Pakistan-US Relations Donald Trump-Aseem Munir Strategy : रशियाकडून स्वस्त दरात कच्च्या तेलाची आयात करणे सुरूच ठेवल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के अतिरिक्त आयात शुल्क लादलं. परिणामी, अमेरिकेत निर्यात होणाऱ्या भारताच्या सर्वच वस्तूंवरील कर ५० टक्क्यांपर्यंत पोहोचला, त्यामुळे दोन्ही देशांतील व्यापार संबंध काहीसे ताणले गेले. यादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट पाकिस्तानशी जवळीक वाढवून भारताला डिवचण्याचा प्रयत्न सुरू केला. पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी गेल्या दोन महिन्यात दोनवेळा अमेरिका दौरा केला. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांना पाकिस्तानकडून नेमकं काय हवं आहे? असीम मुनीर हे वारंवार अमेरिका दौऱ्यावर का जात आहे? त्यासंदर्भातील घेतलेला हा आढावा…

पाकिस्तान लष्करप्रमुखांनी मागील आठवड्यात अमेरिकेचा दौरा केला. गेल्या दोन महिन्यातील त्यांचा हा दुसरा दौरा होता. याआधी असीम मुनीर हे १८ जून रोजी अमेरिका दौऱ्यावर गेले होते. आता ८ ऑगस्ट रोजी त्यांनी अमेरिकेतील सर्वोच्च लष्करी अधिकारी जनरल डॅन केन यांची भेट घेतली. या भेटीत अमेरिका-पाकिस्तान यांच्यातील दहशतवादविरोधी सहकार्यातील यशस्वी प्रयत्नांवर चर्चा झाली, असं अमेरिकन लष्करानं त्यांच्या निवेदनात म्हटलं. दुसरीकडे जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे एप्रिलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे नियोजन मुनीरने केल्याचा आरोप भारताकडून करण्यात आला.

पाकिस्तानची नेमकी योजना काय?

पाकिस्तानमध्ये लिथियम, तांबे व दुर्मीळ खनिजे यांसारख्या मौल्यवान खनिजांचा मोठा साठा आहे; पण त्याचा पुरेसा वापर झालेला नाही. आर्थिक संकटात सापडलेला पाकिस्तान आता या खनिजांचा उपयोग आपल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी करत आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी या खनिजांचा वापर करून देशाची आर्थिक स्थिती सुधारण्याची योजना आखली आहे. विशेष म्हणजे, अमेरिकेनेही पाकिस्तानच्या या दुर्मीळ खनिजांमध्ये आणि तेलाच्या साठ्यांमध्ये रस दाखवला आहे.

आणखी वाचा : भारताविरोधात दंड थोपाटणारे ट्रम्प चीनसमोर कसे नरमले? कारण काय?

पाकिस्तान कर्जातून मुक्त होणार?

असीम मुनीर यांनी पाकिस्तानच्या नशिबाला कलाटणी देणारी ही योजना ‘दुर्मीळ खनिजांचा खजिना’ असल्याचं म्हटलं. एका मुलाखतीत मुनीर त्यांनी बलुचिस्तानमधील ‘रेको डिक’ या खाण प्रकल्पाचा उल्लेख केला. आगामी काळात पाकिस्तानला या खाण प्रकल्पांमधून दरवर्षी किमान दोन अब्ज डॉलर्सचा (सुमारे १६,५०० कोटी रुपये) फायदा होईल आणि हा नफा प्रत्येक वर्षी वाढतच जाईल असं मुनीर म्हणाले. “पाकिस्तानकडे दुर्मीळ खनिजांचा खजिना आहे. या खजिन्याने पाकिस्तानचे कर्ज कमी होईल आणि लवकरच पाकिस्तानची गणना सर्वात समृद्ध देशांमध्ये होईल,” असा दावाही त्यांनी केला.

बलुचिस्तानमध्ये खनिजांची सर्वात मोठी खाण

बलुचिस्तानमधील रेको डिक ही तांबे व सोन्याची जगातील सर्वात मोठी खाण आहे. पण, ती बलुचिस्तानसारख्या प्रांतात असल्यामुळे पाकिस्तानसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे, कारण बलुचिस्तानचे नेते आधीच इस्लामाबादवर त्यांच्या नैसर्गिक संसाधनांचा गैरवापर केल्याचा आरोप करीत आहेत. याशिवाय तेथील बंडखोर सातत्याने पाकिस्तानी लष्करावर हल्ला करीत असून स्वतंत्र प्रदेशाची मागणी करीत आहेत. रेको डिक खाण प्रकल्पामध्ये पाकिस्तान आणि बलुचिस्तान सरकार तसेच कॅनडातील ‘बॅरिक गोल्ड’ ही कंपनी संयुक्तपणे काम करीत आहे.

