‘Halal Lifestyle Township’ Project Near Mumbai: अल्लाहचे नाव घेऊन मेंदू व हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमनीवर घाव घालून प्राण्याची कत्तल करून मिळणाऱ्या मांसाला हलाल म्हणतात. यात फक्त डुकराचे मांस हराम म्हणजेच निषिद्ध आहे. हलाल (lawful) म्हणजे काय, हे अनेकांना ठाऊक असते. पण हलाल लाइफस्टाइल म्हणजे नेमकं काय, हे मात्र माहीत नसते. अलीकडेच मुंबईजवळ नेरळ येथे एका गृहनिर्माण प्रकल्पाच्या जाहिरातीत ‘हलाल लाइफस्टाइल टाऊनशिप’ असा उल्लेख करण्यात आला. धर्माच्या आधारावर प्रोत्साहन दिल्याचा आरोप होताच ही जाहिरात सोशल मीडियावरून हटवण्यात आली. त्याच पार्श्वभूमीवर, हलाल जीवनशैली म्हणजे काय आणि त्यामागील अर्थशास्त्र काय सांगते, याचा घेतलेला हा आढावा.
हलाल जीवनशैली : एक आधुनिक प्रवाह

शरीयतच्या नियमांनुसार जगण्याची पद्धत म्हणजे हलाल जीवनशैली. सध्या ही जीवनशैली जगभरात झपाट्याने पसरत असून ती आधुनिक जीवनपद्धती मानली जाऊ लागली आहे.

हलाल- इस्लामिक मूल्य

या जीवनशैलीच्या केंद्रस्थानी प्रामुख्याने मध्यमवर्गीय मुस्लिम समाज आहे. मध्यमवर्गीय मुस्लिम समाज हा आर्थिकदृष्ट्या स्थिर असतो, परंतु तो त्याचवेळी धार्मिकही असतो आणि इस्लामिक तत्त्वांचे पालन काटेकोरपणे करतो. सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या त्यांचा स्तर उच्च असून त्यांची क्रयशक्ती, गुंतवणुकीची क्षमता प्रबळ असल्याचे मानले जाते. मध्यमवर्गीय मुस्लिम ग्राहक आपल्या खरेदीतून आणि सेवनातून फक्त भौतिक नाही तर आध्यात्मिक लाभही शोधतात. म्हणूनच हलाल जीवनशैलीत हलाल हा शब्द केवळ आहारापुरता मर्यादित न राहता, जीवनशैलीच शरीयतच्या नियमानुसार घडवण्याकडे भर दिला जातो. म्हणजेच रोजच्या वापरातील प्रत्येक वस्तू ही हलाल नियमांचं पालन करणारी असणं आवश्यक आहे. यामध्ये इस्लामिक मूल्यांचे पालन महत्त्वाचे ठरत आहे.

हलाल ब्रँडिंग

  • आज जागतिक स्थरावर हलाल हा एक ‘कमोडिफिकेशन’ म्हणजे वस्तू-विक्रीतील ब्रँडिंगचा भाग झाला आहे. प्रत्येक उत्पादनात हलाल तत्त्व असणं आवश्यक मानलं जातं आणि त्यासाठी ग्राहक अधिक किंमत मोजायलाही तयार असतात.
  • जागतिक अर्थव्यवस्था आणि आकडेवारी
  • हलाल जीवनशैली आता फक्त श्रद्धेचा भाग नाही, तर एक प्रचंड जागतिक आर्थिक शक्ती झाली आहे.
  • दुबईतील Dinar Standard च्या अहवालानुसार, २०२२ साली मुस्लिम ग्राहकांनी २.२ ट्रिलियन डॉलर्स हलाल उत्पादनं व सेवांवर खर्च केले.
  • २०२५ पर्यंत हा आकडा २.८ ट्रिलियन डॉलर्सवर जाण्याचा अंदाज आहे.
  • यामध्ये अन्न (१.२ ट्रिलियन), फॅशन (३०० अब्ज), पर्यटन (२०० अब्ज), आरोग्य, औषधनिर्मिती, मीडिया व वित्तीय सेवा यांचा मोठा वाटा आहे.

भारतातील संदर्भ

  • भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा मुस्लिम लोकसंख्या असलेला देश आहे (२० कोटींहून अधिक). त्यामुळे इथे हलाल उत्पादनांचा बाजार झपाट्याने वाढत आहे.
  • हलाल मांस उद्योग : भारत जगातील सर्वात मोठा हलाल मांस निर्यातदार आहे. मध्यपूर्व, आग्नेय आशिया आणि आफ्रिकेत भारतीय कंपन्यांची मोठी मागणी आहे.
  • हलाल कॉस्मेटिक्स : पुणे, मुंबई, बेंगळुरू अशा शहरांत हलाल प्रमाणित सौंदर्यप्रसाधनं वाढत आहेत.
  • पर्यटन : केरळ, काश्मीर, राजस्थान येथे मुस्लिम प्रवाशांसाठी हलाल सुविधांसह पर्यटन प्रोत्साहन दिलं जात आहे.

धर्म आणि अर्थव्यवस्था : संबंध कसा?

