गेल्या काही दिवसांपासून इराण-इस्रायल संघर्ष सुरू होता. आता अमेरिकेने मध्यस्थी करत युद्धविरामाची घोषणा केल्याने हा संघर्ष काहीसा निवळल्याचे पाहायला मिळत आहे. इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असणाऱ्या युद्धात अमेरिकेने उडी घेतल्याने तणाव आणखी वाढेल अशी चिन्हे होती. अमेरिकेने इराणमधील तीन आण्विक केंद्रांवर भीषण हल्ला करत हे तळ उद्ध्वस्त केल्याचा दावा केला होता. या हल्ल्यात इराणमधील तीन आण्विक केंद्र नष्ट करण्यात आल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले होते.
मात्र, याबाबत अमेरिकेची गुप्तचर संस्था म्हणजेच अमेरिकेच्या डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सी अर्थात डीआयएने सादर केलेल्या अहवालात वेगळाच दावा करण्यात आला आहे. त्यामुळे नक्की कोण खरं बोलत आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे. इराणवरील हल्ल्याबाबत डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले होते? अमेरिकन गुप्तचर संस्थेच्या अहवालात काय? इराणने याबाबत काय म्हटले? त्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.

इराणवरील हल्ल्यावर डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले होते?
अमेरिकेच्या वायूदलाने इराणमध्ये हवाई हल्ले करून फोर्डो, नतान्झ व इस्फहानमधील तीन अणू केंद्रांना लक्ष्य केले होते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्यात सर्व अणुकेंद्रे उद्ध्वस्त झाल्याचा दावा केला होता. त्यांनी त्यांच्या ट्रूथ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, “आम्ही इराणधील फोर्डो, नतान्झ व इस्फहानमधील अणू प्रकल्पांवर यशस्वी हल्ले केले आहेत. एअर स्ट्राइक करून सर्व लढाऊ विमाने इराणच्या हवाई हद्दीबाहेर आली आहेत. यावेळी फोर्डो येथील अणू प्रकल्पाचं सर्वाधिक नुकसान झाले आहे.” ते पुढे म्हणाले होते, “आमच्या महान अमेरिकन योद्ध्यांचे अभिनंदन! जगात असे दुसरे कोणतेही सैन्य करू शकले नाही ते यांनी केले. आता शांततेची वेळ आली आहे,” असेही त्यांनी म्हटले होते.
डिफेन्स इंटेलिजेंस एजन्सीने काय म्हटले?
- पेंटागॉनची गुप्तचर शाखा असलेल्या डिफेन्स इंटेलिजेंस एजन्सीने या युद्धातील नुकसानीचा आढावा असलेला एक अहवाल सादर केला.
- तीन महत्त्वाच्या आण्विक केंद्रांना अमेरिकेने लक्ष्य केल्यानंतर या केंद्रांचे किती नुकसान झाले, याचा आढावा असलेला हा अहवाल आहे.
- त्यांनी या अहवालात वेगळाच दावा केल्याने, ट्रम्प यांच्या दाव्यांवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
- डिफेन्स इंटेलिजेंस एजन्सीला आढळले की, इराणचा समृद्ध युरेनियमचा साठा तसेच त्याचे सेंट्रीफ्यूजही शाबूत आहे, त्यांचे कोणतेही नुकसान झालेले नाही.
- या आढाव्यात असे दिसून आले की, अमेरिकेच्या हल्ल्यांपूर्वी ४०० किलोग्रॅम समृद्ध युरेनियम आधीच या ठिकाणांवरून हलवण्यात आले होते. हे युरेनियम १० आण्विक शस्त्रे तयार करण्यासाठी पुरेसे आहेत.
