Lashkar-e-Taiba commander killed लष्कराच्या ‘एलिट पॅरा कमांडों’नी श्रीनगरबाहेर हाती घेतलेल्या ऑपरेशन महादेवला महत्त्वाचे यश मिळाले असून, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार या चकमकीत मारला गेल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. लष्कर-ए-तैयबाचा टॉप कमांडर हाशिम मुसा भारतीय सुरक्षा दलाच्या कारवाईत ठार झाला आहे.

मुसा ऊर्फ सुलेमान शाह हा ऑपरेशन महादेवमध्ये सोमवारी झालेल्या चकमकीत मारल्या गेलेल्या तीन दहशतवाद्यांपैकी एक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. ही चकमक श्रीनगरजवळ झाल्याचे म्हटले जात आहे. दहशतवाद्यांची ओळख अद्याप निश्चित झाली नसली तरी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे तिघे मुसा, यासिर ऊर्फ हॅरिस आणि अबू हमजा असल्याचे सांगण्यात येत आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुलेमान ऊर्फ मुसा हा २२ एप्रिलच्या पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार असल्याचा संशय आहे. कोण आहे हाशिम मुसा? भारतीय सुरक्षा दलांनी त्याचा खात्मा कसा केला? जाणून घेऊयात.

हाशिम मुसा कोण होता?

  • मुसा यापूर्वी पाकिस्तान लष्कराच्या स्पेशल सर्व्हिस ग्रुप (एसएसजी)चा पॅरा-कमांडो होता. लष्कराच्या पदावरून बडतर्फ झाल्यानंतर तो लष्कर-ए-तैयबामध्ये सामील झाला.
  • पाकिस्तान लष्कराने लष्कर-ए-तैयबाच्या काश्मीरमधील कारवाया वाढवण्यासाठी मुसाची भरती केली असल्याचे सांगितले जाते.
  • मुसा हा लष्कर-ए-तैयबाचा एक प्रमुख कमांडर असल्याचे म्हटले जाते. तो गुप्त कारवायांमध्ये निपुण असल्याचेही मानले जाते. त्याला नागरिक आणि सुरक्षा दलांना लक्ष्य करण्यासाठी काश्मीरमध्ये पाठवण्यात आले होते.
  • एका अधिकाऱ्याने ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला सांगितले, “तो पाकिस्तानच्या विशेष दलांकडून, जसे की स्पेशल सर्व्हिस ग्रुपकडून (एसएसजी) लष्कर-ए-तैयबाला भाड्याने दिला गेला असावा.” M4 कार्बाइनसह प्रगत शस्त्रे वापरणे हा त्याच्या विशेष प्रशिक्षणाचा भाग होता. अधिकाऱ्याने सांगितले की, मुसाची पार्श्वभूमी दर्शवते की, आयएसआयच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यात तो सहभाग होता.
पहलगाममधील दहशतवादी हल्ला २०१९ च्या पुलवामा हल्ल्यानंतरचा या प्रदेशातील सर्वात मोठा हल्ला होता. (छायाचित्र-एपी)

तो काश्मीरमधील गागांगीर आणि बारामुल्ला येथील हल्ल्यांसह इतर अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये सामील असल्याचे सांगितले जाते. ऑक्टोबर २०२४ मध्ये घडलेल्या पहिल्या घटनेत एका डॉक्टरांसह सात जणांचा मृत्यू झाला होता. दुसऱ्या घटनेत दोन लष्करी जवान आणि दोन लष्करी पोर्टर यांची हत्या करण्यात आली होती. मुसाने या हल्ल्यांसाठी आपला वेश बदलल्याचे आणि वजन कमी केल्याचे सांगितले जाते. तो गेल्या दोन वर्षांपासून भारतात राहात असल्याची माहितीही अधिकाऱ्यांनी दिली. “आमचा विश्वास आहे की मुसा हा सांबा आणि कठुआ भागातून बेकायदा पद्धतीने भारतात आला आणि नंतर किश्तवाडमध्ये गेला. या दहशतवाद्यांना स्थानिक मदत मिळत नाही, त्यामुळे ते बहुतेकदा घनदाट जंगले, गुहांमध्ये किंवा तंबूंमध्ये राहतात आणि फिरत राहतात, त्यामुळेच मुसाला यापूर्वी अटक करण्यात आली नाही,” असे एका सूत्राने ‘द प्रिंट’ला सांगितले होते.

