Thiruvananthapuram Airport Fighter Jet : केरळमध्ये मागील पाच आठवड्यांपासून अडकून पडलेलं ब्रिटनचं अत्याधुनिक लढाऊ विमान अखेर उड्डाणासाठी सज्ज झालं आहे. स्टेल्थ श्रेणीतील ‘एफ-३५ बी लाइटनिंग II’ हे विमान मंगळवारी २२ जुलैला तिरुवनंतपुरममधून उड्डाण करणार आहे. ब्रिटिश रॉयल नेव्हीच्या ताफ्यातील या लढाऊ विमानामध्ये उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे जूनच्या मध्यात ते तिरुवनंतपुरम येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवण्यात आलं होतं. तेव्हापासून तांत्रिक कारणांमुळं हे विमान तिथेच अडकून पडलं होतं. इतका काळ विमान एका जागी उभं असल्यामुळे ते पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी होत होती. काहींनी समाजमाध्यमांवर त्या संदर्भात विनोदही केले. दरम्यान, या विमानाची दुरुस्ती नेमकी कशी करण्यात आली? त्याच्या पार्किंगसाठी ब्रिटिश सरकारला दिवसाला किती खर्च आला? त्या संदर्भात घेतलेला हा आढावा…
कोणत्याही आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवासी विमानांसाठी पार्किंगची सुविधा केलेली असते. मात्र, लढाऊ विमानाला पार्किंगमध्ये विशेष सुरक्षा व तांत्रिक सेवेची गरज असते. या सर्वांचा खर्च लक्षात घेतला, तर त्याची रक्कम लाखोंच्या घरात पोहोचू शकते. केरळसाठी ही घटना उत्सुकतेचा विषय ठरली असली तरी ब्रिटिश संरक्षण यंत्रणेसाठी ही एक अपवादात्मक गोष्ट आहे. आता हे विमान सुरक्षितपणे परतीच्या मार्गावर निघणार असल्यानं विमानतळावरील प्रवाशांचं आकर्षण संपणार आहे.
ब्रिटिश लढाऊ विमान केरळमध्ये का अडकलं होतं?
ब्रिटिश रॉयल नेव्हीच्या ताफ्यातील या अत्याधुनिक स्टेल्थ लढाऊ विमानानं १४ जूनच्या रात्री तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग केलं होतं. लॉकहीड मार्टिन या कंपनीनं तयार केलेल्या या विमानाची किंमत तब्बल ११ कोटी डॉलर्स (सुमारे ९२० कोटी रुपये) पेक्षा जास्त आहे. संरक्षण अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, केरळच्या किनाऱ्यापासून सुमारे १०० नॉटिकल मैल दूर असताना इंधन कमी झाल्यानं व खराब हवामामुळे हे विमान अडचणीत सापडलं होतं. त्यावेळी वैमानिकानं तिरुवनंतपुरममधील नागरी विमानतळावर उतरायची परवानगी मागितली होती.
आणखी वाचा : Woman Married to Two Brothers : तरुणीने केलं दोन भावांशी लग्न; बहुपत्नीत्वाला कायदेशीर मान्यता आहे का?
भारतीय हवाई दलानं या लढाऊ विमानात इंधन भरण्यास मदत केली. मात्र, परतीच्या प्रयत्नात असताना त्याच्या हायड्रॉलिक सिस्टीममध्ये बिघाड झाला. त्यानंतर अनेकदा विमानाच्या दुरुस्तीचे प्रयत्न झाले; पण त्यात अपयश आल्यानं त्याला आंतरराष्ट्रीय विमानतळावर उभं करण्यात आलं. तसेच या विमानाच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्रीय सुरक्षा दलाकडे (CISF) देण्यात आली. दरम्यान, केरळमध्ये पावसाचं प्रमाण लक्षात घेता, भारत सरकारनं हे विमान हँगरमध्ये किंवा तात्पुरत्या शेडमध्ये हलवण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, सुरुवातीला ब्रिटननं तो प्रस्ताव नाकारला होता. अशा विविध कारणांमुळे हे महागडं व आधुनिक लढाऊ विमान तब्बल पाच आठवडे केरळमध्येच अडकून पडलं.
लढाऊ विमानाची अखेर दुरुस्ती कशी झाली?
