आजपासून तब्बल ४००० वर्षांपूर्वी आजच्या अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारत यांचा समावेश असलेल्या विस्तृत भूभागावर एका संस्कृतीने जन्म घेतला होता. या संस्कृतीतील लोक भाजलेल्या विटांच्या घरात रहात होते. त्यांच्या घरात धान्याची मोठी कोठारे होती. त्यांच्या भाषेचा शोध अद्याप लागलेला नसला तरी ते चित्र-चिन्ह लिपीचा वापर करत असल्याचे अभ्यासक मानतात. इतकेच नाही तर त्यांनी वापरलेले दागिने, वजनं ही त्यांच्या प्रगतीची साक्ष देतात. ही संस्कृती मेसोपोटेमिया, इजिप्त यांसारख्या इतर महान संस्कृतींना समकालीन होती. याच भारतीय संस्कृतीची ओळख हडप्पा, सिंधू किंवा सरस्वती अशी आहे. या संस्कृतीचा इतिहास जितका प्रभावी आहे, तितकेच तिचे अस्तित्त्व आजच्या राजकारणातही महत्त्वाचे मानले जाते. तिच्या अस्तित्त्वाने तिने आधुनिक राजकारणातील एका विचारधारेला टक्कर दिली आहे. सिंधू संस्कृती १९ व्या शतकाच्या पूर्वार्धात उघडकीस आलेली असली तरी २०१९ साली झालेल्या राखीगढी उत्खननात सापडलेल्या मानवी हाडांच्या डीएनए चाचणीने इतिहासबदलाचे काम केले आहे. त्यामुळे प्रचलित इतिहास पुसला जाऊन एक नवीन इतिहास लिहिला गेला आहे. गेल्याच आठवड्यात एनसीईआरटीने इयत्ता १२ वी च्या इतिहास या विषयाच्या अभ्यासक्रमात हा नवा बदल केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर जुना आणि नवा इतिहास यांच्यातील नेमका संघर्ष काय? हे जाणून घेणे समयोचित ठरणारे आहे.

अधिक वाचा: प्राचीन भारताची सिंधू संस्कृती निरक्षर होती का?

अभ्यासक्रमात नेमका बदल काय करण्यात आला?

हडप्पा संस्कृती हे भारतातील पहिले नागरिकरण मानले जाते. उत्तम नगर रचना, सांडपाण्याची व्यवस्था यांसारखी वैशिष्ट्ये या संस्कृतीची प्रगल्भता दर्शवतात, त्यामुळे भारताच्या इतिहासात तब्बल ४००० वर्षांपूर्वी नांदणाऱ्या समृद्धीची प्रचिती येते. परंतु ऐतिहासिकदृष्ट्या या संस्कृतीची भूमी तत्कालीन भारत असला तरी या संस्कृतीचे शिल्पकार हे भारताबाहेरून येऊन भारतात स्थायिक झाल्याचे इतिहासात नोंदविण्यात आले होते. २०१९ साली आलेल्या उत्खननात जे मानवी सांगाडे सापडले, त्यांची डीएनए चाचणी करण्यात आली. या चाचणीनंतर हडप्पाकालीन लोक भारताबाहेरून आलेले नसून, याच भूमीतील असल्याचे सिद्ध झाले. आणि हेच नवीन अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आले आहे.

आर्य सिद्धांताला छेद

राखीगढी येथे सापडलेल्या मानवी हाडांच्या डीएनएच्या अभ्यासातून हडप्पाकालीन संस्कृतीची आनुवांशिक मुळे इसवी सन पूर्व १०,००० वर्षांपर्यंत मागे जातात. हडप्पाकालीन लोकांचे डीएनए आजतागायत एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होत आहेत आणि दक्षिण आशियातील बहुसंख्य लोकसंख्या ही त्यांचीच वंशज असल्याचे दिसून येते. आनुवांशिक तसेच आजपर्यंत सांस्कृतिक इतिहासात कोणताही खंड पडलेला नाही, असे सांगणारे हे संशोधन आर्य स्थलांतराच्या सिद्धांताला छेद देणारे आहे. याचाच नवीन अभ्यासक्रमात समावेश करण्यात आलेला आहे.

