आज रमजान महिन्यातील शेवटचा दिवस आहे. महिन्याभराच्या कडक उपवासानंतर जगभरातील मुस्लीम समुदाय या अध्यात्मिक-उपवासाच्या महिन्याला निरोप देण्याच्या तयारीत आहे. जगभरात कोट्यवधी लोकं हा सण आणि त्यानिमित्ताने उपवास मोठ्या आत्मियतेने करतात, त्यातील अनेकांसाठी हा सण केवळ धार्मिक उत्सव नाही, तर त्याही पलीकडे आत्मशिस्त लावणारा, प्रेम निर्माण करणारा, भक्तीचा गहन मार्ग आहे. जगभरातील १.३ अब्ज मुस्लिमांपैकी ८० टक्के मुस्लिमांनी या प्रथेचा स्वीकार केलेला आहे. २०२१ साली एप्रिलमध्ये, प्रीमियर लीग सामन्यादरम्यान लँचेस्टर सिटी आणि क्रिस्टल पॅलेस या दोन्ही संघामधील खेळाडूंनी विश्रांतीसाठी सायंकाळी एकत्र येण्याचा पर्याय निवडला. त्यामुळे लँचेस्टरच्या वेस्ली फोफानाला त्याचा रमजानचा उपवास सोडता आला. रमजानच्या कालखंडात उपवासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. असे असले तरी उपवासाची परंपरा ही फक्त रमजानपुरताच मर्यादित नाही. योम किप्पूरच्या ज्यूडीक परंपरेपासून ते बौद्ध भिख्खूंच्या शुद्धीकरण विधीपर्यंत विविधधर्मी ज्ञानपरंपराना एकत्र जोडणारा तो समान दुवा आहे. सध्या चैत्र नवरात्रीचा कालखंड सुरु आहे, या नऊ दिवसांच्या कालखंडात अनेक हिंदू कुटुंबात उपवास केला जातो. म्हणजेच धर्म परंपरा जरी वेगळ्या असल्या तरी उपवासाची परंपरा मात्र समान असल्याचे दिसते. त्याच निमित्ताने उपवासाच्या ऐतिहासिक परंपरेचा हा घेतलेला आढावा.
उपवासाचा इतिहास
उपवास हे मानवी उत्क्रांतीचे एक अंतर्भूत अंग आहे. त्याचे मूळ जगण्याच्या प्रक्रियेत सापडते. अन्न- पाण्याशिवाय जगणे हे मानवात उपजत कधीच नव्हते. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा असणाऱ्या मानवाने कालपरत्त्वे उपवासाचे कौशल्य आत्मसात केले. केवळ माणूसच नाही तर सजीव सृष्टीतील अनेक प्रजातींमध्ये हा गुण आढळतो. सरपटणाऱ्या प्राण्यांपासून ते पेंग्विनपर्यंत, अस्वलांपासून ते सीलपर्यंत, अनेक प्राणी उपवास करतात.
उपवासामुळे आयुर्मान वाढू शकते. यीस्टपासून ते मानवापर्यंत विविध जीवांमध्ये चयापचय आरोग्य उपवासामुळे सुधारू शकते असे इंडियन एक्स्प्रेसच्या फास्टिंग,अ सेक्रेड ट्रॅडीशन स्पॅनिंग सेन्चुरीस अँड फ़ेथ्स या संशोधनपर लेखात नमूद केले आहे. अशा स्वरूपाचे संशोधन उपवास आणि सजीव जीवसृष्टीतील संबंध अधोरेखित करते. मानवी उत्क्रांतीचा कालखंड हा अनेक स्थित्यंतरातून गेलेला आहे. इसवी सनपूर्व १०,००० च्या आसपास कृषीक्रांती पूर्वी मानवाला अन्न टंचाईचा सामना करावा लागला होता. या कालखंडात त्याला कित्येक दिवस आणि आठवडे अन्नाशिवाय काढावे लागले होते. हे उपोषण केवळ तात्कालिक त्रास नव्हता, तर जगण्याच्या संघर्षातील अनुकूलताही होती. या उपोषणाने मानवाला जगण्याच्या संघर्षात बळ दिले.
ग्रीक संदर्भ
इसवी सनपूर्व पाचव्या शतकात ग्रीक वैद्य हिप्पोक्रेट्स याने उपवासाचा उल्लेख केला आहे, परंतु हा उल्लेख धार्मिक नसून उपचारांशी संबंधित आहे. काही आजारांवर उपचार म्हणून अन्न-पाणी वर्ज करण्याचा सल्ला तो देतो. आजारपणात मुळातच भूक कमी होते. अशा परिस्थितीत, उपवास शरीराच्या नैसर्गिक उपचार प्रक्रियेचा एक महत्त्वाचा पैलू म्हणून राहिला आहे.
