scorecardresearch

विश्लेषण : रशियन बंडखोर का ठरू लागलेत युक्रेनसाठी डोकेदुखी?

क्रिमिया आणि युक्रेनच्या आणखी दोन प्रांतांमध्ये तळ ठोकून असलेले हे रशियन बंडखोर युक्रेनसाठी रशियन लष्कराइतकीच मोठी डोकेदुखी गेले अनेक महिने ठरत आली आहे.

विश्लेषण : रशियन बंडखोर का ठरू लागलेत युक्रेनसाठी डोकेदुखी?
डॉनेत्स्क आणि लुहान्स्कमध्ये रशियन बोलणाऱ्यांची संख्या युक्रेनियन बोलणाऱ्यांपेक्षा अधिक आहे. (डॉनेत्स्क बंडखोरांचा फोटो रॉयटर्सवरुन साभार)

– सिद्धार्थ खांडेकर

रशिया आणि युक्रेन सीमेवर गेले काही आठवडे जमा झालेले युद्धाचे ढग निवळण्याची चिन्हे अजिबात दिसत नाही. मध्यंतरी रशियन सैन्याच्या काही तुकड्या युक्रेन सीमेवरून माघारीच्या तळांवर बोलावण्यात आल्या, त्यावेळी तणावसमाप्तीकडे वाटचाल सुरू झाल्यासारखे अनेकांना वाटले होतेे. पण दोनच दिवसांपूर्वी रशियाने त्यांच्या काही क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घेतल्या. शिवाय भीतिदायक वाटावेत असे युद्धसरावही सुरू केले. नाटो आणि विशेषतः अमेरिकी नेतृत्वाला रशियन आक्रमणाविषयी आजही ठाम खात्री वाटते. युद्धाला चिथावणी देण्याचा डाव रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन युक्रेनस्थित रशियन बंडखोरांमार्फत आखत असल्याची नाटोला पक्की खात्री वाटते. क्रिमिया आणि युक्रेनच्या आणखी दोन प्रांतांमध्ये तळ ठोकून असलेले हे रशियन बंडखोर युक्रेनसाठी रशियन लष्कराइतकीच मोठी डोकेदुखी गेले अनेक महिने ठरत आली आहे.

कोण आहेत युक्रेनमधील रशियन बंडखोर?

२०१४ मध्ये रशियाने युक्रेनच्या क्रिमिया प्रांतावर कब्जा केला, त्यावेळी जग अक्षरशः पाहात राहिले. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि नाटोच्या इतर नेत्यांना पुतीन यांच्यावर तीव्र शब्दांत टीका करण्यापलीकडे त्यावेळी काही करता आले नव्हते. युरोपिय समुदाय आणि अमेरिकेने रशियावर अनेक निर्बंध लागू केले. पण त्यातून पुतीन यांची महत्त्वाकांक्षा कमी झाल्याची कोणतीही लक्षणे नाहीत. युक्रेनच्या दोन प्रांतांमध्ये रशियाच्या आश्रयाखालील समर्थक सक्रिय आहेत. डॉनेत्स्क आणि लुुहान्स्क नावाचे हे दोन प्रांत युक्रेनच्या पूर्व सीमा भागात रशियाला खेटून आहेत. हा संपूर्ण टापू दोन्बास म्हणून ओळखला जातो. २०१४ मधील क्रिमिया आक्रमणापासूनच येथील रशियन बंडखोरांनी युक्रेनच्या सैन्याशी चकमकी सुरू केल्या असून, त्यात आतापर्यंत १४ हजारांहून अधिक बळी गेले आहेत.

पण केवळ या बंडखोरांपासून युक्रेनला धोका आहे का?

डॉनेत्स्क आणि लुहान्स्कमध्ये रशियन बोलणाऱ्यांची संख्या युक्रेनियन बोलणाऱ्यांपेक्षा अधिक आहे. या भागातील मोठ्या संख्येने नागरिकांना रशियन सरकारने रशियन पासपोर्ट जारी केले आहेत. या कृतीवर युक्रेनने तीव्र आक्षेप मागेच नोंदवला होता. येथील बंडखोरांना रशियन सरकारने धोकादायक शस्त्रे पुरवली आहेत. केवळ त्यांच्या जोरावर हे बंडखोर युक्रेनच्या लष्कराला नेस्तनाबूत करतील अशी स्थिती नाही. पण त्यांच्या माध्यमातून रशियाच्या फौजांवर हल्ले करण्याचा बनाव घडवून आणला जाईल आणि ते निमित्त पुढे करून पुतीन युद्ध सुरू करू शकतील ही भीती आहे. या बंडखोरांनी त्यांच्या प्रभावक्षेत्रामध्ये तोफगोळ्यांचा मारा सुरू केलेला आहेच.

मग युद्ध अटळ आहे असे मानावे का?

डॉनेत्स्क आणि लुहान्स्कमधील घडामोडी पाहता ती शक्यता पुन्हा एकदा वाढीस लागलेेली आहे. रशियाकडून कोणतीही सैन्यमाघारी वगैरे झालेली नसून, उलट १ लाखांऐवजी त्याच्या जवळपास दुप्पट सैनिक युक्रेन सीमेवर जमल्याचे अमेरिकेचे म्हणणे आहे. रशिया-जर्मनी, रशिया-फ्रान्स, युक्रेन-फ्रान्स, युक्रेन-अमेरिका अशा विविध पातळ्यांवर राजनयिक शिष्टाई अजून सुरू असली, तरी त्यांना फार यश येणार नाही अशी भीती युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी बोलून दाखवली आहे. नाटोच्या हस्तक्षेपाचे निमित्त दाखवून युक्रेनचा आणखी भूभाग गिळण्याचाच पुतीन यांचा डाव असल्याची खात्री युक्रेनमधील अनेकांना वाटू लागली आहे. रशियाचा घनिष्ठ मित्र असलेल्या बेलारूसमध्ये सध्या रशियाच्या काही फौजा युद्धसरावासाठी दाखल झाल्या आहेत. या फौजा सरावाची मुदत संपून गेल्यानंतरही बेलारूसमध्येच ठाण मांडून आहेत. बेलारूस युक्रेनच्या उत्तरेकडे असल्यामुळे तेथून आणखी एक आघाडी रशियाकडून उघडली जाण्याची शक्यता सामरिक विश्लेषक नाकारत नाहीत.

बंडखोरांची ही रशियानीती आणखी कोणत्या देशांमध्ये आढळून येते?

सोव्हिएत महासंघाचे विघटन झाल्यानंतरही विखुरलेल्या देशांमध्ये सर्वाधिक प्रबळ आणि महत्त्वाकांक्षी रशियाच आहे. त्यामुळे या टापूतील काही देशांमध्ये रशियन भाषक बंडखोरांनी फुटीर प्रदेशही निर्माण केले आहेत. यांमध्ये ठळक आहेत मोल्डोव्हा आणि जॉर्जिया. जॉर्जियातील अबकाझिया आणि दक्षिण ओसेटिया हे प्रांत रशियन बंडखोरांच्या ताब्यात असून ते जॉर्जियाचा अंमल जुमानत नाहीत. त्याचप्रमाणे मोल्डोव्हातील ट्रान्सनिस्त्रिया प्रांत रशियाधार्जिण्या बंडखोरांच्या ताब्यात असून, मोल्डोव्हा स्वतंत्र झाल्याच्याच सुमारास म्हणजे १९९१मध्ये त्यांनी स्वतःला स्वतंत्र प्रजासत्ताक मानण्यास सुरुवात केली आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.