scorecardresearch

विश्लेषण : इम्रान खान यांच्याविरोधात अटक वॉरंट, पाकिस्तानमधील ‘तोशखाना प्रकरण’ नेमकं काय?

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान चांगलेच अडचणीत सापडले आहेत. त्यांच्याविरोधात इस्लामाबाद सत्र न्यायालयाने मंगळवारी (२८ फेब्रुवारी) अजामीनपात्र अकट वॉरंट जारी केलं आहे.

PAKISTAN FORMER PM IMRAN KHAN
इम्रान खान (फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान चांगलेच अडचणीत सापडले आहेत. त्यांच्याविरोधात इस्लामाबाद सत्र न्यायालयाने मंगळवारी (२८ फेब्रुवारी) अजामीनपात्र अकट वॉरंट जारी केले आहे. तोशखाना खटल्याशी निगडित हे वॉरंट जारी करण्यात आले आहे. दरम्यान, इम्रान खान यांच्याविरोधातील तीन वेगवेगळ्या खटल्यांवर वेगवेगळ्या न्यायालयांत सुनावणी सुरू आहे. असे असतानाच इस्लामाबाद न्यायालयाने अजामीपात्र अटक वॉरंट जारी केल्यामुळे इम्रान खान यांच्या अडचणींत वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर इम्रान खान यांच्याविरोधातील वेगवेगळे खटले काय आहेत? न्यायालयातील सुनावणी आतापर्यंत कुठपर्यंत पोहोचली आहे? याबाबत जाणून घेऊ या.

एकाच ठिकाणी चार न्यायालयांत हजर राहण्याचा आदेश

इम्रान खान यांच्याविरोधातील तोशखाना प्रकरण, दहशतवादाचे प्रकरण, खुनाचा प्रयत्न, प्रतिबंधित संस्थांकडून निधी मिळवणे अशा वेगवेगळ्या प्रकरणांची सुनावणी न्यायालयात सुरू आहे. इम्रान खान यांच्याविरोधात इस्लामाबाद कोर्टाने २८ फेब्रुवारी रोजी अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले, त्याच दिवशी इतर तीन न्यायालयांनी वरील प्रकरणांत जामीन मंजूर केला आहे. २८ फेब्रुवारी रोजी इम्रान खान यांना या सर्वच न्यायालयांत हजेरी लावायची होती. याच कारणामुळे इम्रान खान यांच्या वकिलाने त्यांना अनुपस्थित राहण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती इस्लामाबाद कोर्टाकडे केली होती. मात्र ही विनंती अमान्य करण्यात आली आणि इम्रान खान यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण: घटता ग्राहक-उपभोग अधिक चिंताजनक का?

इम्रान खान यांच्याविरोधात अजामीनपात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्या पाकिस्तान तहरिक ए इन्साफ (पीटीआय) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी इस्लामाबाद न्यायालयासमोर गर्दी केली होती. येथे तोडफोडीची घटना घडली. परिणामी कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून तेथील पोलिसांनी पीटीआय पक्षाच्या २५ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते.

तोशखाना खटला काय आहे?

पाकिस्तानमध्ये सध्या तोशखाना प्रकरणाची चांगलीच चर्चा होत आहे. याच प्रकरणात इस्लामाबाद कोर्टाने इम्रान खान यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे. मुळात तोशखाना हे पाकिस्तानधील एका शासकीय विभागाचे नाव आहे. लोकप्रतिनिधींना ठिकठिकाणी दिल्या जाणाऱ्या भेटवस्तू तोशखाना विभागात जमा कराव्या लागतात. इम्रान खान यांनी त्यांना मिळाळेल्या मौल्यवान भेटवस्तू विकल्या असून त्यातून पैसे मिळवले. तसेच त्यांनी मिळालेल्या भेटवस्तूंची माहिती तोशखाना विभागाकडे उघड न केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. इम्रान खान २०१८ साली पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले होते. तेव्हापासून त्यांना वेगवेगवळ्या देशांकडून मौल्यवान वस्तू भेट म्हणून देण्यात आल्या. मात्र या भेटवस्तूंची माहिती त्यांनी तोशखाना विभागाला दिलेली नाही. तसे केले तर पाकिस्तानचे इतर देशांशी असलेले संबंध बिघडतील, असा दावा इम्रान खान यांच्याकडून केला जातो. हाच मुद्दा घेऊन विरोधकांनी त्यांच्यावर आरोप केलेले आहेत.

हेही वाचा >>> विश्लेषण: संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत नित्यानंदचा देश सहभागी झाला? ‘युएस ऑफ कैलासा’ या देशाबद्दलची माहिती जाणून घ्या

इम्रान खान यांच्याविरोधातील दहशतवादाचा खटला

तोशखाना प्रकरणानंतर पाकिस्तानी निवडणूक आयोगाने इम्रान खान यांना २१ ऑक्टोबर २०२२ रोजी पाच वर्षांसाठी सार्वजनिक कार्यालय सुरू ठेवण्यास मज्जाव केला होता. त्यानंतर पीटीआयच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा धारण करत काही ठिकाणी तोडफोड केली होती. तसेच कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत बाचाबाचीदेखील झाली होती. या घटनेनंतर इम्रान खान यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. इम्रान खान यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना तोडफोड करण्यास प्रोत्साहित केल्याच आरोप करण्यात आला होता. याच प्रकरणात दहशतवादविरोधी न्यायालयात इम्रान खान यांच्याविरोधात दहशतवादी कृत्ये घडवून आणण्याबाबतच्या खटल्यावर सुनावणी सुरू आहे. न्यायालयाने त्यांना ९ मार्चपर्यंत जामीन मंजूर केला आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण : दिल्ली मद्य घोटाळ्यात के. कवितांचे नाव, १०० कोटींची लाच? जाणून घ्या ‘दक्षिण गटा’चा उल्लेख का केला जातोय?

खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप

इम्रान खान यांच्याविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. पाकिस्तान मुस्लीम लीगचे (एन) नेते मोहसीन शाहनवाज रांझा यांनी याबाबतची तक्रार दाखल केली होती. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर झालेली मोडतोड आणि निदर्शनांदरम्यान पोलिसांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप रांझा यांनी केलेला आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या सांगण्यावरून हा हल्ला करण्यात आला होता, असे रांझा यांनी आपल्या तक्रारीत म्हटलेले आहे. या प्रकरणातही इम्रान खान यांना न्यायालयाने अंतरिम जामीन दिलेला आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-03-2023 at 14:42 IST