China-Russia’s ‘Sex Warfare’ in Silicon Valley: चीन आणि रशियाच्या महिला हेरांनी तथाकथित ‘सेक्स वॉरफेअर’मध्ये (लैंगिक युद्धनीति) सहभाग घेतल्याच्या बातमीची जोरदार चर्चा सध्या जगभरात सुरू आहे. ‘सेक्स वॉरफेअर’मध्ये आकर्षण, संबंध आणि विवाह यांचा वापर करून अमेरिकेच्या तंत्रज्ञान क्षेत्रात शिरकाव करण्याचा प्रयत्न चिनी आणि रशियन महिला गुप्तहेर करत आहेत, असे वृत्त द टाइम्सने दिले आहे. या वृत्तात म्हटले आहे की, ‘सेक्स वॉरफेअर’चा वापर करून गुप्तचर अधिकारी सिलिकॉन व्हॅलीतील अभियंते, अधिकारी आणि संशोधक यांना लक्ष्य करत आहेत. दीर्घकालीन प्रेमसंबंध निर्माण करायचे, प्रसंगी लग्नही करायचे आणि अखेरीस त्या माध्यमातून लक्ष्य असलेल्या व्यक्तीकडून गोपनीय माहिती मिळवायची, अशी ही मोडस ऑपरेंडी आहे.
अनेक प्रकरणांमध्ये, या महिला गुप्तहेरांनी संबंधित लक्ष्य असलेल्या व्यक्तीच्या मुलांनाही जन्म दिला आहे. दीर्घकालीन गुप्तहेर मोहिमेचा एक भाग म्हणून त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात खोलवर प्रवेश केला आहे. या मोहिमा कथितपणे चीन आणि रशियाच्या गुप्तचर संस्थांनी रचल्याचे वृत्तात म्हटले आहे.
या मोहिमांमध्ये अत्यंत प्रशिक्षित महिलांचा वापर केला जातो. त्यांच्याकडे भावना नियंत्रित करण्याचे, विश्वास निर्माण करण्याचे आणि अनेक वर्षांच्या कालावधीत गुपिते मिळवण्याचे कौशल्य असते. ही युक्ती शीतयुद्धाच्या काळातील गुप्तहेरगिरीच्या तंत्रांवर आधारित असून, ती आता अत्यंत प्रगत पद्धतीने गोपनीय माहिती संकलनासाठी वापरण्यात येते. ही संकल्पना जगातील सर्वाधिक स्पर्धात्मक तंत्रज्ञान केंद्र असलेल्या सिलिकॉन व्हॅलीत नेमके काय सुरू आहे, याची माहिती काढण्यासाठी सध्या वापरली जात आहे.
द टाइम्सने उद्धृत केलेल्या काही विद्यमान आणि काही माजी अमेरिकन गुप्तचर अधिकाऱ्यांच्या मते, या पद्धतीत रोमान्स, शारीरिक आकर्षण आणि मानसिक नियंत्रण यांच्या एकत्रिकरणाचा मिलाफ आहे. एका माजी अमेरिकन अधिकाऱ्याने या द टाइम्सला माहिती देताना सांगितले की, “एखाद्या ‘लक्ष्या’ला भेटणे, त्याच्याशी लग्न करणे, मुलं होणं आणि आयुष्यभर माहिती गोळा करण्याचे काम सुरू ठेवण्याचा विचार करणंही अस्वस्थ करणार आहे, पण आताशा हे सारं नियमितपणे होताना दिसतं.”
पामीर कन्सल्टिंगचे मुख्य गुप्तचर अधिकारी आणि अनुभवी तपास अधिकारी जेम्स मलबेनन यांनी सांगितले की, त्यांनी स्वतः अशा प्रकरणांमध्ये वाढ होताना पाहिली आहे. त्यांनी ‘द टाइम्स’ला सांगितले की, “मला आता अत्यंत सुशिक्षित आणि आकर्षक तरुण चिनी महिलांकडून मोठ्या प्रमाणात ‘लिंक्डइन रिक्वेस्ट’ येत आहेत. अलीकडे या प्रकरणांमध्ये खूपच वाढ झाली आहे.”
मलबेनन यांनी व्हर्जिनियामधील एका व्यावसायिक परिषदेत घडलेली एक घटना सांगितली. दोन चिनी महिला अत्यंत तयारीनिशी आणि आत्मविश्वासाने चीनमधील गुंतवणुकीच्या जोखमींवर आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आल्या होत्या. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. “हे आता एक प्रकारची मोडस ऑपरेंडीच झाल्यासारखं आहे.,” मलबेनन म्हणाले आणि प्रामाणिकपणे सांगायचं तर हे खूपच विचित्र आहे.” आणखी एका प्रकरणात, एका आकर्षक रशियन महिलेनं अमेरिकन एरोस्पेस अभियंत्याशी लग्न केलं होतं. ती त्याच काळात संरक्षणाशी संबंधित प्रकल्पांच्या गोपनीय माहितीवर काम करत होती.
मॉडेलिंग अकॅडमीत प्रशिक्षण आणि तथाकथित ‘रशियन सॉफ्ट-पॉवर स्कूल’मध्ये शिक्षण घेतल्यानंतर, ‘ती’ काही वर्षांनी नवी ओळख घेऊन समोर आली, यावेळी ती अमेरिकन लष्करी-अंतराळ क्षेत्रात क्रिप्टोकरन्सी तज्ज्ञ म्हणून काम करत होती. तिचा नवरा मात्र तिची खरी ओळख आणि गुप्त पार्श्वभूमीबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ होता .
जगभर कार्यरत महिला गुप्तहेरांबद्दलच्या बातम्या प्रसिद्ध होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. २०२५ च्या सुरुवातीच्या महिन्यांमध्ये यूकेच्या अधिकाऱ्यांना जर्मनीतील अमेरिकन लष्करी तळावर गुप्तपणे नजर ठेवणाऱ्या रशियन हेरांच्या टोळीचा शोध लागला, असे वृत्तही प्रसिद्ध झाले होते. त्याचवेळी, आधीच्या अहवालांमध्ये इस्रायलच्या मोसाद या गुप्तचर संस्थेने गुप्त कारवायांसाठी महिला एजंट्सचा वापर केल्याचेही अधोरेखित केले होते. आता पुन्हा गुप्तचर संस्थांमधील महिला अधिकारी अर्थात मोहिनींच्या वापराची जोरदार चर्चा नव्याने सुरू झाली आहे. सध्याचे जग हे तंत्रज्ञनाधारीत असल्याने या क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांमधील अधिकारी आणि तंत्रज्ञांची माहिती काढण्याचे सत्र सध्या अग्रक्रमावर आहे.
