गेल्या तीन दिवसांपासून रशियाने युक्रेनची राजधानी कीव्हवर हवाई हल्ले वाढविले आहेत. संपूर्ण राजधानीच भीतीच्या सावटाखाली आहे. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यापासून धोरणांमध्ये असलेला गोंधळ आणि विसंगती यामुळे युक्रेनची अवस्था ‘ना घर का ना घाट का’ अशी होऊ लागली आहे. त्यातच युक्रेनमधील महत्त्वाची खनिजे असलेला भूभाग जिंकण्यासाठी रशिया जंगजंग पछाडत आहे. युरोपीय देशांनी युक्रेनला सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला असला, तरी ही मदत पुरेशी पडणार का अशी रास्त शंका उपस्थित होत आहे.
रशिया-युक्रेन युद्धाची सद्यःस्थिती काय?
रशियाने गेल्या तीन-चार दिवसांपासून आपली युद्धनीती बदलल्याचे दिसते. कारण मंगळवारी, ८ जुलैला कीव्हवर आजवरचा सर्वांत मोठा हवाई हल्ला झाला. रशियाने तब्बल ७२८ ड्रोन आणि १३ क्षेपणास्त्रे एकट्या राजधानीवर डागली. या हल्ल्यात किमान एकाचा बळी गेल्याचे आतापर्यंत स्पष्ट झाले आहे. गुरुवारीही ४०० ड्रोन आणि १८ क्षेपणास्त्रे डागण्यात आल्याचे युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी ‘टेलिग्राम’वरील संदेशात लिहिले. यात आठ बॅलिस्टिक आणि सहा क्रूझ क्षेपणास्त्रांचा समावेश होता.
हा हल्ला अधिक घातक अशासाठी ठरला, की कीव्हवर सर्व दिशांनी हल्ले होत होते. हे युद्धतंत्र रशियाने प्रथमच वापरले. काही ड्रोन राजधानीवरून उडत पुढे गेले, त्यामुळे हवाई सुरक्षा प्रणालीने त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र नंतर त्यांनी अचानक दिशा बदलून राजधानीत स्फोट घडविले. यात २२ वर्षांच्या पोलीस अधिकारी मारिया जुमाहा यांच्यासह किमान दोघांचा बळी गेल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. रोज रात्री हल्ले होत असून कानठळ्या बसविणारे इशारा भोंगे सातत्याने शहरभर वाजत असतात. कधी, कुठे, कसा हल्ला होईल याची शाश्वती नसल्यामुळे नागरिक प्रचंड तणावाखाली जगत आहेत. आपण केवळ लष्करी आस्थापनांना लक्ष्य करत असल्याचा पोकळ दावा रशिया करत असला, तरी वास्तवात कीव्हमधील सर्वसामान्यांची घरे, शाळा, नागरी वस्त्यांमधील रस्ते, समाजमंदिरे या हल्ल्यांत उद्ध्वस्त झाली आहेत. एकीकडे युक्रेनच्या राजधानीची चाळण होत असताना युद्धबंदीची चर्चा मात्र पुढे सरकताना दिसत नाही.
शस्त्रसंधीच्या प्रयत्नांना किती यश येत आहे?
ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये गेल्यानंतर लगेच युद्ध थांबेल, अशी घोषणा केली होती. मात्र आपल्या आवाहनांना आणि धमक्यांना पुतिन अजिबात भीक घालत नसल्याचे एव्हाना ट्रम्प यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे ते आपली नाराजी अधिकाधिक बोलून दाखवू लागले आहेत. “पुतिन मला खूप भाकडकथा सांगत आहेत. ते खूप गोड बोलतात, पण अंती त्याला काहीच अर्थ नसतो,” असे ट्रम्प यांनी मंत्रिमंडळ बैठकीत सांगितले. त्यातच युक्रेनची सामरिक मदत अचानक रोखल्यामुळे आणि ती कुणी रोखली हेच स्पष्ट नसल्यामुळे ट्रम्प प्रशासनातील सावळा गोंधळ समोर आला आहे. या गोंधळात शस्त्रसंधीचा गाडा मात्र खोल रुतत चालला आहे.