हडप्पा आणि वैदिक एकच

हे संशोधन एका विशिष्ट गटाच्या इतिहासकार आणि विचारवंतांच्या बाजूचे असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या संशोधनात केलेल्या युक्तिवादाप्रमाणे भारत ही बारमाही परंपरा असलेली एक प्राचीन संस्कृती आहे, परकीय आक्रमणकर्त्यांनी या संस्कृतीच्या मुळावर आघात केला, परंतु हा युक्तिवाद कितपत बरोबर आहे हेही जाणून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. सेल आणि सायन्स या दोन्ही संशोधनपर नियतकालिकांमध्ये या विषयावरील संशोधनाची विस्तृत माहिती देण्यात आली आहे. डॉ. वसंत शिंदे हे या संशोधनातील एक प्रमुख होते. त्यांनी नमूद केल्याप्रमाणे आर्य स्थलांतरणाचा सिद्धांत या नवीन संशोधनामुळे खोडून टाकण्यात आला आहे. या संशोधनातून दक्षिण आशियातील स्थानिक लोकांनीच हडप्पा संस्कृती विकसित केली, आणि तेच वैदिकजन असल्याचेही सिद्ध होते असे त्यांनी साप्ताहिक ‘लोकप्रभा’ला दिलेल्या मुलाखतीत नमूद केले होते. इतिहासकार आणि पुरातत्त्व अभ्यासकांच्या मोठ्या गटाने या सिद्धांताला विरोध दर्शवला आहे. असे असले तरी प्राचीन भारतीय ही संकल्पना प्रधान मानणाऱ्या मोठ्या गटाकडून त्यांना पाठिंबा मिळत आहे. असे असले तरी अनेक संशोधकांनी याविषयावर सखोल संशोधनाची गरज असल्याचेही म्हटले आहे.

अधिक वाचा: सिंधू लिपी नवीन संशोधनावरून पुन्हा खळबळ का? खरंच आहे का ही लिपी भारतीयांच्या लेखनकलेचा आद्यपुरावा?

इंग्रज आणि आर्य स्थलांतर सिद्धांत

मूळ भारतीय कोण हा प्रश्न इंग्रजांच्या आगमनानंतर अधिक जटील झाल्याचे दिसते. जर्मन तज्ज्ञ मॅक्सम्युलरने मध्य आशिया ही आर्यांची मूळ भूमी असल्याचे म्हटले आहे. मध्य आशियातील एका उंच टेकडीवर आर्यांचे स्थान होते आणि त्यांची भाषा संस्कृत किंवा ग्रीक नसून इंडो-युरोपियन भाषांचे मूळ ज्या भाषेत होते त्यातील एक भाषा होती. उत्तरेकडील ज्या आर्यांनी युरोपमध्ये स्थलांतर केले, असे म्हटले जाते त्यांचे वर्णन मॅक्सम्युलर यांनी सक्रिय आणि लढाऊ असे केले आणि त्यांनी राष्ट्राची कल्पना विकसित केली, तर दक्षिणेकडील आर्य जे इराण आणि भारतात स्थलांतरित झाले. ते सहनशील आणि ध्यानी होते, धर्म आणि तत्त्वज्ञानाशी संबंधित होते, असे म्हटले.

प्रसिद्ध इतिहासकार रोमिला थापर यांनी ‘द थिअरी ऑफ आर्यन रेस अँड इंडिया: हिस्ट्री अ‍ॅण्ड पॉलिटिक्स, १९९६’ या लेखात याबद्दल सविस्तर लिहिलेले आहे. मॅक्सम्युलरने (१८८३) राममोहन रॉय यांचे वर्णन आर्य वंशाच्या दक्षिण-पूर्व शाखेतील आर्य असा केला आहे, तर बंगाली भाषेचा उल्लेख आर्य भाषा असा केला आहे. याच सिद्धांताला अनुसरून ज्योतिबा फुले यांनी आर्यांचा उल्लेख आक्रमणकर्ते आणि आदिवासी तसेच निम्नवर्गीय जातींचा उल्लेख मूळ रहिवासी म्हणून केलेला आहे. बाळ गंगाधर टिळकांनी देखील हिमनदीपूर्व कालखंडात उत्तर ध्रुव हे आर्यांचे वसतिस्थान असल्याचे म्हटले आहे. परंतु हिंदू विचारसरणीच्या गटाककडून आर्य मूळ भारतातलेच होते असे मत मांडले गेले. ‘बंच ऑफ थॉट्स’मध्ये रा. स्व. संघाचे दुसरे सरसंघचालक एम. एस. गोळवलकर यांनी ब्रिटिशांनी इतिहासाचे विकृतीकरण केल्याचा ठपका ठेवला आणि इंग्रजांनी आर्य- द्रविड सिद्धांत मांडून फूट फाडल्याचे अधोरेखित केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इतिहास बदलत आहे

राखीगढीतील डीएनए चाचणीने स्वदेशी आणि अखंड भारतीय संस्कृतीच्या या सिद्धांताला बळकटी मिळाली. केवळ राखीगढीच नाही तर नव्याने उघडकीस येणारी अनेक पुरातत्त्वीय- ऐतिहासिक स्थळे प्रचलित इतिहासाला आव्हान देत आहेत. २०१५ मध्ये चेन्नईपासून सुमारे ५०० किलोमीटर अंतरावर असलेल्या कीलाडी गावात उत्खनन सुरू झाले, या स्थळावर सापडलेल्या अवशेषांचा कालखंड इसवी सन पूर्व ५८० आहे, यावरूनच केवळ उत्तर भारतातच नाही तर दक्षिण भारतातही दुसरे नागरीकरण अस्तित्त्वात होते हे सिद्ध होण्यास मदत होत आहे. एकूणात या नव्या उत्खनन आणि संशोधनांमधून येणाऱ्या काळात भारताचा प्राचीन इतिहास बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.