Oral cancer prevention तोंडाचा कर्करोग हा तोंडाच्या आतील ऊतींमध्ये एकसमान आणि नियंत्रित पेशींच्या वाढीमुळे होणारा एक गंभीर आजार आहे. अनेकांचा असा समज आहे की, केवळ तंबाखूचे सेवन, धूम्रपान यांच्या सेवनानेच तोंडाचा कर्करोग होतो. मात्र, हा समज चुकीचा आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, तोंडाच्या आरोग्याशी संबंधित समस्या जगभरात वाढत आहेत. कोलगेट-पामोलिव्ह, एपीएसीच्या ओरल केअर विभागाच्या संचालिका डॉ. स्वप्ना कोप्पीकर यांनी ‘फायनान्शियल एक्स्प्रेस डॉट कॉम’ला सांगितले की, “भारतातील तोंडासंबंधी आरोग्य समस्या वाढत आहेत. अंदाजे ८५ टक्के लोकांना दातांमध्ये कीड, हिरड्यांचे रोग आणि तोंडाचा कर्करोग यांसारख्या समस्या उद्भवत आहेत.

वाईट सवयी, स्वच्छता न पाळणे आणि दंतवैद्यकीय उपचारांचा अभाव ही प्रमुख कारणे आहेत. विशेषतः ग्रामीण भागात, दंतवैद्यकीय पायाभूत सुविधा कमी आहेत. आर्थिक अडचणी आणि कमी जागरूकता यामुळे लोक अनेकदा दातांच्या उपचारांना विलंब करतात किंवा टाळतात. परिणामी रोग वाढल्यानंतर निदान होते, ज्यामुळे उपचार करणे अधिक क्लिष्ट होते आणि आरोग्य सेवांचा खर्च वाढतो.” त्या सांगतात, तंबाखू आणि सुपारीच्या व्यापक वापरामुळे तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण विशेषतः चिंताजनक आहे. सुमारे ८० टक्के भारतीयांना दातांमध्ये कीड असूनही केवळ १० टक्के भारतीयच त्यावर उपचार घेत आहेत. तोंडाच्या कर्करोगाची लक्षणे कोणती? दात किडू नये यासाठी काय करावे? तोंडासंबंधित विकार का वाढत आहेत? याबाबत सविस्तर जाणून घेऊयात…

आव्हाने कोणती?

निदान आणि उपचारातील आव्हाने खर्च आणि जागरूकता यांच्याशी जोडलेली आहेत. अनेक लोक प्रतिबंधात्मक उपायांपेक्षा वेदनेसारखी लक्षणे दिसल्यावरच दंतवैद्यकीय उपचार घेतात. डॉ. कोप्पीकर म्हणाल्या, “दर सहा महिन्यांनी नियमित दंत तपासणी केल्यास रोगांचे लवकर निदान आणि उपचार होण्यास मदत होऊ शकते. मात्र, देशातील आरोग्य प्रोत्साहन कार्यक्रम आणि सार्वजनिक आरोग्य उपक्रम यांचा अजूनही अभाव आहे. आयुष्मान भारतसारखे प्रयत्न आरोग्य सेवांमध्ये सुधारणा करत असले, तरी तोंडी आरोग्याला सार्वजनिक आरोग्य आराखड्यात समाविष्ट करणे आणि शाळा तसेच ग्रामीण समुदायांमध्ये शिक्षण वाढवणे ही या आव्हानांवर मात करण्यासाठी आणि प्रतिबंधात्मक काळजीला प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले आहेत.”

भारतात दातांची कीड ही एक प्रचलित आरोग्य समस्या आहे, विशेषतः लहान मुलांमध्ये आणि किशोवयीन मुलांमध्ये. दातांची कीड हा एक आजार आहे. त्यात तोंडात असलेले बॅक्टेरिया अन्नातील साखरेचे रूपांतर ॲसिडमध्ये करतात, ज्यामुळे दातांचे संरक्षक आवरण नष्ट होते. वेळेवर उपचार न केल्यास, यामुळे संसर्ग होऊन दात गमवावे लागतात. डॉ. कोप्पीकर यांच्या मते, दातांच्या किडीस हातभार लावणारे घटक म्हणजे तोंडाच्या स्वच्छतेचा अभाव, साखरेचा जास्त वापर, दंत उपचारांची मर्यादित उपलब्धतता आणि तोंडी आरोग्याच्या योग्य पद्धतींबद्दल जागरूकता नसणे.

