India’s iron dome? PM Modi mentioned Sudarshan Chakra Mission: स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी लाल किल्ल्यावरून देशवासीयांना उद्देशून केलेल्या ऐतिहासिक भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सुदर्शन चक्र मोहीमे’ची घोषणा केली. पुढील दहा वर्षांत, म्हणजेच २०३५ पर्यंत, भारताचे सुरक्षा कवच अधिक विस्तारण्याचा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज करत बळकट करण्याचा रोडमॅपच त्यांनी मांडला. भगवान श्रीकृष्णाच्या सुदर्शन चक्रातून प्रेरणा घेत, देश स्वतःची ‘आयर्न डोम’सारखी बहुस्तरीय संरक्षण प्रणाली उभारणार असून ती सामरिक, धार्मिक आणि नागरी अशा सर्व महत्त्वाच्या स्थळांचे रक्षण करणार आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.
पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले की ‘सुदर्शन चक्र मोहीमे’चे उद्दिष्ट प्रगत तंत्रज्ञानाच्या मदतीने शत्रूवर पाळत ठेवणे, त्याला अडथळा निर्माण करणे आणि त्वरित प्रत्युत्तर देणे हे असेल. यामुळे हवाई, जमिनीवर येणारा तसेच सागरी क्षेत्रावरील कोणताही धोका जलदगतीने निष्प्रभ करता येईल. स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात त्यांनी भारताच्या लढाऊ विमान प्रकल्पासाठी स्वदेशी जेट इंजिन विकसित करण्याचे महत्त्व अधोरेखित केले आणि संरक्षण उत्पादन क्षेत्रात अधिक प्रगतीची गरज असल्याचेही सांगितले. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशाबद्दल सशस्त्र दलांचे अभिनंदन करताना पंतप्रधान मोदींनी नमूद केले की, या कारवाईमुळे पाकिस्तानला मोठा फटका बसला असून झालेल्या नुकसानीची नवी माहिती दररोज समोर येत आहे.
यावर्षी मोदींनी आतापर्यंतच्या सर्वात दीर्घ स्वातंत्र्यदिनाचा भाषण विक्रम प्रस्थापित केला. लाल किल्ल्यावरून त्यांनी तब्बल १०३ मिनिटे (१ तास ४३ मिनिटे) भाषण केले, ज्यामुळे २०२४ मधील ९८ मिनिटांच्या त्यांचा आधीचा विक्रम मोडला गेला. त्यांचा स्वातंत्र्यदिनाच्या भाषणाचा पहिला विक्रम २०१५ साली ८८ मिनिटांच्या भाषणाचा होता.
‘सुदर्शन चक्र मोहीमे’ची उद्दिष्टे काय आहेत?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, नव्या ‘सुदर्शन चक्र मोहीमे’चा मुख्य उद्देश भारताच्या सामरिक, नागरी आणि धार्मिक स्थळांना संभाव्य शत्रूंच्या हल्ल्यांपासून संरक्षण देणारे एक मजबूत कवच निर्माण करणे आणि त्याचबरोबर अत्याधुनिक शस्त्रास्त्रे विकसित करणे हा असेल. ही प्रणाली इस्रायलच्या जगप्रसिद्ध ‘आयर्न डोम’ या संरक्षण कवचाच्या तोडीस तोड असेल, अशी अपेक्षा आहे. ‘आयर्न डोम’ ही बहुस्तरीय संरक्षण प्रणाली असून २०१० पासून हमास आणि हिझबुल्ला यांची हजारो रॉकेट्स यशस्वीपणे अडवण्यात तिने भूमिका बजावली आहे. इस्रायलने दिलेल्या माहितीनुसार, या प्रणालीचा यशाचा दर ९० टक्क्यांहून अधिक आहे.
ते पुढे म्हणाले, “२०३५ पर्यंत या राष्ट्रीय सुरक्षा कवचाचा विस्तार, बळकटीकरण आणि आधुनिकीकरण करण्याचा निश्चय केला आहे. भगवान श्रीकृष्णांकडून प्रेरणा घेऊन आम्ही सुदर्शन चक्राचा मार्ग निवडला आहे… ‘सुदर्शन चक्र मोहीम’ ही संपूर्ण आधुनिक प्रणाली भारतातच संशोधित, विकसित असेल आणि तिची निर्मितीही भारतातच केली जाईल. यासाठी आपल्या तरुणांच्या प्रतिभेचा पूर्ण उपयोग केला जाईल. ही शक्तिशाली यंत्रणा दहशतवादी हल्ले रोखण्याबरोबरच त्यांच्यावर अचूक आणि प्रभावी प्रत्युत्तर हल्लाही करेल.”
मोदींनी स्पष्ट केले की ‘सुदर्शन चक्र मोहीम’ ही स्वदेशी नवकल्पना आणि सक्षम संरक्षण क्षमतांबाबत भारताच्या ठाम बांधिलकीचे प्रतीक आहे. लाल किल्ल्यावरून पाकिस्तानला कठोर इशारा देताना ते म्हणाले, “दहशतवादी आणि त्यांना आसरा देणारे, दोघांनाही सारखीच शिक्षा मिळेल.” तसेच, शेजारील देशाकडून भविष्यातील कोणत्याही धाडसाला प्रत्युत्तर देण्यासाठी सशस्त्र दलांना शिक्षा ठरवण्याचा संपूर्ण अधिकार असेल. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशासाठी लष्कराचे अभिनंदन करताना त्यांनी नमूद केले की, भारत आता “पाकिस्तानच्या आण्विक धमकावणीला सहन करणार नाही” आणि सीमेपलीकडील दहशतवादाचा सामना करण्यासाठी आता “नवा पायंडा” प्रस्थापित करण्यात आला आहे. त्यांची ही टिप्पणी २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर होती, ज्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता, त्यापैकी बहुतेक पर्यटक होते. या घटनेनंतर भारताने अनेक कडक राजनैतिक आणि आर्थिक पावले उचलली, ज्यामध्ये सिंधू जल करार निलंबित करण्याचाही समावेश होता.
७ मे रोजी पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर लक्ष्य साधण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले. या कारवाईनंतर सलग चार दिवस चकमकी झाल्या आणि १० मे रोजी पाकिस्तानच्या विनंतीनंतर दोन्ही बाजूंमध्ये समझोता झाला. मोदींनी सांगितले की, पहलगाम हल्ल्यामागील दोषींना शिक्षा देण्यासाठी सशस्त्र दलांना पूर्ण मोकळीक देण्यात आली होती, तसेच भविष्यातील प्रत्युत्तर कारवाईचा निर्णय घेण्याचाही अधिकार लष्कराला सोपवण्यात आला आहे.