फोर्डोवरील हवाई हल्ल्याच्या काही दिवस आधी १६ ट्रक रांगेत उभे असल्याचे उपग्रह प्रतिमांमध्ये दिसून आले आहे. त्यावरून असा अंदाज वर्तविण्यात आला आहे की, इराणने त्यांचे युरेनियम साठे त्या ठिकाणावरून आधीच हलविले होते. या आढाव्यात असेही सांगण्यात आले की, आण्विक केंद्रावरील कोणत्याही मूलभूत बाबींना धक्का बसलेला नाही आणि हल्ल्याच्या नुकसानामुळे हा आण्विक कार्यक्रम केवळ काही महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आला आहे. डिफेन्स इंटेलिजेंस एजन्सीने एकार्थी इराणचे अणुकेंद्रे पूर्णपणे नष्ट केल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा खोटा ठरवला आहे.
याबाबत अमेरिकन सरकारचे म्हणणे काय?
अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी ‘एबीसी न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, ट्रम्प प्रशासन गायब झालेल्या समृद्ध युरेनियमबाबत इराणशी चर्चा करेल. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी सीएनएन, न्यूयॉर्क टाईम्स आणि एमएसएनबीसीसारख्या आंतरराष्ट्रीय माध्यम समूहांवर टीका केली आहे आणि त्यांच्यावर इराणी अणु केंद्रांवर अमेरिकेच्या हल्ल्याच्या यशाला कमी लेखल्याचा आरोप केला आहे. व्हाईट हाऊसने गुप्तचर संस्थेने घेतलेल्या अढाव्यातील माहितीचे मूल्यांकन मान्य केले, परंतु त्यांच्याशी असहमती दर्शवली. व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या कॅरोलिन लीविट यांनी सांगितले की, हा आढावा पूर्णपणे चुकीचा होता. अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी राष्ट्राध्यक्षांच्या भूमिकेचे समर्थन केले आणि म्हटले की, हल्ल्याच्या तीव्रतेला कमी लेखणे हा राष्ट्राध्यक्ष आणि मोहिमेच्या यशाला कमी लेखण्याचा प्रयत्न आहे. असे असले तरी, गुप्तचर संस्था आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात या मुद्दयावरून अजूनही मतभेद आहेत.
इराणने युरेनियमचे स्थान बदलले का?
संयुक्त राष्ट्रांच्या अणुऊर्जा निरीक्षक संस्थेने १३ जून नंतर त्यांची पडताळणी स्थगित केली आणि त्यामुळे त्यांना युरेनियमच्या स्थानाबद्दल स्पष्ट माहिती नाही. विश्लेषकांचे म्हणणे आहे की, इराण पूर्वीपासून युरेनियमची जागा बदलत आला आहे. अमेरिकन गुप्तचर संस्थांनी असाही निष्कर्ष काढला आहे की, इराण युरेनियम समृद्ध करत असला तरी त्याने अणुबॉम्ब तयार केलेले नाहीत, त्यामुळे इराणच्या समृद्धीकरण कार्यक्रम आणि प्रत्यक्ष शस्त्र विकसित करणे यावर वादविवाद सुरू आहेत. इराणने संयुक्त राष्ट्रांच्या अणुऊर्जा निरीक्षक संस्थेला सहकार्य करण्यास नकार दिला आहे आणि अणुप्रसार करारातून बाहेर पडण्याचेही संकेत दिले आहेत; त्यामुळे इराणच्या या भूमिकेला आण्विक शस्त्र विकसित करण्याची भूमिका म्हणून पाहिले जात आहे.
आण्विक केंद्रांवरील हल्ल्यावर इराणने काय म्हटले?
सुरुवातीला आण्विक केंद्रांवर हल्ला करण्यात आल्याचा दावा इराणने फेटाळून लावला होता. मात्र, आता इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माइल बागाई यांनी याबाबत पुष्टी केली आहे. त्यांनी म्हटले की, “आमच्या अणुस्थळांचे खूप मोठे नुकसान झाले हे निश्चित आहे,” मात्र इराणच्या अणुकेंद्राच्या नुकसानाबाबत किंवा स्थितीबाबत अधिक तपशील देण्यास इस्माइल बागाई यांनी नकार दिला.