Why Many Snake Rescuers Death in India : मध्य प्रदेशमधील गुना जिल्ह्यातील प्रसिद्ध सर्पमित्र दीपक महावर यांचा १४ जुलै रोजी विषारी सापाच्या दंशामुळे मृत्यू झाला. त्याआधी समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत दीपक हे विषारी कोब्रा सापाला गळ्यात अडकून दुचाकी चालवताना दिसून आले. मात्र, काही वेळातच या सापानं त्यांना दंश केला आणि उपचारादरम्यान दीपक यांचा मृत्यू झाला. मागील काही वर्षांपासून सर्पदंशानं अनेक सर्पमित्रांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या. समाजमाध्यमांवर प्रसिद्धी मिळवण्यासाठी विषारी प्राण्यांबरोबर खेळणं त्यांच्या जीवावर बेतलं. दरम्यान, सर्पमित्रांना सर्पदंश होण्याच्या घटनांमध्ये का वाढ होत आहे? सर्पदंशानं आजवर कितीजणांचा आपले प्राण गमावावे लागले? त्यासंदर्भातील घेतलेला हा आढावा…
६ जुलै रोजी बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील सर्पमित्र जे. पी. यादव यांचा कोब्रानं दंश केल्यानं मृत्यू झाला, तर मे महिन्यात समस्तिपूरमध्ये ‘स्नेक मॅन’ म्हणून ओळखले जाणारे जय कुमार साहनी यांनाही कोब्राच्या दंशानं आपले प्राण गमावावे लागले. त्याआधी मार्चमध्ये तमिळनाडूच्या कोयंबतूरमधील सर्पमित्र संतोष कुमार याचंही सर्पदंशामुळे निधन झालं. त्याच परिसरात ऑगस्ट २०२३ मध्ये के. मुरली या सर्पमित्राचा रसेल वायपर प्रजातीच्या सापानं दंश केल्याने मृत्यू झाला होता. कर्नाटकमधील प्रसिद्ध सर्पमित्र नरेशने २०२३ मध्ये आपल्या स्कूटरच्या सीटखाली एका कोब्राला ठेवलं होतं. त्याच सापानं त्याला दंश केला आणि नरेशचा मृत्यू झाला.
स्टंटबाजीमुळे अनेक सर्पमित्रांचा मृत्यू
सर्पमित्रांच्या मृत्यूची वरील सर्व प्रकरणं जबाबदारीशून्य व धोकादायक स्टंटबाजीकडे लक्ष वेधतात. सर्पतज्ज्ञ आणि वन विभाग यांनी अनेकदा इशारे देऊनही स्टंटबाजीमुळं अनेकजण आपले प्राण गमावतात. २०२१ मध्ये राजस्थानमधील पाली जिल्ह्यात १९ वर्षीय मनीष वैष्णव या सर्पमित्राचा कोब्रानं चावा घेतला. फेसबुकवर लाईव्ह व्हिडीओ बनवण्याच्या नांदात त्याचा जीव गेला. साप असं नावही ऐकलं तरी अनेकांचे पाय थरथरतात; पण विषारी साप कसा पकडायचा याचे प्रशिक्षण घेऊनही सर्पमित्र जाणून बुजून आपला जीव धोक्यात टाकतात. “मी वनस्पतीशास्त्राचा अभ्यास केला असून गेली दोन दशकं वाघांवर अभ्यास केलाय; पण जेव्हाही मी साप पकडायला जातो तेव्हा लोक माझ्यावर अधिकच प्रभावी होतात, असं रणथंबोर येथील ‘टायगर वॉच’ या स्वयंसेवी संस्थेचे धर्मेंद्र खांडाल सांगतात.
आणखी वाचा : Woman Married to Two Brothers : तरुणीने केलं दोन भावांशी लग्न; बहुपत्नीत्वाला कायदेशीर मान्यता आहे का?
