Former Sri Lankan President Ranil Wickremesinghe: श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांना गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. विक्रमसिंघे यांना सरकारी निधीचा खासगी परदेश दौऱ्यासाठी गैरवापर केल्याच्या आरोपावरून शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. कोलंबो इथल्या सीआयडी मुख्यालयात चौकशीसाठी हजर राहिल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. पुढे त्यांना कोलंबो फोर्ट दंडाधिकारी न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. ७६ वर्षीय विक्रमसिंघे यांच्यावर सप्टेंबर २०२३ मध्ये ब्रिटनमधील वूल्वरहॅम्प्टन विद्यापीठाच्या कार्यक्रमासाठी शासकीय संसाधनांचा वापर केल्याचा आरोप आहे. या कार्यक्रमात त्यांच्या पत्नी प्राध्यापक मैथ्री विक्रमसिंघे यांचा सन्मान करण्यात आला होता. हा दौरा क्यूबातील हवाना इथे झालेल्या जी-७७ शिखर परिषदेवरून परतत असताना लंडनमध्ये केलेल्या थांब्यादरम्यान झाला होता. सीआयडीच्या एका अधिकाऱ्याने एएफपीला सांगितले की, या दौऱ्याला खासगी भेट मानले जात असून सार्वजनिक निधीचा वापर केल्यामुळे आरोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांनी यापूर्वी त्यांच्या कर्मचाऱ्यांचीही या दौऱ्याशी संबंधित खर्चाबाबत चौकशी केली होती.
नेमकं प्रकरण काय आहे?
श्रीलंका पोलिस आणि सीआयडीच्या सूत्रांनुसार, विक्रमसिंघे यांनी ब्रिटन दौऱ्यासाठीचा प्रवास आणि इतर खर्च भागवण्यासाठी सरकारी निधीचा वापर केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रवासासाठी सरकारी खर्चावर सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आल्याचेही आरोप आहेत. शिवाय हा दौरा अधिकृतही नव्हता. विक्रमसिंघे यांनी मात्र सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. पत्नीच्या प्रवासाचा खर्च त्यांनी वैयक्तिक पैशातून केला होता आणि सरकारी निधीचा वैयक्तिक हेतूसाठी वापर झालेला नाही, असे विक्रमसिंघे यांनी म्हटले आहे. बीबीसीला दिलेल्या माहितीनुसार, २०२२ ते २०२४ या कार्यकाळात विक्रमसिंघे यांनी एकूण २३ परदेश दौरे केले. या दौऱ्यावर श्रीलंकन सरकारला ६०० दशलक्ष रुपयांहून अधिक खर्च आला. सध्याचा त्यांच्यावरील खटला हा २०२३ मधील लंडन दौऱ्यापुरता असला तरी त्यांच्या संपूर्ण कार्यकाळातील परदेश प्रवासाच्या खर्चाची चर्चा होत आहे.
राष्ट्रपती म्हणून विक्रमसिंघे यांचा कार्यकाळ
जुलै २०२२ मध्ये गोटाबाया राजपक्षे यांच्या राजीनाम्यानंतर रानिल विक्रमसिंघे यांनी श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्षपद स्वीकारले होते. आर्थिक संकटामुळे जनआंदोलन उफाळून आल्यानंतर राजपक्षे यांनी देश सोडला होता. दुसरीकडे, विक्रमसिंघे यांनी त्यांचा उर्वरित कार्यकाळ पूर्ण केला. मात्र, सप्टेंबर २०२४ मधील पुनर्निवडणुकीत ते पराभूत झाले. त्यांच्या कार्यकाळात आर्थिक स्थैर्य आणण्यासाठी अनेक उपाय योजना केल्या होत्या. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) कडून त्यांनी श्रीलंकेच्या मदतीसाठी पॅकेजही मिळवले होते. त्यामुळे हळूहळू देश सावरण्यास सुरुवात झाली.
विक्रमसिंघे यांची राजकीय पार्श्वभूमी
रानिल विक्रमसिंघे हे युनायटेड नॅशनल पार्टीचे नेते असून गेल्या चार दशकांहून अधिक काळ विक्रमसिंघे श्रीलंकेतल्या राजकारणात केंद्रस्थानी आहेत. विक्रमसिंघे यांनी वकिलीचे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर १९७८ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती आणि त्यांचे काका ज्युनियस जयवर्धने यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी प्रवेश केला. त्यावेळी ते सर्वात तरुण कॅबिनेट मंत्री ठरले होते. १९९४ मध्ये पक्षातील अनेक नेत्यांच्या हत्येनंतर त्यांनी युनायटेड नॅशनल पार्टीचे नेतृत्व स्वीकारले. सहा वेळा त्यांनी श्रीलंकेचे पंतप्रधान म्हणून काम पाहिले आहे. राजकीयदृष्ट्या प्रभावशाली आणि माध्यम, व्यावसायिक क्षेत्रात मजबूत पाया असलेल्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला.
पुढची प्रक्रिया काय असेल?
सार्वजनिक निधीचा खासगी कामासाठी वापर केल्याच्या आरोपांवरून सीआयडी कायदेशीर कारवाई करत आहे. विक्रमसिंघे यांना कोलंबो फोर्ट दंडाधिकारी न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. यापुढे त्यांना कोठडीत पाठवले जाईल की औपचारिक गुन्हा दाखल केला जाईल, याबाबत निर्णय घेतला जाईल.
श्रीलंकेची अर्थव्यवस्था २०२२च्या मोठ्या संकटातून सावरत आहे, तरीही काही प्रमाणात देशासमोर आव्हाने ही आहेतच. जागतिक बँकेच्या अहवालानुसार, २०२३च्या अखेरीस श्रीलंकेची अर्थव्यवस्था काहीशी स्थिर झाली आहे. २०२४मध्ये अर्थव्यवस्थेत वाढही नोंदवली गेली.