scorecardresearch

Premium

पाकिस्तान भिकाऱ्यांची निर्यात करणारा देश कसा बनला? परदेशात ९० टक्के भिकारी पाकिस्तानचे

सौदी अरेबियामधील मुस्लीम धर्मीयांच्या पवित्र मक्का मशिदीच्या दर्शनाला तीर्थयात्रीच्या व्हिसावर जाणारे अनेक पाकिस्तानी नागरिक भीक मागण्याचे काम करतात. परदेशातून अटक करण्यात आलेल्या एकूण भिकाऱ्यांपैकी ९० टक्के भिकारी पाकिस्तानातील असल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे सौदी अरेबिया आणि इराक पाकिस्तानवर नाराज आहेत.

beggars in saudi arabia
पाकिस्तानमधील नागरिक सौदी अरेबिया आणि इराकमध्ये अवैध प्रवास करून भिक मागतात. (Photo – Arab News)

महागाईच्या ओझ्याखाली दबलेल्या संकटग्रस्त पाकिस्तानला आणखी एका नव्या पेचप्रसंगाचा सामना करावा लागत आहे. नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार परदेशात अटक करण्यात आलेले ९० टक्के भिकारी हे पाकिस्तानातून येत असल्याचे समोर आले आहे. सौदी अरेबिया आणि इराक या दोन देशांनी पाकिस्तानातून येणाऱ्या भिकाऱ्यांबद्दल चिंता व्यक्त केल्यामुळे ही समस्या अधिक ठळक झाली आहे. फर्स्टपोस्ट या संकेतस्थळाने या विषयासंबंधीची माहिती गोळा केली आहे. त्यासंबंधी घेतलेला हा आढावा.

परदेशात पाकिस्तानातील भिकारी किती?

डॉन (Dawn) या वृत्तसंकेतस्थळाच्या माहितीनुसार, परदेशात अटक करण्यात आलेल्या भिकाऱ्यांपैकी ९० टक्के भिकारी एकट्या पाकिस्तानातील आहेत. संसदेच्या स्थायी समितीला बुधवारी सांगण्यात आले की, पाकिस्तान सोडून जाणाऱ्या लोकांपैकी सर्वाधिक भिकारीच आहेत. विदेश मंत्रालयाचे सचिव झुल्फिकार हैदर यांनी कुशल आणि अकुशल कामगार देश सोडून जात असल्याची आकडेवारी संसदेत देत असताना भिकाऱ्यांसंदर्भातली आकडेवारी जाहीर केली. हैदर म्हणाले की, सौदी अरेबियामध्ये सध्या तीस लाख पाकिस्तानी आहेत, यूएईमध्ये १५ लाख आणि कतारमध्ये दोन लाख पाकिस्तानी नागरिक आहेत.

vikram kumar doraiswami
भारतीय उच्चायुक्तांना गुरुद्वारात प्रवेश करण्यापासून रोखले; स्कॉटलंडमध्ये खलिस्तानवाद्यांचे कृत्य
india rejects justin trudeau allegations
खलिस्तानवादी हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येचे प्रकरण : ट्रुडोंचा पुराव्यांचा दावा भारताला अमान्य
indians in canada hindu sikh
Indians in Canada: “कॅनडातील हिंदू दहशतीच्या छायेखाली”, भारतावरील आरोपांनंतर कॅनडाच्या खासदाराचा दावा; म्हणाले, “खलिस्तानी…”
Anti-Terrorism Squad action against 3 Bangladeshi citizens living India illegally
बेकायदा भारतात राहणाऱ्या ३ बांगलादेशी नागरिकांच्या विरोधात दहशदवाद विरोधी पथकाची कारवाई; १२ वर्षांपासून भारतात वास्तव्य 

हैदर यांनी संसदेच्या स्थायी समितीला माहिती देताना म्हटले की, अनेक भिकारी तीर्थयात्रेसाठी असलेल्या व्हिसाचा गैरफायदा घेऊन सौदी अरेबिया, इराण आणि इराक येथे जातात. एकदा का तिथे पोहोचले की, मग ते भीक मागायला सुरुवात करतात.

