राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना पोटात दुखत असल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात रविवारी तपासणीसाठी दाखल करण्यात आले होते अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. ब्रीच कँडीमध्ये तपासणी झाल्यानंतर आता बुधवारी पवारांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. दोन दिवसांसाठी पवार घेत असणारी रक्त पातळ करणारी औषधं थांबवण्यात आली आहे. ३१ मार्चला अँडोस्कोपी झाल्यानंतर शस्त्रक्रिया केली जाईल, असं सांगण्यात आलं आहे. मात्र शरद पवारांना झालेलं हे दुखणं नक्की काय आहे यासंदर्भातील हा लेख…

पित्ताशयाचे खडे शस्त्रक्रियेमधून काढले, असे आपण ऐकतो. परंतु हे खडे नेमके कसे तयार होतात आणि त्यामुळे शरीरात होणारे बदल समजून घेणे गरजेचे आहे. आपल्या पोटात वरच्या बाजूला उजवीकडे आणि डावीकडे उजवीकडून डावीकडे यकृत असते. यकृतामध्ये खालच्या बाजूस पित्ताशयाची छोटी पिशवी असते. यकृतात पित्तरस तयार होतो आणि जास्त तयार झालेला पित्तरस पित्ताशयात साठवला जातो. आहार घेतल्यावर अन्न जठरात येते. तिथे ते तीन तास राहते. त्यानंतर अन्न लहान आतड्यात येते. यावेळेस पित्ताशयाच्या नलिकेमधून ठरावीक प्रमाणामध्ये पित्तरस पचनक्रियेसाठी लहान आतड्यात सोडला जातो. त्या योगे लहान आतड्यांमध्ये आहारातून आलेल्या स्निग्ध पदार्थाचे पचन होण्यास मदत होते.

Sleeping At This Time Reduce Spike In Diabetes Type 2
मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी ‘या’ वेळी व ‘इतका’ वेळ झोपणं गरजेचं! खाणं-पिणं, व्यायामाशिवाय ‘ही’ चूक ठरते घातक
Fatty Liver Can Happen Without Drinking Alcohol Check These Changes Signs
मद्यपान न करताही होतो फॅटी लिव्हर; भूक, लघवीचा रंग व त्वचेसह ‘या’ ८ बदलांमधून शरीर देतं संकेत, उपचार काय?
Maharashtra Board Class 10th and 12th Result 2024 Date Time in Marathi
१०वी १२वीच्या निकालासंदर्भात मोठी बातमी! ‘या’ तारखेला निकाल लागण्याची शक्यता; कसा पाहाल? जाणून घ्या
bottle gourd halwa for diabetics and heart patients
मधुमेही अन् हृदयरोग्यांसाठी ‘दुधी हलवा’ ठरतो फायदेशीर? डॉक्टर्स नेमके काय सांगतात जाणून घ्या…

आता आहारात स्निग्ध पदार्थाचे प्रमाण सातत्याने जास्त झाले किंवा तंतुमय पदार्थाचे (फायबर) प्रमाण कमी झाले तर पित्तरस दाट बनत जातो आणि पित्ताशयात छोटे खडे तयार होतात. रजोनिवृत्तीच्या वयातील स्त्रियांमध्ये असे खडे होण्याचे प्रमाण पुरुषांपेक्षा सहापट जास्त आढळते. संततिनियमनासाठी ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह गोळ्या घेणाऱ्या आणि गर्भवती स्त्रियांमध्येही याचे प्रमाण जास्त असते. त्याचबरोबर आनुवंशिकता, बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव, अतिरिक्त वजनवाढ, पित्ताशयाच्या पिशवीतील दोष या कारणांमुळे हा आजार जडतो. सतत उपास करणाऱ्या व्यक्ती, चुकीच्या पद्धतीचे डाएट करून झटपट वजन कमी झालेल्या व्यक्तीत पित्ताचे खडे हमखास होत असल्याचे दिसून येते.

लक्षणं काय?

