Krishna’s Sudarshan Chakra in the Mahabharata: भारतीय संस्कृतीत देवी-देवतांची अखंड परंपरा आहे. भक्ताच्या मनाला ईश्वराचे जे रूप भावते, त्या स्वरूपातच देव त्याला दर्शन देतो. असंच काहीसं त्या सावळ्या कृष्णाच्या बाबतीत आहे. राधेचं चित्त चोरणाऱ्या त्या कृष्णामध्ये कधी कोणाला सखा सापडतो, तर कधी कुणाला सर्वश्रेष्ठ रणनीतिकार. रूप कोणतही असो, या कृष्ण सावळ्याची पकड भारतीय जनमानसावर अखंड आहे. तो कधी यमुनेच्या किनाऱ्यावर अवखळ लीला करतो, तर कधी आपल्या भक्ताचा सारथी होऊन विराट रूपाचं दर्शन देतो. महाभारतातील कौरवांच्या प्रत्येक कुटील डावाला उधळून लावणारा आणि युद्धतंत्र सांगणाराही तोचं. याच कृष्णाकडून प्रेरणा घेऊन सध्या भारत सरकारने सुदर्शन मोहीम राबवली आहे. या मोहिमेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात केली.

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशाची सुरक्षा अधिक कडक करावी यासाठी सुदर्शन मोहिमेची आखणी करण्यात आल्याचे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितले. परंतु, हा संदर्भ देताना मोदींनी महाभारताचा उल्लेख केला आणि श्रीकृष्णाने सुदर्शन चक्र कसं वापरलं हेही सांगितलं. त्याच पार्श्वभूमीवर मोदींनी महाभारतातील नेमका कोणता संदर्भ दिला हे जाणून घेणं नक्कीचं माहितीपूर्ण ठरणारं आहे.

मोदी, स्वातंत्र्य दिन आणि कृष्णजन्म

पंतप्रधान मोदी यांनी महाभारतातील जयद्रथाच्या वधाचा प्रसंग कथन केला. श्रीकृष्णाने सुदर्शन चक्राने सूर्य झाकोळून टाकला आणि भरदिवसा अंधार झाला. त्यामुळे अर्जुनाला त्याचा ‘पण’ पूर्ण करता आला. पंतप्रधान मोदींनी दिलेला हा दाखला अनेकार्थाने महत्त्वाचा आहे. स्वातंत्र्यदिनी सुदर्शन मोहिमेची घोषणा करण्यात आलेली असली, तरी यावर्षी कृष्ण जन्माष्टमी ही १६ ऑगस्टला आहे. म्हणजेच १५ ऑगस्टच्या मध्यरात्री १२ वाजता श्रीकृष्णजन्म साजरा होणार होता. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या मुहूर्तावर मदमस्त झालेल्या जयद्रथाचे गर्वहरण आणि मग वध, या कथेच्या दिलेला दाखला म्हणजे पाकिस्तानला वेळीच सावरण्याचा इशारा म्हणावा लागेल.

कोण होता हा जयद्रथ?

कौरवांचा जावई अशीच जयद्रथाची ओळख करून देणं सार्थ ठरणारं आहे. माणसाची जशी प्रवृत्ती असते, त्याचप्रमाणे तो आपली संगत निवडतो. जयद्रथानेही आपला मार्ग निवडला होता. कौरवांच्या एकुलत्या एक असलेल्या बहिणीचा हा पती, एवढीच त्याची ओळख नाही. महाभारतातील सिंधू राज्याचा हा राजा. वृद्धक्षत्र हा त्याचा पिता. सिंधुराज आणि सैन्धव या इतर नावांनी देखील तो प्रसिद्ध होता.

