scorecardresearch

विश्लेषण : उत्तर प्रदेश मतदान चौथा टप्पा – भाजप गतवेळचा प्रभाव कायम राखणार का?

पहिल्या तीन टप्प्यांतील मतदान भाजपला पुरेसे अनुकूल नसल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. या पार्श्वभूमीवर राजधानी लखनऊ व आसपासच्या परिसरातील मतदारसंघ भाजपसाठी महत्त्वाचे आहेत.

विश्लेषण : उत्तर प्रदेश मतदान चौथा टप्पा – भाजप गतवेळचा प्रभाव कायम राखणार का?
शेतकरी व स्थानिक रहिवाशांमध्ये भाजपच्या विरोधात असंतोष आहे.

– संतोष प्रधान

उत्तर प्रदेशातील चौथ्या टप्प्यात ५९ जागांसाठी होणाऱ्या मतदानात सत्ताधारी भाजपपुढे गतवेळप्रमाणे यश मिळविण्याचे आव्हान असेल. पाच वर्षांपूर्वी या टप्प्यातील ५२ जागांवर भाजपला विजय मिळाला होता. पहिल्या तीन टप्प्यांतील मतदान भाजपला पुरेसे अनुकूल नसल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. या पार्श्वभूमीवर राजधानी लखनऊ व आसपासच्या परिसरातील मतदारसंघ भाजपसाठी महत्त्वाचे आहेत. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या रायबरेली मतदारसंघातही या टप्प्यात मतदान होत आहे. गतवेळी काँग्रेसचे दोन उमेदवार या भागातून निवडून आले होते, पण दोघांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. रायबरेलीत काँग्रेसचा धुव्वा उडाल्यास काँग्रेससाठी हा आणखी धोक्याचा इशारा ठरेल. शेतकरी आंदोलनावरून लखीमपूर खेरीमध्ये झालेल्या हिंसाचारात चार शेतकरी गाडीखाली चिरडले गेले होते. याबद्दल केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्र यांच्या पुत्राला अटक झाली होती. या घटनेनंतर शेतकरी व स्थानिक रहिवाशांमध्ये भाजपच्या विरोधात असंतोष आहे. त्याचे काही पडसाद उमटतात का, हेही महत्त्वाचे असेल.

भाजपसाठी हा टप्पा महत्त्वाचा का?

लखनऊ, उन्नाव, पिलभीत, रायबरेली अशा नऊ जिल्ह्यांमध्ये पसरेलल्या ५९ मतदारसंघांत मतदान होत आहे. अवध,  रोहिलखंड ते तेराई पट्य्यात हे मतदारसंघ आहेत. पाच वर्षांपूर्वी भाजपने ५१ तर मित्र पक्षाने एक अशा ५२ जागा जिंकल्या होत्या. जवळपास ९० टक्के जागा भाजपने त्या टप्प्यात जिंकल्या होत्या. यामुळेच चौथ्या टप्प्यात यशाचा हाच आलेख कायम राखण्याचे भाजपपुढे आव्हान असेल.

भाजपपुढे आव्हान कोणते असेल?

शेतकरी कायद्यांवरून शेतकरी वर्गात असंतोष होता. सत्ताधारी भाजपने कृषी कायदे मागे घेतले असले तरी शेतकरी वर्गात अजूनही नाराजी आढळते. लखीमपूर खेरी या भागातील आठही मतदारसंघांत गेल्या वेळी भाजपला विजय मिळाला होता. पण गेल्या ऑक्टोबरमध्ये लखीमपूर खेरीमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालण्यात आली होती. त्यात चार शेतकरी ठार झाले होते. ही गाडी स्थानिक खासदार व केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्र यांचे पुत्र चालवित असल्याचा आरोप झाला होता. या दुर्घटनेनंतर लखीमपूर भागात मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला होता. स्थानिकांचा दबाव आणि राजकीय वातावरण तापल्याने अखेर राज्यमंत्र्यांच्या पुत्राला अटक करण्यात आली होती. मिश्र यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली होती पण भाजप नेतृत्वाने मिश्र यांना अभय दिले होते. ब्राह्मण समाजाची नाराजी दूर करण्याकरिता गेल्या जुलै महिन्यात मिश्र यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता.

काँग्रेससाठी हा टप्पा महत्त्वाचा का?

एकेकाळी उत्तर प्रदेशवर अधिराज्य गाजविणाऱ्या काँग्रेसवर अस्तित्वाची लढाई करण्याची वेळ आली आहे. पक्ष दिवसेंदिवस कमकुवतच होत गेला. प्रियंका गांधी – वढेरा यांच्याकडे उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपविण्यात आली. योग्य ती वातावरण निर्मिती करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. उमेदवार निश्चित करताना महिलांना प्राधान्य देण्यात आले. रायबरेली हा सोनिया गांधी यांचा मतदारसंघ. गेल्या वेळी काँग्रेसचे दोन आमदार या भागातून निवडून आले होते. काँग्रेससाठी चौथ्या टप्प्यातील मतदारसंघ त्यामुळेच अधिक महत्त्वाचे आहेत.

समाजवादी पक्षाकडून करण्यात येणाऱ्या दाव्यांत किती तथ्य?

पहिल्या तीन टप्प्यांमध्ये आम्हाला चांगले यश मिळाले आहे. चौथ्या टप्प्यात आम्ही सत्तेच्या समीप जाऊ, असा विश्वास समाजवादी पक्षाचे नेते रामगोपाळ यादव यांनी व्यक्त केला. गेल्या वेळी समाजवादी पक्षाला गेल्या वेळी या टप्प्यातील मतदानात फक्त चार जागा मिळाल्या होत्या. यंदा भाजपला शह देत जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा समाजवादी पक्षाचा प्रयत्न आहे. पण या टप्प्यात त्यांच्या जागा किती वाढतील, याविषयी फार सांगण्यासारखी स्थिती नाही. 

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या