Indias BrahMos vs Pakistan Fateh-4 Missile : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रत्युत्तरादाखल भारताने ऑपरेशन सिंदूर राबवीत पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अनेक तळ उद्ध्वस्त केले. या मोहिमेत भारताच्या ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्राची ताकद सगळ्या जगाने पाहिली. ऑपरेशन सिंदूरनंतर बिथरलेल्या पाकिस्तानने आता आपली संरक्षण यंत्रणा मजबूत करण्याचे ठरविले आहे. मंगळवारी पाकिस्तानी लष्कराने ‘फतेह-४’ या स्वदेशी बनावटीच्या क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. हे क्षेपणास्त्र भारताच्या ‘ब्रह्मोसला रोखण्यात १०० टक्के यशस्वी ठरणार असल्याचा दावा पाकिस्तानकडून केला जात आहे. दरम्यान, पाकिस्तानने ‘फतेह-४’ क्षेपणास्त्र कसे तयार केले? ‘ब्रह्मोस’ आणि त्यामध्ये नेमका काय फरक आहे? त्या संदर्भात घेतलेला हा आढावा…

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील नुकत्याच झालेल्या संघर्षात भारताने ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा वापर केल्याचा दावा पाकिस्तानी लष्कराने केला होता. या क्षेपणास्त्रामुळे पाकिस्तानच्या हवाई तळाचे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले होते. ‘ब्रह्मोस’ला भारतीय लष्कराचे एक शक्तिशाली शस्त्र मानले जाते. हे एक सुपरसॉनिक क्रूझ मिसाईल असून ते पाणबुडी, जहाज, एअरक्राफ्ट किंवा जमिनीवरूनही सोडता येऊ शकते. ‘ब्रह्मोस’चा वापर करून भारताने आमची सुरक्षा यंत्रणा भेदली आणि १३ पैकी ११ तळ उद्ध्वस्त केल्याचा आरोप पाकिस्तानकडून करण्यात आला होता.

पाकिस्तानचे ‘फतेह ४’ क्षेपणास्त्र किती घातक?

पाकिस्तानचे ‘फतेह ४’ हे एक लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र असून, ते जमिनीवरून हवेत अचूक मारा करू शकते. या क्षेपणास्त्राची एकूण लांबी ७.५ मीटर असून, त्याचे वजन सुमारे १,५३० किलो असल्याचे सांगितले जाते. ‘फतेह ४’ची मारक क्षमता ७५० किलोमीटपर्यंत असून, त्यात सुमारे ३३० किलो वजनाचे वॉरहेड बसवले जाऊ शकते. हे क्षेपणास्त्र फक्त अण्वस्त्रासाठीच नव्हे, तर पारंपरिक शस्त्रास्त्र वाहून नेण्यासाठी तयार करण्यात आले आहे. ‘फतेह ४’ शत्रूच्या रडारला चकवून सहजपणे त्यांची सुरक्षा यंत्रणा भेदू शकते. त्याची अचूकता आणि रडारला चकवण्याच्या क्षमतेमुळे ते विशेष महत्त्वाचे ठरते, असे पाकिस्तानी लष्करातील एका अधिकाऱ्याने सांगितले. अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे ’फतेह ४’ शत्रूच्या क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीला भेदण्यास सक्षम असल्याचे त्यांनी म्हटले. या क्षेपणास्त्रामध्ये आधुनिक इलेक्ट्रॉनिक यंत्रणा आणि दिशादर्शक साधने बसविण्यात आली आहेत. त्यामुळे ते शत्रूच्या क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीला सहजपणे लक्ष्य करू शकते.

आणखी वाचा : भारत-पाकिस्तान संघर्षाचा नवा केंद्रबिंदू कराचीजवळ? काय आहे ‘सर खाडी’ सागरी सीमावाद? 

‘फतेह ४’ क्षेपणास्त्राची मारक क्षमता किती?

‘फतेह ४’ क्षेपणास्त्राचे वैशिष्ट्य म्हणजे ते आवाजाच्या वेगापेक्षा तिप्पट (मॅक ०.७ म्हणजेच ताशी सुमारे ८६५ किलोमीटर) वेगाने लक्ष्याचा वेध घेते. कठीण परिस्थितीतही लक्ष्यावर अचूकपणे प्रहार करण्यासाठी ’फतेह ४’मध्ये इलेक्ट्रॉनिक काउंटर मेझर्स व कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. हे क्षेपणास्त्र ‘Transporter-Erector-Launcher’ या वाहनातून डागता येते. त्यामध्ये घन पदार्थांचा (इंधन आणि ऑक्सिडायझर) वापर करून रॉकेटला गती देणारी प्रणाली असल्यामुळे हे क्षेपणास्त्र झटपट प्रक्षेपणासाठी सज्ज होते. या नवीन क्षेपणास्त्रामुळे लष्कराच्या रॉकेट फोर्स कमांडची पारंपरिक क्षेपणास्त्र यंत्रणा अधिक मजबूत होईल आणि लष्कराची ताकद वाढेल, असा दावा पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी केला आहे. ‘फतेह ४’ च्या आधी पाकिस्तानने फतेह १ व फतेह २ ही लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे विकसित केलेली आहे. त्याशिवाय पाकिस्तानकडे अब्दाली ही जमिनीवर मारा करणारी प्रगत शस्त्र प्रणाली आहे.

