Shabana Mahmood Anti Indian : ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी गेल्या आठवड्यात त्यांच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करण्याचा निर्णय घेतला. उपपंतप्रधान अँजेला रेयनर यांच्या राजीनाम्यानंतर त्यांनी गृहमंत्रिपदावर शबाना महमूद यांची नियुक्ती केली. त्या पदावर विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या मुस्लीम महिला ठरल्या आहेत. मूळ पाकिस्तानी वंशाच्या असलेल्या शबाना यांनी बेकायदा स्थलांतराविरोधात कठोर भूमिका घेतलेली आहे. ब्रिटनच्या गृहमंत्रिपदी निवड होताच अनेक जण त्यांना भारतविरोधी म्हणून लक्ष्य करीत आहेत. सध्या समाजमाध्यमांवर त्यांच्याविरोधात जोरदार मोहीम सुरू आहे. दरम्यान, कोण आहेत शबाना महमूद? त्यांना भारतविरोधी का म्हटलं जात आहे? त्या संदर्भात घेतलेला हा सविस्तर आढावा…
शबाना महमूद कोण आहेत?
शबाना महमूद या ब्रिटनच्या (UK) नवीन गृहमंत्री आहेत. २०१० पासून त्या बर्मिंगहॅम लेडीवुडच्या खासदार म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातील लिंकन महाविद्यालयातून कायद्याचं शिक्षण घेतलेलं आहे. राजकारणात येण्यापूर्वी शबाना या वकील म्हणून काम करीत होत्या. १९८० मध्ये बर्मिंगहॅममध्ये जन्मलेल्या शबाना यांचं मूळ गाव पाकव्याप्त काश्मीरमधील मिरपूर आहे. शबाना यांनी ‘शॅडो कॅबिनेट’ आणि सरकारमध्ये अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. लॉर्ड चॅन्सेलर व सामाजिक न्यायमंत्री असताना त्यांनी तुरुंगांतील गर्दी कमी करण्यासाठी पावले उचलली होती, ज्यामध्ये कैद्यांची लवकर सुटका करण्याच्या मोहिमेचाही समावेश होता.
स्थलांतरितांविरोधात कठोर भूमिका
‘गल्फ न्यूज’च्या वृत्तानुसार, शबाना यांनी देशातील बेकायदा स्थलांतरित आणि मानवाधिकार सुधारणांबाबत ठाम भूमिका घेतलेली आहे. “जर तुम्ही आमच्या आदरातिथ्याचा गैरवापर केला आणि आमचे कायदे मोडले, तर आम्ही तुम्हाला तुमच्या देशात परत पाठवू,” असा सज्जड दम त्यांनी स्थलांतरितांना दिला होता. पंतप्रधान कीअर स्टार्मर यांच्या सरकारसमोर सध्या एक मोठं आव्हानं उभं ठाकलं आहे. ब्रिटनमधील जनतेचा त्यांच्या सरकारवरील विश्वास कमी होत असल्याचं एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे. “शबाना यांनी तुरुंगांमधील कैद्यांची गर्दी कमी केल्यानं त्यांच्या या निर्णयाला मोठा विरोध झाला होता. आता त्यांना गृहमंत्रिपद देऊन, जनतेचा विश्वास पुन्हा मिळविण्याचा लेबर पक्षाचा प्रयत्न आहे. शबाना पाकिस्तानी वंशाच्या असल्यामुळे त्या देशासाठी कठोर भूमिका घेऊ शकतात,” असं ब्रिटनमधील एका नेत्यानं ‘द टेलिग्राफ’ला सांगितलं.
आणखी वाचा : चीन आता युद्धात ‘रोबो लांडगे’ उतरवणार; किती विध्वंसक व धोकादायक आहे ही प्रणाली?
शबाना यांच्यावर ‘भारतविरोधी’ आरोप का होतोय?
शबाना महमूद यांच्या काही भूमिका आणि वक्तव्यांमुळे त्यांना भारतविरोधी समजलं जात आहे. विशेषतः काश्मीर आणि गाझावरील त्यांच्या मतांमुळे त्यांची ही प्रतिमा तयार झाली आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या एका वृत्तानुसार, २०१९ मध्ये केंद्र सरकारनं काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम ३७० रद्द केलं होतं. त्यावेळी या निर्णयाविरोधात लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयासमोर काही पाकिस्तानी लोकांनी मोठी निदर्शने केली होती. या निदर्शनात शबाना यांनीदेखील सहभाग घेतला होता. इतकंच नाही, तर त्यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून पोस्ट शेअर करीत या निर्णयाला काश्मीरमधील लोकांचा विश्वासघात, असं म्हटलं होतं. २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ब्रिटन दौऱ्यापूर्वी शबाना यांनी ३० हून अधिक खासदारांच्या समर्थनाद्वारे काश्मीर विषयावर ब्रिटनच्या पंतप्रधानांना पत्रही लिहिलं होतं.

