Spy Cockroaches: तुम्ही कधी विचार केला आहे का, येत्या काळत युद्धात झुरळं शत्रूच्या बंकरमध्ये घुसून हेरगिरी करतील? पण, जर्मनी आता हेच करणार आहे. जर्मन स्टार्ट-अप कंपनी हेल्सिंग एक अशी सेना तयार करत आहे, ज्यामध्ये मानवी सैनिकांऐवजी टँकसारखे एआय रोबोट, समुद्रात तरंगणाऱ्या मिनी पाणबुड्या आणि भिंतीमध्ये घुसून ऐकू शकणारी झुरळं असतील.
जर्मनीचे संरक्षणमंत्री बोरिस पिस्टोरियस यांनी अनेक एआय स्टार्ट-अप्सना सांगितले होते की, आमच्याकडे पैसा आणि धाडस आहे. त्यानंतर एआरएक्स रोबोटिक्स, हेल्सिंगसारख्या कंपन्या स्पर्धेत उतरल्या. जर्मन स्टार्ट-अप्स आता गुप्तचर झुरळांसाठी अल्ट्रामॉडर्न शस्त्रे, टँक आणि मिनी पाणबुड्यांसारखे कृत्रिम बुद्धिमत्ता असलेले रोबोट बनवत आहेत. हा देशाच्या लष्करी धोरणाचा एक भाग आहे. त्यामागे शत्रूच्या भागातून गुप्त माहिती गोळा करणे हे उद्दिष्ट आहे. त्यामुळे मानवी सैनिकांना होणारा धोका कमी होतो. जर्मनी नावीन्यपूर्ण लष्करी तंत्रज्ञान स्वीकारत असल्याचे यावरून दिसून येते.
सायबोर्ग झुरळे आता युद्धभूमीवर येण्यास तयार झाली आहेत. युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर युरोप लष्करी खर्च वाढवत असताना जर्मनी त्यांच्या लष्कराचे आधुनिकीकरण करण्यासाठी स्टार्ट-अप आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर भर देत आहे. त्यामध्ये एक महत्त्वपूर्ण क्रांती म्हणजे जिवंत कीटकांचे पाळत ठेवणाऱ्या बॉट्समध्ये रूपांतर. बायो रोबोट कॅमेरा, सेन्सर्स आणि सुरक्षित कम्युनिकेशन मॉड्यूलने परिपूर्ण असे छोटे बॅकपॅक तयार करण्यात आले आहेत. हे बॅकपॅक शत्रूच्या भागातून रिअल टाइम डेटा संकलित करू शकतात.
सायबोर्ग झुरळे म्हणजे नेमके काय?
सायबोर्ग झुरळे म्हणजे झुरळांसारख्या जिवंत कीटकांमध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणं बसवून, त्यांना नियंत्रित करण्याचा एक तांत्रिक प्रयोग आहे. या झुरळांमध्ये मायक्रोचिप्स, सेन्सर्स व वायरलेस सिग्नल्स वापरून, त्यांना छोटे गुप्तहेर म्हणून किंवा स्पाय म्हणून वापरले जाऊ शकते. म्हणूनच त्यांना स्पाय कॉक्रोचेस म्हणतात.
सायबोर्ग झुरळे कशी काम करतात?
या प्रक्रियेत झुरळांची नर्व्ह सिस्टीम वैज्ञानिकांकडून नियंत्रित केली जाते. झुरळांच्या मज्जासंस्थेवर इलेक्ट्रोड्स बसवले जातात. तसेच झुरळांच्या पाठीवर एक हलकं इलेक्ट्रॉनिक यंत्र बसवलं जातं. ते ब्ल्यूटूथ किंवा रेडिओ फ्रिक्वेन्सीनं नियंत्रित केलं जाऊ शकतं. काही सायबोर्ग झुरळांमध्ये लहान कॅमेरे, ऑडिओ रेकॉर्डर व वातावरणीय सेन्सर्स बसवले जातात. ही संपूर्ण यंत्रणा बॅटरीवर चालते. मात्र, काही संशोधनांत झुरळाच्या हालचालींवरून ऊर्जा मिळविण्याचे प्रयोगही केले जात आहेत.
