India BrahMos vs Germany IRIS-T : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवित पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अनेक अड्डे उद्ध्वस्त केले. भारताच्या या कारवाईला पाकिस्तानने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला; मात्र भारतीय सैन्यदलाने तो यशस्वीरित्या हाणून पाडला. ऑपरेशन सिंदूरनंतर बिथलेल्या पाकिस्तानने आता आपली हवाई यंत्रणा मजबूत करण्याचे ठरविले आहे. भारताकडे असलेल्या ‘ब्रह्मोस’ या क्षेपणास्त्राचा पाकिस्तानने चांगलाच धसका घेतला आहे. ‘ब्रह्मोस’ला रोखण्यासाठी पाकिस्तान जर्मनीकडून ‘IRIS-T SLM’ ही हवाई संरक्षण प्रणाली खरेदी करण्याचा विचार करीत आहे. दरम्यान, नेमकी काय आहे ही संरक्षण प्रणाली? ती ब्रह्मोस’ला रोखू शकते का? याबाबत जाणून घेऊ…
भारत-पाकिस्तानमधील नुकत्याच झालेल्या संघर्षात भारताने ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा (मिसाइल) वापर केल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. ब्रह्मोसला भारतीय लष्कराचं एक शक्तिशाली शस्त्र मानलं जातं. हे एक सुपरसॉनिक क्रूझ मिसाइल असून ते पाणबुडी, जहाज, एअरक्राफ्ट किंवा जमिनीवरूनही सोडता येऊ शकतं. ब्रह्मोसचा वापर करून भारताने आमच्या हवाई दलाची सुरक्षा भेदली आणि १३ पैकी ११ तळे उद्ध्वस्त केली, असा आरोप पाकिस्तानकडून करण्यात येत आहे.
‘ब्रह्मोस’चे सामर्थ्य आणि पाकिस्तानची भीती
भारताकडे असलेलं ब्रह्मोस हे जगातील सर्वात वेगवान सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रांपैकी एक आहे. भारताने रशियासोबत भागीदारी करून हे क्षेपणास्त्र विकसित केलं आहे. भारताच्या ब्रह्मपुत्रा आणि रशियाच्या मॉस्क्वा नदीवरून त्याला ब्रह्मोस हे नाव देण्यात आले आहे. या क्षेपणास्त्राचे वैशिष्ट म्हणजे ते आवाजाच्या वेगापेक्षा तिप्पट वेगाने उडतं. हा वेगच त्याला अत्यंत घातक आणि शत्रूच्या रडारमध्ये कधीच न दिसणारे क्षेपणास्त्र म्हणून ओळख देतो. त्याचे लक्ष्य इतके अचूक आहे की, २९० किलोमीटरच्या अंतरावरूनही ते शत्रूंची ठिकाणं उद्ध्वस्त करू शकतं. सध्या पाकिस्तानकडे असलेले HQ-9B आणि HQ-16 हे चिनी क्षेपणास्त्रही ब्रह्मोसला रोखण्यात अपयशी ठरतात.
आणखी वाचा : पाकिस्तान दिवाळखोरीच्या खाईत, तरीही राजकीय नेते अब्जाधीश कसे? कुणाकडे किती संपत्ती?

जर्मनीची IRIS-T SLM प्रणाली नेमकी काय आहे?
- IRIS-T SLM ही मध्यम श्रेणीतील जमिनीवरून डागली जाणारी हवाई संरक्षण प्रणाली आहे.
- जर्मनीच्या या प्रणालीअंतर्गत ४० किमी अंतरावर आणि २० किमी उंचीवर असलेल्या लक्ष्यांवर अचूकपणे मारा करता येतो.
- ही प्रणाली क्रूझ क्षेपणास्त्रं, ड्रोन, लढाऊ विमाने व अन्य वेगाने हालचाल करणाऱ्या हवाई धोक्यांविरोधात देशाला संरक्षण देते.
- या प्रणालीत रडार, नियंत्रण केंद्र आणि लॉन्चर असतात, जे हलक्या वाहनांवर बसवलेले असतात.
