निमा पाटील

जागतिक व्यापाराची ८० टक्के मालवाहतूक ज्या पनामा कालव्यातून होते, तिथे आता २०० पेक्षा जास्त मालवाहतूक जहाजे खोळंबली आहेत. यामुळे मोठमोठ्या मालवाहतूक कंपन्या हैराण झाल्या आहेत. वाहतूक खोळंबल्यामुळे त्यांना थेट आर्थिक फटका बसत आहे. ही परिस्थिती का उद्भवली आणि त्याचा जागतिक व्यापारावर काय परिणाम होईल त्याचा हा आढावा.

पनामा कालव्याची सद्य:स्थिती काय आहे?

पनामा कालव्याच्या दोन्ही बाजूंना २०० पेक्षा जास्त जहाजे अडकून पडली आहेत. जागतिक मालवाहतूक व्यापाराचा ८० टक्के वाटा उचलणाऱ्या या कालव्यातील ही आतापर्यंतची सर्वात वाईट वाहतूक कोंडी आहे. या अभूतपूर्व स्थितीमुळे अनेकांना २०२१ च्या सुवेज कालवा सहा दिवसांसाठी बंद पडल्याच्या घटनेची आठवण येत आहे. नैसर्गिक आव्हाने, हवामान बदल आणि कामकाजाच्या पद्धतीशी जुळवून घेण्यासाठी केलेले बदल या सर्वांचा एकत्र परिणाम म्हणून पनामाची ही अभूतपूर्व कोंडी झाली आहे असे म्हणता येईल.

ही स्थिती कशामुळे उद्भवली?

पनामामधील ऐतिहासिक दुष्काळ, समुद्राच्या पाण्याचे वाढते तापमान याचा फटका पनामा कालव्यातून होणाऱ्या वाहतुकीला बसला आहे. पनामा येथे यंदा तीव्र दुष्काळ पडल्यामुळे कालव्याचा जलस्तर घसरला आहे. कालव्याच्या पाण्याचे संवर्धन करण्यासाठी पनामा कालव्याच्या व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी कठोर उपाययोजना केली आहे. त्यानुसार, जहाजांवरील मालाची वजनमर्यादा कमी करण्यात आली आहे, तसेच जहाजांच्या फेऱ्यांची संख्या ३६ वरून ३२ इतकी कमी केली आहे. त्यामुळे मालवाहतूक खोळंबली आहे. नवीन नियमांमुळे जहाजमालकांसमोर वाहतुकीच्या मालाचे वजन कमी करणे अथवा हजारो मैलांचा प्रवास वाढवणारा पर्यायी मार्ग निवडणे किंवा वाट पाहणे असे तीन पर्याय उपलब्ध आहेत. काही जहाजांसाठी प्रतीक्षेचा कालावधी २१ दिवसांपर्यंत असू शकतो.

या परिस्थितीचा काय परिणाम होत आहे?

मालवाहतुकीला होणाऱ्या विलंबाचे परिणाम संपूर्ण जगावर पडणार आहेत. तेल आणि नैसर्गिक वायू यांच्या वाहतुकीसाठी पनामा कालवा हा एक प्रमुख मार्ग आहे. त्यांची वाहतूक थांबल्यास किंवा त्याला उशीर झाल्यास इंधनाचे जागतिक दर वाढू शकतात. त्याचा सर्वाधिक फटका अविकसित आणि विकसनशील देशांना बसू शकतो. त्याबरोबरच मालवाहतूक करणाऱ्या कंपन्यांनाही आर्थिक भुर्दंड बसू शकतो. मालवाहतुकीला एका दिवसाचा उशीर झाल्यास, प्रत्येक जहाजाचा खर्च जवळपास दोन लाख डॉलरने वाढत आहे. यामुळे अमेरिका आणि चीनच्या जहाजांच्या मालवाहतुकीचा खर्च जवळपास ३६ टक्क्यांनी वाढला आहे, असे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले. खुद्द वाहतुकीत अडकलेल्या जहाजांसमोर उद्भवलेल्या समस्या वेगळ्या आहेत. जहाजांना होणारा अन्न आणि पाण्याचा पुरवठा कमी होत आहे. हा पुरवठा पूर्णपणे आटला तर त्यामुळे त्यावरील कर्मचाऱ्यांसाठी गंभीर परिस्थिती होऊ शकते.

समस्या सोडवण्यासाठी कोणते प्रयत्न केले जात आहेत?

या आव्हानांची गुंतागुंत आणि व्यापकता पाहता, पनामा कालव्याचे व्यवस्थापन निरनिराळ्या उपाययोजनांचा विचार करत आहे. पनामा कालव्याचा पाणीपुरवठा वाढवण्यासाठी नवीन जलसाठा बांधण्यासारख्या पर्यायांचा गांभीर्याने विचार केला जात आहे. त्याच्या जोडीला, वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी काही विशिष्ट जहाजांचा मार्ग बदलणे आणि अत्यावश्यक मालाच्या वाहतुकीला प्राधान्य देणे असे पर्याय वापरले जात आहेत. यापैकी नवीन जलसाठ्याची व्यवस्था करणे हा उपाय तातडीने अमलात आणण्यासारखा नाही. त्याला काही वेळ लागेल. त्याशिवाय पुढील वर्षीही पनामा येथे दुष्काळ पडेल, असा इशारा हवामानतज्ज्ञांनी दिला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुष्काळाचा जागतिक मालवाहतुकीवर काय परिणाम होईल?

सर्व जहाजे दीर्घकाळ प्रतीक्षा करू शकत नाहीत. त्यांच्यासमोर लांबचा मार्ग निवडण्याचा पर्याय आहे. मात्र त्यामुळे इंधनाचा खर्च आणि कार्बन वायू उत्सर्जन दोन्ही वाढतील. त्याशिवाय मालाचे वितरण उशिरा होईल. परिणामी जगभरात गृहोपयोगी आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढतील. याचा फटका जागतिक व्यवसाय आणि ग्राहक या दोघांनाही बसेल. पनामा आणि सुवेज हे दोन्ही कालवे जागतिक मालवाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत. दोन वर्षांपूर्वी सुवेज कालव्यात एक जहाज अडकून ते सहा दिवस बंद पडल्यामुळे समस्या उद्भवली होती. आता पनामा कालव्याचे पाणी कमी होत असल्यामुळे तेथील वाहतूक अडली आहे. पुढील वर्षीही ही परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे पर्यायी व्यापार मार्गांचा गांभीर्याने विचार करावा लागणार आहे.