scorecardresearch

विश्लेषण : ‘रॅकून’ या कुत्र्यासदृश प्राण्यामुळे करोना विषाणू पसरला? कसा आहे हा प्राणी, कुठे आढळतो?

रॅकून प्रजातीचे कुत्रे हे पूर्णपणे कुत्रे नाहीत आणि रॅकूनही. हा प्राणी कॅनिड (Canid) परिवारातून उत्क्रांत झालेला असून कोल्ह्याशी साधर्म्य साधणारा आहे. कोविड १९ विषाणूच्या उत्पत्तीचा आणि या प्राण्याचा काय संबंध आहे?

Raccoon dogs linked to coronavirus pandemic
रॅकून जातीच्या कुत्र्यांपासून करोना विषाणू पसरला, असा नवा दावा तज्ज्ञांनी केला आहे.

करोना महामारीच्या तीन वर्षांनंतरही या महामारीच्या उत्पत्तीचे गूढ अद्याप पूर्णपणे उलगडलेले नाही. चीनमधील वूहान प्रांतातील ज्या मासळी बाजाराकडे सर्व जगाने बोट दाखविले, त्या बाजाराशी निगडित आणखी एक माहिती समोर आली आहे. शास्त्रज्ञांनी वूहान प्रांतातील हुनान या मासळी बाजारातून अनेक नमुने तपासणीसाठी गोळा केले होते. या नमुन्यांची आनुवंशिक तपासणी केली असता करोना विषाणूची उत्पत्ती रॅकून प्रजातीच्या कुत्र्यापासून झाली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. संसर्ग झालेले प्राणी या बाजारात विकले गेल्यानंतर त्यापासून या महामारीची सुरुवात झाली असावी, असा पुरावा शास्त्रज्ञांना मिळाला असल्याचा दावा केला जात आहे.

आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या एक पथकाने १६ मार्च रोजी वरील दावा केला आहे. या पथकात ॲरिझोना विद्यापीठातील उत्क्रांतिवादी जीवशास्त्रज्ञ मायकल वोरोबेय (Michael Worobey), कॅलिफोर्नियामधील स्क्रिप्स रिसर्च इन्स्टिट्यूटचे विषाणुतज्ज्ञ क्रिस्टिन अँडरसन (Kristian Andersen) आणि सिडनी विद्यापीठातील जीवशास्त्रज्ञ एडवर्ड होल्मस (Edward Holmes) या तज्ज्ञांचा समावेश होता. असोसिएटेड प्रेसच्या माहितीनुसार, जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांनी सांगितले की, करोनाची उत्पत्ती नेमक्या याच कारणामुळे झाली का? याचे ठाम उत्तर ही नवी माहिती देत नाही. मात्र अचूक उत्तराच्या दिशेने मार्गक्रमण करताना प्रत्येक माहिती आपल्यासाठी महत्त्वाची आहे.

हे वाचा >> Covid-19 चा विषाणू बरा झाल्यानंतरही सोडत नाही रुग्णाची पाठ; तो ‘या’ ८ आजारांच्या रूपाने पुन्हा पुन्हा हल्ला करतो

आनुवंशिक डेटा गोळा करण्यासाठी हुनान बाजारातील विविध ठिकाणांवरून लाळेचे नमुने जानेवारी २०२० मध्ये गोळा करण्यात आले होते. या बाजारातून विषाणू पसरला असे म्हटले जात असल्यामुळे चीन सरकारने त्यानंतर हा बाजार बंद केला, असे न्यू यॉर्क टाइम्सने लिहिले. या बाजारातून घेतलेल्या नमुन्यांच्या माहितीचे विश्लेषण मागच्या वर्षी प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यामध्ये गोळा केलेल्या नमुन्यांमध्ये कोविड विषाणू आणि मानवी डीएनए आढळून आला असल्याचे सांगितले गेले होते. चिनी संशोधकांनी मात्र या नमुन्यांमध्ये प्राण्यांचा डीएनए असल्याचा दावा फेटाळून लावला होता.