सुरुवातीला पोटाच्या वरच्या भागात, थोडेसे उजवीकडे दुखायला लागते.
जेवल्यावर पोटात गुबारा धरतो, वारंवार गॅसेस होतात, मळमळ सुटते, छातीत जळजळ होऊ  लागते.
एखादा खडा पित्तनलिकेत अडकून राहिला तर पित्तरस आतडयात नेणारा मार्ग बंद होतो आणि पित्तरस यकृतामध्ये साचू लागतो.
पित्तरसातील बिलिरुबीन हे रंगद्रव्य रक्तात मिसळू लागते आणि काविळीची लक्षणे दिसू लागतात.
या अशा काविळीला अवरोधक कावीळ (ऑबस्ट्क्र्टिव्ह जॉण्डिस) म्हणतात. यामध्ये पोटात कमालीचे दुखते. हे दुखणे अनेकदा पोटातील मध्यभागातून आतल्या बाजूने पाठीकडे जाते.
शिवाय अंगाला खाज सुटते.
पित्ताशयातील खडय़ांमुळे स्वादुपिंडदाह (पॅनक्रियाटायटिस) हा गंभीर विकार होऊ  शकतो.

हा त्रास कुणाला होऊ शकतो?

वैद्यकशास्त्रामध्ये पित्ताशयातील खडे हे फॅट, फर्टाइल, फीमेल ऑफ फोर्टी म्हणजे स्थूल देहाच्या चाळिशीतील महिलांमध्ये जास्त प्रमाणात असे शिकवले जाते. पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये याचे प्रमाण सहापटींनी जास्त असते. पाश्चात्त्य देशात व उत्तर भारतामध्ये याचे प्रमाण जास्त आहे. त्यांचा आहार, स्थूल शरीर, जाडेपणा, अतिस्थूलपणा, अति तूपकट, तेलकट खाणे, आहारात तंतुमय पदार्थ न घेणे, बैठी कामे करणे, व्यायामाचा अभाव, वरचेवर फास्ट फूड किंवा जंक फूड असणे, या सर्व गोष्टींमुळे पित्ताशयात खडे तयार होऊ शकतात. त्यामुळे गेल्या दोन-तीन दशकांत भारतातही याचे प्रमाण वाढत आहे. हल्ली हे खडे सर्व वयाच्या स्त्री-पुरुषांमध्ये आढळतात.

हा त्रास कसा ओळखावा?

सुरुवातीची लक्षणे अ‍ॅसिडिटीच्या त्रासासारखीच असतात. सुरुवातीला पोटाच्या वरच्या भागात थोडेसे उजवीकडे दुखायला लागते. गॅसेस होतात. मळमळ सुटते, जळजळ होऊ लागते, त्याबरोबरच एखादा खडा पित्तनलिकेत अडकून राहिला तर पित्तरस आतडय़ात नेणारा मार्ग अरुंद होतो व पित्तरस यकृत (लिव्हर)मध्ये साचू लागतो त्यातील बिलिरुबीन हे रंगद्रव्य रक्तात मिसळतात व काविळीची लक्षणे दिसू लागतात. याला अवरोधक कावीळ (Obstructive Jaundice) असे म्हणतात. पित्तखडय़ांमुळे होणाऱ्या काविळीबरोबर अंगाला खाज सुटते. पित्ताशयातील खडय़ांमुळे स्वादुपिंडदाहही होऊ शकतो.

पित्ताशयातील खड्याचे निदान कसं होतं?

सोनोग्राफी, काही विशिष्ट रक्ततपासणी व एण्डोस्कोपी करून पित्ताशयातील दोष, अडकलेले खडे, पित्तनलिकेचा आजार इत्यादी गोष्टींविषयी पूर्ण माहिती मिळू शकते.

