रामसेतूच्या मुद्द्यावरून भारत आणि श्रीलंकेदरम्यान असणारी पाल्कची सामुद्रधुनी नेहमीच चर्चेत असते. सध्या हाच भाग निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा भलताच चर्चेत आला आहे. यावेळी १४ व्या शतकात ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे वर आलेले कच्चथीवू बेट केंद्रस्थानी आहे. स्वातत्र्यांनंतर भारत आणि श्रीलंका या दोन्ही देशांनी या बेटावर आपला मालकीहक्क सांगितला होता. अखेर १९७४ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी या बेटावरील श्रीलंकेचे सार्वभौमत्व मान्य केले. सध्या याच मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कलगीतुरा सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर या बेटावर ज्यांनी राज्य केले त्या राजघराण्याचा आणि प्रभू रामांचा नेमका संबंध काय होता? हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरावे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अधिक वाचा: विश्लेषण: रामायण एक अन्वयार्थ अनेक!

कच्चथीवू हे बेट भारताचेच…

कच्चथीवू हे बेट एकेकाळी रामनाड जमीनदारीचा भाग होते. रामनाथपुरम रियासतीची (किंवा रामनाड) स्थापना १६०५ साली मदुराईच्या नायक घराण्याने केली. या रियासतीच्या अधिपत्याखाली एकूण ६९ किनारी गावे आणि ११ बेटांचा समावेश होता, त्यातीलच कच्चथीवू हे एक होते. १६२२ आणि १६३५ च्या दरम्यान रामनाथपुरमचे सार्वभौम कूथन सेतुपती यांच्याकडे होते, त्यांच्या ताम्रपटात या बेटाचा संदर्भ येतो. आजच्या श्रीलंकेतील तलाईमन्नारपर्यंत (थलाईमन्नार) विस्तारलेल्या भूभागावर भारताची मालकी होती याची साक्ष हा लेख देतो. रामनाथपुरम रियासतीचाच कच्चथीवू हा एक महत्त्वपूर्ण उत्पन्नाचा स्रोत होता. १७६७ साली डच ईस्ट इंडिया कंपनीने मुथुरामलिंगा सेतुपती यांच्याकडून आणि नंतर १८२२ मध्ये, ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने रामास्वामी सेतुपती यांच्याकडून हे बेट भाड्याने घेतले होते.

रामनाड रियासत आणि रामाचा संबंध

रामनाड या शब्दाचा थेट संबंध रामेश्वरममधील रामनाथस्वामी मंदिराशी आहे. रामेश्वरमचा रामायणाच्या कथेशी असलेला संबंध सर्वश्रुत आहे. अध्यात्म रामायणानुसार श्रीरामाने लंकेला प्रस्थान करण्यापूर्वी याच किनाऱ्यावर शिवलिंगाची स्थापना केली होती, आणि इथेच रावण वधानंतर ब्रह्महत्येचे पापक्षालनही केले होते. शिवाय खुद्द श्रीरामाने रामेश्वरम बेटावर तीर्थक्षेत्राचे आणि भाविकांचे संरक्षण करण्यासाठी सेतुपतीही नेमले असा पौराणिक संदर्भ आहे. सेतुपती म्हणजे सेतूचे रक्षण करणारे. १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या रामनाथस्वामी मंदिराचा विस्तार पांड्य राजवंशाच्या कालखंडात झाला.

सेथुनाडूवर राज्य

प्रचलित कथेनुसार श्रीरामाच्या गुहा नावाच्या विश्वासू सेवकाने रामसेतुजवळ एक नगर वसवले होते. या नगराला मुगवईनगरम/ मुखवईनगरम असे म्हणत. हे नगर वैगई नदीच्या मुखाशी आहे. ब्रिटीश काळात मुगवईला ‘रामनाड’ असे संबोधण्यास सुरुवात झाली; हेच नाव स्वातंत्र्यानंतरही कायम राहिले. सेतुपती हे मरावर समाजाचे होते. याच मरावर समाजाच्या सेतुपतींनी १६०५ ते १७९५ या दोन शतकांच्या कालखंडात सेथुनाडूच्या क्षेत्रावर राज्य केले. यांनी दक्षिण भारताच्या सामाजिक-राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक इतिहासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

रामेश्वरम येथील बहुतांश मंदिरांचे बांधकाम १५ व्या ते १७ व्या शतकादरम्यान रामनाडच्या सेतुपती घराण्याने केले आहे. त्यांची बांधणी पंधराव्या ते सतराव्या शतकांमध्ये प्रामुख्याने झाली. यांनी देवस्थानच्या पूजे-अर्चेसाठी अग्रहार दिले असून पहिल्या पूजेचा मान या घराण्याकडे आहे. यासंदर्भातील अनेक शिलालेखही उपलब्ध आहेत. विख्यात पुरातत्त्वज्ञ जेम्स फर्ग्युसन यांनी या मंदिराचे वर्णन द्रविडीयन वास्तुशिल्पाचा अद्वितीय नमुना म्हणून केले आहे.