आता नव्या संशोधनानुसार, रॅकून कुत्र्याच्या डीएनएमध्ये कोविड पॉझिटिव्ह नमुने आढळल्यामुळे नवा पुरावा समोर आला आहे. मात्र तरीही या पुराव्यामुळे करोना महामारी रॅकून कुत्रा किंवा इतर प्राण्यापासूनच पसरली का? हे ठामपणे सिद्ध करता आलेले नाही.

रॅकून कुत्रे म्हणजे नेमके काय, ते कसे असतात?

रॅकून प्रजातीचे कुत्रे हे पूर्णपणे कुत्रे नाहीत आणि रॅकूनही नाहीत. हा प्राणी कॅनिड (Canid) या कुत्रासदृश प्राण्याच्या परिवारातून उत्क्रांत झालेला असून तो कोल्ह्याशी साधर्म्य साधणारा आहे. कॅनिड परिवारातला रॅकून हा एकमेव प्राणी आहे, जो हिवाळ्यात आपल्या हालचाली कमी करून एका ठिकाणी विश्रांतीच्या अवस्थेत जातो. ज्यामुळे कडक हिवाळ्यात जिवंत राहण्यासाठी त्याची शक्ती टिकून राहते. ‘स्लेट’ मासिकाच्या माहितीनुसार, रॅकून कुत्र्याच्या दोन प्रजाती आहेत. एक नायस्ट्रेट्स प्रोसायनोइडेस, (Nyctereutes procyonoides) जी सामान्य रॅकून कुत्रा म्हणून ओळखली जाते. दुसरी म्हणजे, नायस्ट्रेट्स पी. विवेरिनस (Nyctereutes p. viverrinus), ही जपानी रॅकून कुत्र्याची प्रजाती आहे.

हे प्राणी जवळपास १६ पाउंड (अंदाजे ७.२५ किलो) वजनाचे असतात. रॅकून सर्वभक्षी प्राणी आहे. उंदीर आणि फळे, बिया असे पदार्थ रॅकून आवडीने खातात. उन्हाळ्यात अतिशय आकर्षक, झुबकेदार केसांचे दिसणारे रॅकून हिवाळ्यात मात्र आकसून जातात. त्यांची त्वचा थंडीपासून बचाव करण्यासाठी जाड होते. रॅकून कुत्रे हे एकावेळी एकाच जोडीदारासोबत (Monogamous) राहणे पसंत करतात, अशी माहिती न्यू यॉर्क टाइम्सने दिली आहे.

हे ही वाचा >> आरोग्य वार्ता : करोना संक्रमणाचा संपूर्ण शरीरावर गंभीर परिणाम

रॅकून कुत्रे कुठे आढळतात?

रॅकून हे पूर्व आशियात आणि सामान्यपणे चीन, कोरिया आणि जपानच्या बऱ्याच भागांत आढळतात. या ठिकाणी याला टनुकी (Tanuki) असे संबोधले जाते. युरोपमधील काही भागांमध्येही आता रॅकून आढळतात. १९२० च्या दरम्यान प्राण्यांचे केस (Fur) विकणाऱ्या व्यापाऱ्यांनी रॅकून युरोपात आणले होते. सध्या रॅकून कुत्रे हे युरोप आणि युरोपियन युनियनमधील स्थानिक परिसंस्थेसाठी सर्वात मोठा धोका मानले जात आहेत. बाहेरच्या जगातून आलेला मांसाहारी प्राणी म्हणून युरोपमध्ये रॅकून कुत्र्याची गणना होते.