उपाय

एखाद्यास पित्ताशयाच्या खडय़ामुळे त्रास होत असेल आणि कावीळ नसेल तर शस्त्रक्रिया करून हे पित्ताशय काढून टाकता येते, ही शस्त्रक्रिया पोटाची चिरफाड न करता दुर्बिणीद्वारे लॅप्रोस्कोपी (Laparoscopy) केली जाते. ती तज्ज्ञ, अनुभवी सर्जनकडून करणे. त्यामुळे रुग्ण दुसऱ्या दिवशी घरी जाऊ शकतो. दुर्बिणीद्वारे केलेल्या शस्त्रक्रियेमुळे फारशी गुंतागुंत निर्माण होत नाही व पोटावर टाके, जखमेत व्रण राहत नाही. ही शस्त्रक्रिया सोपी, सुलभ असते. यामध्ये खराब झालेले पित्ताशय व खडे काढून टाकतात. यानंतर त्या व्यक्तीला त्रास होत नाही. कारण पचनास लागणारा पित्तरस सरळ लहान आतडय़ात नियमित प्रमाणात येत राहतो.
जर एखाद्यास पित्ताशयाच्या खडय़ामुळे कावीळ असेल तर दुर्बिणीद्वारे लॅप्रोस्कोपी किंवा ERCP करून, पित्तनलिकेतील खडे काढले जातात, दुर्बिणीद्वारे एक छोटेसे छेद करून पित्तनलिकेतील खडे काढता येतात व एक प्लास्टिकची नळी (stent) पित्तनलिकेत टाकून कावीळ कमी होते. पुन्हा होऊ नये म्हणून दुर्बिणीद्वारे पित्ताशय काढणे उचित ठरते. काही रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज लागते ज्यामध्ये पित्तनलिका ही लहान आतडय़ास जोडली जाते.

टाळण्यासाठी काय करावे?

१) जेवणातील तेल-तुपाचे प्रमाण (स्वयंपाकातील) योग्य प्रमाणात असावे म्हणजे फोडणीसाठी माफक तेल, भातावर थोडे साजूक तूप (हे लोणी काढून घरी बनवलेले तूपच असावे) इतके चालेल. पनीर, खोबरे व शेंगदाण्याचाही वापर माफक प्रमाणात करावा.
२) तळलेले पदार्थ, फास्ट फूड वरचेवर खाऊ नये.
३) जेवणात रोज कोशिंबीर वा सॅलड घ्यावे.
४) चिकू, सफरचंद, पपई, संत्री, मोसंबी, केळे अशी फळे खावीत.
५) रोज नियमित व्यायाम करावा. रोज एक तास चालायला जावे.

खडे विरघळण्यासाठी औषधे?

पित्ताशयातील खडे विरघळण्याची काही औषधे उपलब्ध आहेत खरी, पण ती बरीच वर्षे घ्यायला लागतात. बरीच खर्चीक असतात व खडे विरघळण्याचे प्रमाण अनिश्चित असते. दुसरा धोका म्हणजे या अवधीत एखादा खडा अडकून काही दुष्परिणाम होणार नाहीत, असे सांगता येत नाही.

त्रास न होणारे खडे (Silent or asymptomatic stones)

पित्ताशयातील खडे असणाऱ्या ७०-८० टक्के रुग्णांना त्याचा काही त्रास होत नाही. त्यातले काही सोनोग्राफीमध्ये दिसतात. अशा खडय़ांना सायलेंट खडे म्हणतात. जर खडय़ांचा काही त्रास नसेल, ते लहान असतील व पित्ताशय जाड झाले नसेल तर असे खडे काढणे आवश्यक नसते. केवळ सोनोग्राफीमध्ये खडे आहेत म्हणून ते काढावेत हे गरजेचे नाही. त्यावर फक्त लक्ष ठेवावे व डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार करावे. सोनोग्राफीच्या रिपोर्टने घाबरून न जाता जर खडय़ामुळे त्रास होत असेल तरच त्यावर शस्त्रक्रियेची गरज असते.

(माहिती डॉ. अविनाश भोंडवे आणि डॉ. अविनाश सुपे यांच्या जुन्या लेखांमधून साभार)