पांडवांशी वैर

वनवासाच्या कालखंडात पांडव धौम्य ऋषींच्या आश्रमात वास्तव्यास असताना एक महत्त्वाची घटना घडली. एकदा पाचही पांडव शिकारीसाठी गेलेले असताना जयद्रथ आश्रमात आला होता, तिथे त्याने द्रौपदीला पाहिले आणि आपल्या मंत्र्यांकडून तिच्याविषयी माहिती काढली. ती कोणाची पत्नी आहे, हे समजल्यावरही, त्याने माघार घेतली नाही. वासनांध मनाने तो तिच्याकडे गेला आणि तिला लग्नाची मागणी घातली. तिने नकार दिला. पण, कामातुर माणसाला कसलीच लाज नसल्याने त्याने थेट द्रौपदीला रथात टाकून पळवून नेले.

जयद्रथाला जीवदान

द्रौपदीहरणाची वार्ता पांडवांना कळताच, त्यांनी त्याच्या रथाचा पाठलाग केला. जय म्हणजे विजयी, जयद्रथ हा रथ चालवण्यात निष्णात होता. म्हणूनच त्याचं नाव हे जयद्रथ पडलं होतं. परंतु, पांडवांच्या युद्धकौशल्यापुढे त्याचं सामर्थ्य फिकं पडलं. अर्जुनाने धनुष्याची प्रत्यंजा ओढली आणि अचूक नेम साधतं त्याच्या घोड्यांना मारलं. त्यामुळे जयद्रथ पांडवांच्या हाती लागला. भीमाने त्याचे केस भादरून त्याला चांगलंच बदडून काढलं. परंतु, आपल्याच चुलत बहिणीचा नवरा असल्याने त्याला जीवदान देण्यात आलं आणि इथूनच पुढे हे वैमनस्य विकोपाला पोहोचलं.

कुरुक्षेत्र आणि युद्ध

कुरुक्षेत्रावरील कौरव-पांडवांच्या युद्धादरम्यान ११ व्या दिवशी जयद्रथ कौरवांच्या बाजूने युद्धात उतरला होता. त्याने द्रुपद आणि त्याच्या पांचाल सेनेचा पराभव केला. परंतु, अर्जुनपुत्र अभिमन्यूकडून त्याला हार पत्करावी लागली होती. मात्र, युद्धाच्या तेराव्या दिवशी द्रोणाचार्यांनी चक्रव्यूह रचला. अभिमन्यू चक्रव्यूहात शिरला आणि जयद्रथाने मागून येणाऱ्या पांडव सेनेचा मार्ग बंद केला. त्यामुळे, अभिमन्यू कौरवांच्या हाती सापडला, कौरवांनी सख्या पुतण्याची निर्घृण हत्या केली. अभिमन्यूचा मृत्यू पांडवांसाठी प्रचंड धक्का होता.

पांडवांना वेळीच जयद्रथाचा वध न केल्याची खंत वाटत होती. पुत्र वियोगाने दुःखी झालेल्या अर्जुनाने युद्धभूमीवर दुसऱ्या दिवशी सूर्यास्तापूर्वी जयद्रथाचा वध करण्याचा ‘पण’ घेतला. अन्यथा तो स्वतःला जिवंत जाळून घेईल, अशी प्रतिज्ञा केली.

युद्धभूमीवरील १४ वा दिवस

१४ व्या दिवशी युद्धभूमीवर अर्जुनापासून जयद्रथाचे रक्षण करणे हे कौरवांचे उद्दिष्ट होते. त्याचे रक्षण करण्यासाठी तीन व्यूहांचीं रचना द्रोणाचार्यांनी केली. शकट, सूचीमुख, पद्म अशी या व्यूहांचीं नावं होती. या व्यूहांचीं रचना अर्जुन सूर्यास्तापर्यंत जयद्रथापर्यंत पोहोचू नये अशी करण्यात आली होती. अर्जुन, भीम आणि सत्यकिने एक एक व्यूह पार करण्याचा प्रयत्न केला. परंतु, सूर्यास्तापर्यंत अर्जुनाला जयद्रथापर्यंत पोहोचणं अशक्य होतं. हजारोंची कौरव सेना समोर उभी होती.

