पैसा, शारीरिक संबंध आणि विश्वासघाताच्या एका घोटाळ्याने थायलंडला हादरवून सोडले आहे. नोंथाबुरी प्रांतातील विलावन एम्सावत या ३० वर्षीय महिलेने भिक्खूंशी शारीरिक संबंध ठेवले आणि त्यानंतर हे संबंध उघडकीस येऊ नये म्हणून त्यांना लाखो रुपयांसाठी ब्लॅकमेल केले अशी माहिती थायलंड पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणामुळे थायलंडच्या बौद्ध समुदायाला मोठा धक्का बसला आहे. जाणून घ्या हे प्रकरण नेमकं काय आहे?
काय आहे हे प्रकरण?
मंगळवारी १५ जुलै रोजी एका ३० वर्षीय महिलेला थायलंड पोलिसांनी अटक केली. या महिलेने भिक्खूंना भुरळ घालत त्यांच्याकडून पैसे उकळल्याचा आरोप तिच्यावर आहे. असोसिएटेड प्रेसच्या वृत्तानुसार, या महिलेला नोंथाबुरी प्रांतातील तिच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली. या महिलेने विविध प्रांतामधील प्रसिद्ध मंदिरांमधल्या किमान ९ मठाधिपती आणि वरिष्ठ भिक्खूंबरोबर संबंध ठेवल्याचा आरोप आहे. तसंच या महिलेवर खंडणी, मनी लाँड्रिंग यासह इतरही अनेक आरोप आहेत. थाई भिक्खूंना ब्रम्हचारी राहणे आणि स्त्रीचा स्पर्श टाळणे बंधनकारक आहे.
भिक्खूंना भुरळ कशी पाडली?
गेल्या महिन्यात बँकॉकमधील एका प्रसिद्ध मंदिराच्या मठाधिपतीने अचानक भिक्षूत्व सोडल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आल्याचे थाई पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाच्या तपासादरम्यान असे आढळून आले की, मे २०२४ मध्ये या महिलेचे एका भिक्खूशी संबंध होते. त्यानंतर तिने त्याला सांगितले की ती गर्भवती आहे आणि बाल संगोपनासाठी ७.२ दशलक्ष बाहट (१६.५६ लाख रूपये) देण्याची मागणी केली. ही माहिती केंद्रीय तपास यंत्रणेचे उपायुक्त जरूनकियत पंकाव यांनी दिली. त्यानंतर पोलिसांना असे आढळले की, त्या महिलेने इतर भिक्खूंनाही अशाचप्रकारे ब्लॅकमेल केले होते. काही भिक्खूंनी तिला पैसेही दिले होते. पैसे उकळण्याचाच हेतू असल्याचे या भिक्खूंनी तपासादरम्यान सांगितल्याचे वृत्त बीबीसी या वृत्तसंस्थेने दिले.
जुलै महिन्याच्या सुरुवातीला या महिलेबाबत माहिती मिळताच तिच्या घराची झडती घेण्यात आली. त्यावेळी तिच्या मोबाईलमध्ये ८० हजारांहून अधिक फोटो आणि व्हिडीओ आढळले आणि धक्कादायक म्हणजे हे सर्व फोटो आणि व्हिडीओ भिक्खूंचे असून त्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी तिने त्याचा वापर केला होता. अनेक भिक्खूंशी जवळीक दर्शवणारे चॅट्सही आढळले आणि त्याचाही वापर तिने पैसे उकळण्यासाठी केला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन वर्षांत महिलेला ३८५ दशलक्ष बाहट (सुमारे १०१.७ कोटी) रुपये मिळाले आहेत. यापैकी जवळपास सर्व पैसे तिने काढून ते ऑनलाइन जुगारासाठी वापरल्याचे वृत्त बीबीसीने दिले आहे. बुधवार, १६ जुलैपर्यंत आरोप झालेल्यांपैकी १० भिक्खूंनी आधीच भिक्खूत्व सोडल्याचे वृत्त द बँकॉक पोस्टने दिले आहे.
थाई भिक्खूंची तपासणी
या प्रकरणामुळे थाई भिक्खू आणि मठाधिपतींच्या नियंत्रणाखाली असलेल्या मंदिरांना मोठ्या प्रमाणात दान केल्या जाणाऱ्या पैशांवर मोठं प्रश्नचिन्ह उभं आहे. अलीकडच्या काही वर्षांत आग्नेय आशियाई देशातील भिक्खू अमली पदार्थांच्या तस्करीमध्ये सहभागी असल्याचे समोर आले होते. २०२२ मध्ये उत्तरेकडील फेचाबुन प्रांतातील एका मंदिरातील चार भिक्खूंना अमली पदार्थांविरोधी छाप्यात अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर त्यांना भिक्खू पदावरून काढून टाकण्यात आले होते.

महत्त्वाचे मुद्दे:
- आध्यात्मिक सल्ला घेण्याच्या नावाखाली महिलेने त्यांच्याशी संवाद सुरू केला
- हळूहळू विश्वास संपादन करत संबंध ठेवले
- तिने हे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्याची धमकी देऊन भिक्खूंकडून पैसे उकळले
- भिक्खू या सर्व गोष्टी मंदिर प्रशासन किंवा पोलिसांना सांगण्यास घाबरले, कारण त्यांना समाजातील प्रतिष्ठा गमावण्याची भीती होती
विरापोल सुकफोल नावाचा एक भिक्खू त्याच्या खास जीवनशैलीसाठी ओळखला जातो. त्याच्यावर २०१७ मध्ये लैंगिक गुन्हे, फसवणूक आणि मनी लाँड्रिंगचे आरोप करण्यात आले होते. आता उघडकीस आलेल्या या प्रकरणामुळे थाई पोलिसांनी भिक्खूंशी गैरवर्तन करणाऱ्यांची तक्रार करण्यासाठी एक फेसबुक पेजही तयार केले आहे. “आम्ही देशभरातील भिक्खूंची चौकशी करू. मला खात्री आहे की या चौकशीच्या परिणामांमुळे बरेच बदल होतील”, असे जारूनकियत यांनी सांगितले आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर थाई बौद्ध प्रशासकीय संस्था असलेल्या संघ सुप्रीम काउन्सिलकडून मठांच्या नियमांचे पुनरावलोकन करण्यासाठी एक विशेष समिती स्थापन केली जाणार आहे.
“मठासंबंधित कायद्यातील त्रुटी दूर करण्याची आणि जनतेचा विश्वास पुन्हा संपादित करण्याची गरज आहे”, असे काउन्सिलचे सरचिटणीस चचापोल चाय्यापोर्न यांनी साउथ चायना मॉर्निंग पोस्टला सांगितले आहे. दुसरीकडे, थाई सरकार मठाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या भिक्खूंसाठी दंड आणि तुरुंगवासासह कठोर शिक्षेचा विचार करत आहे. सध्या थायलंडमध्ये यासंदर्भातील असा कोणताही कायदा नाही.