Brahmi script history: जैन पुराणकथांनुसार पहिले तीर्थंकर ऋषभदेव यांनी लेखनकलेचं ज्ञान आपली कन्या ब्राह्मीला दिलं आणि संख्यांचं ज्ञान कन्या सुंदरीला दिलं. म्हणजेच साहित्य आणि गणित या दोन जैन साध्वींपासून निर्माण झाल्या आहेत. जैन परंपरेत ‘विद्या’ किंवा विविध विषय हे तीर्थंकरांच्या शिकवणुकीतून प्रकट होणाऱ्या देवींच्या समूहाच्या रूपात मानले गेले आहेत. परंतु, या कथा नंतरच्या काळात उदयास आल्या असाव्यात आणि त्या कदाचित लेखनाच्या उगमाचं काव्यात्मक स्पष्टीकरण असाव्यात. वेगवेगळ्या लिपींचा प्रसार करण्यात जैन धर्माचा मोलाचा वाटा असल्याचं अभ्यासक मानतात. तामिळनाडूतील जैन धर्माशी संबधित स्थळांवर तमिळ-ब्राह्मी लिपी आढळून आली आहे, या स्थळांवर जैन साधूंनी सल्लेखना (उपवास करून देहत्याग) करून देहत्याग केला होता.

या लिपीचा कालखंड इ.स.पू. २७० मानला जातो आणि ती सम्राट अशोकाच्या शिलालेखांपेक्षाही (इ.स.पू. २५०) जुनी असू शकते. त्यामुळे हे स्पष्ट होतं की, सुमारे २,३०० वर्षांपूर्वी व्यापारी, साधू आणि राजे यांच्यामार्फत लेखनकला भारताच्या अनेक भागांपर्यंत पोहोचली होती.

अशोकाच्या लेखनाला ब्राह्मी लिपी का म्हणतात?

  • अशोकाच्या लिपीला ब्राह्मी का म्हणतात? मौर्यकाळात ही लिपी ब्राह्मी म्हणूनच ओळखली जात होती का? हे आपल्याला माहीत नाही. सुरुवातीच्या विद्वानांनी तिला “पिन-मॅन स्क्रिप्ट”, नंतर “लाट स्क्रिप्ट” (लाठी म्हणजे दांडा, अशोकाचे स्तंभ ‘लाट’ म्हणून ओळखले जात), “इंडियन पाली” आणि “मौर्यन स्क्रिप्ट” अशी नावे दिली होती.
  • मात्र, त्यानंतर अनेक शतकांनी लिहिलेल्या बौद्ध कथांमध्ये, जसं की संस्कृतमधील ललितविस्तार सूत्रासारख्या (इसवी सन ३००) स्रोतांमध्ये राजकुमार सिद्धार्थाने शिकलेल्या अनेक प्रकारच्या लिपींची यादी दिली आहे. त्यात पहिली लिपी ब्राह्मी आहे. त्यामुळे अभ्यासकांनी अशोककालीन लिपीला ब्राह्मी लिपी मानलं.
  • याचा ब्रह्मा किंवा ब्राह्मण यांच्याशी काहीही संबंध नाही.
  • ब्राह्मी ही आग्नेय आशियात सापडणाऱ्या बहुतांश लिपींची जननी मानली जाते. तिचा प्रसार बौद्ध धर्माबरोबर झाला. ही लिपी लॅटिन आणि सेमिटिक लिपींहून पूर्णपणे वेगळी आहे.
  • लॅटिन लिपीत व्यंजन आणि स्वर स्वतंत्र अक्षररूपात सलग लिहिले जातात आणि ही लिपी डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. सेमिटिक लिपी ही उजवीकडून डावीकडे लिहिली जाते आणि त्यात फक्त व्यंजन असतात, स्वर नसतात.
  • ब्राह्मी मात्र डावीकडून उजवीकडे लिहिली जाते आणि तिची रचना अतिशय वैशिष्ट्यपूर्ण, वर्तुळाकार स्वरूपाची आहे. व्यंजन (अक्षर) मध्यभागी बसतं आणि स्वर (मात्रा) त्याच्या भोवती वेगवेगळ्या ठिकाणी लागतात; वर, खाली, डावीकडे किंवा उजवीकडे. व्यंजन आणि स्वर हे जणू केंद्राभोवतीच्या वर्तुळांमध्ये मांडलेले असतात.
  • लिपी आपल्याला भारतीय संस्कृतीबद्दल आणि भारतीय संस्कृतीच्या जगावर झालेल्या प्रभावाबद्दल बरंच काही सांगतात. अशोकाच्या काळात गांधार प्रदेशात अभुगिदा-स्वराक्षराधारित (abugida-syllabary) एक लिपी वापरली जात होती, तिला खरोष्टी म्हणत.
  • खरोष्टी लिपी उजवीकडून डावीकडे लिहिली जात असे, ज्यावर पर्शियन साम्राज्यातील अरमाईक लिपीचा प्रभाव दिसतो. त्याउलट ब्राह्मी लिपी डावीकडून उजवीकडे लिहिली जात असे, ज्यामुळे तिचा उगम स्वतंत्र असल्याचं मानलं जातं.
  • काळ जसजसा पुढे गेला, तसतसा खरोष्टी लिपीचा वापर कमी झाला आणि ब्राह्मी लिपी अधिक प्रभावी ठरली.