‘फतेह ४’ भारताच्या ‘ब्रह्मोस’ला खरंच रोखणार?

भारताकडील ब्रह्मोस हे जगातील सर्वांत वेगवान सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रांपैकी एक आहे. भारताने रशियाबरोबर भागीदारी करून हे क्षेपणास्त्र विकसित केले आहे. भारताच्या ब्रह्मपुत्रा आणि रशियाच्या मॉस्क्वा नदीवरून त्याला ब्रह्मोस हे नाव देण्यात आले आहे. या क्षेपणास्त्राचे वैशिष्ट्य म्हणजे ते आवाजाच्या वेगापेक्षा तिप्पट वेगाने मार्गक्रमण करते. हा वेगच त्याला अत्यंत घातक आणि शत्रूच्या रडारमध्ये कधीच न दिसणारे क्षेपणास्त्र म्हणून ओळख देतो. त्याचे लक्ष्य इतके अचूक आहे की, २९० किलोमीटरच्या अंतरावरूनही ते शत्रूची ठिकाणे उद्ध्वस्त करू शकते. सध्या पाकिस्तानकडे असलेली कोणतीही क्षेपणास्त्रे ‘ब्रह्मोस’ला रोखू शकत नाहीत, असे संरक्षण तज्ज्ञांचे म्हणणे आहे. फतेह ४ हे क्षेपणास्त्र ब्रह्मोसला रोखणार, असा पाकिस्तानी लष्कराने केलेला दावा हास्यास्पद असल्याचे भारतीय लष्करातील एका माजी अधिकाऱ्याने सांगितले आहे.

पाकिस्तानचे अब्दाली क्षेपणास्त्र किती घातक?

याआधी पाकिस्तानने जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या अब्दाली क्षेपणास्त्राची चाचणी केली होती. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता ताशी ४५० किलोमीटर असल्याचे सांगितले जाते. पाकिस्तानकडून मे महिन्यात या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली होती. या प्रक्षेपणाचे उद्दिष्ट सैन्याची ऑपरेशनल तयारी सुनिश्चित करणे, क्षेपणास्त्राची प्रगत नेव्हिगेशन प्रणाली व तांत्रिक पॅरामीटर्सची पडताळणी करणे हे होते, आयएसपीआर (Inter-Services Public Relations) ने एका प्रसिद्धी पत्रकामध्ये म्हटले होते. पाकिस्तानमधील विश्लेषकांनी ‘एएफपी’ला सांगितले की, या क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण हा भारतासाठी एक इशारा होता. आमच्याकडे भारताचा प्रतिकार करण्यासाठी पुरेशी संसाधने आहेत. हा केवळ भारतासाठीच नव्हे, तर जगासाठी संदेश आहे, असे पाकिस्तानी लष्करी विश्लेषक हसन अस्करी रिझवी यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : Cancer Symptoms : महाराष्ट्रातही वाढतोय कॅन्सरचा धोका,’या’ १० लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष नको; तज्ज्ञ काय सांगतात? 

आर्थिक संकटातही पाकिस्तानने वाढवला संरक्षण खर्च

दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानमध्ये सध्या महागाईचा वणवा पेटला आहे. भारताविरोधात नेहमीच कुरापती करणारा हा देश सध्या दिवाळखोरीच्या खाईत सापडला आहे. दिवसेंदिवस महागाई वाढत असल्याने पाकिस्तानमधील लोकांचे जगणे कठीण झाले आहे. देशावर आर्थिक संकट असतानाही पाकिस्तानकडून संरक्षण खर्चात २० टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यासाठी पाकिस्तानने ‘आयएमएफ’ आणि आशियाई विकास बँकेकडून १.८ अब्ज डॉलर्सचे कर्ज घेतले आहे. भारताने या गोष्टीवर टीका केली असून, पाकिस्तान हे कर्ज विकासासाठी नाही, तर दहशतवादाला खतपाणी घालण्यासाठी वापरत असल्याचे म्हटले आहे.