Shashi Tharoor Pahalgam Terrorist attack : पहलगाम येथील दहशतवादी हल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवीत दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. या कारवाईत १०० पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यासाठी केंद्र सरकारने एक रणनीती आखली. जगभरातील विविध देशांमध्ये सात सर्वपक्षीय संसदीय शिष्टमंडळे पाठविण्यात येणार आहेत. त्यापैकी एका शिष्टमंडळाचे नेतृत्व काँग्रेसचे खासदार शशी थरूर करणार आहेत. दरम्यान, काँग्रेसला त्यांच्या नियुक्तीवर आक्षेप असल्याचे सांगितले जात आहे. यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप होत असताना थरूर यांनी ‘द हिंदू’ या वृत्तपत्रात एक लेख लिहिला आहे. या लेखात ज्येष्ठ खासदारांनी नेमके काय म्हटलेय? ते जाणून घेऊ…
“पहलगाम हल्ल्यानं आपल्याला जागं केलं”
शशी थरूर लिहितात, “२२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानं पुन्हा एकदा आपल्या सद्सद्विवेकबुद्धीला हादरवून सोडलं. इतिहासाच्या ओझ्याखाली दबलेल्या या भागात शांततेची नाजूकता अधोरेखित करीत, या हल्ल्यानं पुन्हा एकदा आपल्याला जागं केलं. सध्या संपूर्ण देश निरपराध जीवांच्या मृत्यूवर शोक व्यक्त करून दहशतवादाविरुद्धची आपली भूमिका अधिक मजबूत करीत आहे. अशा वेळी आपल्याला राष्ट्रीय सुरक्षेबाबत राजकीय एकोप्याचंही महत्त्व लक्षात घ्यावं लागेल. या मुद्द्यावर राजकारण होता कामा नये. भारत अशा प्रकारच्या संकटांचा सामना करीत असताना एक चिंताजनक पद्धत पुन्हा पुन्हा दिसून येते आणि ती म्हणजे राजकीय पक्ष एकत्र येऊन राष्ट्राच्या रक्षणासाठी उभे राहण्याऐवजी, अनेकदा राजकीय लाभासाठी शोकाचं भांडवल करतात.”
“दहशतवादी कारवाया निवडणूक प्रचाराचा भाग”
“२०१९ च्या पुलवामा हल्ल्यानंतरही असाच काहीसा प्रकार झाला होता. दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल केली गेलेली कारवाई निवडणूक प्रचाराचा भाग झाली होती. त्यावेळी लोकसभा निवडणूक जवळ आल्यामुळे हे कदाचित अपरिहार्य होतं. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेच्या गरजांवरून लक्ष हटून स्थानिक राजकारणाकडे वळलं. पण यात शंका नाही की, हा चक्रव्यूह आपल्याला एकसंध आणि दीर्घकालीन सुरक्षा धोरण ठरविण्यापासून रोखतो. आपल्यासमोरचं आव्हान स्पष्ट आहे. दहशतवाद हे असं संकट आहे की, ज्याला ठोस आणि विचारपूर्वक उत्तर देणं आवश्यक आहे. दहशतवादविरोधी कारवाया, राजनैतिक वाटाघाटी वा गुप्तचर यंत्रणेतील सुधारणा असो; त्याबाबत घेतले जाणारे निर्णय दीर्घ दृष्टिकोन आणि सामूहिक विचार यांवर आधारित असायला हवेत. राष्ट्रीय सुरक्षा ही इतकी गंभीर बाब आहे की, ती पक्षीय ओळखीत अडकता कामा नये.”
कारगिलच्या युद्धावेळी नेमकं काय घडलं होतं?
“१९९९ च्या कारगिल युद्धावेळी सत्ताधारी भाजपा आणि विरोधी काँग्रेस पक्षामध्ये मतभेद असूनही संपूर्ण देश राष्ट्राच्या रक्षणासाठी एकसंघ उभा राहिला होता. त्यावेळी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी सरकारच्या लष्करी कारवाईला पाठिंबा दिला आणि भारतीय जवानांच्या शौर्याचं कौतुक केलं होतं. “कारगिलमध्ये आपल्या जवानांनी दाखवलेलं शौर्य प्रत्येक भारतीयाचा अभिमान वाढवणारं आहे. त्यांचं बलिदान कधीच विसरलं जाणार नाही. त्याचप्रमाणे २०१६ मध्ये उरीवरील हल्ल्यानंतर भारतानं केलेल्या सर्जिकल स्ट्राइकलाही सर्वपक्षीय समर्थन मिळालं होतं”, अशी आठवण शशी थरूर यांनी आपल्या लेखातून करून दिली.
आणखी वाचा : Maharashtra Politics : छगन भुजबळांनंतर धनंजय मुंडेंच्या गळ्यातही लवकरच मंत्रिपदाची माळ?
“जगभरात दहशतवादी कारयावायांच्या अशा उदाहरणांची कमतरता नाही. ९/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेतील दोन्ही पक्षांनी एकत्रितपणे दहशतवादाविरोधात भूमिका घेतली होती. २०१९ मध्ये न्यूझीलंडच्या ख्राइस्टचर्चमध्ये मशिदींवर झालेल्या हल्ल्यानंतर पंतप्रधान जसिंडा आर्डर्न यांनी पक्षभेद न ठेवता, शस्त्रांच्या कायद्यात मोठा बदल केला. रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणानंतर पाश्चिमात्य युरोपातील अनेक देशांनी व्यापक एकमताने लष्करी मदत आणि निर्बंधांवर सहमती दर्शवली. स्वीडन व फिनलंडसारख्या परंपरागत तटस्थ देशांनीही NATO मध्ये प्रवेश केला”, असंही शशी थरूर म्हणाले.
