PMi Modi announced Vikasit Bharat Rojgar Yojana on Independence Day 2025 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (१५ ऑगस्ट) स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशातील जनतेला संबोधित केलं. आपल्या भाषणातून त्यांनी युवा रोजगार आणि सक्षमीकरणाबद्दल अनेक बाबी सांगितल्या. यावेळी पंतप्रधानांनी तरुणांसाठी विकसित भारत योजनेची घोषणा केली. या योजनेंतर्गत देशभरातील ३.५ कोटी तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण केल्या जातील, अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली. तसेच खासगी क्षेत्रात पहिली नोकरी करणाऱ्या तरुण-तरुणींना केंद्र सरकारकडून १५,००० रुपयांचं अनुदान दिलं जाईल, अशी घोषणाही त्यांनी केली. दरम्यान, नेमकी काय आहे ही योजना? त्याचा लाभ कुणाकुणाला मिळणार? पंतप्रधान विकसित भारत योजनेसाठी कोण पात्र ठरणार? त्या संदर्भात घेतलेला हा आढावा….
देशाच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनी दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदींनी ध्वजारोहण केलं. यावेळी पंतप्रधानांनी पांढऱ्या रंगाचा सदरा व केशरी रंगाचं जॅकेट परिधान करून डोक्यावर फेटा बांधला होता. स्वातंत्र्यदिनाच्या परंपरेनुसार पंतप्रधानांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ देण्यात आला. त्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी दोन मोठ्या घोषणा केल्या. त्यातील पहिली घोषणा – जीएसटीसंदर्भातील होती. “आम्ही राज्यांशी चर्चा केली असून, दिवाळीपर्यंत जीएसटीमध्ये सुधारणा केली जाईल. अनेक वस्तूंवरील कर लक्षणीयरीत्या कमी केले जातील आणि दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त होतील, ज्यामुळे आपली अर्थव्यवस्था मजबूत होईल,” असं मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदींनी केल्या दोन मोठ्या घोषणा
पंतप्रधानांनी केलेली दुसरी घोषणा ही खासगी क्षेत्रातील काम करणाऱ्या तरुणांसंदर्भातील होती. “आज १५ ऑगस्टला केंद्र सरकार एक लाख कोटी रुपयांची पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना सुरू करीत आहे. या योजनेंतर्गत खासगी कंपन्यांमध्ये नोकरी करणाऱ्या प्रत्येक तरुणाला १५,००० रुपये दिले जातील. या योजनेत कंपन्यांनादेखील प्रोत्साहन दिले जाणार असून, नव्या उमेदवारांना अधिकाधिक रोजगार देण्यासाठी कंपन्यांसाठी प्रोत्साहनपर योजना लागू केल्या जातील”, अशी घोषणा पंतप्रधानांनी दिली. देशातील तरुणांना आवाहन करताना मोदी म्हणाले, “आपल्या कल्पना कधीही मरू देऊ नका. मी तुमच्या पाठीशी आहे आणि तुमचा भागीदार म्हणून काम करायला तयार आहे. पुढे येऊन धैर्य दाखवा आणि सरकारचे नियम बदलणे गरजेचे असेल, तर मला सांगा. आपला देश आता थांबणार नाही. प्रत्येक क्षण अमूल्य असून, आपण तो वाया घालवायचा नाही.”
आणखी वाचा : दिवाणी आणि फौजदारी खटल्यांमध्ये काय फरक आहे? कोणते खटले लवकर निकाली निघतात?
कोणकोणाला मिळणार १५,००० रुपयांचा लाभ?
- पंतप्रधान मोदींनी जाहीर केलेली ‘विकसित भारत रोजगार योजना (PM-VBRY)’ ही तरुणांसाठी मोठी संधी ठरणार आहे.
- पीआयबीने दिलेल्या माहितीनुसार, या योजनेंतर्गत तब्बल एक कोटी ९२ लाख लाभार्थी हे पहिल्यांदाच रोजगार क्षेत्रात प्रवेश करणारे असतील.
- विकसित भारत रोजगार योजना ही १ ऑगस्ट २०२५ ते ३१ जुलै २०२७ या कालावधीत निर्माण होणाऱ्या नोकऱ्यांसाठी लागू असेल.
- पंतप्रधानांच्या ‘विकसित भारत’ या दृष्टिकोनाशी ही योजना सुसंगत असल्याचं सांगितलं जातं.
