Trump nominates Sergio Gor: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्जिओ गोर यांना भारतातील अमेरिकेचे राजदूत म्हणून नियुक्त केले आहे. सर्जिओ हे दक्षिण आणि मध्य आशियासाठी अमेरिकेचे विशेष दूत म्हणूनही भूमिका बजावणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून या निर्णयाची माहिती दिली आहे. ३८ वर्षीय सर्जिओ हे ट्रम्प यांचे निकटवर्तीय मानले जातात. व्हाईट हाउसमध्येही त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. भारतासोबत अमेरिकेचे संबंध ताणलेले असताना सर्जिओ गोर यांच्या नियुक्तीचा निर्णय घेण्यात आला आहे. जो बायडन यांच्या काळातील राजदूत एरिक गार्सेटी यांनी जानेवारीत भारतीय राजदूत पदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद जवळपास आठ महिने रिकामे होते.

कोण आहेत सर्जिओ गोर?

सर्जिओ गोर हे दीर्घकाळापासून ट्रम्प प्रशासनात कार्यरत आहेत. सध्या ते ट्रम्प प्रशासनात नवीन नियुक्त्या करण्याआधी नेमल्या जाणाऱ्या व्यक्तीची ट्रम्प यांच्याप्रति निष्ठा तपासण्यासाठी म्हणून ते ओळखले जातात. ‘स्पेस एक्स’चे संस्थापक एलॉन मस्क यांनी गोर यांना एकदा साप, असे संबोधले होते. कारण- नासाच्या प्रशासकपदासाठीचे उमेदवार जॅरेड आयझॅकमॅन यांची निवड गोर यांच्यामुळे थांबली होती. मस्क यांनीच जॅरेड यांचं नाव सुचवलं होतं. जॅरेड यांच्या निवडीसाठी गोर यांनी तयार केलेल्या फाईलमध्ये जॅरेड यांनी ट्रम्प विरोधक असलेल्या डेमोक्रॅटसना दिलेल्या देणग्यांचा तपशील त्यात होता. साहजिकच त्यामुळे त्यांची निवड झाली नाही. अमेरिकतील माध्यमांच्या माहितीनुसार, गोर यांचा जन्म उझबेकिस्तानमध्ये ताश्कंद इथे झाला. त्यांचे मूळ आडनाव गोरोक्होव्हस्की होते आणि त्यानंतर त्यांनी ते गोर असे केले. वयाच्या १२ व्या वर्षी गोर त्यांच्या पालकांसह ते अमेरिकेत आले. त्यांचे बालपण अमेरिकेतली माल्टा येथे गेले.

सर्जिओ गोर यांच्या नियुक्तीतील खास गोष्टी काय आहेत?

भारताचे राजदूत म्हणून गोर यांची नियुक्ती करण्यात आली आहे; तर दक्षिण आणि मध्य आशियाई घडामोडींसाठी विशेष दूत म्हणूनही त्यांची नेमणूक झाली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या संकेतस्थळानुसार हा ब्युरो अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, भारत, कझाकिस्तान, कर्गिझस्तान, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका, ताझिकिस्तान, तर्कमेनिस्तान व उझबेकिस्तान या देशांबरोबरच्या अमेरिकन परराष्ट्र धोरण आणि संबंधांचे निरीक्षण करते. या दोन्ही पदांवर एकाच व्यक्तीची नियुक्ती हा अपवाद आहे आणि याचा भारतासाठी नेमका काय अर्थ आहे हे जाणून घेऊ…

सर्जिओ गोर नवी दिल्लीत कधी येऊ शकतात?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष औपचारिकरीत्या राजदूत पदाच्या उमेदवाराचे नाव सिनेटसमोर मांडले जाते. सिनेटची परराष्ट्र संबंध समिती त्या नामांकनाचा आढावा घेईल आणि त्यानंतर त्यावर सुनावणी होऊ शकते. समितीने मान्यता दिल्यानंतर पूर्ण सिनेटमध्ये मतदान होते. सिनेटच्या मंजुरीनंतरच या पदासाठीची नियुक्ती अधिकृत ठरते.

भारतासाठी याचा काय अर्थ आहे?

ट्रम्प यांनी याबाबत त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर लिहिले, “जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या प्रदेशासाठी माझ्या अजेंड्याची अंमलबजावणी करण्यासाठी आणि आम्हाला मेक अमेरिका ग्रेट अगेन साध्य करण्यात मदत करण्यासाठी माझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवता येईल अशी व्यक्ती असणे गरजेचे आहे.” भारताचा रशियासोबतचा व्यापार आणि अमेरिकन आयातीसाठी कृषी क्षेत्र न उघडल्यामुळे ट्रम्प नाराज आहेत. त्यामुळे गोर यांच्या उमेदवारीमागे त्यांचा नेमका हेतू काय असेल हे अद्याप स्पष्ट नाही.
भारतप्रेमी मानले जाणारे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांनी एक्सवर लिहिले की, सर्जिओ गोर यांच्या भारतातील पुढील राजदूत म्हणून नियुक्तीबाबत मला आनंद आहे. अमेरिका आणि भारत यांच्यातील सर्वांत महत्त्वाच्या अशा संबंधांमध्ये गोर हे एक महत्त्वपूर्ण व्यक्ती ठरतील.”

पॉलिटिको या अमेरिकन न्यूज वेबसाइटने सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सांगितले की, ट्रम्प अशा व्यक्तीला भारतात पाठवीत आहेत, जी त्यांच्या फार जवळची आहे असा संदेश राष्ट्राध्यक्ष मोदी सरकारला देत आहेत. राजदूतांच्या नियुक्तीत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचाच शब्द अंतिम असतो यावर गोर यांच्या निवडीने शिक्कामोर्तब केलं आहे. त्यावर ट्रम्प यांचे माजी वरिष्ठ सल्लागार स्टीव्ह बॅन यांनीही मत व्यक्त केले आहे की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी गोर यांचे व्यक्तिगत संबंध आहेत. भारतीय धोरणाविषयक मुद्द्यांचे सखोल ज्ञान आहे का, तर नाही. पण ते लगेचच शिकून घेणाऱ्यांपैकी आहेत. गोर हे ट्रम्प यांचे विश्वासू शिलेदार मानले जातात. गोर हे प्रामाणिकपणे काम करतात, असा ट्रम्प यांचा विश्वास आहे.

सर्जिओ यांच्यासमोरील आव्हाने

सर्जिओ हे ट्रम्प यांचे निकटवर्तीय असले तरी भारत आणि अमेरिकेतली तणावमुक्त परिस्थिती ते कसे हाताळतात हे त्यांच्यापुढचे आव्हान असणार आहे. ट्रम्प यांचा अमेरिका फर्स्ट अजेंडा गोर पुढे नेतील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.