scorecardresearch

सॅम अल्टमॅन यांच्या हकालपट्टीचे नेमके कारण काय? OpenAIचे नवे अंतरिम CEO इम्मेट शियर कोण आहेत?

अल्टमॅन यांच्या हकालपट्टीनंतर आता शियर यांच्यावर ओपनएआयने अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची जबाबदारी दिली आहे.

Emmett Shear AND Sam Altman
सॅम अल्टमॅन, इम्मेट शियर (फोटो सौजन्य- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

‘चॅटजीपीटी’या कृत्रिम बुद्धीमत्ता मंचाची निर्मिती करणाऱ्या ‘ओपनएआय’ या कंपनीत मोठी उलथापालथ झाली आहे. ओपनएआय या कंपनीचे सहसंस्थापक सॅम अल्टमॅन यांना शुक्रवारी (१७ नोव्हेंबर) मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावरून हटवण्यात आले. त्यानंतर आता ओपनएआय कंपनीने इम्मेट शियर (Emmett Shear) यांची अंतिरम मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. याच पार्श्वभूमीवर ओपनएआय या कंपनीत नेमके काय घडले? नव्याने नियुक्ती करण्यात आलेले इम्मेट शियर कोण आहेत? हे जाणून घेऊ या…

सॅम अल्टमॅन यांची मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून हकालपट्टी

ओपनएआय या कृत्रिम बुद्धीमत्ता क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीने सॅम अल्टमॅन यांची मुख्य कार्यकारी अधिकारीपदावरून हकालपट्टी केली. ‘ओपएनआय’च्या मंडळाचा अल्टमॅन यांच्यावर आता विश्वास राहिला नाही, असे कंपनीने एका ‘ब्लॉग’मध्ये हकालपट्टीच्या निर्णयानंतर स्पष्टीकरण दिले. त्यानंतर कंपनीच्या या निर्णयाला विरोध करत ‘ओपनआय’चे अध्यक्ष ग्रेग ब्रोकमॅन यांनीही पदाचा राजीनामा दिला. या घटनेनंतर तंत्रज्ञान उद्योगात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

complaints against Guardian Minister suresh khade
पालकमंत्री खाडे यांच्या विरोधात भाजपच्याच बैठकीत तक्रारींचा पाढा
Kevin McCarthy
विश्लेषण : केविन मॅकार्थींच्या हकालपट्टीचे नाट्य कसे रंगले? बायडेन प्रशासनाची पुन्हा आर्थिक कोंडी?
narendra_modi_naveen_patnaik
नवीन पटनाईक यांच्याकडून मोदी सरकारला १० पैकी ८ गुण, भविष्यात बीजेपी-बीजेडी एकत्र येणार का?
arrest, arrested in the murder case
मनसे पदाधिकारी जमील शेख यांच्या हत्येप्रकरणात आणखी एकाला अटक

आता शियर अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारीपदी

अल्टमॅन यांच्या हकालपट्टीनंतर आता शियर यांच्यावर ओपनएआयने अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची जबाबदारी दिली आहे. याबाबतची माहिती खुद्द शियर यांनीच २० नोव्हेंबर रोजी एक्सद्वारे (पूर्वीचे ट्विटर) दिली. याआधी ‘ओपनएआय’च्या मुख्य तंत्रज्ञान अधिकारी मीरा मुराती यांच्याकडे अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

अवघ्या दोन महिन्यांत चॅटजीपीटी जगभरात प्रसिद्ध

अल्टमॅन यांच्यावर केलेल्या या कारवाईनंतर तंत्रज्ञान क्षेत्रात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ओपनएआय या कंपनीने नोव्हेंबर २०२२ मध्ये चॅटजीपीटी हा कृत्रिम बुद्धीमत्ता मंच सुरू केला होता. या प्रकल्पाला जगभरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर अवघ्या दोन महिन्यातं चॅटजीपीटीचा वापर करणाऱ्यांची संख्या तब्बल १०० दशलक्षवर पोहोचली होती.

कर्मचारी संचालक मंडळावर टाकत होते दबाव

अल्टमॅन यांच्यावर कारवाई केल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर घेण्यासाठी अनेक कर्मचारी संचालक मंडळावर दबाव टाकत आहेत, असे सांगितले जात होते. याच आधारावर अल्टमॅन यांच्याकडे पुन्हा एकदा मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते, असा अंदाज बांधला जात होता. मात्र प्रत्यक्षात तसे घडले नाही.

