चहा हे तमाम भारतीयांचे आवडते पेय. अनेकांची दिवसांची सुरुवात चहानेच होते, तर दिवसभराचा थकवा वा आळस झटकण्यासाठी मध्ये-मध्ये चहा हा लागतोच. चहा पावडर, साखर व दूध यांपासून बनवलेला साधा चहा तर प्रसिद्ध आहेतच, मात्र आरोग्यविषयक फायदे लक्षात घेऊन चहामध्येही काळानुरूप बदल करण्यात आले. आले, लवंग, दालचिनी यांचा वापर करून तयार केलेला मसाला चहा, लिंबू वा लिंबूवर्गीय फळांपासून तयार केलेला ‘लेमन टी’, दुधाचा वापर न करता तयार केलेला ‘ब्लॅक टी’, चमेली किंवा कॅमोमाइल चहा, आरोग्यदायी ‘ग्रीन टी’ असे विविध चहांचे प्रकार लोकप्रिय हाेत आहेत. यामध्ये आता नव्या चहाप्रकाराची भर पडली आहे… कांदाचहा! कांद्यापासून बनवलेला हा चहा आरोग्यासाठी कसा उपयुक्त आहे, त्याच्या उत्पादनासाठी कशा प्रकारे पावले उचलली जात आहेत यांविषयी…
कांद्याचा चहा म्हणजे काय? आरोग्यदायी कसा?
दररोजचा चहा अधिक कडक, उत्तेजक आणि खवखवणाऱ्या घशाला आराम देण्यासाठी त्यामध्ये आले, गवती चहा टाकले जातात, त्याचप्रमाणे जर कांद्याचे लहान तुकडे टाकले तर हा चहा आरोग्यासाठी उपयुक्त बनतो. कांद्याचा चहा आयुर्वेदात औषधी मानला जातो. बहुतेक घरांमध्ये सर्दी, घशाची खवखव दूर करण्यासाठी कांद्याचा चहा बनवला जात असला तरी त्याचे आरोग्यासाठी फार मोठे फायदे आहेत. हा चहा आतड्यांसाठी उपयुक्त असून पचनशक्ती वाढवतो. कांद्याच्या चहाने आतड्यातील टॉक्सिन बाहेर निघून जातात. कांद्यामध्ये क्वेरसेटिन नावाचा रासायनिक घटक असतो, जो रक्तात अँटीऑक्सिडेंट्स वाढवण्यास मदत करतो. मधुमेहाच्या रुग्णांसाठी तर कांद्याचा चहा अधिक फायदेशीर आहे. कांद्याच्या चहाने फ्री रेडिकल्स नष्ट होऊ शकतात, तर वजन कमी करण्यासाठीही हा चहा फायदेशीर आहे.
हेही वाचा >>>केजरीवालांना जामिनामुळे राजकीय नेत्यांच्या सुटकेबाबत वेगळा विचार होणार?
सरकारी पातळीवर काय हालचाली?
केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालय ‘कदर्प चहा’ म्हणजेच कांद्याच्या चहाला प्रोत्साहन देण्यासाठी काम करत आहे. आतड्याच्या आरोग्यासाठी हा चहा उपुयक्त असल्याचा विश्वास हे मंत्रालय व्यक्त करते. कांद्याच्या टाकाऊ पदार्थांपासून मधुमेहींसाठी ‘स्वीटनर’ तयार करण्याच्या योजनेला पाठिंबा देणारे हे मंत्रालय कांद्यापासून प्रोबायोटिक चहा बनवू इच्छिणाऱ्या संघटनेला प्रायोजित करत आहे. इंदूरमधील ‘एक्रोपोलिस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च’ (एआयएमएसआर) ही संस्था कांद्याचा चहा विकसित करत आहे. आतड्याचे आरोग्य, रोगप्रतिकारकशक्ती वाढवणे, सूज कमी करणे आणि वजन व्यवस्थापन यांसारखे फायदे काद्याचा चहा देऊ शकते, असे या संस्थेचे म्हणणे आहे. कांदा चहाच्या अंतिम उत्पादनासाठीचा प्रस्ताव मंजुरीसाठी पुनरावलोकनाधीन आहे, असे ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. या मंत्रालयासह भारतीय अन्नसुरक्षा व मानक प्राधिकारणाच्या पथकांनी कांदा चहाच्या उत्पादन प्रक्रियेचे आधीच मूल्यांकन केले आहे.
