Raj Thackeray Says Hanuman Chalisa Is in Awadhi: गेल्या काही दिवसांपासून राज्यात हिंदी विरुद्ध मराठी आणि मराठी विरुद्ध अमराठी अशा मुद्यांवरून राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी मिरा भाईंदरमध्ये एका व्यापाऱ्याने मराठी बोलण्यास नकार दिला. त्यानंतर अमराठी व्यापाऱ्यांनी मराठीविरोधात एक मोर्चा काढला. व्यापाऱ्यांच्या मराठीविरोधी मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी मराठीसाठी एक मोर्चा काढला होता. त्यानंतर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा मिरा भाईंदरमध्ये पार पडली. यावेळी राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीच्या मुद्यांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत त्यांना थेट जाहीर आव्हान दिलं. याच भाषणात राज ठाकरे म्हणाले, तुलसीदासांनी लिहिलेली हनुमान चालीसाही अवधीत आहे, हिंदीत नाही. हिंदीने अवधीसारख्या किमान २५० भाषा मारल्या.

एखाद्या भाषेची किंमत केवळ तिच्या आर्थिक उपयोगावर ठरत नाही. भाषा म्हणजे संस्कृतीचं प्रतिबिंब असतं. त्यामुळेच अनेक अभ्यासक अवधी भाषेच्या पुनरुज्जीवनासाठी प्रयत्न करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर अवधी भाषा नेमकी काय आहे? अयोध्येशी तिचा काय संबंध काय? ती नेमकी कोणत्या भागात बोलली जाते याचाच घेतलेला हा आढावा.

अवधीची व्युत्पत्ती

अवधी ही उत्तर प्रदेश आणि त्याच्या शेजारील भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर बोलली जाते. जॉर्ज अब्राहम ग्रियर्सन यांच्या नेतृत्त्वाखाली भारताचे पहिले भाषा सर्वेक्षण (Linguistic Survey of India) झाले होते. ग्रियर्सन यांनी त्यावेळी अवधीला ‘पूर्व हिंदी’ म्हणून वर्गीकृत केलं होतं. बाबूराम सक्सेना यांनी १९७१ साली लिहिलेल्या Evolution of Awadhi: A Branch of Hindi या पुस्तकात अवधीचं वर्णन “उत्तर भारतात बोलल्या जाणाऱ्या इंडो-आर्यन भाषाकुलातील पूर्व हिंदी शाखेची मुख्य बोली” असं केलं आहे.

पूर्वी आणि कोसली

अवधी भाषा हरदोई, खेरी, फैजाबाद (अयोध्या), अलाहाबाद, जौनपूर, मिर्झापूर, फतेहपूर, आग्रा आणि प्रतापगढ जिल्ह्यांमध्ये बोलली जाते. सक्सेना यांनी म्हटलं आहे की, भारताच्या भाषा सर्वेक्षणात (LSI) अवधीसाठी ‘पूर्वी’ (पूर्वेकडील) आणि ‘कोसली’ (पूर्वीच्या कोसल राज्याची भाषा) असे शब्दही वापरले आहेत. शिवाय अवधीसाठी ‘बैसवाडी’ हा एक शब्द देखील वापरला जातो. परंतु, तो लखनऊ, उन्नाव, रायबरेली आणि फतेहपूर यांसारख्या मर्यादित भागांमध्ये प्रचलित आहे.

अवधीच्या बोली

सक्सेना पुढे सांगतात की, अवधीच्या पश्चिमेला पश्चिम हिंदीच्या कनौजी आणि बुंदेली या दोन बोली वापरल्या जातात. तर पूर्वेला बिहारी भाषाशाखेतील भोजपुरी वापरली जाते. अवधी ही मुख्यत्त्वे पश्चिम हिंदी आणि बिहारी यांचामधला दुवा आहे. हिंदी तुलनेने अधिक कठोर आहे, तर अवधी थोडी मवाळ आहे. तर बिहारीमध्ये लिंगभेद फारसा पाळला जात नाही.” अवधी भाषक बोली पश्चिमेकडील (सीतापूर, लखनऊ, उन्नाव, फतेहपूर), मध्यवर्ती (बहराइच, बाराबंकी, रायबरेली) आणि पूर्वेकडील (गोंडा, अयोध्या, प्रयागराज, जौनपूर, मिर्झापूर) या तीन भागात विभागल्या जातात. सक्सेना आपल्या लेखनात अवधीला सातत्याने ‘बोली’ म्हणून संबोधतात. मात्र कॅनडाच्या ब्रिटीश कोलंबिया विद्यापीठातील सांस्कृतिक इतिहासतज्ज्ञ अ‍ॅन मर्फी यांनी बोली आणि भाषा यांच्यातील फरक समजून तसा काळजीपूर्वक भेद केला पाहिजे असे म्हटले आहे. ते म्हणतात, कोणत्या भाषेला बोली किंवा भाषा म्हणावं हा एक राजकीय निर्णय असतो.