तथापि, जपानमध्ये मात्र रॅकूनला आदराचे स्थान आहे. ‘स्लेट’ मासिकाने माहिती दिल्याप्रमाणे, रॅकून म्हणजेच टनुकीशी संबंधित अनेक लोककथा (दंतकथा) येथे प्रसवल्या गेल्या आहेत. टनुकी हे मस्तीखोर प्राणी असून त्यांच्यामुळे आर्थिक नशीब फळफळते, अशा कथा प्रचलित आहेत. काही जपानी कथांमध्ये टनुकीला महाकाय प्राण्यासारखेदेखील चित्रित करण्यात आले आहे, जे छत्री आणि माश्याच्या जाळ्याप्रमाणे आपले पंख आणि इतर अवयव पसरवू शकतात.

वूहानमध्ये रॅकून कुत्रे का विकले जातात?

रॅकूनच्या केसांसाठी अनेक दशकांपासून त्यांचे पालन केले जात आहे. युनायटेड स्टेट्समधील ह्यूमन सोसायटीने दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक वर्षी लाखो रॅकून कुत्र्यांची चीनमध्ये शिकार केली जाते. चीन हा रॅकूनच्या केस आणि कातडीचे सर्वाधिक उत्पादन करणारा देश आहे. ‘स्लेट’च्या माहितीनुसार, ही उत्पादने विकत घेणारा यूएस हा सर्वात मोठा देश आहे.

रॅकूनची मागणी आणि पुरवठा यांचा ताळमेळ साधण्यासाठी विक्रेते अतिशय छोट्या जागेत रॅकूनचे पालन करतात. आपल्याकडे कोंबड्यांची जशी वाहतूक केली जाते, तशीच अतिशय दाटीवाटीने आणि छोट्या पिंजऱ्यातून रॅकूनचीही वाहतूक केली जाते. वाहतूक करताना अनेकदा रॅकून आणि इतर प्राणी एकत्रच ठेवले जातात. विविध आजारांच्या उत्पत्तीसाठी ही परिस्थिती अतिशय पोषक ठरते.

रॅकून कुत्रे इतर आजारांशी निगडित आहेत का?

एनपीआरच्या (National Public Radio ही अमेरिकेतील ना नफा या तत्त्वावर चालणारी वृत्तसंस्था आहे) अहवालाने ही शक्यता फेटाळलेली नाही. एनपीआरने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, २००३ साली रॅकून कुत्रे आणि त्यांच्याशी निगडित असलेले स्तनधारी प्राणी मांसाकरिता चीनच्या प्राणी-बाजारात जिवंतपणे विकले जात होते. त्या वेळी SARS हा कोरोना विषाणू त्यांच्यापासून मानवापर्यंत पोहोचला असल्याचे समोर आले होते.

२०२२ साली, चीनमध्ये १८ विविध प्रजातींच्या दोन हजार प्राण्यांवर एक अभ्यास करण्यात आला होता. या प्रजातींच्या प्राण्यांचे मांस चीनमधील लोकांकडून खाल्ले जाते. यामध्ये रॅकून कुत्र्यांचाही समावेश आहे. अभ्यासानंतर लक्षात आले की, या प्रजातीमधून १३ संसर्गजन्य विषाणू कुटुंबातील तब्बल १०२ प्रकारच्या विषाणूंचे वहन होत होते. त्यांपैकी २१ विषाणू हे मानवांसाठी अतिधोकादायक श्रेणीत गणले जातात. या अभ्यासात, रॅकून कुत्र्यांमधून चार प्रकारचे कॅनीन (कुत्र्यांच्या प्रजातीमध्ये आढळणारा) कोरोना विषाणू आढळले, जे मानवामध्येही आढळले होते, अशी माहिती एनपीआरने (NPR) दिली.

पण याचा अर्थ रॅकून कुत्रे हे करोना विषाणूचा नैसर्गिक स्रोत आहेत, असे होत नाही. वूहानमध्ये चाचणी करण्यात आलेल्या रॅकून कुत्र्यांमध्ये वटवाघूळ किंवा इतर प्राण्यांच्या माध्यमातून विषाणूचा संसर्ग झालेला असू शकतो, अशी शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-03-2023 at 13:46 IST

संबंधित बातम्या