सर्पमित्रांना स्टंटबाजीचं वेड
समाजमाध्यमांवर सक्रिय असलेल्या बऱ्याच व्यक्तींना सापाचे व्हिडीओ बघायला आवडतात. यामुळेच सर्पमित्र हे प्रसिद्धीसाठी ‘स्नेक रेस्क्यू’ करताना त्या घटनेचं कॅमेऱ्यात चित्रण करतात. पुढे हाच व्हिडीओ ते आपल्या अधिकृत अकाउंटवर अपलोड करतात, ज्यातून त्यांना प्रसिद्धी मिळते आणि आर्थिक फायदाही होतो. उदाहरणच द्यायचं झाल्यास उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील सर्पमित्र ‘मुरलीवाले हौसला’ हा देशातील सर्वात मोठा ‘स्नेक-इन्फ्लुएंसर’ आहे. यूट्यूबवर त्याचे तब्बल १६ मिलियन सबस्क्रायबर्स आणि इन्स्टाग्रामवर ३.६ मिलियन फॉलोअर्स आहेत. त्याच्यानंतर छत्तीसगडचा कमल चौधरी (१२ लाख सबस्क्रायबर्स) आणि कर्नाटकचा ‘स्नेक हरिहा’ (दोन लाख सबस्क्रायबर्स) यांचा नंबर लागतो. समाजमाध्यमांवर एक लाख फॉलोअर्सचा टप्पा गाठण्यासाठी शेकडो सर्पमित्र धडपड करताना दिसून येतात.
वन्यजीवांच्या संरक्षणाचा गंभीर प्रश्न
‘वाइल्डलाईफ ट्रस्ट ऑफ इंडिया’चे मुख्य कार्यकारी अधिकारी जोसे लुईस यांनी या प्रकारावर नाराजी व्यक्त केली आहे. “हे लोक सापांना चिडवतात आणि बनावट रेस्क्यू व्हिडीओ दाखवतात. एका व्हिडीओमध्ये कोब्रा आणि उंदराला एकाच विहिरीत दाखवण्यात आलं आहे. अशा प्रकारे वन्य प्राण्यांना एका जागेवरून दुसऱ्या जागेवर नेणं हे वन्यजीव कायद्यानुसार शिकार करण्यासारखंच आहे,” असं त्यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’ला सांगितलं. या प्रकारामुळे सर्पमित्रांच्या सुरक्षेचा व वन्यजीवांच्या संरक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, केवळ प्रसिद्धीसाठी जीवाशी खेळणं कितपत योग्य आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
‘स्नेक रेस्क्यू’ करताना अनेक ठिकाणी मनमानी
साप वाचवण्याच्या कामासाठी देशातील फार थोड्या राज्यांमध्ये विशिष्ट नियम लागू आहेत. लोकवस्तीमध्ये साप निघाल्यास त्याला सुरक्षितरित्या दुसऱ्या ठिकाणी हलवण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यपद्धती महत्त्वाच्या असतात. मात्र, अनेक राज्यांमध्ये अशा नियमांची अंमलबजावणी करणे शक्य होत नाही, कारण वन विभागातील अधिकारी वारंवार येणाऱ्या मदतीच्या कॉल्ससाठी स्वयंसेवकांवरच अवलंबून असतात. “पावसाळ्यात तर साप निघाल्याच्या इतक्या तक्रारी येतात की आम्हाला प्रत्येक ठिकाणी पोहोचणं शक्य होत नाही. आमच्याकडे प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुळे खासगी सर्पमित्रांची मदत घ्यावी लागते. मात्र, या संधीचा ते गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतात,” असं मध्य प्रदेशमधील एका वरिष्ठ वन अधिकाऱ्यानं सांगितलं.
अनेक राज्यांत नियमांचं पालन नाहीच
२०१८ मध्ये महाराष्ट्र सरकारनं साप वाचवण्याच्या कामासाठी मार्गदर्शक नियमावली लागू केली होती, ज्यामध्ये सर्पमित्रांना प्रशिक्षण व नोंदणी अनिवार्य करण्यात आली. त्यानंतर केरळने २०२०, गुजरातने २०२१, कर्नाटकमध्ये २०२२ आणि ओडिशामध्ये २०२३ साली अशा प्रमाणपत्राची अट लागू केली; पण आजवर फक्त केरळमध्येच ‘SARPA App’ च्या माध्यमातून प्रगत तंत्रज्ञानावर आधारित प्रणाली तयार करण्यात आली आहे. याद्वारे अधिकृत सर्पमित्रांवर नजर ठेवता येते आणि त्यांच्या गैरवर्तन करणाऱ्यांवर कारवाईही केली जाते. इतर राज्यांमध्ये मात्र हे नियम फक्त कागदावरच आहेत. प्रत्यक्षात अजूनही बऱ्याच ठिकाणी स्वयंघोषित ‘सर्पमित्र’ जीव धोक्यात घालून नियम धाब्यावर बसवून स्टंट करताना दिसून येत आहेत.
