UNESCO World Heritage nomination India: सारनाथ स्तूपाला २०२५-२६ या वर्षात जागतिक वारसा यादीत स्थान मिळावं, याकरिता भारताने नामांकन दिलं आहे. म्हणूनच युनेस्को पथकाच्या प्रस्तावित सारनाथ दौऱ्याआधी भारतीय पुरातत्त्व विभाग या स्थळाची माहिती देणारा नवीन फलक बसवणार आहे. या फलकावर असलेली माहिती दुरूस्त करण्यात आली आहे. यापूर्वी या पवित्र बौद्ध स्थळाचं जतन करण्याचं आणि या स्थळाचं महत्त्व १७९८ साली उघड करण्याचं श्रेय ब्रिटिशांना देण्यात आलं होतं. परंतु,नवीन फलकावर हे श्रेय स्थानिक शासकाला देण्यात येणार आहे. नव्या फलकावर बाबू जगतसिंह यांनी १७८७-८८ या कालखंडात सारनाथचं पुरातत्त्वीय महत्त्व प्रथम उघड केलं होतं, असं नमूद करण्याचा प्रस्ताव आहे, अशी माहिती सूत्रांनी इंडियन एक्स्प्रेसला दिली. हा बदल सिंह यांच्या कुटुंबाने भारतीय पुरातत्त्व खात्याला दिलेल्या प्रस्तावानंतर करण्यात येणार आहे.
सारनाथ येथे झालेल्या अलीकडच्या उत्खननात अशोकपूर्व कालखंडातील वस्तीचे अवशेष समोर आले आहेत. असे असले तरी या स्थळाचा आणि अशोकाचा संबंध या स्तूपाच्या इतिहासातील एक महत्त्वाचे पर्व आहे. सम्राट अशोकाच्या काळात या ठिकाणी बौद्ध धर्माशी संबंधित अनेक वास्तू उभारल्या गेल्या. याच ठिकाणी गौतम बुद्धांनी ज्ञानप्राप्ती नंतरचा प्रथम उपदेश (पहिले प्रवचन) दिला. अशोकाच्या कारकीर्दीतच सारनाथ बौद्ध तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यानंतर सारनाथला कुषाण (इ.स. १-४ व शतक) आणि गुप्त (इ.स. ३-६ व शतक) राजवटींचाही आश्रय लाभला. या राजवटींनीही अशोककालीन रचना दुरुस्त केल्या आणि नव्या बांधकामांची उभारणी केली. सुमारे १२ व्या शतकापर्यंत येथे एक समृद्ध विहार कार्यरत होते.
सारनाथचा ‘विनाश’ कोणी केला?
१२ व्या शतकात सारनाथवर हल्ला झाला होता, या हल्ल्यात जाळपोळ करण्यात आल्याचे इतिहासकार सांगतात. याविषयीचा पहिला महत्त्वाचा उल्लेख भारतीय पुरातत्त्व खात्याचे पहिले संचालक अलेक्झांडर कनिंगहॅम यांच्या नोंदीत सापडतो. मात्र, या विध्वंसासाठी कोण जबाबदार होते, यावर इतिहासकारांत एकमत नाही.
फ्रेडरिक डब्ल्यू. अॅशर (इतिहासकार आणि इंडॉलॉजिस्ट) यांनी लिहिलं आहे की, “… इ.स. ११९३ मध्ये मोहम्मद घोरीच्या सैन्याचा सेनापती कुतुबुद्दीन ऐबक वाराणसीकडे वळला. तिथे त्याने हजारो मंदिरांतील मूर्तींचा नाश केला, असं सांगितलं जातं. सारनाथ हा त्या आक्रमणातील बळींपैकी एक असण्याची दाट शक्यता आहे…” अॅशर यांच्या मते, हे आक्रमण भूमी आणि संपत्ती मिळवण्यासाठी प्रेरित होतं आणि त्यामुळे उरलेले भिक्षू पळून गेले असावेत. त्यानंतर विहार ओस पडून नासधूस झाली.