या लढाऊ विमानामध्ये झालेला तांत्रिक बिघाड तपासण्यासाठी, तसेच त्याच्या दुरुस्तीसाठी २४ जुलैला ब्रिटनमधून २४ सदस्यांचं पथक केरळमध्ये दाखल झालं. या पथकात १४ तांत्रिक तज्ज्ञ व १० क्रू सदस्य होते. त्यांनी विमान एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी हलवण्यासाठी आणि दुरुस्तीसाठी लागणारी खास उपकरणं सोबत आणली होती. ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयानं सांगितलं की, एफ-३५ बी लढाऊ विमानाची तपासणी आणि दुरुस्ती करण्यासाठी आम्ही १४ अभियंत्यांची टीम तिरुवनंतपुरम विमानतळावर पाठवली आहे. या तज्ज्ञ पथकाच्या आगमनानंतर विमानाला एअर इंडियाच्या देखभाल दुरुस्ती केंद्रात नेण्यात आलं आहे.
गोपनीयतेत व कडक सुरक्षेत दुरुस्तीचं काम पूर्ण
मातृभूमी या वृत्तपत्राच्या माहितीनुसार, दुरुस्तीचं संपूर्ण काम अत्यंत गोपनीयतेत व कडक सुरक्षा व्यवस्थेत करण्यात आलं. एअर इंडियाच्या दुरुस्ती केंद्रात या विमानातील तांत्रिक बिघाड दूर करण्यात आला. यावेळी ब्रिटिश लष्करी अधिकाऱ्यांनी स्वतः विमानाची सुरक्षा सांभाळली. द हिंदूच्या वृत्तानुसार, या लढाऊ विमानाच्या ‘ऑक्झिलरी पॉवर युनिट’मध्ये (सहायक ऊर्जा प्रणाली) गंभीर बिघाड झाला होता. त्यासाठी तांत्रिक तज्ज्ञांची गरज होती. दुरुस्तीचं काम मागील आठवड्यात पूर्ण झालं. जर तज्ज्ञांना या विमानाची दुरुस्ती करण्यात अपयश आलं असतं, तर त्याचे भाग वेगवेगळे करून मोठ्या मालवाहू विमानातून त्याला ब्रिटनला परत नेण्यात आलं असतं.

दरम्यान, विमानातील बिघाड दुरुस्त करण्यात तज्ज्ञांच्या पथकाला यश आल्यानं आता २२ जुलै रोजी हे लढाऊ विमान केरळमधून ब्रिटनच्या दिशेनं उड्डाण करणार आहे. मात्र, ते कोणत्या वेळेत उड्डाण करणार, परतीच्या प्रवासात इंधन भरण्यासाठी कोणत्या विमानतळावर थांबणार आणि दुरुस्तीसाठी आलेले तज्ज्ञ व उपकरणे परत नेण्यासाठी कोणते विमान वापरण्यात येणार याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही, असं तिरुवनंतपुरमधील विमानतळावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यानं बीबीसीला सांगितलं आहे.
हेही वाचा : पाकिस्तानचा पाठिंबा असलेली TRF संघटना काय आहे? अमेरिकेनं तिला दहशतवादी का घोषित केलं?
लढाऊ विमानाच्या पार्किंगसाठी किती खर्च आला?
१४ जूनपासून तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर उभ्या असलेल्या या लढाऊ विमानाच्या पार्किंगसाठी ब्रिटनच्या अधिकाऱ्यांना मोठी रक्कम मोजावी लागणार आहे. द हिंदूच्या माहितीनुसार, ६ जुलैनंतर विमानाला एअर इंडिया इंजिनियरिंग सर्व्हिसेस लिमिटेड (AI Engineering Services Ltd) च्या दुरुस्ती केंद्रात पाठवण्यात आलं होतं. तिथे त्याच्या सुरक्षेसाठी आलेला खर्च ब्रिटिश सरकारला द्यावा लागणार आहे. इंडियन डिफेन्स रिसर्च विंगने (IDRW) दिलेल्या माहितीनुसार, ब्रिटिश लढाऊ विमानाच्या पार्किंगसाठी दिवसाला २६ हजार २६१ इतकं शुल्क आकारण्यात आलं आहे. हे विमान जवळपास ३५ दिवसांहून अधिक काळ पार्किंगमध्ये उभं असल्यामुळे एकूण खर्च सुमारे नऊ लाख १९ हजारांच्या आसपास गेला आहे. तपासणीनंतर हा खर्च आणखीच वाढण्याची शक्यता आहे. एकंदरीत भारतात झालेल्या या अनपेक्षित मुक्कामामुळे ब्रिटन सरकारवर लाखो रुपयांचं पार्किंग बिल भरण्याची वेळ आली आहे.