राज्याची सूत्रे

रामनाड आणि शिवगंगा हे प्रदेश मदुराईच्या नायक राज्याचे अविभाज्य भाग होते. विजयनगरचा कृष्णदेवराय याचा सेनापती व्यंकटप्पा नायक याने हे राज्य स्थापन केल्याचा संदर्भ इतिहासात सापडतो. १६ व्या शतकात, मदुराईच्या नायक शासकांनी अधिकृतपणे या प्रदेशातील पारंपारिक रामनाड सरदाराला मान्यता दिली, हा सरदार मरावर जातीचा होता. त्या बदल्यात त्याने सदाइक्का थेवर नायक राजाचे त्याच्या जमिनीवरील सार्वभौमत्व मान्य केले. १७ व्या शतकाच्या उत्तरार्धात मदुराईच्या नायक राजांची शक्ती कमी झाल्यावर रामनाडच्या सेतुपतींनी आपण स्वतंत्र असल्याचे घोषित केले.

अधिक वाचा: अंकुशपुराण : अस्सल महाराष्ट्रीय रामायण आहे तरी काय?

संगम ग्रंथांतील उल्लेख

पुराणनुरु आणि सिलप्पाधिकारम् यांसारख्या संगम ग्रंथांमध्ये मरावर समाजाचे असंख्य संदर्भ सापडतात. हा समाज मुख्यत्त्वे योद्धा वर्ग म्हणून ओळखला जातो. संगम साहित्यात मरावर समाजाचा उल्लेख योद्धा आणि सेनापती असा केला आहे. त्यांचा उल्लेख पलाई (वाळवंट, कोरड्या) जमिनीचे रहिवासी म्हणून येतो. हा या प्रदेशातील सर्वात जुना समुदाय आहे. सतराव्या शतकात रामनाडचे राजे दक्षिणेतील सार्वभौम लोकांमध्ये अत्यंत आदरणीय स्थानावर होते हे ऐतिहासिक सत्य आहे.

मुथुकृष्णप्पा नायक यांची भूमिका

मुथुकृष्णप्पा नायक यांनी १६०५ साली प्राचीन मरावर प्रदेशाचे पुनरुज्जीवन केले. रामनाडच्या सेतुपती घराण्याच्या पायाभरणीचे श्रेय त्यांना दिले जाते. या प्रदेशातील गुन्हेगारी हटवून, रामेश्वरमला जाणाऱ्या यात्रेकरूंना चोर आणि डाकूंपासून संरक्षण देण्याच्या अटीवर राज्य देण्यात आले होते. अशाप्रकारे मरावर सरदार प्रचलित सरंजामशाही रचनेत विलीन झाले. त्यांना युद्धकाळातील योगदानाच्या अटीवर जमिनीचे हक्क देण्यात आले. रामेश्वरमला भेट देणाऱ्या यात्रेकरूंना संरक्षण देण्याव्यतिरिक्त दोन सेतुपतींनी रामेश्वरम येथील रामनाथस्वामी मंदिरात धार्मिक सेवा देखील केली. १७ व्या शतकाच्या उत्तरार्धात रघुनाथ किळावन सेतुपतीने स्वतःला रामनाडचा राजा म्हणून राज्याभिषेक केला आणि त्याने आपले स्थान पोगलूर येथून पूर्व किनाऱ्याजवळील रामनाड येथे हलवले. आपल्या राजधानीचे रक्षण करण्यासाठी मोठ्या तटबंदी उभारल्या. एकुणातच या घराण्याने रामेश्वरम आणि त्या सभोवतालच्या प्रदेशाच्या रक्षणासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The history of katchatheevu island which was taken over by sri lanka during the time of the congress what is the exact relationship between the kings who ruled this island and lord rama svs
First published on: 05-04-2024 at 08:15 IST