गाझा युद्धाबाबत शबाना यांची भूमिका
शबाना महमूद या पॅलेस्टिनी लोकांच्या समर्थक मानल्या जातात. अनेकदा त्या ‘फ्री पॅलेस्टाईन’ असे फलक घेऊन निदर्शनांमध्ये दिसलेल्या आहेत. २०१४ मध्ये शबाना यांनी सुपरमार्केट सॅन्सबरीच्या बर्मिंगहॅम शाखेसमोर निदर्शनं केली होती, ज्यात इस्रायली वसाहतींमधून मिळालेला माल विकणं थांबवावं, अशी मागणी त्यांनी केली होती. इस्रायल-गाझाशी संबंधित काही महत्त्वाच्या मतदानांमध्ये महमूद अनुपस्थित होत्या. नोव्हेंबर २०२३ मध्ये स्कॉटिश नॅशनल पार्टीनं ‘गाझामध्ये युद्धविराम’ या दुरुस्तीसाठी केलेल्या प्रस्तावावर त्यांनी मतदान केलं नव्हतं. मात्र, ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासनं इस्रायलवर हल्ला केल्यानंतर शबाना यांनी त्याचा तीव्र निषेध केला. “मी हमासच्या निर्दयी कारवायांचा स्पष्ट निषेध करते. त्यांनी निर्दोष इस्रायली नागरिकांना लक्ष्य केलं आहे. सर्व बंधकांची सुटका झाली पाहिजे,” अशी पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली होती.
पॅलेस्टाईनच्या स्वातंत्र्याबाबत शबाना यांचं भाष्य
“गाझामधील नागरिकांवर अत्याचार करणारे दहशतवादी (इस्रायलचे सैनिक) हिंसाचाराला चालना देतात. त्यामुळे पॅलेस्टाईनच्या स्वातंत्र्य आणि राष्ट्रनिर्मितीच्या योग्य मागणीला मोठा धक्का बसत आहे. मीसुद्धा आयुष्यभर याच मागणीला पाठिंबा दिलेला आहे,” असं शबाना महमूद यांनी त्यांच्या पोस्टमध्ये नमूद केलं होतं. फेब्रुवारी २०२४ मध्ये ‘बीबीसी रेडिओ ४’ला दिलेल्या मुलाखतीत शबाना म्हणाल्या, “इस्रायलच्या लोकांना स्वनिर्णयाचा अधिकार मिळावा; पण पॅलेस्टिनी लोकांना तो मिळू नये, ही भूमिका खरोखरच अन्यायकारक आहे.” दरम्यान- ब्रिटनच्या गृहमंत्रिपदावर विराजमान झाल्यानंतर शबाना या ‘पॅलेस्टाईन अॅक्शन’ या दहशतवादी गटावर कठोर भूमिका घेतील, अशी अपेक्षा तेथील नागरिकांना आहे.
गाझा युद्धावर शबाना महमूद यांची प्रतिक्रिया
ब्रिटनचे संरक्षणमंत्री जॉन हीली यांनी ‘स्काय न्यूज‘ला सांगितले, “सरकारने ‘पॅलेस्टाईन ॲक्शन‘वर घेतलेला निर्णय योग्य आहे आणि शबाना महमूद त्याचे समर्थन करतील, अशी माझी अपेक्षा आहे. कारण- या गटातील काही सदस्यांनी जे काही घडवून आणण्याचा कट रचलाय, तो खरोखरच गंभीर आहे. आपल्या देशात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे. तसेच जे लोक कायदा तोडतात, त्यांना त्याचे गंभीर परिणाम भोगावेच लागतील.” दरम्यान, इस्रायल – पॅलेस्टाईन यांच्यातील युद्धावर शबाना महमूद यांनी प्रतिक्रिया दिली. “गाझामधील दृश्यं पाहताना माझ्या मनाला तीव्र वेदना झाल्या. मानवनिर्मित उपासमारीची चित्रं पाहताना ही वेदना जवळजवळ प्रत्येकानंच अनुभवली. ज्यांना आपली चिंता व्यक्त करायची आहे, आंदोलनं करायची आहेत, त्यांचं मी स्वागत करते. या आंदोलनांना पॅलेस्टाईन ॲक्शन या बंदी घालण्यात आलेल्या संघटनेच्या पाठिंब्याशी जोडणं आवश्यक नाही. सरकारच्या या संघटनेवरील बंदीच्या निर्णयाविरोधात लंडनमध्ये झालेल्या निदर्शनांत ८०० हून अधिक लोकांना अटक करण्यात आली”, असं शबाना यांनी स्पष्ट केलं.