Sheikh Hasina Awami League Offices : अवामी लीगचे सदस्य भारतात आश्रय घेऊन सातत्यानं बांगलादेशविरोधी कारवाया करीत असल्याचा आरोप बांगलादेशच्या अंतरिम सरकारनं केला. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं मात्र त्यांचा हा आरोप फेटाळून लावला. आम्ही शेजारील देशांच्या अंतर्गत राजकारणात कोणताही हस्तक्षेप करीत नाही, असं खणखणीत उत्तर भारतानं बांगलादेशला दिलं. अवामी लीग हा बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचा पक्ष आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये झालेल्या उठावानंतर त्यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देश सोडला होता. त्यानंतर शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतला, असा दावा बांगलादेशमधील काही नेत्यांनी केला. दरम्यान, भारतात खरंच ‘अवामी लीग’ची कार्यालये आहेत का? शेख हसीना नेमक्या कुठे आहेत? त्या संदर्भात घेतलेला हा आढावा…
बांगलादेशचा आरोप काय होता?
बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयानं बुधवारी (२० ऑगस्ट) जारी केलेल्या निवेदनात म्हटलं की, अवामी लीगचे अनेक नेते बांगलादेशमध्ये गंभीर गुन्हे करून फरारी झाले असून, सध्या त्यांनी भारतात आश्रय घेतला आहे. या नेत्यांनी २१ जुलै २०२५ रोजी दिल्लीतील प्रेस क्लबमध्ये एक कार्यक्रम आयोजित केला, ज्यात त्यांनी पत्रकारांना पुस्तके आणि काही माहितीपत्रके वाटली. अनेक भारतीय माध्यमांनी त्या संदर्भातील वृत्त दिलं. त्यावरून हे लक्षात येतं की, अवामी लीगचे नेते भारतात आश्रय घेऊन बांगलादेशविरोधी कारवाया करीत आहेत. या घडामोडींमुळे परस्पर विश्वास आणि आदरावर आधारित भारत-बांगलादेश यांच्यातील चांगले संबंध धोक्यात येऊ शकतात. हा मुद्दा बांगलादेशातील जनतेच्या भावनाही दुखावू शकतो. बांगलादेशमधील सध्या स्थिर असलेल्या अंतरिम सरकारवरही त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे भारतीय भूमीवरून कोणत्याही बांगलादेशी नागरिकांकडून बांगलादेशविरोधी कारवाया होऊ नयेत, यासाठी भारत सरकारनं तातडीने पावलं उचलावीत, अशी आमची विनंती आहे.
बांगलादेशचे सर्व आरोप भारतानं फेटाळले
दरम्यान, बांगलादेशच्या अंतरिम सरकारनं केलेले सर्व आरोप भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं फेटाळून लावले आहेत. ” ‘अवामी लीग’चे सदस्य भारतात राहून बांगलादेशविरोधी कारवाया करीत असल्याची कोणतीही माहिती आमच्याकडे नाही. तसेच भारत कोणत्याही परदेशी पक्षाला आपल्या भूमीवरून दुसऱ्या देशाविरुद्ध राजकीय कारवाया करण्याची परवानगी देत नाही. त्यामुळे बांगलादेशच्या अंतरिम सरकारनं दिलेलं निवेदन चुकीचं आहे”, असं परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. तसेच शेजारील देशानं लवकरात लवकर मुक्त, निष्पक्ष व सर्वसमावेशक निवडणुका घेणं आवश्यक आहे, ज्यामुळे खऱ्या अर्थानं लोकांची इच्छा आणि जनादेश समोर येईल, असा सल्लाही भारताकडून देण्यात आला आहे.
आणखी वाचा : अमेरिकन डॉलरच्या वर्चस्वाला धक्का बसणार? चीनचं स्टेबलकॉइन्स आहे तरी काय?
भारतात ‘अवामी लीग’ची कार्यालये आहेत का?
