नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए)ने एअर इंडियाला क्रू मेंबर्सच्या व्यवस्थापन आणि प्रशिक्षणातील गंभीर बाबींवरून कडक इशारे दिले आहेत. हा इशारा एअर इंडियाने स्वत: सादर केलेल्या अहवालाच्या पार्श्वभूमीवर देण्यात आला आहे. यामध्ये २०२३ आणि मागील महिन्यातील सुरक्षाविषयक उल्लंघनांची नोंद करण्यात आली होती. त्यामुळे डीजीसीए आता कठोर नियामक कारवाईचा विचार करत आहे. अहमदाबादमध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या काही दिवसांनंतर डीजीसीएने हा इशारा दिला आहे. भारतामध्ये वैमानिक त्यांच्या कामाच्या वेळा आणि अपुऱ्या विश्रांतीमुळे होणाऱ्या आरोग्याच्या समस्या तसंच मानसिक आरोग्य आणि थकवा याबाबत वारंवार चिंता व्यक्त करतात. अलीकडच्या काही घटनांमधून या सर्व बाबी अधिक स्पष्टपणे समोर आल्या आहेत.
२३ जुलै रोजी देण्यात आलेल्या चार सरकारी नोटीसांमध्ये एअर इंडियाला वारंवार सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल फटकारण्यात आले. या नोटीसांमध्ये एकूण २९ नियमांचं उल्लंघन केल्याचा उल्लेख आहे. यामध्ये वैमानिकांना अपुरी विश्रांती मिळणे, सिम्युलेटर प्रशिक्षणाच्या नियमांचे पालन न करणे, उंचावरील विमानतळांसाठी अपुरी प्रशिक्षण प्रक्रिया तसंच आंतरराष्ट्रीय मार्गांवर आवश्यकतेपेक्षा कमी केबिन क्रूसह उड्डाण करणे अशा गोष्टींचा समावेश आहे. जून २०२४मध्ये दोन वैमानिकांकडून आणि जून २०२५ मध्ये एका वैमानिकाकडून आठवड्याच्या विश्रांतीसंदर्भातील नियमांचे उल्लंघन झाले असल्याचे आढळून आले.
एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने याबाबत चिंता व्यक्त करताना म्हटले की, “एअर इंडिया सरकारच्या वारंवार दिल्या जाणाऱ्या इशाऱ्यांकडे गांभीर्याने पाहत नाही. आम्ही त्यांना अनेकदा इशारे दिले आहेत.” फेब्रुवारी महिन्यात सरकारने संसदेत माहिती दिली की, मागील सहा महिन्यांत एअर इंडियाला नऊ नोटीस देण्यात आल्या होत्या. गेल्यावर्षी अधिकाऱ्यांनी सुरक्षा नियमांच्या उल्लंघनाबद्दल एकूण २३ प्रकरणांमध्ये इशारे दिले तसंच दंडही ठोठावला होता. त्यापैकी ११ प्रकरणांमध्ये एअर इंडियाचेही नाव सामील होती.
डीजीसीएची नियमावली
डीजीसीएने वैमानिकांसाठी कामाच्या विशिष्ट वेळा निश्चित केल्या आहेत. रात्रीच्या वेळेस (मध्यरात्री १२ ते सकाळी ६) जास्तीत जास्त ८ तास उड्डाणाची मर्यादा आणि १० तास कर्तव्याची कमाल मर्यादा ठरवण्यात आली आहे. रात्रीचे लॅंडिंग पूर्वीप्रमाणे ६ ऐवजी आता केवळ २ वेळाच करण्याची परवानगी आहे. तसंच वैमानिकांच्या आठवड्याच्या विश्रांतीच्या वेळेत वाढ करून ती ३६ तासांवरून ४८ तास करण्यात आली आहे. जेणेकरून त्यांना थकवा कमी जाणवेल. ही नियमावली १ जून २०२४ पासून लागू करण्याचे नियोजन होते. मात्र, एअरलाईन कंपन्यांकडून याला विरोध करण्यात आला. त्यामुळे वैमानिकांनी दिल्ली उच्च न्यायालयाकडे यासंदर्भात हस्तक्षेपाची मागणी केली. न्यायालयाच्या निर्णयानंतर हे नियम १ जुलै २०२५ पासून लागू झाले आहेत.
न्यायालयाने काय हस्तक्षेप केला
दिल्ली उच्च न्यायालयाने निर्णय दिला की, वैमानिकांच्या कामकाज आणि विश्रांतीसंदर्भातील नियम १ जुलै २०२५ पासून लागू होतील. याअंतर्गत वैमानिकांना आठवड्यातून दोन दिवस सुट्टी मिळेल आणि रात्रीच्या ड्युटीची वेळ आता रात्री १२ ते सकाळी ६ अशी करण्यात आली आहे. वैमानिकांना सलग रात्रीच्या शिफ्टवर काम करण्यास परवानगी नाही. तसंच रात्रीच्या ड्युटीदरम्यान केवळ दोन उड्डाणांची परवानगी आहे. त्यासाठी जास्तीत जास्त ८ तास उड्डाण आणि १० तासाची ड्युटी असू शकतो. अनपेक्षित परिस्थितीसाठी विशेष सवलत आता तीन तासांऐवजी दोन तासांपर्यंत मर्यादित केली आहे.
