Satellite images of Pakistan Navy fled from Karachi: ६ आणि ७ मेच्या दरम्यान रात्री भारताने पाकिस्तान व पाकव्याप्त जम्मू काश्मीरमधील दहशतवादाशी संबंधित नऊ ठिकाणांवर हल्ले केले. त्यानंतर नवी दिल्लीतून इस्लामाबादच्या डीजीएमओंना (DGMO) कळवण्यात आलं होतं की, मोहिम पूर्ण झाली आहे. मात्र, पाकिस्तानने त्यानंतर प्रत्युत्तर देण्याची भाषा केली होती. परंतु, काही सॅटेलाइट इमेजेसनी पाकिस्तानचं बिंग फोडण्याचं काम केलं आहे. या उपग्रह छायाचित्रांमध्ये कराची व ग्वादर बंदरांवर असलेल्या पाकिस्तानी नौदलाच्या युद्धनौकांनी ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान बचावात्मक भूमिका स्वीकारली होती, हे स्पष्ट दिसत आहे, असं इंडिया टुडेने केलेल्या विशेष रिपोर्ताजमध्ये म्हटलं आहे.
संघर्ष शिगेला पोहोचला त्यावेळेस पाकिस्तानी नौदलाच्या (PN) युद्धनौका कराचीतील नौदल गोदीतून हलवून त्यांची रवानगी व्यापारी टर्मिनल्सवर करण्यात आली होती. दरम्यान, इतर काही युद्धनौका भारताच्या दिशेने पूर्वेकडे सरकण्याऐवजी इराणच्या सीमेपासून अवघ्या १०० किमी अंतरावर असलेल्या त्यांच्या पश्चिमेकडील ग्वादर बंदरात आश्रयास होत्या, हेही पुरते स्पष्ट झाले आहे.
वरिष्ठ लष्करी भारतीय अधिकाऱ्यांनी तणावाच्या काळात पाकिस्तानी नौदलाच्या कार्यतत्परतेवर (Operational Readiness) प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दक्षिणी नौदल कमांडचे माजी प्रमुख आणि १९७१ मध्ये कराची बंदरावर झालेल्या धाडसी हल्ल्यात प्रत्यक्ष सहभागी असलेले व्हाइस अॅडमिरल एस. सी. सुरेश बंगारा (निवृत्त) म्हणाले, “७ मे रोजी दहशतवादी तळांवर भारताने हल्ला केलेला असताना पाकिस्तानी सैन्याचे तिन्ही भाग पूर्णपणे सतर्क असायला हवे होते. प्रत्यक्षात पाकिस्तानच्या आघाडीच्या युद्धनौका त्यावेळेस बंदरातच ठाम मांडून असलेल्या दिसतात. त्यांच्या कार्यतत्परतेच्या कमतरतेचं हे स्पष्ट दर्शनच आहे.” त्यांनी पुढे असेही नमूद केले की, पाकिस्तानी नौदलाच्या युद्धनौका व्यापारी टर्मिनल्सवर नेण्याच्या हालचाली आणि ऑपरेशनदरम्यान व्यावसायिक विमानांच्या आड लढाऊ विमानांचं उड्डाण करण्याच्या कृती यामध्ये एक ठरावीक पॅटर्न दिसतो. ते म्हणतात, “व्यापारी बंदर क्षेत्रात युद्धनौका उभ्या करणे म्हणजे क्षेपणास्त्र हल्ल्यांपासून वाचण्याचा प्रयत्न आहे. यासोबतच व्यावसायिक उड्डाणांच्या जवळपास लढाऊ विमानांचं उड्डण करण्याची कृती हे दाखवते की, पाकिस्तान आपल्या नागरी मालमत्तेचा बळी देण्याची अथवा त्याआडून प्रहार करण्याची प्रवृत्ती राखतो.”