हे वाचा >> विश्लेषण : पाकिस्तान क्रिकेटमध्ये पुन्हा वादाची ठिणगी? नेमके काय घडले?

एक्सप्रेस ट्रिब्यून या संकेतस्थळाने हैदर यांच्या वक्तव्याचा हवाला देताना सांगितले की, पाकिस्तानातून मोठ्या प्रमाणावर भिकारी बाहेर पडत आहेत. ते अनेकदा बोटीतून प्रवास करतात आणि नंतर उमराह आणि व्हिजिट व्हिसाचा गैरवापर करून परदेशातील यात्रेकरूंकडून भीक मागतात. तसेच हैदर पुढे म्हणाले की, पवित्र मशीद मक्का आणि परदेशातील तीर्थक्षेत्राजवळ मोठ्या प्रमाणात पाकिटमारांना अटक करण्यात आली आहे. हे पाकिटमार पाकिस्तानी नागरिक असल्याचे लक्षात आले आहे.

परदेशात असलेल्या एक कोटी नागरिकांमधील एक मोठी संख्या भीक मागण्यात गुंतलेली असल्याचे पाकिस्तानी खासदार झिशान खानझादा यांनी सांगितले आहे.

सौदी अरेबियाकडून पाकिस्तानवर टीका

न्यूज १८ ने दिलेल्या माहितीनुसार, सौदी अरेबियातील अधिकाऱ्यांनी बुधवारी पाकिस्तानला सक्त ताकीद देऊन हज कोट्यासाठी यात्रेकरू निवडताना काळजी घेण्यास सांगितले आहे. सौदी अरेबियाने म्हटले की, अटक केलेले ९० टक्के भिकारी पाकिस्तानातील आहेत. अटक केलेले भिकारी उमराह व्हिसावर पाकिस्तानात आले होते. तसेच पुन्हा पुन्हा गुन्हे करणाऱ्या लोकांना पाकिस्तान सौदीत पाठवत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. सौदी अरेबियाने म्हटले की, आमचे कारागृह तुमच्या देशातील कैद्यांनी भरले आहेत. जीओटीव्हीने (GeoTV) पाकिस्तानातील विदेश सचिव खानजादा यांच्या एका वक्तव्याचा हवाला दिला. त्यात त्यांनी म्हटले की, सौदी आणि इराकच्या राजदूतांनी त्यांच्या कारागृहात पाकिस्तांनी कैद्यांचाच अधिक भरणा झाल्याची तक्रार नोंदविली आहे.

तसेच मक्का मशिदीनजीक असलेल्या मशीद अल-हरम येथे पकडले गेलेले सर्व खिसेकापू चोर (पाकिटमार) पाकिस्तानमधले असल्याचेही सौदीने सांगितले आहे. या लोकांनी उमराह व्हिसाचा गैरवापर करून सौदीत शिरकाव केल्यामुळे सौदीला फार त्रास सहन करावा लागत असल्याचेही सौदीतील अधिकाऱ्यांनी सांगितले. अधिकारी म्हणाले, असे लोक कुशल कामगार नसल्यामुळे आमच्याकडून त्यांना निमंत्रण किंवा रोजगार पत्र दिले जात नाही. त्याऐवजी सौदीतील उद्योग आणि व्यावसायिक भारत आणि बांगलादेशमधील कामगारांवर अवलंबून असतात.

संयुक्त अरब अमिराती अर्थात यूएईने पाकिस्तानमधून येणाऱ्या नागरिकांना व्हिसा बंदी केली होती. डिसेंबर २०२२ मध्ये या व्हिसा बंदीला आणखी मुदतवाढ देण्यात आली. याआधी २२ शहरांमध्ये असलेली व्हिसा बंदी आता वाढवून २४ शहरांसाठी करण्यात आली आहे.