“भारतात दाताला कीड लागण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या जास्त आहे. अभ्यासातून असे दिसून आले आहे की, शहरी आणि ग्रामीण भागातील सुमारे ६० ते ७० टक्के मुलांच्या दातांना कीड आहे. हे प्रमाण सामाजिक-आर्थिक स्थिती, वय आणि प्रादेशिक घटकांनुसार बदलते. उदाहरणार्थ, कर्नाटकमधील एका अभ्यासात ६ ते ११ वयोगटातील मुलांमध्ये किडीचे प्रमाण जवळपास ७८.९ टक्के आढळले, जे दक्षिण आफ्रिका आणि अमेरिकेसारख्या इतर देशांपेक्षा जास्त आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

तेलंगणातील महबूबनगर जिल्ह्यातील आणखी एका अभ्यासात, अंदाजे ६४ टक्के मुलांमध्ये दुधाच्या दातांमध्ये किडीची लक्षणे दिसली. तोंडी स्वच्छतेचा अभाव असलेल्या मुलांमध्ये हे प्रमाण जास्त होते. याव्यतिरिक्त, लिंगावर आधारित फरकदेखील दिसून आले, ज्यामध्ये मुलांपेक्षा मुलींमध्ये किडीचे प्रमाण किंचित जास्त आढळले.

दातांची कीड प्रभावीपणे कशी रोखता येते?

नुकत्याच इंटरनॅशनल जर्नल ऑफ क्लिनिकल पेडियाट्रिक डेन्टिस्ट्रीमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात, दातांची कीड रोखण्यासाठी फ्लोराईड आणि आर्जिनिनच्या एकत्रित परिणामांचे संशोधन केले आहे. डॉ. कोप्पीकर यांनी ‘फायनान्शियल एक्स्प्रेस डॉट कॉम’ला सांगितले की, “आर्जिनिन हे एक अमिनो ॲसिड आहे, जे तोंडात बॅक्टेरियाद्वारे तयार होणाऱ्या ॲसिडला निष्क्रिय करण्यास मदत करते, ज्यामुळे तोंडातील पीएच (pH) पातळी संतुलित राहते. दातांचे संरक्षक आवरण मजबूत करणाऱ्या फ्लोराईडबरोबरच जेव्हा हे घटक एकत्र येतात, तेव्हा दातांचे आवरण पुन्हा सुधारते आणि किडीची शक्यता कमी करते. हे संयोजन अशा वातावरणात विशेषतः फायदेशीर आहे, जिथे दातांची कीड मोठ्या प्रमाणात आढळते.”

भारतात आहार, दंत उपचारांची मर्यादित उपलब्धता आणि इतर घटकांमुळे दातांची कीड ही एक मोठी समस्या आहे; त्यामुळे भारतात या फ्लोराईड-आर्जिनिन संयोजनाचा महत्त्वपूर्ण परिणाम होऊ शकतो. “हे विशेषत: मागासलेल्या भागातील लोकांसाठी एक सहज उपलब्ध उपाय म्हणून काम करू शकते, ज्यामुळे दातांची कीड रोखण्यास आणि एकूणच तोंडी आरोग्य सुधारण्यास मदत होईल,” असे ते म्हणाले.

तुमच्या दातांची अधिक चांगली काळजी घेण्यासाठी आणि दातांची कीड टाळण्यासाठी काही प्रभावी उपाय खालीलप्रमाणे आहेत:

  • दिवसातून दोनदा दात घासा.
  • दिवसातून एकदा फ्लॉस (Floss) करा.
  • संतुलित आहार घ्या.
  • साखरेचे आणि ॲसिडिक (आंबट) पदार्थ मर्यादित करा.
  • फ्लोराईडयुक्त पाणी प्या.
  • अँटीबॅक्टेरियल माउथवॉश वापरा.
  • जेवणानंतर लाळेचा प्रवाह वाढवण्यासाठी Sugar-free Gum चघळा.
  • तुमच्या दातांची नियमित तपासणी करा.
  • धूम्रपान आणि तंबाखूचा वापर टाळा.
  • तोंड कोरडे पडण्याची समस्या असल्यास त्यावर उपचार करा.

कर्करोगाचा धोका

आकाश हेल्थकेअरचे डायरेक्टर व सर्जिकल ऑन्कोलॉजीतले डॉक्टर अरुण कुमार गिरी सांगतात, जर आपण तोंडाची स्वच्छता नीट राखली नाही, सर्व्हायकल कॅन्सर किंवा ओरल कॅव्हिटी कॅन्सर असे दोन प्रकारचे कर्करोग होण्याची दाट शक्यता असते. जर तोंड आणि दातांची स्वच्छता योग्य पद्धतीने राखली गेली नाही, तर तोंडातले जंतू कर्करोगास कारणीभूत ठरू शकतात. या कर्करोगाचे लवकर निदान होणेदेखील महत्त्वाचे आहे, कारण पहिल्या टप्प्यात उपचार करून कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूचा धोका टळू शकतो, मात्र निदान होण्यास उशीर झाला तर उपचार करणे कठीण होते.