-अविनाश कवठेकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विजांचा कडकडाट, कमी कालावधीत होणारा जास्त पाऊस, रस्त्यावरून वाहणारे पाण्याचे लोट, पाणी न साचणाऱ्या रस्त्यांवरही साठलेले फूटभर पाणी, ओढे-नाल्यांना आलेले पूर, ठप्प झालेली वाहतूक, पाण्याच्या प्रवाहात वाहत जाणाऱ्या दुचाकी आणि मोटारी, कमरेएवढ्या तुंबलेल्या पाण्यातून वाट काढणारे नागरिक असे भयावह चित्र पुण्यात अलीकडच्या काही वर्षांत सातत्याने दिसून येत आहे. पावसात पाणी तुंबून किमान दोनदा शहर ठप्प झाले नाही तर मुंबईकरांना पाऊस पडल्यासारखेही वाटत नाही. तसाच प्रकार आता पुण्यातही सुरू झाला आहे. जोरदार पाऊस झाला की पूर आणि शहर तुंबणे असे समीकरणच पुण्यात झाले आहे. एके काळी टुमदार आणि सुंदर शहर अशी ओळख असलेल्या आणि सध्या वास्तव्यास देशातील सर्वोत्तम शहर तसेच स्मार्ट सिटी अशी ख्याती असलेल्या पुण्याची पावसाळ्यात वाताहात का होते, पुण्याची अवस्था मुंबईप्रमाणे का झाली, त्यामागे कोणती कारणे आहेत, असाच प्रश्न सर्वांना पडला आहे.

पुण्यात किती पाऊस पडतो?

राज्यातील मुंबईनंतरचे दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे शहर आणि सर्वाधिक लोकसंख्या असलेले देशातील पुणे हे सातव्या क्रमांकाचे शहर आहे. तर मुंबई शहराला मागे टाकून पुणे महापालिका क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यातील सर्वाधिक मोठी महापालिका ठरली आहे. राज्याच्या पश्चिम भागात मुळा-मुठा नद्यांच्या काठावर वसलेल्या पुण्यात पावसाळ्याच्या हंगामात सरासरी ६५० ते ७५० मिलिमीटर एवढे पर्जन्यमान आहे. पावसाची सरासरी तपासल्यास अलीकडच्या काही वर्षात पाऊस सरासरीपेक्षा जास्त पडत आहे. पावसाच्या एकूण नोंदीमध्ये रोजची भर पडत आहे.

शहरातील ओढ्या-नाल्यांचे वास्तव काय?

शहरात सध्या १५८.३९ किलोमीटर लांबीचे नाले आहेत. पावसाळी चेंबर्सची संख्या ३८ हजार ८१ असून, पावसाळी गटारांची लांबी १७८.९६७ किलोमीटर आहे, तर कल्व्हर्ट्सची संख्या ४२९ आहे. पावसाळापूर्व कामावेळी आकडेवारीच्या आधारे केवळ कामे पूर्ण केली जात असल्याचे भासविले जाते. इंग्रजांनी महसुली नकाशे करताना नाले, ओढे यांचे प्रवाह दाखविले होते. शहराचा विकास आराखडा करताना काही नाले गायब करण्यात आल्याची वस्तुस्थिती आहे. नाल्यांवर बांधकामे करण्यास मान्यता देण्यात आली. तर काही ठिकाणी नाले वळविण्यात आले, त्यावर रस्ते बांधण्यात आले. त्याचे विपरीत परिणाम आता पुढे येत आहेत.

पावसाचे पाणी तुंबण्याची कारणे कोणती?

कमी वेळात होणारी विक्रमी अतिवृष्टी हे पाणी तुंबण्याचे प्रमुख कारण असले तरी पावसाळी वाहिन्या आणि गटारांची स्वच्छता करण्याकडे महापालिकेचे होत असलेले अक्षम्य दुर्लक्ष हेही तेवढेच महत्त्वाचे कारण आहे. अनधिकृत बांधकामे, अशास्त्रीय पद्धतीने होणारे रस्ते खोदकाम, सिमेंट रस्त्यांचा अट्टाहास, पावसाळी गटारे आणि वाहिन्यांची अपुरी संख्या ही कारणेही पाणी तुंबण्यास जबाबदार आहेत. कमी वेळेत झालेल्या जास्त पावसाचे पाणी वाहून नेणारी यंत्रणा महापालिकेकडे नाही. महापालिकेचे वरिष्ठ अधिकारीही तशी कबुली जाहीरपणे देतात. काही वर्षांपूर्वी पर्यंत पावसाळी वाहिन्यांतून ताशी ५० मिलिमीटर एवढे पावसाचे पाणी वाहून जाईल, अशी यंत्रणा शहरात होती. त्यानंतर त्यात काही प्रमाणात सुधारणा करण्यात आली. मात्र सध्या ताशी साठ मिलिमीटर एवढा पाऊस झाला तरीही पाणी वहन यंत्रणा पूर्णपणे कोलमडून पडते.