उपवासाचे अध्यात्मिक महत्त्व
प्राचीन संस्कृतींमध्ये उपवासाला धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व होते. पेरूमधील हेलेनिस्टिक गूढ धर्मांपासून ते प्री-कोलंबियन समाजाच्या संस्कृतींमध्ये ईश्वराशी जवळीक साधण्यासाठी उपवास विधींचा वापर केलेला आहे. हा तपश्चर्येचा एक प्रकार आहे, किंबहुना उपवासाला भौतिक आणि पारलौकिक जगतातील एक समन्वय साधणारा दुवा म्हणून पाहिले गेले आहे.
उपवासाचे सामाजिक- राजकीय महत्त्व
उपवासाच्या धार्मिक-अध्यात्मिक महत्त्वाप्रमाणेच त्याचे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही तितकेच महत्त्व आहे. किंबहुना या क्षेत्रांमध्ये त्याकडे अभिव्यक्तीचे साधन म्हणून पाहिले जाते. भारतातील ब्रिटीश वसाहतवादी राजवटीचा निषेध करण्यासाठी महात्मा गांधींनी उपोषणाचा केलेला वापर हे एक मार्मिक उदाहरण आहे. संपूर्ण इतिहासात, विविध पार्श्वभूमी असलेल्या अनेकांनी न्याय्य हक्कांच्या मागणीसाठी उपोषणाचाच वापर केल्याची अनेक उदाहरणे आहेत.
विविध धर्मातील उपवास
उपवास हा अनेक धर्मांत महत्त्वाचा मानला आहे. प्रत्येक धर्मानुसार त्याचे स्वरूप, विधी आणि महत्त्व बदलते. इस्लाममध्ये रमजानकडे भक्तीचे आणि सांप्रदायिक एकतेचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. जगभरात रमजानच्या महिन्यात सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत मुस्लिम बांधव उपवास करतात. केवळ अन्न पाण्याचा त्याग इतकाच अर्थ यात नसतो, तर मोहमाया, अतिरिक्त इच्छा- वासना यांचा त्यागही अपेक्षित असतो. अनेकजन या कालखंडात दानधर्म करतात. रमजान हा इस्लामिक दिनदर्शिकेतील नववा महिना आहे, याच महिन्यात १४०० वर्षांपूर्वी प्रेषित मुहम्मद यांना कुराणच्या पहिल्या श्लोकांचा दृष्टांत झाला, त्यामुळे या महिन्याचे इस्लाममधील महत्त्व विशेष आहे. या महिन्यात प्रत्येक संध्याकाळी इफ्तारच्या जेवणाने उपवास सोडला जातो. असे असले तरी अपवादात्मक परिस्थितीत उपवास सोडण्याची परवानगी असते.
बौद्ध परंपरा
उपवास हा बौद्ध धर्माचाही महत्त्वाचा भाग आहे. बौद्ध धर्मातील उपवासाची परंपरा संयम आणि संतुलनाचा पुरस्कार करते. गौतम बुद्धांना बोधीज्ञान प्राप्त होण्यापूर्वी अन्न दाण्याचा एकही कण ग्रहण न करता त्यांनी कडक साधना केली होती. बौद्ध धर्माच्या विनयपीटकामध्ये भिक्खू आणि भिक्खुनींसाठी नियमावली दिली आहे, त्यात खानपानाच्या शिस्तीबद्दल नमूद करण्यात आले आहे. त्यात लंघन हे महत्त्वाचे अंग आहे. दुपारच्या जेवणाविषयीं नियम दिले आहेत.
ख्रिश्चन परंपरा
ख्रिश्चन धर्मात, उपवासाला सांप्रदायिक आणि वैयक्तिक असे दोन्ही महत्त्व आहे. ख्रिश्चन धार्मिक दिनदर्शिकेनुसार उपवासाचे दिवस ठरतात. पारंपारिक ब्लॅक फास्टपासून इस्टरच्या आधीच्या लेन्टेन उपवासापर्यंतचे संदर्भ आहेत. ख्रिस्ती आध्यात्मिक शुद्धीकरण आणि नूतनीकरणाचे साधन म्हणून उपवास करतात. बायबलमध्ये आढळणाऱ्या ४० दिवसांच्या येशूच्या उपवासाच्या कथेमुळे या धर्मातही उपवासाला महत्त्व प्राप्त झालेले आहे. ख्रिस्ती धर्मात आध्यात्मिक शिस्त आणि धैर्य यांचे अनुकरण करण्याचा एक मार्ग म्हणून उपवासाकडे पाहिले जाते.
हिंदू परंपरा
हिंदू धर्मात उपवासाचे अनेक प्रकार आहेत. त्याचे स्वरूप श्रद्धा आणि प्रथेप्रमाणे बदलते. एकादशी आणि प्रदोष उपवासापासून ते महाशिवरात्रीच्या कडक उपवासापर्यंत, हिंदू आध्यात्मिक भक्ती, शुद्धीकरण आणि तपश्चर्येचे साधन म्हणून उपवास करतात. धार्मिक सणांच्या दरम्यान उपवास श्रद्धा आणि धार्मिकतेची मूर्त अभिव्यक्ती म्हणून कार्य करतो, भक्त त्यांच्या देवतांचा सन्मान करण्यासाठी आणि दैवी आशीर्वाद मिळविण्यासाठी अन्न आणि काही सांसारिक भोगांचा त्याग करतात.
