PM Modi Announcement GST Reforms : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच झालेल्या भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केलं. यावेळी जीएसटीच्या विद्यमान कर प्रणालीत मोठ्या सुधारणा करण्याची घोषणा त्यांनी केली. “लवकरच आम्ही जीएसटीमध्ये सुधारणा करणार आहोत, ज्यामुळे जीवनावश्यक वस्तूंवरील कर मोठ्या प्रमाणात कमी होतील आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळेल. ही दिवाळीपूर्वीची मोठी भेट असेल”, असं पंतप्रधान म्हणाले. दरम्यान, या अपेक्षित जीएसटी सुधारणेमुळे काय स्वस्त आणि काय महाग होऊ शकतं? सर्वसामान्यांना खरंच दिलासा मिळणार का? त्याबाबत जाणून घेऊ…
पंतप्रधान मोदींनी केलेल्या या घोषणेमुळे देशातील शेतकरी, मध्यमवर्गीय व लहान व्यावसायिकांना मोठा फायदा होऊ शकतो. कारण- केंद्र सरकारनं जीएसटी कर प्रणालीत सुधारणा केल्यास त्यांच्यावरील कराचा बोजा लक्षणीयरीत्या कमी होण्याची शक्यता आहे. पंतप्रधानांच्या या घोषणेला अनेक राजकीय विश्लेषकांनी ‘मास्टरस्ट्रोक’ असं म्हटलं आहे. बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाला याचा मोठा फायदा होऊ शकतो. कारण- तेथील विरोधकांनी बेरोजगारीच्या मुद्द्यावरून भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारची कोंडी केली आहे. त्याशिवाय अमेरिकेसोबत सुरू असलेल्या व्यापार युद्धातही पंतप्रधानांची प्रतिमा अधिक मजबूत होण्यास या निर्णयामुळे मदत होईल, असं काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
जीएसटीमध्ये सुधारणा कशी होऊ शकते?
- सध्याच्या जीएसटी प्रणालीमध्ये ५%, १२%, १८% व २८% असे चार मुख्य टॅक्स स्लॅब आहेत.
- नवीन सुधारणांमध्ये हे स्लॅब कमी करून फक्त ५% व १८% असे दोन मुख्य स्लॅब ठेवण्याचा विचार आहे.
- या अनपेक्षित बदलांमुळे १२% टॅक्स स्लॅबमधील जवळपास ९९% वस्तू ५% स्लॅबमध्ये येऊ शकतात.
- तसेच २८% टॅक्स स्लॅबमधील ९०% वस्तू १८% स्लॅबमध्ये आणल्या जाण्याची शक्यता आहे.
- काही विशिष्ट वस्तूंसाठी ४०% असा एक विशेष दर लागू केला जाण्याचा अंदाज आहे.
आणखी वाचा : भारताशी दुरावा तर पाकिस्तानशी जवळीक; अमेरिकेला पाकिस्तानकडून नेमकं काय हवंय?
जीएसटीचे सध्याचे दर आणि टॅक्स स्लॅब
वस्तू आणि सेवा कराचे (GST) दर आणि टॅक्स स्लॅब ठरवण्याचा अधिकार जीएसटी कौन्सिलकडे आहे. या कौन्सिलमध्ये केंद्र सरकार, राज्य सरकारे व केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी असतात. सध्या जीएसटी प्रणालीमध्ये प्रामुख्याने चार टॅक्स स्लॅब आहेत. देशातील बहुतांश वस्तू आणि सेवांवर या चार दरांनुसारच कर आकारला जातो. आवश्यक खाद्यपदार्थ, औषधे आणि शिक्षण यांसारख्या वस्तूंवर कोणताही कर (०%) लागत नाही. पाच टक्के कर हा दैनंदिन वापराच्या वस्तूंवर आकारला जातो. १२% कर हा प्रमाणित वस्तूंवर लागतो. १८% कर इलेक्ट्रॉनिक्स आणि सेवांवर असतो. तर २८% कर तंबाखू, मद्य यांसारख्या वस्तूंवर आकारला जातो.
याव्यतिरिक्त काही विशेष वस्तूंसाठी तीन वेगवेगळे जीएसटी दर आहेत. सोने-चांदीचे दागिने, हिरे आणि मौल्यवान वस्तूंवर तीन टक्के जीएसटी कर आकारला जातो. तर पॉलिश केलेल्या हिऱ्यांवर १.५% कर लावला जातो. याशिवाय कच्च्या हिऱ्यांवर ०.२५% जीएसटी आकारला जातो. सध्याचे चार मुख्य टॅक्स स्लॅब कमी करून फक्त दोन स्लॅब (५% आणि १८%) ठेवण्याचा सरकारचा विचार आहे. २०१७ मध्ये जीएसटी लागू झाल्यापासून अप्रत्यक्ष करातील ही सर्वात मोठी सुधारणा ठरणार आहे.
