Rahul Gandhi mentions Eklavya: शनिवारी (१५ डिसेंबर) राहुल गांधी यांनी संसदेत महाभारतातील ‘एकलव्या’चाउल्लेख केला. तसेच एकलव्याची तुलना देशातील तरुण, लहान व्यावसायिक आणि शेतकऱ्यांशी केली. या कथेचा संदर्भ देऊन राहुल गांधी यांनी विद्यमान सरकारवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले. “द्रोणाचार्यांनी एकलव्याचा अंगठा कापून घेतला त्याप्रमाणे तुम्ही (सरकार) भारतीय तरुणांचे अंगठे कापत आहात.” मोठ्या उद्योजकांना दिल्या जाणाऱ्या विशेष सवलती या शेतकरी तसेच लहान व्यावसायिकांचे अंगठे कापण्यासारखे आहे. तर अग्निवीर योजना आणि सरकारी नोकऱ्यांमधील बाह्यप्रवेश (लॅटरल एंट्री) योजना नोकरी शोधणाऱ्या तरुणांचे अंगठे कापत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर एकलव्याच्या कथेच्या माध्यमातून धर्म आणि कर्तव्याबाबत कोणते प्रश्न विचारले गेले त्याचाच घेतलेला हा आढावा.

एकलव्य कोण होता?

प्रचलित कथेनुसार एकलव्य हा एक साहसी निषाद मुलगा होता. त्याला धर्नुविद्येत विशेष रस होता. म्हणूनच तो द्रोणाचार्यांकडे शिष्य म्हणून स्वीकार करावा यासाठी गेला. द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडव राजकुमारांचे गुरू होते. द्रोणाचार्यांनी एकलव्याला शिष्य म्हणून स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे एकलव्याने द्रोणाचार्यांची मातीची मूर्ती तयार केली आणि त्यांना आपले गुरू मानून स्वतःहून धनुर्विद्येचा अभ्यास केला. त्याच्या कठोर परिश्रमामुळे तो धनुर्विद्येत पारंगत झाला. एके दिवशी द्रोणाचार्य राजकुमार शिष्यांबरोबर शिकार करण्यासाठी गेले होते. त्यांच्याबरोबर त्यांचा कुत्राही होता. जो सतत भुंकत होता. परंतु एका क्षणाला तो शांत झाला. द्रोणाचार्य आणि त्यांच्या शिष्यांनी ज्यावेळी कुत्र्याकडे पाहिले त्यावेळी त्याचे तोंड संपूर्ण बाणांनी भरलेले होते. परंतु त्याला कुठल्याही प्रकारची इजा झालेली नव्हती. म्हणून हा अद्वितीय धनुर्धर कोण याचा शोध घेतला असता, तो एकलव्यच असल्याचे उघड झाले. त्यानंतर द्रोणाचार्यांनी तुझे गुरु कोण असे विचारले असता त्याने आपणच माझे गुरु आहात हे उत्तर दिले. त्यानंतरची कथा गुरुदक्षिणेची आहे. ज्यात द्रोणाचार्यांनी एकलव्याकडून उजवा अंगठा गुरुदक्षिणा म्हणून मागितला.

अधिक वाचा: Datta Jayanti 2024: एकमुखी ते त्रिमुखी दत्तमूर्ती; सिंधू संस्कृती, वेद ते गुरुचरित्र त्रिमूर्तीचा विकास कसा झाला?

त्याच्या अंगठा गमावल्यानंतर काय घडले? What Happened After Eklavya Lost His Thumb?

एकलव्याच्या प्रसिद्ध कथांमध्ये त्याच्या अंगठा कापण्याच्या प्रसंगाबद्दल माहिती आहे. परंतु त्याआधी तो कोण होता आणि त्यानंतर त्याचे काय झाले याबाबत फारशी माहिती मिळत नाही.

एकलव्य कोण होता? Who Was Eklavya?

एकलव्य हा निषाद राजाचा म्हणजेच हिरण्यधनूचा पुत्र होता. महाभारतात डोंगराळ किंवा वनात राहणाऱ्या जमातींना निषाद असे संबोधले गेले आहे. मुख्यतः शिकार आणि मासेमारी ही त्यांची उपजीविका होती. एका वेगळ्या कथेनुसार एकलव्य हा हिरण्यधनूचा दत्तक पुत्र होता. त्याचे जन्मदाते पिता देवश्रवा होते. देवश्रवा हे वसुदेव (भगवान श्रीकृष्णाचे वडील) यांचे कनिष्ठ बंधू होते, असे म्हटले जाते.