  • धार्मिक बंधनं = बाजारपेठेची गरज : शरीयतचं पालन करणाऱ्या मुस्लिम समाजामुळे हलाल प्रमाणपत्र ही व्यापारी विश्वासार्हतेची हमी ठरत आहे.
  • आर्थिक संधी : अन्न, औषधं, पर्यटन, मीडिया, ई-कॉमर्स, वित्त प्रत्येक क्षेत्रात मुस्लिम समाजासाठी हलाल उद्योगातून मोठ्या संधी निर्माण होतात.
  • ग्लोबलायझेशन : मलेशिया, इंडोनेशिया, तुर्की, सौदी अरेबिया स्वतःला ‘हलाल हब’ बनवत आहेत.
  • आध्यात्मिक समाधान = ब्रँड लॉयल्टी : मुस्लिम ग्राहकांसाठी हलाल ब्रँड म्हणजे फक्त गुणवत्ता नव्हे तर श्रद्धेचं पालन असं एकत्रित समीकरण ठरलं आहे.
  • परोपकार आणि अर्थव्यवस्था : इस्लामिक बँकिंगमध्ये व्याज बंदी, झकात व वक्फ यामुळे समानतेवर आधारित आर्थिक रचना मजबूत होते.

वाढती मागणी

हलाल प्रमाणपत्र असलेल्या उत्पादनांची मागणी जगभरात सर्वाधिक दिसून येते. यामध्ये अन्नपदार्थ, फॅशन, सौंदर्यप्रसाधने, औषधनिर्मिती, दैनंदिन वस्तू, शिक्षण आणि पर्यटन यांचा समावेश होतो.

रेस्टॉरंट क्षेत्र

हलाल लेबलिंग फक्त पॅकेजिंगपुरते मर्यादित नाही. रेस्टॉरंट्समध्ये हलाल संकल्पना स्वीकारल्यास अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेत हराम घटकांचा वापर केला जात नाही. हलाल व नॉन-हलाल स्वयंपाक एकत्र मिसळला जात नाही. अशा रेस्टॉरंट्सवर हलालचा लोगो स्पष्टपणे दिसतो.

हलाल पर्यटन

हलाल पर्यटन म्हणजे पर्यटनाच्या प्रत्येक घटकात इस्लामिक मूल्यांचा समावेश. यात हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, ट्रॅव्हल एजन्सी आणि पर्यटन सेवा हे चार घटक महत्त्वाचे मानले जातात.

यामध्ये –

  • हलाल प्रमाणपत्र असलेली रेस्टॉरंट्स,
  • पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र स्विमिंग पूल,
  • मशिदी व नमाज स्थळं,
  • स्वच्छ पाण्याची सुविधा – यांना प्राधान्य दिलं जातं.
  • पारंपरिक पर्यटनात रात्रीचे मनोरंजन, मद्यपान, डुकराचे मांस असलेले पदार्थ आणि कपड्यांतील स्वैरपणा मान्य केला जातो. पण हलाल पर्यटनात सर्व सुविधा इस्लामी तत्त्वांनुसार असतात.
  • इंडोनेशियातील लॉम्बोक हा प्रदेश हलाल पर्यटनाचा पहिला आदर्श प्रयोग ठरला असून त्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर पुरस्कारही मिळाले आहेत.

हॉटेल्स आणि अतिथी सेवा

  • पर्यटनाच्या वाढीबरोबरच हॉटेल व्यवसायही झपाट्याने वाढतो आहे. यातूनच शरिया हॉटेल्स ही संकल्पना उदयास आली. ही हॉटेल्स सर्वसाधारण हॉटेल्ससारखीच असतात, पण काही अतिरिक्त नियम काटेकोरपणे पाळतात – उदा. फक्त विवाहित जोडपी किंवा कुटुंबांनाच निवासाची सोय असते.
  • खोलीत कुराण, किब्ला दिशादर्शक, जाजम आणि मुकना उपलब्ध असतात.
  • शरिया हॉटेल्समध्ये बार नसतात, त्यामुळे दारू व पार्ट्यांच्या आवाजापासून मुक्त वातावरण असतं.
  • काही हॉटेल्स हज-उमराह प्रवास कंपन्यांशी भागीदारी करून इस्लामी वातावरण निर्माण करतात.

फॅशन आणि सौंदर्य

  • फॅशन उद्योगात शरई मॉडेलवर आधारित कपड्यांना लोकप्रियता मिळत आहे. अंग झाकणारे, सैलसर आणि आरामदायी कपडे, तसेच आधुनिक डिझाईन्समुळे मुस्लिम समाजात हा ट्रेंड वाढतो आहे.
  • हिजाब आता केवळ अंग झाकण्यासाठी नसून फॅशनचे प्रतीक बनला आहे. विविध रंग, डिझाईन्स आणि पॅटर्न्समुळे हिजाब एक मोठा उद्योग ठरला आहे.
  • हलाल फॅशनमध्ये खऱ्या चामड्याऐवजी कृत्रिम चामड्याचा वापर होतो. उत्पादन प्रक्रियेत इस्लामी तत्त्व पाळणं आवश्यक मानलं जातं.
  • सौंदर्यप्रसाधनांमध्येही हलाल ट्रेंड झपाट्याने वाढत आहे. घटकांची निवड, वापराचे प्रकार, रंगसंगती या सगळ्यात हलाल संकल्पना लागू होत आहे. आधुनिक व जागतिक दृष्टिकोन असलेले मुस्लिम तरुण ब्रँड अॅम्बेसेडर होत आहेत, ज्यामुळे बाजारपेठेत मागणी वाढते आहे.

एकूणच, नेरळमध्ये हलाल जीवन शैलीला अनुसरून जी टाऊनशीप उभी राहत आहे. त्यात जाहिरातीत मेकअप करून हिजाब परिधान करणारी महिला आहे. तिने हिजाब परिधान केला असला तरी तिने आधुनिकतेचे इतर मापदंड स्वीकारले आहेत. धर्माला प्राधान्य असलं तरी आधुनिक सुविधांनी युक्त गृहप्रकल्प आहे. त्यामुळे या हलाल लाइफस्टाईलचा संबंध मांसाहाराशी नसून इस्लामिक जीवनशैलीशी संबंधित आहे.