वैमानिकांच्या रजेबाबतचे नियम
एअर इंडियामध्ये वैमानिकांना ६ प्रासंगिक (कॅज्युअल) रजा, १२ वैद्यकीय रजा आणि ३० विशेष (प्रिव्हिलेज) रजा मिळतात. यासाठी वर्षभर आधी अर्ज करणे आवश्यक असते. इंडिगो कंपनी वैमानिकांना ४२ विशेष रजा तर फर्स्ट ऑफिसर्सना २२ रजा देते.
वैमानिकांसमोरील अडचणी
गेल्या दशकात काही विमान कंपन्यांनी कमी पल्ल्याच्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये मोठी वाढ केली आहे. त्यामुळे रात्रीच्या ऑपरेशन्समध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. त्याचवेळी अनेक कंपन्यांनी थांब्याच्या ठिकाणच्या हॉटेल विश्रांतीची सुविधा बंद केली आहे. अशावेळी वैमानिक तक्रार करतात की कामकाजाचे वेळापत्रक आठवडाभर आधीच तयार करणे गरजेचे असताना ते वेळेवर मिळत नाही आणि अचानक त्यात बदल केले जातात.
तणावपूर्ण कॉकपिट वातावरण
कॉकपिटमध्ये मर्यादित जागा असते, व्यवस्थित हालचालही करता येत नाही, सतत एअर ट्राफिकचा ताण, मंद प्रकाश, आवाज, कंपण यांचा सामना करावा लागतो. ऑक्सिजन प्रेशरमध्ये वारंवार होणारे बदल शरीराला सतत जुळवून घ्यावे लावतात, परिणामी थकवा वाढतो.
द हिंदूने दिलेल्या वृत्तानुसार, एका विमान कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, त्यांनी क्रू मेंबर्सच्या सुरक्षिततेसाठी काम करणे बंधनकारक आहे आणि यासाठी कामाच्या वेळेच्या व्यवस्थापनाबाबतचे प्रोटोकॉल लागू केले आहेत. मात्र, वैमानिकांची उपलब्धता विमान कंपन्यांनुसार बदलते. काही कंपन्यांकडे पुरेशी टीम आहे तर काही कंपन्यांकडे पुरेसे मनुष्यबळ नाही.
नोव्हेंबर २०२४ पर्यंत देशभरात ११ हजार ७७५ वैमानिक होते जे सुमारे ८० विमाने उडवत होते. एअर इंडिया आणि इंडिगो यांनी २०३५ पर्यंत एक हजार नवीन विमानांच्या खरेदीसाठी ऑर्डर दिली आहे. एअर इंडियाकडे सध्या ३५००हून अधिक वैमानिक असून सध्याची गरज आणि डीजीसीएचे नियम पाळले जात असल्याचा त्यांचा दावा आहे.
मानसिक आरोग्याच्या समस्या
अनियमित वेळा, लांबलचक शिफ्ट, जेटलॅग आणि मोठ्या जबाबदाऱ्यांमुळे वैमानिक अत्यंत तणाव, नैराश्य आणि मानसिक थकव्याला सामोरे जातात. अहमदाबाद दुर्घटनेसारख्या अलीकडील घटनांनंतर अनेक वैमानिकांनी वैद्यकीय रजा घेतल्या आहेत. त्यामुळे मानसिक आरोग्याच्या समस्यांकडे लक्ष वेधले गेले आहे. डीजीसीएने वैमानिक आणि एअर ट्राफिक कंट्रोलर्ससाठी मानसिक आरोग्य मूल्यांकनासाठी आणि मदतीसाठी ‘पीअर सपोर्ट प्रोग्राम्स’ यांसारख्या विशेष योजनांची शिफारस केली आहे. अति कामाचा ताण आणि विश्रांतीचा अभाव यामुळे मानसिक थकवा, नैराश्य, चिडचिड, कार्यक्षमतेत घट आणि शेवटी अपघाताचे धोके वाढतात.
थकवा आणि झोपेच्या समस्या
वेगवेगळ्या वेळापत्रकांनुसार सतत प्रवासामुळे वैमानिकांना जेटलॅग (एका वेळापत्रकातून दुसऱ्या वेळापत्रकात गेल्याने शरीरातील बायोलॉजिकल क्लॉकमध्ये बिघाड) होतो. त्यामुळे झोपेची चक्र बिघडतात आणि तीव्र थकवा निर्माण होतो. काहींना ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अॅपनियासारखा त्रास होऊ शकतो. यामध्ये झोपेत श्वास थांबणे आणि दिवसा अधिक झोप येणे अशा समस्या निर्माण होऊन अपघाताचा धोका वाढतो.
डीजीसीए अशा आरोग्य विषयक समस्यांवर बारकाईने लक्ष ठेवते. कारण याचा थेट परिणाम उड्डाण सुरक्षेवर होतो. अनियमित आणि सतत बदलणाऱ्या कामाच्या वेळापत्रकांमुळे वैमानिकांच्या दैनंदिन कामांमध्ये अडथळा येतो, तसंच पुरेशी विश्रांती मिळत नाही. त्यामुळे डीजीसीएने अलीकडेच वैमानिकांच्या कामाच्या वेळा आणि विश्रांतीबाबत सुधारित नियम प्रस्तावित केले आहेत, जे या सर्व व्यवस्थापनात मदत करतील.