- त्याचबरोबर या योजनेला देशातील रोजगार निर्मितीबाबत केंद्र सरकारच्या बांधिलकीचं प्रतीक मानलं जात आहे.
योजना कशी कार्यान्वित होईल?
सीएनबीसी-न्यूज १८ च्या वृत्तानुसार, खासगी क्षेत्रात पहिली नोकरी मिळवणाऱ्या प्रत्येक तरुणाला या योजनेंतर्गत १५,००० रुपये दिले जातील. ही रक्कम केंद्र सरकारकडून दोन हप्त्यांमध्ये दिली जाईल. त्याचबरोबर तरुणांना रोजगाराची संधी देणाऱ्या कंपन्यांनाही प्रोत्साहन दिलं जाईल. सलग सहा महिने नोकरी केल्यानंतर या योजनेचा ७,५०० रुपयांचा पहिला हप्ता संबंधित तरुणाला दिला जाईल. तर, दुसरा हप्ता नोकरीला १२ महिने पूर्ण झाल्यावर मिळेल. ही रक्कम थेट ‘ईपीएफओ’ खात्यात जमा केली जाईल. बचत करण्याच्या सवयीला प्रोत्साहन देण्यासाठी या प्रोत्साहन राशीचा एक भाग हा बचत (सेव्हिंग अकाऊंट) खाते किंवा ठेव खात्यात निश्चित कालावधीसाठी ठेवला जाईल आणि त्यानंतर कर्मचारी ते पैसे काढू शकतील.

विकसित भारत रोजगार योजनेसाठी पात्रता काय?
पंतप्रधान विकसित भारत योजनेचा लाभ फक्त खासगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या तरुणांनाच मिळेल. मात्र, त्यासाठी त्यांचा मासिक पगार एक लाख रुपयांपर्यंत असावा, अशी अट आहे. त्यापेक्षा जास्त पगार घेणारे तरुण या योजनेसाठी अपात्र ठरतील. त्याचबरोबर लाभार्थ्याचे नाव ‘Employees’ Provident Fund Organisation’ (EPFO) मध्ये नोंदवलेले असणे आवश्यक आहे. ज्या तरुणांच्या नावाची नोंद १ ऑगस्ट २०२५ पूर्वी EPFO किंवा Exempted Trust मध्ये झालेली नसेल, त्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल. म्हणजेच पहिल्यांदाच नोकरी करणारे तरुण १५,००० रुपयांची मदत मिळण्यासाठी पात्र असतील. योजनेचा लाभ मिळविण्यासाठी संबंधित नोकरदार तरुणाने एका कंपनीत किमान सहा महिने काम करणे गरजेचे आहे.
हेही वाचा : Weapon License : भारतात शस्त्र बाळगण्याची कुणाला मिळते परवानगी? परवान्याचे काय आहेत नियम?
योजनेंतर्गत कंपन्यांनाही मिळणार लाभ
नव्या उमेदवारांना रोजगार देणाऱ्या कंपन्यांनाही सरकारकडून प्रोत्साहन दिले जाणार आहे. त्यासाठी कंपन्यांना ईपीएफओकडे नोकरीची नोंद नियमितपणे करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर ५० पेक्षा कमी कर्मचारी असलेल्या कंपन्यांना किमान दोन नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे बंधनकारक असेल. तर, ५० किंवा त्याहून अधिक कर्मचारी असलेल्या आस्थापनांनी किमान पाच नवे कर्मचारी कायमस्वरूपी किमान सहा महिने कामावर ठेवण्याची अट आहे. कंपन्यांना मिळणारी रक्कम थेट त्यांच्या पॅन कार्ड लिंक असलेल्या खात्यात जमा केली जाणार आहे. या योजनेमुळे देशातील खासगी क्षेत्रात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, अशी अपेक्षा सरकारला आहे.
पंतप्रधान विकसित भारत योजना प्रामुख्याने सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग, उत्पादन, सेवा आणि तंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रांमध्ये नोकरीच्या संधी वाढवण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे. या योजनेची घोषणा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, या योजनेमुळे बेरोजगार तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील. आतापर्यंत केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणल्या आहेत. तसेच महिलांसाठी ‘लखपती दीदी’सारखी योजना सुरू केली आहे. सध्या लाखो शेतकरी व महिला या योजनांचा लाभ घेत आहेत. आता तरुणांसाठी ही योजना आणली आहे.