‘एआयएमएसआर’ कशा प्रकारे कार्य करते?
‘एआयएमएसआर’ या संस्थेच्या मते प्रीबायोटिक कांद्याच्या चहाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात इन्युलिन-फ्रुक्टो- ओलिगोसॅकराइड्स असतात. ते आतड्यामध्ये फायदेशीर जिवाणूंच्या वाढीस प्रोत्साहन देऊन आतड्याचे आरोग्य सुधारण्यास मदत करते. त्याशिवाय कमी उष्मांक मूल्य असल्याने हा चहा फायदेशीर आहे. ‘‘कांदा चहाच्या उत्पादनाचे पेटंट प्रकाशित झाले आहे. प्रीबायोटिया ब्रँड नावाने ते खुल्या बाजारात आणण्याची प्रक्रिया सुरू आहे,’’ असे एक्रोपोलिस ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटच्या प्रज्ञा गोयल यांनी सांगितले. कांदा चहाच्या उत्पादनासंबंधी ही संस्था काम करत आहेत. गोयल या ‘एआयएमएसआर’ या संस्थेतही कार्यरत आहेत. कांदे उकळवून त्यातून प्रीबायोटिक सामग्री काढली जाते. एक किलो कांद्यामधून सुमारे ६० ग्रॅम इन्युलिन-फ्रुक्टो-ऑलिगोसॅकराइड्स काढता येतात. टाकाऊ किंवा न वापरलेल्या कांद्यापासून इन्युलिन-एफओएस पावडरची उत्पादन प्रक्रिया आम्ही विकसित केली आहे, असे गाेयल यांनी सांगितले.
हेही वाचा >>>१० हजार मतदारांपैकी केवळ ७ जणांचे मतदान! रायगडात बाळगंगा प्रकल्पग्रस्तांनी मतदानावर बहिष्कार का घातला?
कांदा चहाच्या उत्पादनाविषयी…
इन्युलिन-एफओएसच्या उत्खननासाठी शेतकऱ्यांकडून कांदे थेट मिळवले जाणार आहेत. अतिरिक्त उत्पादन झालेले किंवा वापरात नसलेल्या शिल्लक कांद्याचा वापर त्यासाठी केला जाणार आहे. या वर्षांच्या अखेरीस कांदा चहाच्या टी-बॅग उपलब्ध केल्या जाणार आहेत. एक टी-बॅग तीन ग्रॅमची असेल आणि १२ ते १५ रुपये किमतीमध्ये उपलब्ध केली जाणार आहे. आले, दालचिनी व वेलची या तीन फ्लेवर्समध्ये या टी-बॅगचे उत्पादन केले जाणार आहे. कांदा या औषधी वनस्पतीमध्ये भरपूर अँटिऑक्सिडेंट व दाहकविरोधी गुणधर्म आहे. त्याचा वापर करूनच कांदा चहाचे उत्पादन केले जाणार आहे. उत्पादन करण्यापूर्वी उत्पादकांनी दावा केलेल्या कोणत्याही गुणधर्मांचे वैज्ञानिक आणि बारकाईने पुनरावलोकन केले जाणार आहे, असे संशोधकांनी सांगितले.
कांदा मधुमेहासाठी किती उपयुक्त?
रक्तातील साखरेची पातळी वाढली की मधुमेहाचे निदान होते. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्याचा महत्त्वपूर्ण उपाय म्हणजे कच्चा लाल कांदा खाणे असे संशोधक सांगतात. कांद्यातील अँटीऑक्सिडंट्स रक्तातील ग्लुकोज नियंत्रित करते. कांद्यामध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण खूप कमी असल्यामुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी होते, त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. काही पदार्थांमध्ये साखरेला पर्याय म्हणून ‘स्वीटनर’चा वापर केला जातो. मात्र काही कृत्रिम स्वीटनर आरोग्यासाठी धोकादायक असतात. साखरेला पर्याय म्हणून कांद्यापासून स्वीटनर तयार करण्याचा विचार सुरू आहे. जर याला यश मिळाले तर मधुमेहींसाठी कांद्याचे स्वीटनर फारच उपयुक्त ठरू शकेल.
sandeep.nalawade@expressindia.com