ब्रिटिश रॉयल नेव्हीचे एफ-३५ बी लाइटनिंग आयआय स्टेल्थ फायटर जेट केरळमध्ये अडकून पडले आहे. या फायटर जेटच्या आपत्कालीन लँडिंगनंतर जवळपास दोन आठवडे झाले आहेत. अमेरिकेतील लॉकहीड मार्टिनने बनवलेले हे विमान ११० दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त किमतीचे आहे. केरळच्या तिरवनंतरपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर हे फायटर जेट अजूनही उभे आहे. ब्रिटिश रॉयल नेव्हीचे हे विमान अशा प्रकारे एखाद्या ठिकाणी अडकून पडण्याची ही पहिलीच वेळ आहे.

विमानानं आपत्कालीन लँडिंग का केलं?

१४ जूनच्या रात्री ब्रिटिश रॉयल नेव्हीच्या एफ-३५ लाइटनिंग लढाऊ विमानाने केरळच्या तिरुवनंतरपरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग केलं. संरक्षण अधिकाऱ्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, विमानात इंधनाची कमतरता होती. केरळच्या किनाऱ्यापासून सुमारे १०० नॉटिकल मैल अंतरावर जेट उड्डाण करीत असताना त्याला खराब हवामानाचा सामना करावा लागला. त्यामुळे पायलटने दक्षिणेकडील राज्यातील नागरी विमानतळावर उतरण्याची परवानगी मागितली. या विमानाने आणीबाणीची घोषणा केली आणि भारतीय हवाई दलाच्या इंडिग्रेटेड एअर कमांड अँड कंट्रोल सिस्टीमने त्यावर त्वरित अ‍ॅक्शन घेत ते लँड करण्यासाठी परवानगी दिली, असे आयएएफ (Indian Air Force)ने एका निवेदनात म्हटले आहे.

रॉयल नेव्हीच्या या लढाऊ विमानाने १४ जूनच्या रात्री तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग केले. विमानाची दुरुस्ती आणि त्यानंतर ते परत पाठविणे या कार्यवाहीसाठी आयएएफ आवश्यक ती सर्व मदत करीत आहे, असे आयएएफने एक्सवर पोस्ट केले. हे स्टेल्थ विमान रात्री ९.२८ च्या सुमारास केरळ विमानतळावर सुरक्षितपणे उतरले आणि एका वेगळ्या खाडीकडे वळवण्यात आले. पाचव्या पिढीचे हे प्रगत लढाऊ विमान यूके रॉयल नेव्हीचे विमानवाहू जहाज एचएमएस प्रिन्स ऑफ वेल्सचा भाग असल्याची माहिती आहे. आयएएफने स्टेल्थ विमानात इंधन भरण्यासही मदत केली. असे असताना परतीच्या प्रयत्नात या जेटमध्ये हायड्रॉलिक बिघाड झाला, अशी माहिती संरक्षण अधिकाऱ्यांनी एएनआयला दिली.

विमान भारताजवळ काय करत होते?

एफ-३५ बी लायटनिंग आयआय स्टेल्थ लढाऊ विमान एचएमएस प्रिन्स ऑफ वेल्स इथून हिंद महासागरात उड्डाण करीत होते. हे जेट इंडियन एअर डिफेन्स आयडेंटिफिकेशन झोनच्या बाहेर नियमित उड्डाण करीत होते. तेव्हा यामध्ये समस्या निर्माण होत असल्याचे लक्षात आले आणि तिरूवनंतरपुरमला आपत्कालीन पुनर्प्राप्ती क्षेत्र म्हणून चिन्हांकित केले गेले, असे आयएएफने म्हटले आहे. ज्या रात्री लढाऊ विमान केरळमध्ये उतरले, त्या रात्री विमानाची तपासणी करण्यासाठी तज्ज्ञांसह रॉयल नेव्ही एडब्ल्यू १०१ मर्लिन हेलिकॉप्टर तिरुवनंतरपुरम विमानतळावर पोहोचले. त्यांनी एका बदली पायलटलादेखील नेले. असं असताना ब्रिटिश तज्ज्ञांच्या पथकाच्या मदतीपर्यंत जेट ग्राउंडेड ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

महत्त्वाचे मुद्दे:

  • १२ दिवसांपासून यूके नेव्हीचं विमान केरळमध्ये
  • आधी इंधनाची कमतरता असल्याचे लक्षात आले, मग हायड्रॉलिक बिघाड
  • भारतीय हद्दीत नव्हते, पण बिघाड झाल्याने केरळ विमानतळावर लँडिंग
  • यूके नेव्हीला मात्र भारताची मदत नको

“यूके नौदलाच्या देखभाल पथकाने येऊन समस्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला; मात्र ते शक्य झालं नाही”, असे संरक्षण अधिकाऱ्यांच्या निवेदनात सांगितल्याचे एएनआयने वृत्त दिले आहे.

इतक्या दिवसांनंतरही ते का अडकून पडले?

मान्सूनच्या परिस्थितीमुळे देशांतर्गत टर्मिनलजवळील मोकळ्या जागेत पार्क केलेल्या ब्रिटिश विमानाचे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल रक्षण करीत आहे. ओनमॅनोरामाच्या वृत्तानुसार, एफ-३५ बी जेटची दुरुस्ती करण्यासाठी यूकेमधील ४० सदस्यांची तज्ज्ञ टीम लवकरच येण्याची अपेक्षा वर्तविली जात आहे. तपासणीसाठी विमान हँगरमार्फत हलवायचे की नाही यावर टीमने अद्याप निर्णय घेतलेला नाही. भारताने जेट हँगर किंवा तात्पुरत्या शेडमध्ये हलवण्याची ऑफर दिली होती. भारताकडून इतकी मदत करण्यात आल्यानंतरही रॉयल नेव्हीने ती नाकारली आहे. एनडीटीव्हीच्या सूत्रांनुसार, एफ-३५ बीच्या संरक्षित तंत्रज्ञानाबद्दलच्या चिंतेमुळे हा निर्णय घेण्यात आला असावा, असे सांगण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिल्लीतील ब्रिटिश उच्चायुक्तालयाच्या प्रवक्त्याने दि इंडिपेंडेंट या वृत्तपत्राला सांगितले, “आम्ही तिरुवनंतरपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर शक्य तितक्या लवकर यूके-३५ बी दुरुस्त करण्याचे काम करीत आहोत. भारतीय अधिकाऱ्यांनी सतत सहकार्य केल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. गरज पडल्यास विमान लष्करी वाहतूक विमानामार्फत परत आणले जाईल.” सर्वांत प्रगत लढाऊ विमानांपैकी एक असलेल्या या लढाऊ विमानाची शॉर्ट टेकऑफ आणि व्हर्टिकल लँडिंग क्षमता आहे. त्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उत्तम वापर केलेला आहे. त्यामध्ये सेन्सर्स, मिशन सिस्टीम व स्टेल्थ वैशिष्ट्यांचा समावेश आहे