गौरव मुठे

देशांतर्गत भांडवली बाजाराने हाँगकाँगच्या भांडवली बाजाराला मागे टाकत चौथ्या स्थानी झेप घेतली आहे. यामागची नेमकी कारणे काय आहेत, ते जाणून घेऊया.

Difficulties in the redevelopment of redeveloped buildings
मुंबई : पुनर्विकसित इमारतींच्या पुनर्विकासात अडचणी!
LinkedIn, top companies, india
वित्तीय, तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी; लिंक्डइनकडून देशातील मोठ्या २५ कंपन्यांची यादी जाहीर
Apple Company has decided to fires 600 employees in California
‘ॲपल’कडून ६०० कर्मचाऱ्यांना नारळ; कंपनीकडून करोनानंतरची पहिलीच मोठी कर्मचारी कपात
bank of Maharashtra loan disbursement increased by 16 percent
‘महाबँके’च्या कर्ज वितरणात १६ टक्क्यांची वाढ

जागतिक भांडवली बाजारांमध्ये भारत जगात कितव्या स्थानी?

देशांतर्गत भांडवली बाजारात सूचिबद्ध असलेल्या कंपन्यांचे मूल्यांकन ४.३३ लाख कोटी डॉलरवर पोहोचले आहे. परिणामी भारतीय भांडवली बाजाराने जागतिक पातळीवर सर्वाधिक मूल्य असलेल्या बाजारांमध्ये चौथ्या स्थानी झेप घेतली. त्यामुळे हाँगकाँग ४.२९ लाख कोटी डॉलर बाजार मूल्यासह पाचव्या स्थानावर गेला आहे. अर्थात भारतीय भांडवली बाजार आणि हाँगकाँगच्या बाजार भांडवलात फारसा फरक नसल्याने ही चौथ्या स्थानासाठी रस्सीखेच अजून काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. सरलेल्या वर्षात ५ डिसेंबर रोजी भारतीय भांडवली बाजाराने ४ लाख कोटी बाजार मूल्यांकनाचा टप्पा ओलांडला. गेल्या पाच वर्षांत बाजार मूल्यांकनात २ लाख कोटी डॉलर मूल्याची भर पडली. विद्यमान जानेवारी महिन्यातील सरलेला आठवडा वगळता भांडवली बाजारावर तेजीवाल्यांचा पगडा राहिलेला आहे.

बाजाराला चौथ्या स्थानी पोहोचवण्यास कोणत्या घटकांचा हातभार?

मुख्यतः भारतीय अर्थव्यवस्थेची समाधानकारक वाटचाल आणि परदेशी गुंतवणूकदारांकडून समभाग खरेदी झाल्याने देशांतर्गत भांडवली बाजार तेजीत आहेत. तेव्हापासून बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी सुमारे १७ ते १८ टक्क्यांनी वधारले आहेत. व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणारे बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक ४३ टक्के आणि ४६ टक्क्यांनी वधारले. शिवाय किरकोळ गुंतवणूकदारांचा भांडवली बाजारातील सहभाग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. डीमॅट खात्यांची संख्या १३ कोटींपुढे पोहोचली असून दर महिन्याला त्यात सरासरी ३० लाख नवीन खात्यांची भर पडते आहे. 

हेही वाचा >>>विश्लेषण: शिष्यवृत्ती संकेतस्थळावरील नव्या पर्यायाने गोंधळ का उडाला?

हाँगकाँगचा भांडवली बाजार पाचव्या स्थानी का घसरला?

भारतीय भांडवली बाजाराची चमकदार कामगिरी हे एक मुख्य कारण आहेच. तसेच सरलेल्या वर्षात हाँगकाँग बाजाराने सलग चौथ्या वर्षात नकारात्मक परतावा दिला आहे. विद्यमान वर्षात चीनच्या भांडवली बाजारात ८.८१ टक्क्यांची घसरण झाली. तर हाँगकाँगच्या बाजार भांडवलात अंदाजे १२.६ टक्के घसरून ४ लाख कोटी डॉलरवर आले. वर्ष २०२३ मध्ये हाँगकाँगचा प्रमुख निर्देशांक हँग सेंग आतापर्यंत १७.४ टक्क्यांनी घसरला आहे. शिवाय जागतिक पटलावर भारत परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यास यशस्वी झाला असून परदेशी गुंतवणूकदारांचे आवडीचे केंद्र बनला आहे.

आयपीओ बाजारातील उत्साह किती कारणीभूत?

विद्यमान वर्षात प्रारंभिक समभाग विक्रीद्वारे (आयपीओ) भांडवली बाजारात प्रवेश करणाऱ्या कंपन्यांच्या जोरावर भारतीय भांडवली बाजाराने अव्वल स्थान गाठले आहे. सरलेल्या वर्षात भांडवली बाजारात १०० हून अधिक नवीन कंपन्यांचे आगमन झाले, अशी माहिती जागतिक सल्लागार संस्था ‘अर्न्स्ट अँड यंग’ने संकलित केलेल्या अहवालात मिळते.