चिनी लिपी

चिनी लिपी ही लोगोग्राफिक स्वरूपाची आहे. म्हणजेच प्रत्येक चिन्ह हे एका शब्दाचं किंवा संकल्पनेच प्रतिनिधित्त्व करतं. या लिपीत असंख्य अक्षरं आहेत आणि ती लक्षात ठेवणं कठीण असतं. चिनी भाषेच्या विविध बोलींमध्ये एकाच चिन्हाचा उच्चार वेगळा असला तरी त्याचा अर्थ तोच राहतो. त्यामुळे संपूर्ण देशात एकसंधता टिकते, म्हणूनच ही लिपी प्राधान्याने वापरली जाते. बौद्ध धर्म चीनमध्ये पोहोचल्यावरही बौद्ध मंत्र चिनी लिपीतच लिहिले गेले.

जपानी लिपी

जपानी भाषेत दोन्ही प्रकारच्या लिपी आहेत. लोगोग्राफिक लिपीत (कांजी) सुमारे ५०,००० चिन्हं आहेत आणि सिलेबरी लिपीत (काना) फक्त ५० चिन्हं आहेत. हे साधारण हजार वर्षांपूर्वी घडलं. या काळात जपानवर बौद्ध ग्रंथांतील ब्राह्मी लिपीचा प्रभाव पडला. इतकंच नव्हे तर जपानी आजही पूर्व भारतातील सिद्धम् लिपीचा वापर बौद्ध मंत्रांसाठी करतात.

कोरियन लिपी

चिनी लोगोग्राफिक लिपी कोरियन उच्चवर्गीयांकडून वापरली जात होती, पण ती शिकणं खूप कठीण होतं. त्यामुळे सुमारे ५०० वर्षांपूर्वी सामान्य माणूस साक्षर व्हावा म्हणून एका कोरियन राजाने नवी लिपी विकसित केली. त्याच्या दरबारातील लोकांना ब्राह्मीपासून विकसित झालेल्या तमिळ लिपीची प्रेरणा मिळाली होती. तमिळ आणि कोरियन भाषेत अनेक समान शब्द आढळतात, यावरून त्या काळातील व्यापारी संबंध स्पष्ट होतात. इतकंच नव्हे तर तमिळ व्यापाऱ्यांनी १३०० च्या आसपास चीनमधील क्वान्झो शहरात कैयुआन मंदिरही बांधलं होतं.

कोरियाची हांगुल लिपी

  • ब्राह्मी लिपीत व्यंजन मध्यभागी असतं आणि त्याच्या आजूबाजूला स्वर लागतात. कोरियातील हांगुल लिपीने वेगळ्या पद्धतीने हेच तत्त्व अवलंबले. ब्राह्मीच्या अभुगिदा लिपीपासून प्रेरणा घेतली असली तरी ती शिकायला अधिक सोपी होती.
  • ब्राह्मी लिपीमध्ये ठरावीक तर्कसंगती नव्हती. पण हांगुल लिपीत स्पष्ट तर्क होता; व्यंजन आणि स्वर उच्चारताना जिभेची जी स्थिती असते त्याप्रमाणे चिन्हं लिहिली जात. त्यामुळे ती लक्षात ठेवणं सोपं होतं. हांगुलमध्ये १५ व्यंजनं आणि १० स्वर यांची वेगळी चिन्हं होती. स्वर व्यंजनाच्या उजवीकडे किंवा खाली ठेवला जाई. यामुळे ती सहज शिकता येत असे आणि कोरियन समाज फार वेगाने साक्षर झाला.
  • भारतात मात्र लेखन दीर्घकाळ स्वीकारलं गेलं नाही. इ.स.पू. ३०० ते इ.स. १०० या काळातले सर्व लेखन प्राकृत भाषेत होतं. सुमारे ४०० वर्षांनंतर संस्कृत लेखन सुरू झालं. त्यानंतर इ.स. ३०० ते १३०० या काळात अफगाणिस्तानपासून व्हिएतनामपर्यंत संस्कृत हीच दरबारातली प्रमुख भाषा ठरली, राजकीय घोषणा याच भाषेत लिहिल्या जाऊ लागल्या. इस्लामच्या उदयानंतर हे बदललं. अरबी व फारसी लिपींसह स्थानिक भारतीय भाषांसाठी स्थानिक लिपी उदयास आल्या.

विषयाशी संबंधित प्रश्न

  • लिपी आपल्याला भारतीय संस्कृतीबद्दल आणि भारतीय संस्कृतीच्या जगावर झालेल्या प्रभावाबद्दल बरेच काही सांगतात. ब्राह्मी लिपीच्या संदर्भात यावर चर्चा करा.
  • ब्राह्मी लिपीतील स्वरांची मांडणी तिला कशी वैशिष्ट्यपूर्ण बनवते?
  • ब्राह्मी लिपीचा हिंदू धर्म आणि जैन पुराणकथांशी काय संबंध आहे? दिगंबर जैन परंपरेनुसार ब्राह्मीबद्दल काय सांगितले आहे?
  • ब्राह्मी लिपी वर्णमाला-आधारित (लॅटिन) आणि केवळ व्यंजन-आधारित (सेमिटिक) लिपींपेक्षा कशी वेगळी आहे, आणि त्यामुळे ती अभुगिदा म्हणून कशी अद्वितीय ठरते?