जीएसटीमधील प्रमुख बदल कसे असतील?
- नवीन जीएसटी सुधारणेनुसार- पाच टक्के आणि १८% असे दोनच मुख्य दर ठेवले जातील.
- सध्या १२% जीएसटी असलेल्या जवळपास ९९% वस्तू, ५% च्या स्लॅबमध्ये समाविष्ट केल्या जातील.
- सध्या २८% जीएसटी असलेल्या जवळपास ९०% वस्तू १८% च्या स्लॅबमध्ये आणल्या जातील.
- लहान कार व दुचाकींवरील करही २८% वरून १८% पर्यंत कमी केला जाण्याची शक्यता आहे.
- तंबाखू, मद्य तसेच ऑनलाइन खेळावर ४० टक्के विशेष जीएसटी दर लागू केला जाण्याची शक्यता आहे.

जीएसटी बदलांमुळे काय स्वस्त होणार?
सरकारने जीएसटी प्रणालीमध्ये बदल केल्यास- टूथ पावडर, काही ब्रँडेड टूथपेस्ट, साबण, केश तेल यांसारख्या अनेक वस्तू स्वस्त होऊ शकतात. तसेच प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ, स्नॅक्स यांच्या किमतीही कमी होऊ शकतात. मोबाईल फोन, संगणक, शिलाई मशीन, प्रेशर कुकर, गिझर, इस्त्री व व्हॅक्यूम क्लीनर यांसारख्या वस्तू स्वस्त होणे अपेक्षित आहे. इतर वस्तूंमध्ये १००० रुपयांपेक्षा जास्त किमतीचे तयार कपडे आणि ५०० ते १००० रुपयांच्या चपला/बूट स्वस्त होतील. तसेच, स्वयंपाकघरातील भांडी आणि आयुर्वेदिक औषधेही स्वस्त होण्याची शक्यता आहे.
लहान गाड्यांवरील जीएसटी कमी होऊन, त्या अधिक स्वस्त होतील. जीएसटीतील बदलांमुळे बांधकाम व्यावसायिकांसाठी खर्च कमी होईल. त्यामुळे घरांची किंमत कमी होऊन, त्याचा थेट फायदा ग्राहकांना मिळेल. सध्या १८% जीएसटी असलेला विमा स्वस्त होण्याची शक्यता आहे. आरोग्य आणि जीवन विमा प्रीमियमवरील जीएसटी ५% किंवा शून्य टक्के होऊ शकतो, असे सरकारी सूत्रांनी सांगितले आहे.
हेही वाचा : Pregnancy Robot : रोबो आई होणार? चीनमध्ये काय घडतंय?
काय महाग होण्याची शक्यता आहे?
तंबाखू उत्पादनांवर ४०% जीएसटी आकारण्याचा विचार केंद्र सरकार करीत आहे. सध्या तंबाखू व सिगारेटवर २८% जीएसटी आणि इतर कर मिळून एकूण ५३% कर लागतो; पण नवीन बदलानंतर हा कर अधिक वाढू शकतो. ऑनलाइन गेमिंग कंपन्यांवरही ४०% जीएसटी लागू केला जाण्याची शक्यता आहे. सध्या यावर २८% जीएसटी लागतो. ऑनलाइन गेमिंगवर वाढलेला खर्च आणि त्यावर घालवल्या जाणाऱ्या वेळेमुळे सरकार हा निर्णय घेण्याच्या विचारात आहे.
या बदलांचा परिणाम काय होईल?
जीएसटी स्लॅबमधील बदलांमुळे सुरुवातीला महसुलात घट होऊ शकते; पण नंतर कराचे दर कमी झाल्यामुळे उपभोग वाढेल आणि त्यामुळे महसुलाची भरपाई होईल. या बदलांमुळे खाद्यपदार्थांवरील वेगवेगळ्या करांसारखे सध्याचे काही वादग्रस्त मुद्देही संपुष्टात येतील. आता दिवाळीत जीएसटी कौन्सिल काय घोषणा करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. सर्वसामान्यांसाठी खरोखरच हा ‘दिवाळी धमाका’ असेल का, हे लवकरच स्पष्ट होईल.