इराणी सीमेच्या जवळ पाकिस्तानी युद्धनौकांचा आश्रय
‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू होण्याच्या अवघ्या सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तान नौदलाने मोठ्या थाटामाटात घोषणा केली होती. त्यांनी दावा केला होता की, त्यांनी स्वदेशी बनावटीचे P282 बॅलिस्टिक क्षेपणास्त्र तयार केलं आहे. हे क्षेपणास्त्र जहाजावरून डागता येतं, त्याची रेंज ३५० किमी आहे आणि ते अगदी अचूक प्रहार करू शकतं, . एवढंच नाही, तर चीनमध्ये तयार केलेल्या झुल्फिकार-श्रेणीच्या युद्धनौकेवरून क्षेपणास्त्र डागतानाचा व्हिडिओही त्यांनी प्रसारित केला होता. पण, मे २०२५ मध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू झालं, तेव्हा परिस्थिती वेगळीच होती. मॅक्सर टेक्नॉलॉजीजच्या उपग्रह छायाचित्रांतून दिसतं की, पाकिस्तानच्या झुल्फिकार-श्रेणीच्या अर्ध्या युद्धनौका आणि इतर जहाजं पश्चिमेकडच्या ग्वादर बंदरात लपवून ठेवण्यात आली. हे बंदर इराणी सीमेपासून फक्त १०० किमी अंतरावर आहे. चीन– पाक आर्थिक कॉरिडॉरचं ‘क्राउन ज्वेल’ मानलं जाणारं ग्वादर बंदर त्या वेळी पाकिस्तानसाठी नौदलाचं तात्पुरतं आश्रयस्थान ठरलं होतं.
१० मेपर्यंत ग्वादर बंदरातील कंटेनर ठेवायचं क्षेत्र पूर्ण रिकामं होतं. पण धक्क्यावर मात्र पाकिस्तानी युद्धनौकांचीच लगबग होती. त्यात दोन झुल्फिकार-श्रेणीच्या युद्धनौका होत्या. शिवाय, पाकिस्तानची सर्वात मोठ्या तुघरिल-श्रेणीतील दोन फ्रिगेट्स, अमेरिकेत तयार झालेली त्यांची एकमेव ऑलिव्हर हॅझर्ड पेरी-श्रेणीची फ्रिगेट आणि दोन सागरी गस्तीनौका अशा युद्धनौकांची रांग लागली होती.
याबाबत निवृत्त व्हाइस अॅडमिरल बंगारा यांनी निरीक्षण नोंदवलं की, “ग्वादरसारख्या ठिकाणी व्यापारी हालचाली नसताना एवढ्या मोठ्या युद्धनौका ठेवणं हे चुकीचं पाऊल होतं. अशा युद्धनौका लगेच नजरेत येतात. खरं तर समुद्रात पाकिस्तानची खरी ताकद ही त्यांची पाणबुडीची क्षमता असावी, असं स्पष्ट दिसतं.”
दरम्यान, इंटेल लॅबचे जिओ-इंटेलिजन्स तज्ज्ञ डेमियन सायमन यांनी सांगितलं की, “ऑपरेशन सिंदूर’दरम्यान भारताची पहिली स्वदेशी विमानवाहू नौका आयएनएस विक्रांतने (INS Vikrant) आपलं पहिलं युद्धमोहिमेचं तैनाती अभियान पूर्ण केलं. अरबी समुद्रात तिच्या हालचाली पाकिस्ताननं स्वतःच जाहीर केल्या. यावरून नवी दिल्लीने उत्तरेकडील पाण्यात जबरदस्त दबाव निर्माण केला होता, हे स्पष्ट होतं. भारत सैनिकी कारवाईसाठी सज्ज होतोय, हे लक्षात आल्यावर पाकिस्ताननं आपला ताफा आधीच वेगवेगळ्या व्यापारी बंदरांवर हलवला, जेणेकरून तणाव वाढला किंवा अचानक संकट आलं, तर हानी टाळता येईल.”
कराचीतील व्यापारी टर्मिनल्सवर युद्धनौका
उपग्रह छायाचित्रांनुसार (८ मे), कराचीची नौदल गोदी अनपेक्षितरीत्या रिकामी दिसत होती, तर सर्व युद्धनौका व्यापारी मालवाहू टर्मिनल्सवर उभ्या करण्यात आल्या होत्या. ढगांच्या आच्छादनामुळे दृश्य अंशतः अस्पष्ट असलं तरी, पाकिस्तानी नौदलाच्या किमान चार युद्धनौका व्यापारी बंदरांवर आणि कंटेनर टर्मिनलजवळ असल्याचं स्पष्ट दिसतं. या छायाचित्रांमध्ये पीएनएस आलमगीर, बाबर-श्रेणीतील एक कार्व्हेट आणि एक डॅमन ऑफशोर गस्तीनौका (OPV) व्यापारी बंदरावर थांबलेल्या दिसतात, त्यांच्यापासून अगदी जवळ काही मीटर अंतरावर माल लोड/ अनलोड सुरू असलेलं एक व्यापारी जहाज होतं आणि आजूबाजूला कंटेनर्सचा पसारा दिसत होता. आणखी एक नौदल फ्रिगेट नौदल गोदीऐवजी कंटेनर टर्मिनलवर उभी होती.
