RSS prayer’s history and significance: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) दैनंदिन तसेच साप्ताहिक शाखांपासून ते मोठ्या सभांपर्यंत प्रत्येक कार्यक्रमाचा शेवट एका विशिष्ट प्रार्थनेने होतो. ही प्रार्थना म्हणजे फक्त काही ओळींचं गाणं नाही, तर ती संघाच्या कार्यपद्धतीचं आणि ध्येयाचं प्रतीक मानली जाते. १९३९ सालापासून आजपर्यंत अखंडपणे म्हटली जाणारी ही संस्कृतमधील १३ ओळींची ‘प्रार्थना’ संघाच्या विचारधारेचं सार मांडते. तिच्या निर्मितीमागचा इतिहास, तिला आकार देणारे व्यक्तिमत्व आणि गेल्या शतकभरात तिचं वाढलेलं महत्त्व… यातूनच या प्रार्थनेची खरी ताकद उलगडते!

एकूण १३ ओळींची संस्कृतमधील ही प्रार्थना ‘नमस्ते सदा वत्सले मातृभूमे…’ या ओळीने सुरू होते आणि ‘भारत माता की जय’ या घोषणेसह संपते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांसाठी ही ‘प्रार्थना’ परमआदराची आणि गाढ श्रद्धा असलेली आहे.

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी शुक्रवारी राज्य विधानसभेत अनपेक्षितपणे हे संघगीत म्हणायला सुरुवात केली. भाजप आमदारांनी त्यांचे स्वागत केले, तर काँग्रेसच्या बाकांवर मात्र शांतता पसरली.

RSS रा. स्व. संघाची प्रार्थना

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांकडून ‘प्रार्थना’ म्हणून ओळखले जाणारे हे १३ ओळींचे संस्कृतमधील गीत ‘नमस्ते सदा वत्सले मातृभूमे…’ या ओळीने सुरू होते आणि ‘भारत माता की जय’ या घोषवाक्याने संपते.
‘भारत माता की जय’ या ओळीच्या आधी असे म्हटले आहे –

“विजेत्री च नः संहता कार्यशक्तिर्, विधायस्य धर्मस्य संरक्षणम्।
परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रं, समर्था भवत्वाशिष ते भृशम्॥”

(तुझ्या आशीर्वादाने आमचे संघटनकार्य धर्मसंरक्षणासाठी यशस्वी होवो आणि आमचे राष्ट्र सर्वोच्च वैभवाकडे जावो.)

१९३९ पासून म्हटली जाते ही प्रार्थना

  • ही प्रार्थना १९३९ पासून RSSच्या शाखा, सभा आणि कार्यक्रमांमध्ये म्हटली जाते. एक स्वयंसेवक प्रार्थनेतील एक एक ओळ म्हणतो आणि इतर स्वयंसेवक किंवा उपस्थित वर्ग ती ओळ सामुदायिक पद्धतीने त्याच्या मागोमाग म्हणतात.
  • रा. स्व. संघाच्या दैनंदिन एक तासाच्या शाखांचा समारोप या प्रार्थनेने होतो; मात्र ज्या कार्यक्रमांमध्ये सर्वसामान्य जनता उपस्थित असते, तिथे ही प्रार्थना सुरुवातीस गायली जाते.
  • गीत म्हणताना सर्वांनी आपल्या जागी उभे राहणे अपेक्षित असते. उजवा हात छातीपर्यंत उचलून जमिनीशी समांतर ठेवला जातो आणि तळहात खाली वळवलेला असतो.

प्रार्थनेचे लेखक

  • ‘प्रार्थना’चे लेखन नागपूरचे प्राध्यापक नरहरी नारायण भिडे यांनी केले होते. रा. स्व. संघाची RSS स्थापना करणारे पहिले सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचे ते जवळचे मित्र होते. भिडे इंग्रजी शिकवत असले तरी त्यांना संस्कृतचेही अतिशय उत्तम ज्ञान होते.
  • १९३९ साली वर्धा जिल्ह्यात झालेल्या स्वयंसेवकांच्या आठवडाभर चाललेल्या बैठकीत ही प्रार्थना आकाराला आली. या वेळी डॉ. हेडगेवार यांनी देशभरातील संघ कार्यक्रमांमध्ये म्हणता येईल, अशी एक प्रार्थना तयार करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर प्रा. भिडे यांनी या ओळी लिहिल्या, ज्या नंतर गीतरुपी प्रार्थनेत रूपांतरित करण्यात आल्या. ही प्रार्थना संघाची कार्यभावना आणि ध्येयाचे समग्र सार अभिव्यक्त करणारी मानली जाते.
Dr. Hedgewar
डॉ. केशव बळीराम हेडगेवार

प्रार्थनेची गरज

  • २७ सप्टेंबर १९२५, विजयादशमीच्या दिवशी नागपूरमध्ये स्थापना झाल्यानंतर अवघ्या एका वर्षभरात दिवसाच्या शाखेची सुरुवात भगव्या ध्वजाला वंदन करून आणि शेवट प्रार्थनेने करण्याची परंपरा दृढ झाली होती.
  • ही प्रार्थना हिंदी आणि मराठीत होती आणि तिचा शेवट छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु समर्थ रामदासस्वामी यांना उद्देशून केलेल्या आवाहनाने होत असे. उत्तर भारतात स्वयंसेवक जे हिंदीतील ओळी म्हणत असत त्या अशा होत्या : “हे प्रभो श्रीराम दूते, शील हमको दीजिए…”
  • परंतु संघ आणि त्यांचे कार्य देशभर विस्तारत गेले तसे सर्व कार्यक्रमांसाठी एकसमान प्रार्थना असावी, अशी गरज डॉ. हेडगेवार यांना वाटू लागली. आणि त्यानंतर ही प्रार्थना आकारास आली.