गुरुवारी, १० तारखेला युद्धबंदीच्या दिशेने पाऊल टाकण्याचा आणखी एक अयशस्वी प्रयत्न झाला. क्वालालंपूरमध्ये अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ आणि रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांच्यात चर्चा झाली. मात्र यात एक इंचही प्रगती झाली नाही. यावेळी काही कल्पनांवर चर्चा झाली, मात्र रशियाकडून कोणतीच हालचाल होत नसल्याने रुबिओ यांनी उघड नाराजी व्यक्त केली. युद्धाचा शेवट अद्याप नजरेच्या टप्प्यात नसताना युक्रेनचा महत्त्वाचा प्रदेश ताब्यात घेतल्याचा दावा रशियाने केला आहे.
‘लाखमोला’च्या जमिनीवर रशियाचा ताबा?
मध्य युक्रेनमधील ‘निप्रोपेत्रोव्हस्क’ या भागात गेले अनेक महिने दोन्ही देशांची सैन्यदले एकमेकांसमोर उभी ठाकली आहेत. अनेक महिन्यांच्या संघर्षात रशियाचे सैन्य इंच-इंच पुढे सरकत आहे. तेथील मोठा औद्योगिक पट्टा आपल्या ताब्यात आल्याचे रशियाने या आठवड्यात जाहीर केले. ‘डान्चे’ गावावर आपला झेंडा फडकल्याचा दावा रशियाने केला. या दाव्याला अद्याप किव्हमधून आव्हा देण्यात आले नसले, तरी युक्रेनच्या त्या भागात लढणाऱ्या तुकड्यांनी मात्र डान्चे आपल्याच ताब्यात असल्याचे म्हटले आहे. आता युद्धापूर्वी अवघी काही डझन लोकसंख्या असलेल्या या गावाला एवढे सामरिक महत्त्व का, असा प्रश्न सहज उपस्थित होतो. याचे मुख्य कारण निप्रोपेत्रोव्हस्क हा प्रदेश म्हणजे ‘काळ्या सोन्या’ची खाण आहे. संपूर्ण युक्रेनची विजेची गरज भागविणारा कोळसा येथील खाणींमधूनच मिळतो. त्यामुळे या भागात रशिया अधिक पुढे आल्यास त्याचा दुहेरी फटका युक्रेनला बसू शकतो. एकतर वीजपुरवठा आणि अर्थव्यवस्था कोलमडण्याची भीती आहे आणि दुसरा धोका हे नैसर्गिक धन रशियाला मिळेल.
युद्धाचे भवितव्य काय?
निप्रोपेत्रोव्हस्कच्या सीमेवर युक्रेनची मोर्चेबांधणी चांगली असून हा संपूर्ण भाग रशियाच्या ताब्यात जाण्याची शक्यता कमी असल्याचे संरक्षणतज्ज्ञ सांगत आहेत. असे असले तरी धोका आहेच. युद्धबंदीच्या चर्चेचे केवळ गुऱ्हाळ सुरू ठेवणे रशियाला परवडू शकते. युक्रेनला नाही. जोपर्यंत ट्रम्प खमकेपणाने भूमिका आणि निर्णय घेत नाहीत, तोपर्यंत मोठा भूभाग गमाविण्याची टांगती तलवार युक्रेनच्या डोक्यावर राहणारच आहे. नाही म्हणायला, युरोप आणि ‘नेटो’ने युक्रेनला मदतीचा ओघ आणि आग्रह कायम ठेवला असला, तरी अमेरिकेच्या सक्रीय मदतीशिवाय हे प्रयत्न अपुरे ठरण्याची शक्यता आहे.