यहुदी परंपरा
यहुदी धर्मातही उपवास केला जातो. या उपवासाचा कालखंड योम किप्पूर या प्रायश्चित्त दिवसापासून ते तिशा बाव या शोकांतिकेच्या स्मरणार्थ पाळल्या जाणाऱ्या दिवसापर्यंत असतो.
‘द सेक्रेड अँड द प्रोफेन’ या पुस्तकात प्रसिद्ध धर्मशास्त्राचे अभ्यासक मिर्सिया एलियाड म्हणतात, ‘उपवासामुळे व्यक्ती भौतिक जगापासून मुक्त होऊन अध्यात्मिक जगताशी जोडली जाते’. इस्लाममध्ये रमझानदरम्यान केलेला उपवास शरीर आणि आत्म्याची सर्वांगीण शुद्धीकरण, आत्म-शिस्त, सहानुभूती आणि ईश्वर-चेतना वाढविण्याचे काम करतो. रमजानच्या महिन्यात धर्मदाय कृत्यांना अधिक महत्त्व दिले जाते. बौद्ध धर्मात उपवास हा आत्म-नियंत्रण आणि शिस्तीचा अभ्यास करण्याची पद्धत म्हणून स्वीकारला जातो. भिक्खू दुपारनंतर घन पदार्थांचे सेवन करत नाहीत, जे त्यांच्या सजगतेच्या वचनबद्धतेचे आणि सांसारिक इच्छांपासून अलिप्ततेचे प्रतीक आहे. या वैविध्यपूर्ण धार्मिक परंपरांमध्ये, उपवासाचे महत्त्व अन्नवर्ज्य करण्यापेक्षा अधिक आहे; हा एक पवित्र विधी आहे जो आत्म्याचे पोषण करतो, आध्यात्मिक वाढीस चालना देतो आणि व्यक्तींना परमात्म्याशी जोडतो.
परिणाम
रमजानचा महिना हा उन्हाळ्यात येतो, त्यामुळे उपवासाचा शरीरावर लक्षणीय परिणाम होऊ शकतो. डच अभ्यासक रेन व्हॅन इविज्क यांनी केलेल्या संशोधनानुसार रमजानच्या उपवासाचे आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात. डोकेदुखी, चक्कर येणे, मळमळ यापासून ते हृदयरोग आणि टाइप २ मधुमेह यासारख्या अधिक घातक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. रमजानमध्ये उपवास करणाऱ्या गरोदर स्त्रियांच्या संततीच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. निर्जळी उपवासामुळे कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. या उपवासाचा परिणाम आरोग्याच्या पलीकडे आर्थिक स्तरावरही जाणवतो. मुस्लिम बहुल देशात या कालखंडात कामाचे तास कमी केले जातात, महत्त्वाची कामे पुढे ढकलली जातात त्यामुळे उत्पादकतेत लक्षणीय घट दिसून येते.
परंतु योग्य मार्गाने उपवास केल्यास ते फायदेशीर ठरू शकते. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या सर्वसमावेशक अभ्यासानुसार , धार्मिक उपवास “व्यक्तीपासून समुदायापर्यंतच्या अनेक स्तरांवर अनेक संधी उपलब्ध करून देऊ शकतात…. आरोग्यदायी, अधिक न्याय्य आणि शाश्वत जीवनशैलीचा अवलंब करण्यासह सामाजिक परिवर्तन आणि बदलांना मदत करू शकतात. याव्यतिरिक्त, जर्नल ऑफ फॅमिली मेडिसिन अँड प्राइमरी केअरमध्ये प्रकाशित झालेल्या २०२० च्या अभ्यासात , संशोधकांनी रमजानच्या उपवासाचा कोलेस्टेरॉलच्या पातळीवर झालेला प्रभाव तपासला. १०० सहभागींच्या डेटाचे विश्लेषण केले, अभ्यासामध्ये रमजानच्या उपवासाच्या आधीच्या आणि नंतरच्या एकूण कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड पातळीची तुलना करण्यात आली. उपवासामुळे एकूण कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसरायड्स या दोन्हींमध्ये लक्षणीय घट झाल्याचे निष्कर्षांवरून दिसून आले. शिवाय, रमजानच्या उपवासावरील अतिरिक्त संशोधन असे सुचविते, की दुपारचे जेवण वगळण्याची प्रथा कोलेस्टेरॉलची पातळी आणि शरीराच्या इन्सुलिन संवेदनशीलतेच्या नियमनात योगदान देऊ शकते. उपवासाच्या कालखंडात पौष्टिक आहाराची जोड दिल्यास, ते वजन कमी करण्यास आणि शरीरातील चरबी कमी करण्यास देखील उपयुक्त ठरते.