रामचरितमानसमुळे अवधी अजरामर

रामचरितमानसने साहित्य क्षेत्रात अवधीला अजरामर केलं. रामचरितमानस १६३१ साली लिहिलं गेलं. अवधीतील आणखी एक महत्त्वाचं साहित्यिक काव्य म्हणजे मलिक मुहम्मद जायसी यांचं ‘पद्मावत’ (इ.स. १५४०). ही एक प्रेमकथा आहे. मुस्लिम कवीने लिहिलेलं हे काव्य विशेषत्वाने उल्लेखनीय आहे, कारण कवीला संस्कृतचं ज्ञान नव्हतं. तरीही सक्सेना म्हणतात, जायसींची अवधी तुलसीदासांपेक्षा अधिक शुद्ध होती. जायसींचं दुसरं प्रसिद्ध काव्य ‘अखरावत’ हेही अवधीतच होतं. कवी कबीर आणि नाथ योगी गोरखनाथ यांचं साहित्यही अवधीमध्येच आहे.

दरबारी संगीतात अवधी

हिंदुस्तानी संगीताच्या मुख्य परंपरा किमान सोळाव्या शतकापासून आजच्या भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये सादर केल्या जात आहेत आणि त्यांना दरबारी पाठबळही लाभत आलं आहे. ही प्रगत सांगितिक परंपरा मुघल भारताच्या दरबारी संस्कृतीत खोलवर रुजलेली होती. विशेषतः दिल्ली आणि लखनऊच्या दरबारांवर हा प्रभाव प्रकर्षाने जाणवतो. सांगितिक परंपरांच्या घडणीत संस्कृत, पर्शियन आणि अवधीसारख्या उत्तर भारतीय लोकभाषांमधील समृद्ध सैद्धांतिक साहित्याचा मोठा वाटा होता. या संगीत परंपरेला तानसेनसारख्या महान व्यक्तींच्या छत्रछायेत भरभरून वाव मिळाला. हिंदुस्तानी संगीत नेहमीच त्या काळाच्या ऐतिहासिक घटनांशी संवाद साधत विकसित झालं. याचं एक ठळक उदाहरण म्हणजे १८७० साली लखनौमध्ये गायलेल्या ठुमरीचा उल्लेख रिचर्ड डेव्हिड विल्यम्स यांनी २०१४ च्या Hindustani Music Between Awadh and Bengal, c. 1758–1905 या प्रबंधात केला आहे.

‘लहान माणसांची भाषा’ कशी हरवली?

भाषाशास्त्रज्ञ आणि शिक्षिका पेगी मोहन यांनी त्यांच्या २०२१ मधील Wanderers, Kings, Merchants: The Story of India Through Its Languages या पुस्तकात म्हटलं आहे की, दहाव्या ते बाराव्या शतकांच्या दरम्यान काही लहान भाषा प्रचलित होत्या. दिल्लीच्या आसपास ब्रज आणि अवधीमध्ये काव्य रचलं जात होतं. पण त्याच काळात एक नवी, नाव न दिलेली बोली उदयाला आली, जिला आपण आज हिंदी म्हणून ओळखतो. indianexpress.com ला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणतात, “या ‘लहान भाषांमध्ये’ दिल्लीची देहलवी, अलीगड भागातील ब्रज आणि अवध भागातील अवधी यांचा समावेश होता.”

अवधी ही हिंदीची बोली हा गैरसमज

त्या मान्य करतात की, या भाषा फारशा वेगळ्या नव्हत्या, पण त्या थेट एकमेकांशी संबंधितही देखील नव्हत्या. मध्य आशियातून आलेल्या सुलतानतांमुळे देहलवीला महत्त्व मिळालं आणि १९११ नंतर ती राजधानीची भाषा झाली. “दिल्लीचं महत्त्व वाढत गेलं आणि देहलवीची मागणी वाढली… अवधी आणि ब्रज नाहीशा झाल्या नाहीत. परंतु, त्यांना हिंदीच्या बोली म्हणून पाहिलं जाऊ लागलं. पण, त्या कधीच हिंदीच्या बोली भाषा नव्हत्या” असं मोहन सांगतात. “काळानुसार हिंदीचा विस्तार झाला आणि तिचे एकेकाळचे प्रतिस्पर्धी असलेले इतर भाषिक समूह ‘हिंदीच्या बोली’ म्हणून गटात टाकले गेले,” असं त्या त्यांच्या पुस्तकात लिहितात.