हे वाचा >> UPSC-MPSC : भारत-पाकिस्तान संबंध; इतिहास आणि पार्श्वभूमी

भारत चंद्रावर पोहोचला, आम्ही मात्र तिथेच

हैदर म्हणाले की, भिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने परदेशात अवैध प्रवास केल्यामुळे मानवी तस्करीचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान, डॉनने दिलेल्या माहितीनुसार, हैदर यांनी सांगितले की, अवैध प्रवाशांनी आता जपान देशाला लक्ष्य केले असून तिथे मोठ्या प्रमाणात भिकारी जात आहेत. हैदर पुढे म्हणाले की, सौदी अरेबियाने अकुशल कामगारांपेक्षा कुशल आणि प्रशिक्षित कामगारांना देशात स्थान देण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानात सध्या ५० हजार अभियंते बेरोजगार बसले आहेत, असेही त्यांनी सांगितले. हैदर म्हणाले, भारत चंद्रावर पोहोचला, आम्ही मात्र अजूनही रोजच्या जगण्याचा संघर्ष करत आहोत.

ऑगस्ट महिन्यात पाकिस्तानमधून निर्वासित झालेले माजी पंतप्रधान नवाज शरीफ म्हणाले होते की, भारत चंद्रावर पोहोचला, जी-२० सारखी आंतरराष्ट्रीय शिखर परिषद भारतात आयोजित केली जात आहे आणि आमचा देश मात्र जगाकडून पैशांची भीक मागत फिरत आहे. पाकिस्तानच्या आर्थिक घसरणीला माजी लष्कर अधिकारी आणि न्यायमूर्ती जबाबदार आहेत, असे दोषारोप शरीफ यांनी केला.

पाकिस्तानाची अर्थव्यवस्था गेल्या काही वर्षांपासून रसातळाला पोहोचली आहे. ज्याचे परिणाम देशातील अतिशय खालच्या वर्गात असलेल्या गरीब जनतेला भोगावे लागत आहेत. आज पाकिस्तानचे पंतप्रधान निधी मिळवण्यासाठी देशोदेशी भटकत आहेत, तर दुसऱ्या बाजूला भारत चंद्रावर गेला आहे आणि दिल्लीमध्ये जी-२० सारखी परिषद यशस्वीरित्या आयोजित करत आहे. भारताने जे साध्य केले, ते पाकिस्तानला करणे का शक्य नाही? पाकिस्तानला कंगाल करण्यात कोणाचा हात आहे? सोमवारी (२५ सप्टेंबर) लाहोर येथे झालेल्या पक्षाच्या बैठकीला शरीफ यांनी लंडनहून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले. यावेळी त्यांनी भारताची स्तुती करत असताना पाकिस्तानच्या सत्ताधाऱ्यांवर टीका केली.

पाकिस्तान मुस्लीम लिग-नवाज (PML-N) या पक्षाचे प्रमुख आणि ७३ वर्षीय नेते शरीफ यांनी पुढे म्हटले की, १९९० साली भारताने नवे आर्थिक धोरण स्वीकारले आणि अर्थव्यवस्थेत आमूलाग्र बदल केला, त्याचे अनुकूल परिणाम आज दिसत आहेत.

आणखी वाचा >> “भारत चंद्रावर पोहोचला आणि पाकिस्तान जगाकडे पैशांची भीक मागतोय”, नवाझ शरीफ यांचं विधान

“अटल बिहारी वाजपेयी ज्यावेळी पंतप्रधान झाले होते, तेव्हा भारताकडे काही अब्ज डॉलर्सची परकीय गंगाजळी होती. मात्र, आता भारताकडे ६०० अब्ज डॉलर्सचा परकीय चलनसाठा आहे”, असेही ते म्हणाले.

जुलै २०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला १.२ अब्ज डॉलर्सची रोख रक्कम मदत म्हणून दिली होती. देशातील अर्थव्यवस्थेला पुन्हा उभारी देण्यासाठी पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्थेशी तीन अब्ज डॉलर्सचा करार केला आहे. त्याचा पहिला हप्ता जुलै महिन्यात पाकिस्तानला प्राप्त झाला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Over 90 per cent of beggars arrested in saudi arabia and iraq are pakistan citizen kvg

First published on: 29-09-2023 at 13:29 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×