अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि तिचा पती निक जोनस हे नुकतेच सरोगसी तंत्राच्या माध्यमातून आईवडील झाले. बॉलिवूडमध्ये सरोगसीच्या माध्यमातून मुलं जन्माला घालणारे हे काही पहिलेच नाहीत. शाहरुख खान, शिल्पा शेट्टी, एकता कपूर, तुषार कपूर, प्रीती झिंटा अशा अनेकांनी याआधी सरोगसीच्या माध्यमातून मुलांना जन्म दिला आहे. काही वर्षांपूर्वी अगदीच अज्ञात असणारं हे तंत्रज्ञान आता बॉलिवूड स्टार्सपासून सामान्य माणसांपर्यंत अनेकजणांच्या आयुष्याचा भाग झालं आहे. त्यानिमित्ताने जाणून घ्या या तंत्राविषयी…
सरोगसी ही संकल्पना ‘चोरी चोरी चुपके चुपके’ सिनेमात दाखवण्यात आली होती. त्यावेळी हे तंत्र भारतात अगदीच नवं आणि पूर्णपणे अज्ञात होतं. त्यानंतर ‘मला आई व्हायचंय’, याच चित्रपटावर आधारित असलेला आणि नुकताच आलेला ‘मिमी’ हा चित्रपट यातून या तंत्राविषयी लोकांना माहिती मिळाली. ही सरोगसी म्हणजे नक्की काय? तर सरोगसीचा अगदी सोप्या शब्दांत अर्थ सांगायचा झाला, तर एका दाम्पत्याचं बाळ दुसऱ्या महिलेच्या पोटात वाढवायचं. गेल्या काही वर्षांत सरोगसीचं प्रमाण वाढल्यामुळे सरकारने त्यावर निर्बंध घालून व्यावसायिक सरोगसीवर (Commercial Surrogacy) बंदी घातली आहे; मात्र इच्छुक महिलांना सरोगेट मदर बनण्याची परवानगीही देण्यात आली आहे.
प्रियांका आणि निक जोनसच्या घरी नवा पाहुणा ; सोशल मीडियावरून चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, म्हणाली…
करोना प्रादुर्भावामुळे देशात आलेली मंदी आणि बेरोजगारी यांमुळे सरोगेट मदर्सच्या प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून येत आहे. घरोघरी धुणी-भांडी, साफसफाई करणाऱ्या महिला किंवा फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या कामगार महिला कमी कालावधीत जास्त पैसे मिळवण्याच्या हेतूने सरोगेट मदर होण्याचा पर्याय निवडतात. लॉकडाउनच्या काळात अनेक सुशिक्षित महिलांनीही पैसे मिळवण्यासाठी सरोगेट मदर बनण्याचा पर्याय निवडल्याचं अनेक अहवालांमधून समोर आलं आहे.
सरोगसीचे प्रकार
सरोगसीचे ट्रॅडिशनल (Traditional Surrogacy) आणि जेस्टेशनल (Gestational Surrogacy) असे दोन प्रकार आहेत. ट्रॅडिशनल सरोगसीमध्ये होणाऱ्या बाळाच्या पित्याच्या शुक्राणूंचं सरोगेट मदरच्या बीजांडाशी मिलन घडवलं जातं. त्यामुळे संबंधित महिला ही जन्माला येणाऱ्या बाळाची जैविक आई अर्थात बायोलॉजिकल मदर असते. जेस्टेशनल सरोगसीमध्ये मात्र सरोगेट मदरचं आणि बाळाचं रक्ताचं नातं नसतं. होणाऱ्या बाळाच्या आई-वडिलांच्याच अनुक्रमे बीजांड आणि शुक्राणूचा संयोग प्रयोगशाळेत केला जातो. त्यातून तयार झालेला भ्रूण टेस्ट ट्यूबद्वारे सरोगेट मदरच्या गर्भाशयात प्रत्यारोपित केला जातो.
सरोगसी तंत्र अवलंबण्यामागचं कारण काय?
काही दाम्पत्यांना मूल होण्यात काही वैद्यकीय अडचणी असतात. काही वेळा गर्भधारणेमुळे संबंधित महिलेच्या जिवाला धोका उत्पन्न होण्यासारखी काही तरी गुंतागुंत असते. तसंच, काही महिलांना गर्भारपणासाठी पुरेसा वेळ देणं शक्य नसतं. यांपैकी कोणत्याही कारणाने सरोगसीचा पर्याय स्वीकारला जातो. त्यासाठी सरोगेट मदर होणारी महिला आणि ज्या जोडप्याला सरोगसीद्वारे मूल हवं आहे ते जोडपं यांच्यामध्ये एक करार केला जातो. त्यानुसार, सरोगसी करून घेणारं दाम्पत्यच होणाऱ्या बाळाचे कायदेशीर आई-वडील असतात. सरोगेट मदरचा संबंध केवळ बाळ जन्माला घालेपर्यंतच असतो. बाळाच्या जन्मानंतर ते आई-वडिलांकडे दिलं जातं. गर्भारपणाच्या काळात स्वतःचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी, तिच्या गर्भातल्या बाळाचं चांगलं भरणपोषण होण्यासाठी चांगला आहार, औषधं आदी कारणांसाठी सरोगेट मदरला पैसे दिले जातात.
या तंत्राबाबत कायदा काय सांगतो?
सरोगसीचा दुरुपयोग होत असल्याचं पाहून केंद्र सरकारने त्याबद्दल काही नियमही निश्चित केले. २०१९ साली व्यावसायिक सरोगसीवर बंदी घालण्यात आली. त्यानुसार आता परदेशी नागरिक, एकल पालक, घटस्फोटित, लिव्ह इन पार्टनर्स, एलजीबीटी समुदाय आदींसाठी सरोगसीचा पर्याय उपलब्ध नाही. २०२० सालच्या सरोगसी रेग्युलेशन विधेयकात अनेक सुधारणा करण्यात आल्या असून, त्यानुसार इच्छुक महिलेला सरोगेट बनण्याची परवानगी देण्यात आली आहे. सरोगेट मदर बनण्यास इच्छुक असलेल्या महिलेकडे पूर्णतः निरोगी असल्याचं प्रमाणपत्र असणं आवश्यक असतं. तसंच, सरोगसी करून घेणाऱ्या दाम्पत्याकडेही ते मूल जन्माला घालू शकत नसल्याचं वैद्यकीय प्रमाणपत्र असणं आवश्यक असतं.