मुसा मुख्यतः काश्मीरमधील बुदगाम जिल्ह्यात श्रीनगरजवळ कार्यरत असल्याचे सांगितले जाते. तो खोऱ्यात कार्यरत असणाऱ्या इतर पाकिस्तान-समर्थित दहशतवादी संघटनांशी समन्वय साधत असल्याचे म्हटले जाते. त्याची पार्श्वभूमी लष्कर-ए-तैयबाच्या काश्मीरमधील एका ओव्हर ग्राउंड वर्करने उघड केल्याचेही सांगितले जाते. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय अधिकाऱ्यांनी अशा अनेक ओव्हर ग्राउंड वर्कर्सला अटक केली होती. या व्यक्तींनी पाकिस्तानी दहशतवाद्यांना आवश्यक असलेल्या वस्तू पुरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे सांगितले जाते. त्यांनी दहशतवादी हल्ल्याच्या जागेची पाहणीदेखील केली असल्याचे सांगितले जाते.

मुसाला सुरक्षा दलांनी कसे ठार केले?

भारतीय लष्कर, जम्मू-काश्मीर पोलिस आणि केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) यांनी ऑपरेशन महादेव ही मोहीम हाती घेतली. या मोहिमेला श्रीनगरमधील महादेव शिखराचे नाव देण्यात आले. श्रीनगरच्या हरवान भागातील दाचीगम वनक्षेत्राच्या वरच्या भागात ही चकमक झाली. भारतीय लष्कर या भागावर लक्ष ठेवून असल्याचे सांगितले जाते. जुलैच्या सुरुवातीला भारतीय लष्कराला एक संदेश मिळाला, जो त्यांना संशयास्पद वाटला. सुरक्षा दल दहशतवाद्यांच्या हालचालींवर लक्ष ठेऊन असल्याचे सांगितले जाते. २४ राष्ट्रीय रायफल्स, जम्मू-काश्मीर पोलिस, केंद्रीय राखीव पोलिस दल आणि ‘४ पॅरा’ जवानांचा समावेश असलेले पथक गेल्या दोन आठवड्यांपासून दाचीगममध्ये शोधमोहीम राबवत होते. पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांनी वापरलेल्या उपकरणासारखेच तांत्रिक संकेत त्यांच्याकडून मिळाल्यानंतर जवानांनी हरवानच्या जंगलात कारवाई सुरू केली.

लष्कर-ए-तैयबा अनेकदा चिनी बनावटीची उपकरणे वापरून एन्क्रिप्टेड संदेश पाठवते. हे डिव्हाइस हुआवे सॅटेलाइट फोन असल्याचे मानले जाते. संदेश मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी दहशतवादी लपले असलेल्या ठिकाणाला घेरा घातला. मुनार गावात शोधमोहीम सुरू असताना, दहशतवाद्यांना घेरा घातलेल्या ठिकाणाहून गोळीबार सुरू झाला. या वेळी लष्कराने प्रत्युत्तरादाखल गोळीबार सुरू केला. त्यात तिघे दहशतवादी मारले गेले. भटक्या लोकांकडून मिळालेल्या माहितीनेही सुरक्षा दलांना दहशतवाद्यांचा माग काढण्यास मदत झाली. २४ राष्ट्रीय रायफल्स आणि ‘४ पॅरा’च्या संयुक्त पथकाला दहशतवादी सापडले. जंगलातील दहशतवाद्यांच्या लपलेल्या ठिकाणाच्या छायाचित्रामध्ये एक मोठी हिरवी चादर दिसली. त्याखाली कपडे, ब्लँकेट, प्लास्टिकच्या पिशव्या, अन्न आणि प्लेट्स विखुरलेल्या दिसल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“या चकमकीत मारले गेलेले दहशतवादी २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू आणि काश्मीरमधील बैसरन व्हॅली परिसरात झालेल्या क्रूर पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सामील असण्याची दाट शक्यता आहे. या हल्ल्यात २६ निरपराध नागरिकांचा बळी गेला,” असे एका उच्चस्तरीय सूत्राने ‘इंडिया टुडे’ला सांगितले. इतर दहशतवाद्यांना शोधण्याचे ऑपरेशन सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. “गोळीबारात तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे. ऑपरेशन सुरू आहे,” असे चिनार कॉर्प्सने ‘एक्स’वर लिहिले. २२ एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर २६ पर्यटक मारले गेले आणि इतर अनेक जण जखमी झाले. हा दहशतवादी हल्ला २०१९ च्या पुलवामा हल्ल्यानंतरचा या प्रदेशातील सर्वात मोठा हल्ला होता.