पाणी वहन यंत्रणेची स्थिती काय ?

महापालिकेला सहा प्रभागांत पावसाळी पाण्याचा निचरा करणारी यंत्रणाच कार्यान्वित करता आली नसल्याची वस्तुस्थिती आहे. शहराचा भौगोलिक विचार करता शहरासाठी ८०० किलोमीटर लांबीच्या पावसाळी वाहिन्यांची गरज असून सध्या जेमतेम ३५० किलोमीटर लांबीच्या पावसाळी वाहिन्यांचे जाळे शहरात आहे. महापालिकेच्या पूरनियंत्रण आणि आपत्ती व्यवस्थापन आराखड्यानुसार अनेक ठिकाणी पावसाळी वाहिन्यांची यंत्रणा नसल्याचे उघडकीस आले आहे. शहरात १ हजार ४०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे जाळे आहे. रस्त्यांचे जाळे लक्षात घेता शहरासाठी ८०० किलोमीटर लांबीच्या पावसाळी वाहिन्यांची आवश्यकता आहे. सद्य:स्थितीमध्ये केवळ निम्म्याच ठिकाणी पावसाळी वाहिन्या आहेत. सध्या बारा मीटर रुंदीच्या रस्त्यांवर ८० किलोमीटर लांबीच्या पावसाळी वाहिन्या आहेत. तर उर्वरित रस्त्यांवर ३२५ किलोमीटर लांबीच्या पावसाळी वाहिन्यांचे जाळे आहे.

भविष्यात पुण्याला कितपत धोका?

पुण्यात सन २०३० पर्यंत पावसाचे प्रमाण ३२ टक्क्यांनी वाढणार आहे. त्यामुळे पुढील काही वर्षांत हा धोका वाढणार आहे. पुण्यातील पावसाचे प्रमाण वाढणार असल्याचा अहवाल केंद्र सरकारने नेमलेल्या पेरी या संस्थेने दहा वर्षापूर्वीच महापालिकेला दिला आहे. तसेच महापालिकेने प्रायमूव्ह या संस्थेकडून ओढे, नाल्यातून वाहणाऱ्या पाण्याची परिस्थिती आणि कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचा अहवाल दिला आहे. त्यामुळे पर्जन्यवृष्टी झाली तर पूरपरिस्थितीच ओढवणारच आहे. त्यातच महापालिकेने नदीकाठ सुधारणा, पुनरुज्जीवन आणि सुशोभीकरणाच्या नावाखाली नदीपात्र अरुंद करण्याचा घाट घातला आहे.

नदी पुनरुज्जीवन योजनेचा तोटा काेणता?

नदीपात्रात दोन्ही बाजूंना ३०-४० फूट उंचीच्या काँक्रिटच्या किंवा दगडी भिंती उभारून नदीला कालव्याचे स्वरूप दिले जाणार आहे. या भिंती निळ्या आणि लाल पूररेषेच्या आत असल्याने नदीपात्र अरुंद होणार असून नदी प्रवाहाचा काटछेद (क्रॉस सेक्शन) कमी होऊन नदीचे पूरवहन क्षेत्र कमी होणार आहे. नद्यांचा प्रवाह अडविला जाणार आहे. नदीपात्रात भर आणि नदीकाठाने भराव घालण्यात येणार असल्यामुळे १ हजार ५४४ एकर जमीन नव्याने निर्माण होणार आहे. या जमिनीवर अनेकविध प्रकारची बांधकामे केली जाणार असून विविध सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. नदीकाठच्या १८० एकर सरकारी जागांवरही सुविधांच्या नावाखाली बांधकामे होणार आहेत. नदीपात्रातील १३ लाख ८३ हजार ११० चौरस मीटर जागा बांधकामासाठी उपलब्ध होणार असून शहरात वारंवार पूर येण्याची ‘शाश्वत व्यवस्था’च याद्वारे निर्माण केली जाणार आहे.

महापालिका बोध घेणार का?

नगरसेवक, ठेकेदार आणि प्रशासनातील अधिकारी यांच्या त्रिकुटाच्या संगनमताने निळी आणि लाल पूररेषा गुंडाळून टाकली आहे. मात्र भविष्यातील वाढता धोका लक्षात घेता ठोस उपाययोजना गांभीर्याने करण्याची वेळ आली आहे. पाणी वहनचा पायाभूत सुविधा, रस्त्याच्या कडेला पाणी वाहून नेण्यासाठीच्या उपाययोजना, नाल्यांचे रुंदीकरण, पावसाळ्या गटारांची नियमित साफसफाई आदी गोष्टी महापालिकलेला कराव्या लागणार आहेत.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune rains why city gets water logged during monsoon print exp scsg
First published on: 20-10-2022 at 07:17 IST