- युक्रेनमध्ये या प्रणालीचा यशस्वी वापर झाला असून २५० हून अधिक मिसाइल्स, ड्रोन आणि क्रूझ मिसाइल्स पाडण्यात आली आहे.
- या प्रणालीच्या प्रत्येक लाँचरमध्ये आठ मिसाइल्स असतात आणि ती एकाच वेळी अनेक ठिकाणांना लक्ष्य करू शकतात.
- ब्रह्मोससारखी क्षेपणास्त्रेही IRIS-T SLM प्रणालीने पाडली असल्याचं सांगितलं जात आहे.
- या प्रणालीच्या प्रत्येक युनिटचा खर्च अंदाजे १७८ ते २०० दशलक्ष युरो (भारतीय चलनानुसार सुमारे १६४६ कोटी ५० लाख रुपये) इतका आहे.
- युद्धात कार्यक्षम असलेली जर्मनीच्या ही प्रणाली खरेदी करण्यास आता पाकिस्तानदेखील उत्सुक आहे.
आर्थिक संकटातही पाकिस्तानने संरक्षण खर्च वाढवला
दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानमध्ये सध्या महागाईचा वणवा पेटला आहे. भारताविरोधात नेहमीच कुरापती करणारा हा देश सध्या दिवाळखोरीच्या खाईत सापडला आहे. दिवसेंदिवस महागाई वाढत असल्याने पाकिस्तानमधील लोकांचं जगणं कठीण झालं आहे. मात्र, देशावर आर्थिक संकट असतानाही पाकिस्तानने संरक्षण खर्चात २०% वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्यांनी ‘आयएमएफ’ आणि आशियाई विकास बँकेकडून १.८ अब्ज डॉलर्सचे कर्ज घेतले आहे. भारताने या गोष्टीवर टीका केली असून पाकिस्तान हे कर्ज विकासासाठी नाही तर दहशतवादाला खतपाणी घालण्यासाठी वापरत असल्याचं म्हटलं आहे.
हेही वाचा : पृथ्वीवरून अंतराळ स्थानक ISS पर्यंत पोहोचण्यासाठी किती वेळ लागतो? अंतराळवीर कसा पूर्ण करतात हा प्रवास?
IRIS-T प्रणाली खरेदीवर भारताचा आक्षेप?
पाकिस्तान सध्या जर्मनीची IRIS-T SLM प्रणाली खरेदी करण्याचा विचार करीत आहे. मात्र, भारताकडून त्यावर आक्षेप घेतला जाण्याची शक्यता आहे. कारण, केंद्र सरकारने नुकताच जर्मनीकडून ‘Project 75I’ अंतर्गत भारतीय नौदलासाठी अत्याधुनिक पाणबुड्या विकसित करण्याचा निर्णय घेतला होता. या महत्वाकांक्षी प्रकल्पाची किंमत सुमारे ७० हजार कोटी रुपये इतकी आहे. जर जर्मनीने पाकिस्तानला IRIS-T प्रणाली विकण्याचा निर्णय घेतला, तर भारत आणि जर्मनी यांच्यातील संबंधांमध्ये तणाव येण्याची शक्यता आहे. याचा परिणाम ‘Project 75I’वर होऊ शकतो, असा अंदाज वर्तविला जात आहे.
जर्मनीकडेच का झुकतंय पाकिस्तान?
पाकिस्तानने याआधी इटलीची CAMM-ER प्रणाली खरेदी करण्याचा विचार केला होता. CAMM-ER ही इटलीत विकसित करण्यात आलेली एक आधुनिक हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली आहे. मात्र, या प्रणालीचा वापर अजूनही कोणत्याही युद्धात करण्यात आलेला नाही. त्यामुळे, तिची ब्रह्मोससारख्या क्षेपणास्त्रांवरील परिणामकारकता पूर्णपणे सिद्ध झालेली नाही. हीच बाब लक्षात घेता पाकिस्तानने सध्या जर्मनीची IRIS-T SLM प्रणाली खरेदी करण्याचा विचार सुरू केला आहे. मात्र, आधीच दिवाळखोरीच्या छायेत सापडलेल्या या देशाला खरंच ही जर्मनीची प्रणाली खरेदी करणे परवडेल का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.