अल्टमॅन लवकरच मायक्रोसॉफ्टमध्ये होणार रुजू

मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून हकालपट्टी झाल्यानंतर अल्टमॅन हे लगेच मायक्रोसॉफ्टमध्ये नवी जबाबदारी स्वीकारणार आहेत. मायक्रोसॉफ्टने ओपनएआय कंपनीत अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केलेली आहे. असे असतानाच आता अल्टमॅन हे मायक्रोसॉफ्टमध्ये नवी जबाबदारी स्वीकारतील. याबाबत मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकार सत्या नडेला यांनी एक्सद्वारे (पूर्वीचे ट्विटर) माहिती दिली. “मला हे सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की, सॅम अल्टमॅन आणि ग्रेग ब्रोकमॅन हे दोघेही सहकारी म्हणून आमच्या मायक्रोसॉफ्ट कंपनीत रुजू होणार आहेत. ते आमच्या नव्या आणि प्रगत अशा एआय संशोधन टीमचे नेतृत्व करतील,” अशी माहिती सत्या नडेला यांनी एक्सच्या माध्यमातून दिली.

इम्मेट शियर कोण आहेत?

इम्मेट शियर हे येले विद्यापाठीचे माजी विद्यार्थी आहेत. ते लाईव्ह व्हिडीओ स्ट्रमिंगसाठी ओळखल्या जाणाऱ्या Twitch या संकेतस्थळाचे सहसंस्थापक आहेत. २०११ साली या संकेतस्थळाची सुरुवात झाली होती. सध्या हे संकेतस्थळ अॅमेझॉन या कंपनीच्या मालकीचे आहे. याआधी त्यांनी स्टार्टअप्स सुरू करण्यासाठी तसेच या स्टार्टअप्सना निधी मिळवून देण्यात मदत करणाऱ्या Y Combinator या संस्थेत काम केले. या कंपनीत असताना त्यांनी Airbnb, Dropbox तसेच Reddit यासारख्या मोठ्या कंपन्या सुरू करण्यास मदत केली होती. २०१५ ते २०१९ या काळात सॅम अल्टमॅन Y Combinator या कंपनीचे अध्यक्ष होते. या वर्षाच्या एप्रिल महिन्यात शियर पुन्हा एकदा Y Combinator या कंपनीत व्हिजिटिंग ग्रुप पार्टनर म्हणून सामील झाले होते.

ओपनएआय कंपनीत नेमकं काय घडतंय?

अल्टमॅन यांना मुख्य कार्यकारी पदावरून हटवण्याचे संकेत ओपनएआय मंडळाचे संचालक इलया सुत्स्केव्हर यांनी दिले होते. मंडळ अल्टमॅन यांना पदावरून काढण्यावर ठाम आहे, असे सुत्स्केव्हर यांनी ओपनएआयच्या कर्मचाऱ्यांना सांगितले होते. अल्टमॅन यांची वागणूक तसेच मंडळाशी त्यांचा असलेला संवाद यामुळे एआयच्या विकासावर देखरेख करण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला आहे, असे ते म्हणाले होते.

अल्टमॅन आणि संचालक मंडळात मतभेद?

मात्र अल्टमॅन आणि ओपनएआय कंपनीचे मंडळ यांच्यात नेमके काय मतभेद होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. एआयचा विकास अधिक सुरक्षितपणे केला जात आहे का? याबाबत कंपनीच्या अनेक कर्मचाऱ्यांत मतमतांतरं होती. याचाच परिणाम म्हणून अल्टमॅन यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. एआय चीप स्टार्टअपसाठी निधीची उभारणा करायला हवी, अशी अल्टमॅन यांची इच्छा होती. मात्र कंपनीचे संचालक मंडळ या मताच्या विरोधात होते.

अल्टमॅन यांच्या हकालपट्टीचे कारण वेगळे?

अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची जबाबदारी आल्यानंतर शियर यांनी काही ट्विट्स केले होते. यामध्ये “मी नवी जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी ओपनएआय कंपनीत नेमके काय घडले, हे घडण्यामागची कारणं काय आहेत? हे जाणून घेतले. सुरक्षेच्या मुद्द्यावर मतभेद झाल्यामुळे संचालक मंडळाने सॅम यांच्यावर कारवाई केलेली नाही. त्यांच्याकडील पदभार काढून घेण्यामागची कारणं वेगळी आहेत. संचालक मंडळाचा पाठिंबा नसताना ही जबाबदारी स्वीकारण्याइतपत मी वेडा नाही,” असे शियर म्हणाले.

दरम्यान, एआयच्या विकासाची गती, एआयतून मिळणारे पैसे आणि संभाव्य धोक्यांसाठी घेण्यात येणारी खबरदारी याबाबत अल्टमॅन आणि ओपनएआयच्या संचालक मंडळात मतभेद होते, असे म्हटले जात आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sam altman fired emmett shear appointed as new interim ceo of openai know detail information prd

First published on: 21-11-2023 at 20:39 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×