एकलव्य दत्तक पुत्र कसा ठरला?

काही कथांनुसार एकलव्याच्या जन्माच्या वेळी ऋषींनी त्याच्या भविष्याबद्दल वाईट भविष्यवाणी केली होती. त्यामुळे त्याच्या जन्मदात्या पालकांनी त्याला जंगलात सोडून दिले. एकलव्य जंगलात लहानाचा मोठा झाला.

एकलव्याचा पुढील जीवनप्रवास:

महाभारताच्या उद्योग आणि द्रोण पर्वामध्ये एकलव्याच्या जीवनाची पुढील कथा वर्णन केली आहे. अंगठा गमावल्यानंतर तो शिकार आणि युद्धकलेत पूर्वीइतका प्रवीण राहू शकला नाही. परंतु तो आपल्या जमातीचे प्रतिनिधित्त्व करणारा पराक्रमी योद्धा ठरला.

एकलव्याचा मृत्यू:

एकलव्याचा शेवट भगवान श्रीकृष्णाच्या हातून झाला. कृष्णाने त्याला ठार मारले. कारण तो पुढे जिवंत राहिला असता तर यादव वंशासाठी तो मोठा धोका ठरला असता अशी काही कथांमध्ये नोंद आहे.

अधिक वाचा: Black Peter gold discovery: या ‘काळ्या’ मराठी माणसाने न्यूझीलंडमध्ये शोधली होती सोन्याची खाण; काय आहे इतिहास?

कथेमधील गूढता:

एकलव्याची कथा त्याच्या पराक्रम, त्याग आणि नशिबाच्या अंधारमय वळणांनी भरलेली आहे. ती धर्म, कर्तव्य आणि सामाजिक विषमतेवर विचार करायला भाग पाडते. द्रोणाने एकलव्याचा अंगठा कापून घेतल्याने त्याच्या युद्धकौशल्यावर फारसा परिणाम झाला नाही असे दिसते. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की, एकलव्याने ‘चामड्याच्या हातमोज्यां’सह लढाई केली आणि तो भीतीदायक योद्धा दिसत होता. हिरण्यधनू एकलव्याचा पिता मगध राजा जरासंधाचा सैन्यप्रमुख होता. जरासंध हा भगवान श्रीकृष्णाचा कट्टर शत्रू होता आणि त्याने मथुरेवर अनेक वेळा हल्ला केला होता. “एकलव्याला शेवटी श्रीकृष्णाने ठार मारले. त्याच्या मृत्यूचे तपशील महाभारतात फारसे दिलेले नाहीत,” असे दिल्लीच्या ईस्ट ऑफ कैलाश येथील ISKCON मंदिरातील ज्येष्ठ प्रचारक जितमित्र दास यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’ला सांगितले. “महाभारतात श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की, कुरुक्षेत्र युद्ध [पांडव आणि कौरव यांच्यातील अंतिम युद्ध] सुरू होण्यापूर्वी त्यांनी कौरवांच्या बाजूने लढणाऱ्या अनेक पराक्रमी सेनापतींचा नाश केला. या योद्ध्यांमध्ये एकलव्याचाही समावेश होता,” असे दास यांनी सांगितले .

एकलव्याच्या कथेमधील विविध अर्थ

एकलव्याची कथा प्रामुख्याने उच्चवर्णीय आणि उच्चवर्गीय समाजाने ज्ञानावर नियंत्रण कसे ठेवले हे सांगते. निम्नवर्णीय आणि निम्नवर्गीय लोकांना शिक्षा करण्याच्या माध्यमातून त्यांचे कौशल्य आणि प्रतिभा अन्यायकारक पद्धतीने नष्ट केली, हे या कथेच्या माध्यमातून सूचित होते. महाभारत हा योग्य आणि अयोग्य यावर लिहिलेला एक अत्यंत प्रगल्भ ग्रंथ आहे. जो सरळसरळ द्विध्रुवीय विचारसरणीला नाकारतो. त्यामुळे ज्या व्यक्ती तत्त्वतः योग्य वाटतात त्यांच्या वर्तनावरही प्रश्न उपस्थित होऊ शकतात. महाभारत योग्य आणि अयोग्य यापेक्षा कर्तव्यावर म्हणजेच धर्मावर अधिक भर देतो. एखाद्या विशिष्ट परिस्थितीत त्या व्यक्तीचे कर्तव्य काय होते?, त्यांनी ते कर्तव्य पार पाडले का?, त्यांच्या कृतींचे परिणाम काय झाले? या कथा वर्तनाचे आणि निर्णयाचे विश्लेषण अधिक गुंतागुंतीने करताना धर्माच्या दृष्टिकोनातून पाहण्यास हा ग्रंथ प्रवृत्त करतो.

