काही दिवसांपूर्वी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सुलतानपूर लोधी येथील काली बेई या नदी पात्रातून थेट एक ग्लास पाणी प्यायले होते. या नदीतील पाणी प्यायल्यानंतर एक-दोन दिवसांत भगवंत मान यांना पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्यामुळे त्यांना दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ते ज्या काली बेई नदीतील पाणी प्यायले होते, त्या नदीला शीख धर्मात अत्यंत महत्त्व आहे. चला तर मग जाणून घेऊया… भगवंत मान या नदीतील पाणी का प्यायले? आणि नदीचा इतिहास काय आहे?

Continue reading this story with Loksatta premium subscription
Already a subscriber? Sign in

‘काली बेई’ काय आहे?

काली बेई ही पंजाबमधील होशियारपूर येथे उगम पावते. या नदीची लांबी १६५ किमी असून ती चार जिल्ह्यांतून वाहते. पुढे ही नदी कपूरथला येथे बियास आणि सतलज या नद्यांना जाऊन मिळते. या नदीच्या काठावर सुमारे ८० गावं आणि अर्धा डझन छोटी-मोठी शहरे वसलेली आहेत. पूर्वी संबंधित शहरातील सांडपाणी आणि औद्योगिक कचरा नाल्यातून वाहून या नदीत येऊन मिळायचा, म्हणून याला नदीला ‘काली बेई’ अर्थात ‘काळा नाला’ असं नाव पडलं. या नदीत स्वच्छता प्रकल्प सुरू होईपर्यंत, नदीतील पाण्यावर दाट गवत आणि तण वाढले होते. यामुळे नदी प्रचंड दूषित झाली होती.

भगवंत मान यांनी पाणी का प्यायले?

खरंतर, १६ जुलै २००० रोजी काली बेई नदीतील स्वच्छता प्रकल्पाला सुरुवात झाली होती. यावर्षी १६ जुलै रोजी या प्रकल्पाला २२ वर्षे पूर्ण झाली. २००० च्या तुलनेत आता ही नदी खूपच स्वच्छ आहे. या दिनाचं औचित्य साधून मुख्यमंत्री भगवंत मान यांनी या नदीतील पाणी प्राशन केलं. यानंतर एक ते दोन दिवसांत त्यांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना दिल्लीतील अपोलो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.

शीख धर्मीयांसाठी काली बेईचं महत्त्व

शीख धर्माच्या इतिहासात काली बेईला खूप महत्त्व आहे. कारण शीख धर्मीयांचे पहिले गुरू गुरुनानक देव यांना येथेच ज्ञानप्राप्ती झाली होती, असं म्हटलं जातं. त्यावेळी गुरुनानक देव हे आपली बहीण बेबे नानकी यांच्यासोबत सुलतानपूर लोधी येथे वास्तव्याला होते. ते काली बेई नदीपात्रात स्नान करायचे. एकेदिवशी ते याच नदीत सुर्योदय होण्यापूर्वी गायब झाल्याचं म्हटलं जातं, म्हणून या नदीला शीख धर्मात पवित्र मानलं जातं.

स्वच्छता प्रकल्पाची सुरुवात कशी झाली?

पंजाब प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (PPCB) माजी सदस्य आणि सध्याचे आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार बाबा बलबीर सिंग सीचेवाल यांनी कोणत्याही सरकारी मदतीशिवाय काली बेई नदीच्या स्वच्छतेला सुरुवात केली होती. त्यांनी काही मूठभर लोकांना सोबत घेऊन नदीची स्वच्छता केली, पाण्यावर प्रक्रिया केली आणि रहिवाशांमध्ये जनजागृती केली. दरम्यान, २००६ साली तत्कालीन राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांनी स्वच्छता प्रकल्पाला भेट दिली आणि सीचेवाल यांच्या प्रयत्नांची प्रशंसा केली.

हेही वाचा- विश्लेषण: गर्भाशय मुखाच्या कर्करोगावर आता भारतीय लस!

तेव्हा सहा वर्षांच्या मेहनतीचं फळ त्यांना मिळालं. त्यानंतर पंजाबमधील तत्कालीन काँग्रेस सरकारने काली बेई नदीत प्रक्रिया न केलेलं सांडपाणी रोखण्याचा प्रकल्प हाती घेतला. तेव्हापासून संथ गतीने ही नदी स्वच्छ करण्याचं काम सुरू आहे. २००० सालच्या तुलनेत ही नदी आता खूपच स्वच्छ आहे.

‘काली बेई मॉडेल’

एकेकाळी हा प्रकल्प नदी स्वच्छता मोहिमांसाठी एक आदर्श प्रकल्प बनला होता. ‘नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा’ची ब्लू प्रिंट म्हणून ‘काली बेई मॉडेल’चा उल्लेख करण्यात आला होता. तत्कालीन केंद्रीय जलसंपदा, नदी प्रकल्प आणि गंगा पुनरुज्जीवन मंत्री उमा भारती यांनी २०१५ मध्ये काली बेईला भेट दिली होती. यानंतर त्यांनी काली बेई मॉडेलचा प्रयोग गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी करता येईल, या उद्देशानं सुमारे ५०० ग्रामपंचायतींच्या नेत्यांना या मॉडेलचं निरीक्षण करण्यासाठी पाठवलं होतं. याव्यतिरिक्त दिल्ली सरकारनेही यमुना नदीच्या स्वच्छतेसाठी हे मॉडेल स्वीकारण्याची घोषणा केली होती.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Panjab cm bhagwant drink water from kali bein revulet significance for sikhs rmm
First published on: 22-07-2022 at 13:44 IST