Russia Drone making: युक्रेनविरुद्धच्या युद्धात वापरल्या जाणाऱ्या ड्रोनच्या डिझाइन आणि चाचणीमध्ये रशियन अधिकारी किशोरवयीन मुलांना सहभागी करून घेत असल्याचे एका नवीन तपासात उघड झाले आहे. रशियन वृत्तसंस्था द इनसाइडरने दिलेल्या वृत्तानुसार, किशोरवयीन मुलांना व्हिडीओ गेम, सरकार आयोजित स्पर्धा आणि शैक्षणिक तसंच करिअर फायद्यांच्या ऑफर्सच्या माध्यमातून टार्गेट केले जात आहे. जे लोक उत्तम परफॉर्मन्स दाखवतात, त्यांना रशियाच्या संरक्षण उद्योगाशी जोडलेल्या कंपन्यांकडून या कामासाठी निवडले जाते. ही मुलं १४ ते १५ वयोगटातील आहेत.
रशिया मुलांचा कसा वापर करत आहे?
ही प्रक्रिया सरकार समर्थित स्पर्धांपासून सुरू होते आणि हळूहळू लष्करी तंत्रज्ञानासह व्यावहारिक कामाकडे वळते. २०२२ मध्ये लाँच झालेल्या बेरलोगासारख्या व्हिडीओ गेमचा वापर कसा केला जातो हे सविस्तर या अहवालात सांगितले आहे. गेममध्ये बुद्धिमान अस्वल ड्रोन वापरून मधमाश्यांशी लढतात.
अशाप्रकारच्या खेळांमधील यशामुळे खेळाडूंना अतिरिक्त शैक्षणिक क्रेडिट्स मिळू शकतात आणि मोठ्या आव्हानांसारख्या स्पर्धांचे दरवाजे उघडले जाऊ शकतात. या स्पर्धांमधील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्यांची निवड बहुतेकदा संरक्षण क्षेत्राशी संबंधित कंपन्यांकडून केली जाते.
विशेष म्हणजे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी ड्रोन उत्पादन वाढवण्याचे आवाहन केले आहे. युक्रेन आणि रशिया हे दोन्ही देश संघर्षात ड्रोनवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत, त्यामुळे ड्रोनच्या उत्तम तंत्रज्ञानासाठी कायम प्रयत्न केले जात आहेत. या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी रशिया आता त्यांच्या हुशार तरुणवर्गाकडे पाहत आहे.
हे कसे केले जाते?
बेर्लोगा हा एक शैक्षणिक व्हिडीओ गेम आहे. यावर खेळाडू काल्पनिक परिस्थितीत ड्रोन वापरतात. या गेमने लाखो तरुण रशियन लोकांना आकर्षित केले आहे. जे या गेममध्ये चांगली कामगिरी करतात ते शालेय परीक्षांमध्ये मदत करणारी बक्षिसे मिळवू शकतात. त्यानंतर काही निवडक खेळाडूंना अधिक प्रगत कार्यक्रमांमध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित केले जाते. विशेष म्हणजे, पुतिन यांनी बेर्लोगाच्या लाँचला वैयक्तिकरित्या मान्यता दिली आणि या प्रकल्पाला अधिकाऱ्यांकडून सतत पाठिंबा मिळत आहे. याचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी रशियाच्या युनिफाइड स्टेट परीक्षेत १० बोनस गुणांची ऑफर आहे. अहवालानुसार, विद्यार्थ्यांनी असे कबूल केले की, बेर्लोगमधील कामे आव्हानात्मक आहेत मात्र अतिरिक्त गुण मिळवण्याची संधी ही एक उत्तम प्रेरणा आहे.
ही किशोरवयीन मुले मोठे, लढाऊ ड्रोन तयार करण्यासाठीदेखील मदत करत आहेत. रशियन सैन्याच्या टेलिव्हिजन चॅनेलवर अलीकडेच दाखवलेल्या एका माहितीपटात तरुणांना कामिकाझे ड्रोन बनवणाऱ्या कारखान्यात काम करताना दाखवण्यात आले होते.
द गार्डियनच्या वृत्तानुसार, जगातील अशा ड्रोनचा सर्वात मोठा उत्पादक असलेला हा प्लांट आधीच युरोपियन युनियनच्या निर्बंधाखाली आहे आणि त्याला लांब पल्ल्याच्या युक्रेनियन ड्रोन हल्ल्यांचा फटका बसला आहे. विशेष म्हणजे, युद्धादरम्यान लक्ष्य ठरू शकणाऱ्या लष्करी सुविधांमध्ये मुलांना कामावर ठेवणे हे अनेक आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन करते. या व्हिडीओमध्ये पूर्ण झालेल्या गेरन-२ कामिकाझे ड्रोनच्या रांगा आणि वर्कस्टेशनवर बसलेल्या किंवा भाग एकत्र करणाऱ्या किशोरवयीन मुलांच्या अस्पष्ट प्रतिमा दाखवल्या गेल्या आहेत. जवळपास एक हजार मैल उडण्यास सक्षम असलेले गेरन-२ हे इराणी डिझाइनवर आधारित आहे आणि आता ते तातारस्तानमधील अलाबुगा इथल्या एका कारखान्यात देशांतर्गत उत्पादित केले जाते.
रशियाच्या सरकारी प्रसारक झ्वेझदा यांनी सांगितले की, १४ आणि १५ वयोगटातील विद्यार्थी जवळच्या एका महाविद्यालयात ड्रोन उत्पादनाचा अभ्यास करत आहेत आणि नंतर प्लांटमध्ये काम करत आहेत. व्हिडीओमध्ये तरुण कामगारांचे चेहरे अस्पष्ट दिसत होते. ते काही जण संगणकावर काम करत होते किंवा ड्रोन एकत्र करत होते. या स्पर्धा शैक्षणिक संधी म्हणून सादर केल्या जात असल्या, तरी द इनसाइडरशी बोलताना विद्यार्थ्यांनी कबूल केले की, त्यांना त्यांच्या कामाचे लष्करी हेतू आहेत याची पूर्ण जाणीव होती, मात्र त्यांना तसे सांगण्यास मनाई आहे. “मुले विविध ड्रोनसाठी सिस्टिमच्या घटकांचे मॉडेलिंग करण्यात सक्रियपणे सहभागी असतात,” असे एका किशोरवयीन मुलाने सांगितले.
दुसऱ्या एका विद्यार्थ्याने सांगितले की, “आम्हाला युद्धासाठी ते आवश्यक आहे असे म्हणण्यास मनाई होती.” काही मुलांनी लष्करी ठिकाणी काम केल्याचेही सांगितले. एका विद्यार्थ्याने तर १३व्या वर्षी २०२२ मध्ये सरकारी सुविधेत सैनिकांना ड्रोन ऑपरेशन्सचे प्रशिक्षणही दिले होते