लघु आणि मध्यम उद्योगांसाठी असणाऱ्या ‘एसएमई’ मंचावर सर्वाधिक कंपन्यांची नोंदणी झाली आहे. सुमारे १७९  ‘एसएमई’ कंपन्यांनी बाजारात पदार्पण केले. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना देखील भारताच्या प्राथमिक बाजारात उत्साहाचे वातावरण कायम आहे. विद्यमान वर्ष २०२४ मध्ये देखील आयपीओ बाजारात उत्साह कायम राहण्याची आशा आहे. तसेच प्राथमिक बाजारात सरलेल्या डिसेंबर महिन्यात एकसाथ धडक देणाऱ्या पाच कंपन्यांच्या प्रारंभिक समभाग विक्रीला (आयपीओ) गुंतवणूकदारांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला होता. केंद्राच्या मालकीच्या इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी अर्थात ‘इरेडा’सह, टाटा टेक्नॉलॉजीज, गांधार ऑइल रिफायनरी इंडिया, फ्लेअर रायटिंग इंडस्ट्रीज आणि फेडबँक फायनान्शियलच्या समभागांसाठी अर्जांचा पाऊस पडला. या माध्यमातून पाच कंपन्यांकडून एकत्रित सुमारे ७ हजार कोटी उभारले जाणार होते, प्रत्यक्षात त्यापेक्षा किती तरी अधिक २.५ लाख कोटी रुपयांच्या विक्रमी बोली गुंतवणूकदारांनी लावल्या. ज्या भागधारकांना आयपीओच्या माध्यमातून समभाग मिळाले नाहीत, त्यांनी खुल्या बाजारातून ते खरेदी केले. परिणामी नव्याने सूचिबद्ध झालेल्या समभागांच्या किमती दुप्पट झाल्या. 

हेही वाचा >>>२६ जानेवारी १९९३ ठरला ‘टर्निंग पॉइंट’ आणि… राष्ट्रध्वज फडकवणे झाले सोपे!

भांडवली बाजाराला अव्वल स्थानी नेण्यास सरकारचे योगदान कसे?

देशात नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांमध्ये केंद्रातील विद्यमान सरकारच्या बाजूने कौल दिला. परिणामी आगामी लोकसभा निवडणुकीतदेखील हेच सरकार कायम राहून राजकीय स्थैर्य प्रदान करेल अशी आशा आहे. शिवाय कैक वर्षांपासून अडगळीत लोटल्या गेलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांवर अचानक प्रकाशझोत आला असून, त्यांच्या समभागांनी कमावलेल्या बहुप्रसवा मोलाने एकंदर भांडवली बाजाराला दिशा देण्यात भूमिका बजावल्याचेही दिसून येत आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, ‘सेन्सेक्स’च्या ६० हजारांवरून, ७० हजारांपर्यंतच्या प्रवासादरम्यान सार्वजनिक क्षेत्रातील सूचिबद्ध कंपन्यांच्या बाजार भांडवलात तब्बल दुपटीने झालेल्या वाढीची प्रमुख भूमिका राहिली आहे. हे बाजार भांडवल आता ४६.४ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. एकूण बाजार भांडवलात सरकारी मालकीच्या कंपन्यांचा हिस्सा सुमारे १३ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. खासगी क्षेत्रातील बड्या उद्योगसमूहांचाही यात सहभाग आहे. अदानी, रिलायन्स आणि टाटा समूहाने देखील ‘सेन्सेक्स’च्या मुसंडीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. टाटा समूहाचे एकंदर बाजार भांडवल २२.४८ लाख कोटींवरून, २७.४१ लाख कोटींवर पोहोचले आहे. रिलायन्स समूहाचे बाजार भांडवल १६.८७ लाख कोटींवरून, १८.६१ लाख कोटींवर, तर अदानी समूहाचे ९.७८ लाख कोटींवरून, १४.३७ लाख कोटींवर पोहोचले आहे.

बाजार तेजीतील इतर कारणे काय?

अमेरिकेतील रोख्यांवरील परताव्याचे वाढलेले दर तीव्र रूपात घसरल्याने, माघारी परतलेले विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांचे पाय पुन्हा भारतीय बाजाराकडे वळतील, अशी आशा आहे.

जागतिक खनिज तेलाच्या किमतीतील नरमाई आणि महागाईला लक्ष्य पातळीपर्यंत खाली आणण्याच्या रिझर्व्ह बँकेच्या प्रयत्नांना अपेक्षेप्रमाणे मिळत असलेले यश पाहता, भारतीय अर्थव्यवस्थेबाबत एकूण आशादायी चित्र निर्माण झाले आहे. परिणामी रिझर्व्ह बँकेसह, अनेक प्रतिष्ठित संस्था व अर्थविश्लेषकांनी एकूणच भारताच्या विकासदर अंदाजात सुधारणा केली आहे, हे सर्व अनुकूल घटक भांडवली बाजारातील गुंतवणुकीला अधिक चालना देणाऱ्या आहेत.

पहिल्या स्थानी सध्या कोण?

अमेरिकेचा बाजार पहिल्या स्थानी भक्कम उभा आहे. सध्या अमेरिकी भांडवली बाजार ५०.८६ लाख कोटी डॉलर बाजारमूल्यासह पहिल्या स्थानी कायम आहे. त्याने सरलेल्या वर्षात २२.६१ टक्क्यांहून अधिक विस्तार साधला आहे. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज निर्देशांक वर्षभरात सुमारे १३ टक्क्यांनी वधारला. अमेरिकी बाजारानंतर चीन ८.४४ लाख कोटी डॉलरसह दुसऱ्या स्थानी आहे. चीनचे बाजारभांडवल सरलेल्या वर्षात सुमारे २ लाख कोटी डॉलरने घसरले आहे. तर जपान ६.३६ लाख कोटी डॉलरसह तिसऱ्या स्थानावर आहे. त्यापाठोपाठ चौथ्या स्थानी भारतीय बाजाराने झेप घेतली आहे. तर हाँगकाँग आणि फ्रान्स अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या स्थानावर घसरले आहेत.