साप वाचवण्याचं काम म्हणजे जीवावरचं संकट
प्रशिक्षण घेतल्यानंतरही साप वाचवण्याचं काम हे कायम उच्च जोखमीचं असतं. भारतात सर्पदंशामुळे होणाऱ्या बहुतांश मृत्यूंसाठी जबाबदार असलेल्या चार अतिविषारी सापांना ‘बिग फोर’ असं म्हटलं जातं. यामध्येही काही साप थोडेसे सौम्य तर काही अत्यंत आक्रमक असतात. क्रेट म्हणजेच मण्यार साप शक्यतो शांत स्वभावाचा असतो आणि क्वचितच तो आक्रमक होतो. तर नाग जातीचा साप सर्पमित्रांच्या हालचालींवर लक्ष ठेवतो. त्याला त्रास झाला नाही तर तो आक्रमक होत नाही. फणा उघडल्यावर तो काही अंतरावरूनच दंश करतो, त्यामुळे फणा उघडणे हे दंशाच्या इशाऱ्याचं एक महत्त्वाचं संकेत मानलं जातं.

सर्वात धोकादायक साप कोणते?
घोणस हा साप सर्वात विषारी व धोकादायक मानला जातो, कारण तो विनाकारण आक्रमक होतो आणि त्यांच्या वर्तनाचा अंदाज लावणं सर्पमित्रांना कठीण जातं. सॉ-स्केल्ड वायपर- ज्याला मराठीत फुरसे साप म्हणतात, त्याची लांबी तीन फुटांपेक्षा कमी असते. आपल्या शरीराचे काही भाग परस्परांवर घासून हा साप शत्रूला इशारा देत असतो. कोब्रा हा अत्यंत ताकदवान व विषारी साप आहे. त्याची लांबी जवळपास सहा ते सात फूट इतकी असते. बऱ्याचदा तो वेटोळं घालून बसलेला असतो आणि क्षणार्धात दीड मीटरपर्यंत झेप घेऊ शकतो, त्यामुळे सर्पमित्राला त्याला पकडण्यासाठी खूपच कष्ट घ्यावे लागतात.
हेही वाचा : Plane Crash : बांगलादेशातील विमान अपघातासाठी चिनी बनावटीचं लढाऊ विमान जबाबदार?
स्टंटबाजी करणाऱ्यांवर कारवाईची गरज
स्नेक रेस्क्यू करताना हुक आणि पाईपसारख्या गळ्याची पिशवी सर्वात प्रभावी साधन मानलं जातं. या साधनांमुळे सापाला सहज पकडता येतं. या प्रक्रियेमध्ये सर्पमित्राला सापाला हात लावण्याची गरज भासत नाही. सापांना त्रास देणं, त्यांच्याशी खेळ करणं किंवा स्टंट करणं हे सर्व वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार दंडनीय गुन्हा आहे. साप हा आधीच अस्वस्थ असतो आणि यादरम्यान त्याला चावा घेण्याची संधी मिळाली तर तो मोठ्या प्रमाणात विष सोडतो,” असं जोसे लुईस यांनी सांगितलं.
जबलपूरचे सर्पतज्ज्ञ विवेक शर्मा म्हणाले, “बहुतेक सर्पमित्र हे ४० वर्षांच्या आतील आणि कमी शिक्षित असतात. यातील अनेकजण कुटुंबातील एकमेव कमावते असतात. काहींवर त्यांच्या लहान मुलांचा सांभाळ करण्याची जबाबदारी असते; पण स्नेक रेस्क्यू करताना ते या जबाबदारीचं भान ठेवत नाहीत. आपल्या देशात दरवर्षी ४० ते ५० हजार लोकांचा सर्पदंशामुळे मृत्यू होतो, त्यामुळेच सर्पमित्रांना अतिशय महत्व प्राप्त झालेलं आहे”, असेही त्यांनी सांगितलं.