“सजीव कीटकांवर आधारित बायो-रोबोटिक्स, न्यूरल स्टिम्युलेशन, सेन्सर्स व सुरक्षित कम्युनिकेशन मॉड्यूलने सुसज्ज आहेत. ते वैयक्तिकरीत्य्या चालवले जाऊ शकतात किंवा समूहामध्येही चालवता येतात”, असे स्वॉर्म बायोटॅक्टिक्सचे सीईओ स्टीफन विल्हेल्म यांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेने माहिती देताना सांगितले.

याचे उद्दिष्ट काय?
मानवी जीव धोक्यात न घालता, शत्रूच्या गोटातून गुप्त माहिती मिळवणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. संरक्षण क्षेत्रातील सूत्रांचे म्हणणे आहे की, जर्मनीचा एकेकाळी असलेला सावध लष्करी दृष्टिकोन आता वेगाने बदलत आहे.
सायबोर्ग झुरळांचा वापर कुठे होईल?
या स्पाय कॉक्रोचेसचा वापर गुप्तचर संस्था, हेरगिरी आणि लष्करी वापरासाठी, तसेच शोधकार्यासाठी केला जाऊ शकतो. जिथे माणूस पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी माहिती गोळा करण्यासाठी ही झुरळं पोहोचू शकतात. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना शोधण्यासाठी, शत्रूच्या तळांवर माहिती मिळविण्यासाठी, कीटकांच्या हालचाली समजून घेण्यासाठी, तसेच निसर्गात निरीक्षणासाठी म्हणून याचा वापर केला जाऊ शकतो.
सायबोर्ग झुरळांमागचे तंत्रज्ञान काय आहे?
सायबोर्ग झुरळांचा विचार बायोनिक्सवर आधारित आहे. म्हणजेच निसर्गातील जीवशास्त्रीय प्रणाली आणि तंत्रज्ञान यांचे संकलन. हा प्रकल्प नैसर्गिक शरीर रचना आणि कृत्रिम यंत्रणा यांचं एकत्रित स्वरूप दाखवते. विद्युत उत्तेजनांच्या साह्याने मानवांना कीटकांच्या हालचाली दूरवरून नियंत्रित करता येतात. यामागचा उद्देश असा की, अवघड किंवा जोखमीच्या परिस्थितीत शत्रूवर पाळत ठेवणे किंवा गुप्त माहिती मिळवणे यासाठी या कीटकांचा उपयोग करता येऊ शकतो.
युरोपमधील संरक्षण स्टार्ट-अप हेल्सिंगचे सहसंस्थापक गुडबर्ट शेर्फ यांच्या मते, रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाने सर्वकाही बदलून टाकले. चार वर्षांपूर्वी लष्करी हल्ला ड्रोन आणि युद्धभूमीतील एआय तंत्रज्ञान वापरणारी त्यांची कंपनी सुरू केल्यानंतर शेर्फला गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले. युरोपला अमेरिकेला मागे टाकायचे आहे; पण आता स्टार्ट-अपसाठी गुंतवणूक ही समस्या राहिलेली नाही. गेल्या महिन्यात झालेल्या निधी संकलन कार्यक्रमात म्युनिक आधारित कंपनीने त्यांचे मूल्यांकन दुप्पट करून, ते १२ अब्ज डॉलर्स इतके केले. या वर्षी प्रथमच युरोप संरक्षण तंत्रज्ञान मिळविण्यावर अमेरिकेपेक्षा जास्त खर्च करत आहे, असे शेर्फ यांनी म्हटले.
संशोधन करणाऱ्या इतर कंपन्या आणि संस्था
रिकेन (RIKEN) या जपानी संशोधन संस्थेने झुरळांच्या पाठीवर वायरलेस कंट्रोलर लावून, त्यांना नियंत्रित करण्याची प्रणाली विकसित केली. त्याचा उद्देश प्रामुख्याने नैसर्गिक आपत्तीनंतर ढिगार्यांखाली अडकलेल्या लोकांचा शोध घेणे हा आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागाची केंद्रीय संशोधन आणि विकास संस्था डिफेन्स अॅडव्हान्स्ड रिसर्च प्रोजेक्ट्स एजन्सी (DARPA)देखील यावर काम करत आहे. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियादेखील यावर प्रयोग करीत आहे. डीआरडीओ सध्या औपचारिकपणे यावर काम करीत नसली तरी जैव-संवेदन, नॅनो ड्रोन्स व मिनिएचर रोबोटिक्सवर ते काम करीत आहेत.