द्रोणाचार्य आणि एकलव्य

द्रोणाचार्य पांडवांचेही गुरू होते, परंतु कुरुक्षेत्र युद्धात त्यांनी कौरवांची बाजू घेतली. कारण त्यांचे कर्तव्य हस्तिनापूरच्या राज्याशी जोडलेले होते. जिथे दुर्योधनाचा पिता धृतराष्ट्र राजा होता. एकलव्याच्या संदर्भातही द्रोणाचार्यांच्या वर्तनाला याच कर्तव्याच्या दृष्टिकोनातून समजून घेता येते. द्रोण हे राजगुरू होते आणि त्यांचे कर्तव्य कोणत्याही प्रकारे राजकुमारांसाठी प्रतिस्पर्धी निर्माण होऊ नये हे सुनिश्चित करणे होते. परंतु, त्यांच्या कर्तव्याने त्यांना असा टोकाच्या निर्णय घेण्यास प्रवृत्त केले कारण त्यांनी पूर्वी एक चूक केली होती. परंपरेनुसार राजकुमार ऋषींच्या आश्रमात शिक्षणासाठी जात असत. जिथे त्यांना इतर शिष्यांप्रमाणेच वागणूक दिली जाई (उदाहरणार्थ: रामायणात राम वसिष्ठ आणि विश्वामित्र यांच्या आश्रमात गेले होते). पण महाभारतात द्रोणाचार्य राजवाड्यात आले. त्यामुळे त्यांच्या शिष्यांचा राजकुमार म्हणून असलेला दर्जा कधीच दुर्लक्षित होऊ शकला नाही. याशिवाय, महाभारताच्या अनेक कथांमध्ये द्रोणांच्या अर्जुनाविषयीच्या विशेष जिव्हाळ्याचा उल्लेख आहे. अर्जुन हा द्रोणांचा सर्वात प्रिय शिष्य असल्याने त्याला सर्वोत्तम बनवण्यासाठी त्याच्यासाठी असलेली स्पर्धा नष्ट करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. हा प्रयत्न फक्त अर्जुनसाठी होता, सर्व राजकुमारांसाठी नव्हे.

अधिक वाचा: Kalyan Durgadi Fort: दुर्गाडी किल्ल्याचा मुद्दा वादग्रस्त; पण कल्याणचा २००० वर्षांचा प्राचीन इतिहास काय सांगतो?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकलव्याच्या संदर्भात:

एकलव्य हा निःसंशय एक शोकांत नायक आहे. मात्र, द्रोणाचार्यांनी स्पष्ट नकार दिल्यानंतरही त्याने त्यांना आपले गुरू मानले. गुरू केवळ युद्धकला शिकवतो असे नाही, तर तिचा योग्य उपयोग करण्यासाठीचे नियम आणि नैतिक मर्यादाही शिकवतो. एकलव्य हा स्वयंपूर्ण योद्धा असल्याने त्याला ही नैतिक शिकवण मिळाली नव्हती. त्यामुळे योग्य मार्गदर्शनाशिवाय एकलव्य एक संभाव्य धोकादायक व्यक्ती ठरू शकला असता. यामुळे द्रोणांचा निर्णय, कर्तव्य आणि नैतिकता यांच्यात गुंतागुंतीचा संवाद उभा करतो. तर एकलव्याच्या कथेत त्याग, दुर्दैव आणि त्याच्या कर्तृत्वामुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा समावेश होतो. म्हणुनच योग्य आणि अयोग्य यांसारख्या गुंतागुंतीच्या प्रश्नांची चर्चा ही ग्रंथांच्या माध्यमातून त्याबरोबर असलेल्या आवश्यक संदर्भांसह केली जाते. परंतु, जी कथा लोकस्मृतीत टिकून आहे त्या लोककथेमध्ये एकलव्य हा निःसंशय अन्यायग्रस्त नायक आहे.