सुदर्शनधारी कृष्ण सारथी

यावेळी अर्जुनाच्या मदतीला श्रीकृष्ण धावून आला. आपल्या सुदर्शन चक्राने त्याने सूर्य झाकून टाकला. त्यामुळे जयद्रथाला सूर्यास्त झाल्याचे वाटले. तो व्यूहातून बाहेर आला आणि अर्जुनाला खिजवू लागला. परंतु, सूर्याला मात्र तात्पुरता ग्रहण लागले होते. जयद्रथ बाहेर येताच, कृष्णाने सुदर्शन चक्र मागे घेतले आणि अर्जुनाला म्हणाला “हा सूर्य आणि हा जयद्रथ… कर शिरच्छेद”. अर्जुनाने क्षणाचाही विलंब न करता दिव्यास्त्र सोडले आणि जयद्रथाचा शिरच्छेद केला.

भारताची आधुनिक सुदर्शन मोहीम काय आहे?

‘सुदर्शन चक्र मोहीम’ ही भारताच्या सामरिक, नागरी आणि धार्मिक स्थळांना संभाव्य शत्रूंच्या हल्ल्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रे विकसित करण्यासाठी राबवली जाणारी महत्त्वाकांक्षी योजना आहे. ही प्रणाली इस्रायलच्या जगप्रसिद्ध ‘आयर्न डोम’ संरक्षण कवचाच्या तोडीस तोड असेल, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. २०१० पासून इस्रायल वापरत असलेल्या या बहुस्तरीय प्रणालीने हमास आणि हिझबुल्ला यांच्या हजारो रॉकेट हल्ल्यांना ९० टक्क्यांहून अधिक यशस्वीपणे रोखले आहे.

मोदी म्हणाले, “२०३५ पर्यंत या राष्ट्रीय सुरक्षा कवचाचा विस्तार, बळकटीकरण आणि आधुनिकीकरण करण्याचा निर्धार केला आहे. भगवान श्रीकृष्णांच्या सुदर्शन चक्रातून प्रेरणा घेत, आम्ही हा मार्ग निवडला आहे. ‘सुदर्शन चक्र मोहीम’ ही संपूर्णपणे भारतातच संशोधित, विकसित आणि निर्मित केलेली आधुनिक प्रणाली असेल. त्यासाठी भारतीय तरुणांच्या प्रतिभेचा पूर्ण वापर होईल. ही यंत्रणा दहशतवादी हल्ले रोखण्याबरोबरच अचूक व प्रभावी प्रत्युत्तर हल्ले करण्यासही सक्षम असेल.”

त्यांनी स्पष्ट केले की, ही मोहीम भारताच्या स्वदेशी नवकल्पना आणि सक्षम संरक्षण क्षमतांबाबतच्या ठाम भूमिकेचे प्रतीक आहे.

श्रीकृष्णाच्या सुदर्शन चक्रासारखीच नीती, दूरदृष्टी आणि अचूक वार करण्याची क्षमता आजच्या काळातही तितकीच महत्त्वाची आहे. महाभारतातील जयद्रथ वधाचा प्रसंग फक्त एका युद्धकथेतला भाग नसून, तो वेळ साधून योग्य निर्णय घेण्याचा आणि शत्रूला मात देण्याचा आदर्श धडा आहे. आज ‘सुदर्शन चक्र मोहीमे’च्या माध्यमातून भारत हाच संदेश देत आहे. आपण फक्त संरक्षणच करणार नाही, तर गरज भासल्यास निर्णायक प्रत्युत्तरही देऊ. श्रीकृष्णाचा सारथीभाव आणि रणनीती जितकी त्या काळात पांडवांसाठी महत्त्वाची ठरली, तितकीच आज ही नवी यंत्रणा भारतासाठी महत्त्वाची ठरणारी आहे.