ब्राह्मणवादी प्रकल्प अपूर्णच राहिला…
याउलट, वेरार्डी आणि पुरातत्त्ववेत्त्या फेडेरिका बार्बा यांनी वेगळं मत मांडलं आहे. त्यांनी लिहिलं आहे की, “… पुरातत्त्वीय पुरावे सूचित करतात की, सुमारे बाराव्या शतकाच्या मध्यावर बौद्धांना तिथून हाकलून लावलं गेलं आणि त्या जागी एक भव्य शैव मंदिर उभारण्यात आलं.” मात्र त्यांनी हीदेखील पुस्ती जोडली की, सारनाथातील हा ‘ब्राह्मणवादी प्रकल्प’ कधीच पूर्णत्वास गेला नाही, कदाचित मुस्लिम आक्रमकांच्या आगमनामुळे हे अपूर्ण राहीलं असावं. ज्याबाबत एक गोष्ट सांगता येते ती म्हणजे, सारनाथच्या विध्वंसानंतर साधारण सात शतकं हे ठिकाण भग्नावस्थेत होतं आणि ज्या भारतभूमीत बौद्ध धर्माचा जन्म झाला, तिथेच तो जवळपास नामशेष झाला.
स्तूपाचा ‘पुनर्शोध’
सारनाथ स्तूप हा ब्रिटिश हौशी पुरातत्त्ववेत्ते आणि भारतीय संस्कृतीवेत्त्यांनी सर्वप्रथम शोधून काढलेल्या स्थळांपैकी एक होता. मात्र, सारनाथच्या पुनर्शोधाचे खरे श्रेय बाबू जगतसिंह यांच्या कामगारांना दिलं जातं, ते बनारसचे राजा चैतसिंह यांचे दिवाण होते. त्यांच्या नावाने उभारल्या जाणाऱ्या नव्या बाजारासाठी विटा आणि दगड मिळवण्यासाठी कामगारांनी त्याजागी खोदकाम सुरू केले (आधुनिक वाराणसीच्या मध्यवर्ती भागाला आजही ‘जगतगंज’ म्हटलं जातं). या खोदकामात कामगारांना बुद्धमूर्तीच्या लेखांकित पादपीठाचा शोध लागला तसेच दोन दगडी अवशेषपात्रे (reliquaries) सापडली.
नंतर ब्रिटिशांनी उत्खनन केलं…
या अवशेष पात्रांच्या आतील सामग्री गंगेत टाकून दिली गेली, अशी नोंद इतिहासकार बी. सी. भट्टाचार्य यांनी केली आहे (The History of Sarnath or the Cradle of Buddhism, 1923). इ.स. १७९९ साली या शोधाची माहिती देणारा अहवाल जोनाथन डंकन यांनी लिहिला. ते त्या काळातील भारतीय संस्कृतीचे प्रख्यात अभ्यासक होते आणि १७९१ साली वाराणसीतील संस्कृत कॉलेजचे संस्थापक होते. डंकन यांच्या वर्णनांमुळेच पुढे ब्रिटिशांनी येथे उत्खनन सुरू केलं, तर १८३५-३६ मध्ये कनिंगहॅम यांनी केलेलं उत्खनन हे सर्वार्थाने महत्त्वाचे मानले जाते.
५०० हून अधिक पुरावस्तू सापडल्या
या उत्खननादरम्यान कनिंगहॅम यांनी येथे आढळलेल्या अनेक मूर्ती काढून नेल्या, तसेच धर्मराजिक स्तूपातून (पूर्वी ज्याला ‘जगतसिंह स्तूप’ म्हटलं जात असे) डंकन यांनी नोंदवलेलं अवशेषपात्र (sandstone box) बाहेर काढलं. १८३६ पर्यंत कनिंगहॅम यांनी ठामपणे सारनाथ हेच बुद्धांनी पहिला उपदेश दिलेलं स्थान असल्याचं ओळखलं. सारनाथवरील सर्वात महत्त्वाचं काम मात्र १९०४-०५ मध्ये पुरातत्त्ववेत्ता फ्रेडरिक ऑर्टेल यांनी केलं. त्यांनी केलेल्या उत्खननात एकाच हंगामात ४७६ स्थापत्य आणि शिल्प अवशेष तसेच ४१ शिलालेख सापडले, असं भट्टाचार्य यांनी लिहिलं आहे.
आजच्या घडीला सारनाथ हे बौद्धांच्या चार पवित्र तीर्थस्थळांपैकी एक आहे (लुंबिनी- बुद्धांचं जन्मस्थळ; बोधगया-बुद्धांना ज्ञानप्राप्ती झालेलं स्थळ; आणि कुशीनगर- महापरिनिर्वाण स्थळ). भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने (ASI) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, २०२४-२५ या वर्षात सारनाथला ८,४३,८३६ पर्यटकांनी भेट दिली.