अमेरिकेला पाकिस्तानकडून काय हवंय?

पाकिस्तानच्या डॉन या वृत्तपत्रानुसार, अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यात दुर्मीळ खनिजे काढण्याबद्दल चर्चा झाली आहे. सध्या दुर्मीळ खनिजांचा जागतिक पुरवठा चीनच्या हातात असून अमेरिका त्याला पर्याय शोधत आहे. दुर्मीळ खनिजांमध्ये स्कँडियम, यट्रियम आणि लँथनाइड्सचा समावेश आहे. ही खनिजे पृथ्वीच्या कवचात सापडतात; पण त्यांची उत्खनन प्रक्रिया महाग असून, ते काढणे पर्यावरणासाठीही हानिकारक आहे. वाहन उद्योगापासून ते संरक्षण क्षेत्रापर्यंत, दुर्मीळ खनिजांपासून तयार झालेलं चुंबक खूप महत्त्वाचं मानलं जातं. अमेरिकेतील इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करणाऱ्या कंपन्या या खनिजांसाठी सध्या चीनवर अवलंबून आहेत.

donald trump and asim munir
भारतावर २५ टक्के अतिरिक्त आयातशुल्क लादल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानबरोबर जवळीक साधली (छायाचित्र पीटीआय)

अमेरिका-पाकिस्तानच्या संबंधात सुधारणा

काही दिवसांपूर्वी ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ने सांगितले की, पाकिस्तानबरोबरची ट्रम्प यांची चर्चा तेलापेक्षा दुर्मीळ खनिजांसाठी महत्त्वाची आहे. गेल्या काही महिन्यांपासून अमेरिका आणि पाकिस्तानचे संबंध सुधारले आहेत. पाकिस्ताननं डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव शांततेसाठी नोबेल पुरस्कारासाठी सुचवलं आहे. दरम्यान, अमेरिका महत्त्वाच्या खनिजांसाठी नवीन क्षेत्रांचा शोध घेत आहे, असं विधान अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांनी पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी केलं होतं. विशेष म्हणजे अमेरिका व पाकिस्तान यांच्यातील नवीन व्यापार करारानंतर त्यांनी हे विधान केलं.

हेही वाचा : China Hangor to Pakistan: चीन- पाकिस्तानची भारताविरुद्ध नवीन खेळी; हँगोर पाणबुड्या भारतासाठी आव्हान ठरणार?

डोनाल्ड ट्रम्प भारताविषयी काय म्हणाले होते?

एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के आयात शुल्क लादण्याची घोषणा केली, तर दुसरीकडे अमेरिकेला नवीन व्यापार करारानुसार पाकिस्तानकडून कच्च्या तेलाची पहिली खेप मिळाली. काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी त्यांच्या अधिकृत ‘ट्रुथ’ या सोशल मीडिया अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली. “पाकिस्तान व अमेरिका कच्च्या तेलाच्या विशाल साठ्याच्या विकासासाठी एकत्र काम करतील. आम्ही या भागीदारीचे नेतृत्व करणारी तेल कंपनी निवडण्याच्या प्रक्रियेत आहोत. कोण जाणे, कदाचित भविष्यात ते भारतालाही तेल विकतील,” असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं.

पाकिस्तानची अमेरिकेशी जवळीक, चीनसाठी धोक्याची घंटा?

अमेरिकेची पाकिस्तानबरोबरची जवळीक चीन व भारत या दोन्ही देशांसाठी डोकेदुखी ठरू शकते, असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी वर्तवला आहे. त्यामागचं कारण म्हणजे चीनने ‘चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर’ (CPEC) द्वारे पाकिस्तानमध्ये अब्जावधींची गुंतवणूक केली आहे, त्यामुळे अमेरिकेशी जवळीक साधण्याबरोबर पाकिस्तानला चीनकडेही लक्ष द्यावे लागणार आहे. “आम्ही एका मित्रासाठी दुसऱ्या मित्राचा बळी देणार नाही,” असं लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी स्पष्ट केलं आहे.