अवधी ही १४ व्या शतकातील साहित्यिक भाषा

इतिहासतज्ज्ञ अ‍ॅन मर्फी यांचा यावर भर आहे की, अवधी ही आधुनिक हिंदीच्या उदयापूर्वीच एक पूर्ण विकसित भाषा होती. “चौदाव्या शतकात अवधीने साहित्यिक भाषा म्हणून स्थान मिळवलं होतं, तर ब्रजने पंधराव्या शतकाच्या सुरुवातीला साहित्यिक भाषा म्हणून उत्तर भारतात प्रवेश केला. अवधीला ‘बोली’ म्हणणं हे एक राजकीय कृत्य आहे. १९ व्या शतकाच्या शेवटी आणि २० व्या शतकाच्या सुरुवातीला अवधी आणि ब्रज यांना हिंदीच्या बोली म्हणून वर्गीकृत केलं गेलं.”

भाषा व राजकारण

या बदलावर भाष्य करताना आशा सारंगी त्यांच्या २००९ च्या Language and Politics in India या पुस्तकात लिहितात, “स्वातंत्र्यानंतर हिंदीच्या विकासाचा जो पॅटर्न पाहायला मिळतो, तो वसाहतवादी काळात झालेल्या वाढीपेक्षा गुणात्मकदृष्ट्या वेगळा आहे…” हिंदीला मोठा प्रेक्षकवर्ग मिळाल्याचं त्या मान्य करतात, पण “हिंदीने आपली आधीची सांस्कृतिक ओळख गमावली आहे, जी मुख्यतः पश्चिम उत्तर प्रदेश आणि थोडक्याच पूर्वेकडील भागांपुरती मर्यादित होती आणि उर्दूबरोबर भाषिकदृष्ट्या मिसळलेली होती.” हिंदीने अवधी, भोजपुरी, मारवाडी इत्यादींना झाकोळलं आहे.

हिंदीने केलेलं सपाटीकरण

हा प्रमाण भाषेचा (standardisation) अर्थात वेगळ्या शब्दांत सांगायचे तर भाषेच्या सपाटीकरणाचा प्रवास केवळ उत्तर भारतापुरता मर्यादित नव्हता. मोहन सांगतात, “बंगालमध्येही असाच कल दिसून येतो, जिथे सुलतानांच्या दरबारात प्रथम लोकप्रिय झालेली भाषा आज आपण मानक बंगाली म्हणून ओळखतो. पण चितगाव बंगालीसारख्या इतर भाषिक प्रकारांचं काय झालं, यावर कोणीच प्रश्न उपस्थित केला नाही. कारण त्या सर्वांना बंगालीच्याच स्थानिक रूपांमध्ये धरलं गेलं. पण, अवधी आणि ब्रज या नेहमीच स्वतंत्र नावांनी ओळखल्या जात होत्या.”

अवधी महिलांना जवळची, तर हिंदी पुरुषसत्ताक

मोहन एका वेगळ्या लैंगिक समजुतीचाही उल्लेख करतात, जी अवधी बोलण्याशी जोडलेली आहे. सईद नक्वी यांच्या Being the Other: The Muslims in India या आत्मचरित्रात म्हणतात की, पश्चिम उत्तर प्रदेशातील मुस्तफाबाद या त्यांच्या गावात पुरुष उर्दू बोलायचे आणि स्त्रिया अवधी. ही परंपरा आजही सुरू असल्याचं ममता सिंग सांगतात, “घरातील स्त्रियांच्या तोंडची भाषा अजूनही अवधीच आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाषा हे सांस्कृतिक उत्तरदायित्व

भाषेचं राजकारण हा केवळ संवादाचा नव्हे, तर संस्कृतीच्या अस्तित्वाचा प्रश्न असतो. अवधीसारख्या समृद्ध भाषांचा इतिहास हेच दर्शवतो की, कोणतीही भाषा ही केवळ संवादाचं माध्यम नसून ती संस्कृती, परंपरा आणि ओळखीचं जिवंत दालन असते. म्हणूनच भाषा जपणं ही केवळ भावनिक बाब नाही, तर सांस्कृतिक उत्तरदायित्व आहे