व्हाइस अॅडमिरल बंगारा यांचे निरीक्षण
व्हाइस अॅडमिरल (निवृत्त) एस. सी. सुरेश बंगारा यांनी म्हटलं आहे की, “तिन्ही सैन्यदलांच्या एकत्रित सैन्यरचनेत पाकिस्तानी नौदलाचा आवाज अत्यल्प किंवा जवळपास नगण्य आहे. याउलट भारताच्या तिन्ही दलांनी एकत्रित संयुक्त मोहीम आखून आणि राबवून ‘ऑपरेशन सिंदूर’ची सर्व उद्दिष्टं साध्य करत एक आदर्शच घालून दिला. परिस्थिती हाताळताना आपण दिलेल्या स्पष्ट संदेशामुळे, समुद्रातून एकही क्षेपणास्त्र न डागताही ही जलद मोहीम संपुष्टात आली.”
ते पुढे म्हणाले, “भारतीय नौदलाने मोठा आणि थेट हल्ला केला असता, तर पाकिस्तानी नौदलाच्या सागरी ताकदीचं नुकसान तितकंच झालं असतं, जितकं १० ऑगस्टला त्यांच्या हवाई दलाच्या (PAF) तळांवर झालं होतं. खरं तर, संयुक्त मोहिमा म्हणजे दीर्घकाळ चालणाऱ्या युद्धासाठी शस्त्रसाठा वाचवून सर्वोत्तम परिणाम मिळवण्याची नीति असते. आणि हे लक्षात ठेवा ..‘ऑपरेशन सिंदूर’ तात्पुरतं थांबलं म्हणजेच विराम घेतला आहे, ते संपलेलं नाही.”
ग्वादारची नवी भूमिका
जिओ-इंटेलिजन्स संशोधक डेमियन सायमन म्हणाले, “ऑपरेश सिंदूरच्या वेळी पाकिस्तानी नौदल तणावाखाली होतं. त्यांच्या पाणबुडी ताफ्यातील अनेक पाणबुड्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी धक्क्यावर आल्या होत्या त्यामुळे समुद्राखाली प्रतिकार करण्याची ताकद क्षीण झालेली होती. त्यामुळे ग्वादार या व्यापारी बंदराला तात्पुरतं नौदलाचं बॅकअप ठिकाण बनवण्यात आलं. ६०० मीटर लांबीचा धक्का युद्धनौकांनी भरून गेला होता आणि ऑफशोर रिफ्युएलिंग टँकर्सही तिथेच लावले होते. त्यामुळे कराचीसारख्या असुरक्षित ठिकाणापासून दूर, इस्लामाबादला एक पुढे सुरक्षित तळ मिळाला.”
भारतीय नौदलाची तयारी
मे २०२५ मधल्या संयुक्त पत्रकार परिषदेत व्हाइस अॅडमिरल ए. एन. प्रमोद यांनी सांगितलं की, “भारतीय नौदल अरबी समुद्रात आघाडीवर तैनात होतं. आम्ही निर्णायक भूमिका घेण्यासाठी पूर्ण सज्ज होतो आणि समुद्रात व जमिनीवर कराचीसह निवडक लक्ष्यांवर हल्ला करण्याची क्षमता आमच्याकडे होती. परिस्थितीची गरज भासली असती, तर आम्ही कराचीवर हल्ला करण्यास तयार होतो.”
नवीन उपग्रह छायाचित्रांमधून एक गोष्ट स्पष्ट दिसते की, संघर्षाच्या काळात पाकिस्तानी नौदल ताफा एकतर विखुरलेला होता किंवा व्यापारी टर्मिनल्सच्यामागे लपवून ठेवण्यात आला होता. ग्वादार ही पाकिस्तानी नौदलासाठीची पळवाटच ठरली होती.