“धूसर रंग गेले; आता काळं-पांढरंच उरलं”
राजकीय मतभेद असूनही राष्ट्रांच्या सुरक्षेसाठी जगभरातील अनेक देशांतील राजकीय पक्षांनी एकजूट दाखवली आहे. मग पहलगामच्या हल्ल्यानंतर भारतातही तसेच का घडू नये, असाही प्रश्नही शशी थरूर यांनी त्यांच्या लेखातून उपस्थित केला. ते म्हणाले की, मी जेव्हा संसदीय परराष्ट्र व्यवहार समितीचा अध्यक्ष झालो, तेव्हा मी जाहीरपणे सांगितलं होतं, “काँग्रेसची आणि भाजपाची परराष्ट्र नीती वेगवेगळी असता कामा नये. मला १९९४ मधील एक प्रसंग आठवतो, जेव्हा पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी विरोधी नेते अटलबिहारी वाजपेयी यांना जीनिव्हामध्ये काश्मीरबाबत भारताचं मत मांडण्यासाठी शिष्टमंडळाचं नेतृत्व करण्यासाठी पाठवलं होतं. त्यांच्यासोबत काँग्रेसचे सलमान खुर्शीद होते. नंतर अटलबिहारी वाजपेयी यांनी सांगितलं की, पाकिस्तानचे नेते या गोष्टीने पुरते गोंधळले होते— की विरोधी पक्षाचे नेते एवढ्या महत्त्वाच्या मुद्द्यावर देशाचं प्रतिनिधित्व करीत होते. दुर्दैवानं, गेल्या तीन दशकांत अशा प्रसंगांची पुनरावृत्ती झालेली नाही.”
“मतभेद विचारांवर होतात; शत्रुत्वावर नव्हे”
शशी थरूर पुढे लिहितात, “सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये परस्पर आदर कमी झाला आहे. लोकशाहीत प्रत्येकाला देशाच्या हिताची काळजी असावी लागते आणि मतभेद विचारांवर होतात; शत्रुत्वावर नव्हे. पण, आताच्या राजकारणाचं इतकं ध्रुवीकरण झालं आहे की, ही समजूतच बाजूला पडली आहे. आताचे राजकारण सूड, संताप व भूतकाळाच्या गोष्टींवर केलं जातंय. सोशल मीडियामुळेही ही विषमता अधिकच वाढली आहे. त्यामुळे सार्वजनिक चर्चांपासून घरगुती संभाषणांपर्यंत, सर्व काही काळं-पांढरं झालं आहे. मधले रंग नाहीसे झाले आहेत.”
हेही वाचा : Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना दिल्लीतून फोन; केंद्रीय मंत्र्यांबरोबर चर्चा, नेमकं काय घडतंय?
“पक्षनिरपेक्ष सुरक्षा धोरणाची गरज”
शशी थरूर लिहितात, “आज भारताला एका अशा राष्ट्रीय सुरक्षा धोरणाची गरज आहे, जे निवडणुकांच्या फेऱ्यांपासून स्वतंत्र राहील. दहशतवादविरोधी धोरण, गुप्तचर यंत्रणांमध्ये सुधारणा व राजकारणापासून अलिप्त राहणारी नीती हवी आहे. संरक्षण, शून्य सहनशीलता, देशांतर्गत सुरक्षा, प्रादेशिक रणनीती आणि आंतरराष्ट्रीय राजनैतिक धोरणं या सगळ्या बाबींबाबत पक्षांमध्ये एकमत असायला हवं; जेणेकरून कोणताही पक्ष सत्तेत असला तरी धोरणं सुसंगत राहतील. भारताची सुरक्षा ही कोणत्याही पक्षापुरती मर्यादित नाही, ती सगळ्यांची जबाबदारी आहे. दुःख आणि संकटाच्या प्रसंगी सर्वच पक्षांनी मतभेद व पक्षभेद विसरून एकत्र उभं राहणं गरजेचं आहे.”
शशी थरूर यांच्या निवडीने वाद
दरम्यान, ऑपरेशन सिंदूरच्या शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव समाविष्ट करण्यात आल्यानंतर काँग्रेसमधील एका गटाला त्यांच्या नियुक्तीवर आक्षेप असल्याचं सांगितलं जात आहे. त्यावरून भाजपा नेत्यांनीही काँग्रेसच्या भूमिकेवर पलटवार केला आहे. “जर काँग्रेसला थरूर यांच्यावर काही आक्षेप असेल, तर त्यांनी थरूर यांना पुन्हा पुन्हा खासदार म्हणून का निवडून दिले, असा प्रश्न भाजपाचे नेते उपस्थित करीत आहेत. काही दिवसांपासून शशी थरूर हे केंद्रातील मोदी सरकारचे कौतुक करीत आहेत. ‘ऑपरेशन सिंदूर’ हा पाकिस्तान आणि जगासाठी एक मजबूत संदेश आहे, असे सांगत थरूर यांनी सरकारच्या धोरणांचे कौतुक केले होते. त्यानंतर काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीत थरूर यांनी लक्ष्मणरेषा ओलांडली आहे, असा ठपका पक्षाने ठेवला होता. पंधरवड्यापूर्वी केरळमधील एका कार्यक्रमात पंतप्रधान मोदी आणि थरूर एकाच मंचावर होते. त्यावेळी व्यासपीठावरील थरूर यांच्या उपस्थितीमुळे काही जणांचा तिळपापड होईल, असे विधान मोदींनी केले होते.