल्ला केला होता? त्या संदर्भात घेतलेला हा आढावा…
‘ब्रह्मोस’ने पाकिस्तानवर कसा हल्ला केला?
ऑपरेशन सिंदूरदरम्यान १० मे रोजी भारतीय वायुदलाने पाकिस्तानातील हवाई तळांवर अचूक हल्ले केले. त्यावेळी भारताकडील सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र ब्रह्मोसने पहिल्यांदा आपली ताकद दाखवली. ब्रह्मोसमुळे शत्रूदेशाच्या हवाई तळांचे मोठे नुकसान झाले. सरकारी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या हल्ल्यात पाकिस्तानच्या हवाई दलातील सुमारे २० टक्के संसाधने नष्ट झाली. ब्रह्मोस हे क्षेपणास्त्र भारताच्या डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) आणि रशियाच्या NPO Mashinostroyenia यांनी एकत्र विकसित केले आहे. हे भारतातील सर्वांत अत्याधुनिक आणि प्रभावी अचूक हल्ला करणारे शस्त्र आहे. पाणबुडी, जहाज, विमान किंवा जमिनीवरून प्रक्षेपण करण्याची त्याची क्षमता आहे.
जगातील सर्वांत वेगवान सुपरसॉनिक क्षेपणास्त्रांपैकी एक असलेल्या ब्रह्मोसचा वेग मॅक २.८ ते मॅक ३.० (म्हणजे आवाजाच्या वेगापेक्षा जवळपास तीन पट जास्त) आहे. इतक्या वेगामुळे शत्रूला प्रत्युत्तर देण्याची कमी संधी मिळते आणि हवाई संरक्षण यंत्रणेला भेदण्याची क्षमता वाढते. साधारणत: २०० ते ३०० किलो स्फोटके वाहून नेण्याची क्षमता असलेल्या या क्षेपणास्त्रामध्ये अण्वस्त्र डागण्याचीही क्षमता आहे. ब्रह्मोस हे फक्त एक क्षेपणास्त्र नसून, भारताच्या लष्करी सामर्थ्याचा संदेश आहे, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा : ब्रिटिशांनी भारतात वैद्यकीय शिक्षण कसं आणलं? त्यावेळी एमबीबीएसचं शिक्षण किती वर्षांचं होतं?
आकाश क्षेपणास्त्र प्रणालीने पाकिस्तानच्या हल्ल्यांना कसं रोखलं?
भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर अचूक हल्ले केल्यानंतर दुसऱ्या दिवशी इस्लामाबादने प्रतिहल्ला केला. या हल्ल्यात पाकिस्तानने चीन व तुर्कीकडून खरेदी केलेले ड्रोन आणि क्षेपणास्त्र भारतावर डागले. मात्र, आकाश क्षेपणास्त्र प्रणालीने या हल्ल्यांना यशस्वीरीत्या रोखले आणि तिची कार्यक्षमता सिद्ध केली. ही प्रणाली डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने (DRDO) विकसित केलेली असून, भारताच्या बहुस्तरीय हवाई संरक्षण यंत्रणेचा भाग आहे. काही संरक्षण तज्ज्ञ ‘आकाश’ची तुलना इस्रायलच्या प्रसिद्ध आयर्न डोमशी करतात; पण दोन्ही प्रणालींमध्ये महत्त्वाचे फरक आहेत. ‘आकाश’ची खासियत म्हणजे ते एका वेळी चार हवाई लक्ष्यांना २५ किमी अंतरावर हल्ला करू शकते. या प्रणालीमुळे भारताच्या हवाई संरक्षणाची ताकद वाढली असून, ऑपरेशन सिंदूरमध्ये त्याचा प्रभाव दिसून आला आहे.

भारताकडील समर हवाई संरक्षण प्रणाली नेमकी काय?
पाकिस्तानने जेव्हा भारतावर ड्रोन व इतर क्षेपणास्त्रांचा मारा केला, तेव्हा देशाची बहुस्तरीय हवाई संरक्षण प्रणाली तत्काळ सक्रिय झाली होती. त्यामध्ये समर (Surface to Air Missile for Assured Retaliation) या प्रणालीचाही समावेश होता. पाकिस्तानने केलेले सर्व हवाई हल्ले ‘समर’ने यशस्वीरीत्या रोखले आणि इस्लामाबादचे मनसुबे उधळून लावले. ही प्रणाली भारतीय हवाई दल आणि देशांतर्गत संरक्षण उद्योगांनी विकसित केली आहे. ‘समर’मध्ये प्रगत रडार व क्षेपणास्त्र तंत्रज्ञान असून, ते त्वरित प्रतिसाद देऊन अचूक लक्ष्यावर हल्ला करते. शत्रूच्या हल्ल्यांना नष्ट करण्याची क्षमता आधुनिक युद्धात अत्यंत महत्त्वाची ठरत असल्याने ‘समर’ला भारतीय संरक्षण दलामध्ये महत्त्वाचे स्थान आहे.
हेही वाचा : Who is Kim Ju-Ae : किम जोंग उन यांची १२ वर्षांची मुलगी होणार उत्तर कोरियाची नवी हुकूमशाह?
भारताने डी -४ ड्रोननाशक यंत्रणेचा कसा केला वापर?
भारताने पाकिस्तानवर हल्ला करण्यासाठी आकाश (Akash) क्षेपणास्त्र आणि समरबरोबर (Samar) डीआरडीओने विकसित केलेल्या डी-४ या अँटीड्रोन प्रणालीचाही वापर केला. ही ड्रोननाशक यंत्रणा इलेक्ट्रॉनिक जॅमिंग व स्पूफिंग तंत्र वापरणाऱ्या अनमॅन्ड कॉम्बॅट एरियल व्हेइकल्स (UCAVs)विरोधात काम करू शकते. त्याचबरोबर लेसर-निर्देशित ऊर्जा शस्त्रे वापरून शत्रूदेशाच्या ड्रोनचे महत्त्वाचे भाग हवेतच वितळवू शकते. पाकिस्तानने केलेला ड्रोनहल्ला रोखण्यासाठी भारताने डी-४ ही प्रणाली मोठ्या प्रमाणात राबवली असावी आणि म्हणूनच ड्रोनहल्ले थांबवले गेले, असे डीआरडीओचे माजी अध्यक्ष डॉ. जी. सतीश रेड्डी यांनी एनडीटीव्हीला सांगितले. ऑपरेशन सिंदूरमध्ये देशांतर्गत शस्त्रांबरोबरच भारताने इस्रायलसोबत संयुक्त विकसित केलेली शस्त्रेदेखील वापरली होती.
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय उपग्रहांची भूमिका
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय उपग्रहांनीही महत्त्वाची भूमिका बजावली. युद्धाच्या वेळी देशातील नागरिक सुरक्षित राहावेत यासाठी किमान १० उपग्रहांचा वापर करण्यात आला, अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी दिली. पाकिस्तानवरील कारवाईनंतर भारताकडे असलेल्या स्वदेशी बनावटीच्या शक्तिशाली क्षेपणास्त्रांची संपूर्ण जगभरात चर्चा होत आहे. मात्र, असे असले तरीही भारत अजूनही संरक्षण उत्पादनात पूर्ण आत्मनिर्भरतेपासून दूर आहे. त्यामागचे कारण म्हणजे २०२० ते २०२४ दरम्यान शस्त्रांच्या आयातीत भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश ठरला आहे.