बांगलादेशी माध्यमांमधील काही वृत्तांनुसार, कोलकातामध्ये ‘अवामी लीग’ च एक गुप्त कार्यालय असून, भारतीय गुप्तचर यंत्रणांना याची माहिती आहे. बांगलादेशच्या द बिझनेस स्टँडर्ड या वृत्तवाहिनीनं ‘बीबीसी बांगला’च्या एका वृताचा हवाला देत म्हटलं की, शेख हसीना यांच्या पक्षाचं कार्यालय कोलकाताच्या बाहेरील एका व्यावसायिक इमारतीमध्ये अनेक महिन्यांपासून सुरू आहे. ५ ऑगस्ट २०२४ रोजी बांगलादेशातील विद्यार्थी आंदोलनांनंतर माजी पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडावा लागला आणि त्या भारतात आल्या. त्यानंतर ‘अवामी लीग’चे अनेक नेते आणि त्यांच्या काही समर्थकांनीही भारतात आश्रय घेतला. त्यापैकी अनेकांनी कोलकाता व आसपासच्या भागात स्थायिक होण्याचा मार्ग निवडला, असं वृत्तांत म्हटलं आहे.

कोलकात्यात बांगलादेशमधील १३०० नेते?
‘द प्रिंट’च्या वृतानुसार, शेख हसीना यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागल्यानंतर त्यांच्या पक्षातील काही प्रमुख नेत्यांसह सुमारे १,३०० हून कार्यकर्त्यांनी भारतात आश्रय घेतला आहे आणि काही नेत्यांनी अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि इतर देशांमध्ये पळ काढला आहे. या वर्षी मे महिन्यात बांगलादेशच्या अंतरिम सरकारनं अवामी लीगच्या नेत्यांवर दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत बंदी घातली आहे. या बंदीमुळे त्यांच्या पक्षाच्या राजकीय प्रभावावर मोठा परिणाम झाला आहे. भारतात आश्रय घेतलेल्या अवामी लीगच्या नेत्यांची दिनचर्या ठरलेली आहे. ते नमाज अदा करतात, व्यायामशाळेत जातात किंवा सकाळी फिरायला जातात. तसेच, संध्याकाळी ते बांगलादेश आणि जगातील इतर भागांतील पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांशी ऑनलाइन बैठका घेतात.
बांगलादेशचे माजी गृहमंत्रीही भारतातच?
‘अवामी लीग’च्या एका माजी खासदाराने सांगितले की, मी कोलकाता येथील न्यू टाउनमध्ये राहणारे बांगलादेशचे माजी गृहमंत्री असादुझमान खान कमल यांची नियमित भेट घेतो. त्यांच्या म्हणण्यानुसार, खान कमल यांनी या भागात एक प्रशस्त इमारत भाड्यानं घेतली आहे. दर आठवड्याला ते दिल्लीला पक्षाच्या बैठका आणि भारतीय प्रशासनातील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी जातात. मी पहाटे लवकर उठून नमाज अदा करतो. त्यानंतर जवळच्या व्यायामशाळेत जाऊन वजन उचलण्याचा व्यायाम करतो. आमच्या पक्षाच्या नेत्या व माजी पंतप्रधान शेख हसीना यांनीही भारतातच आश्रय घेतला आहे. मात्र, त्यांचं ठिकाण मला सार्वजनिकपणे सांगता येणार नाही, असं कॉक्स बाजार परिसरात राहणाऱ्या अवामी लीगच्या एका माजी खासदारानं सांगितलं.
हेही वाचा : हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे ते समुद्राखालील वाहने; चीनची भव्य लष्करी परेड कशी असेल?
भारतात खरंच ‘अवामी लीग’ची कार्यालये आहेत का?
‘द प्रिंट’च्या वृत्तानुसार, भारतात स्थायिक झालेले अवामी लीगचे नेते संध्याकाळी ऑनलाइन बैठकांमध्ये त्यांच्या देशातील राजकीय बातम्यांवर चर्चा करतात आणि त्यांच्या पुढील रणनीतीवर विचारविनिमय करतात. मात्र, त्यांचे कोलकात्यात कोणतेही अधिकृत कार्यालय नाही. या संदर्भात बांगलादेशचे माहिती व प्रसारण राज्यमंत्री राहिलेले मोहम्मद ए अराफत यांनी द प्रिंटला सांगितले, “हो… आम्ही ‘न्यू टाउन’ परिसरात एक जागा भाड्याने घेतली आहे. दररोज आम्ही सर्व नेते या इमारतीत एकमेकांना भेटतो. कोलकात्यात जवळपास पक्षाचे १३०० नेते आहेत. पण, या जागेला पक्षाचे कार्यालय म्हणता येणार नाही.” दरम्यान, या वृत्तांवरून अवामी लीगचे नेते भारतातून राजकीय कारवाया करीत असल्याचा बांगलादेशचा आरोप अधिक गंभीर झाला आहे. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.