How Afghan and Turkic invaders transformed Indian warfare: इसवी सनाच्या १० व्या शतकापासून अफगाणिस्तान आणि मध्य आशियातील घोडे पाळणार्‍या गटांनी मोठ्या संख्येने भारतावर आक्रमण करण्यास सुरुवात केली. सुरुवातीच्या कालखंडात या आक्रमकांनी सोन्याची- मंदिरांची लूट केली. १२ व्या शतकानंतर भारतीय कृषी संपत्तीचं शोषण करण्यासाठी तसेच व्यापारी मार्गांवर नियंत्रण ठेवण्यसाठी सुलतानशाहींची स्थापना केली. या आक्रमकांच्या धार्मिक बाजूवर म्हणजेच त्यांनी मंदिरे पाडून त्याच्या जागी मशिदी, मिनार, थडगी, राजवाडे आणि किल्ले बांधले यावर अधिक भर दिला जातो. परंतु, या धार्मिक दृष्टीकोनामुळे तांत्रिक परिवर्तनाकडे दुर्लक्ष होते. या आक्रमकांबरोबर भारतात आलेल्या नव्या तंत्रज्ञानाबद्दल फारच कमी चर्चा केली जाते, प्रारंभिक कालखंडात या तंत्रज्ञानाला भारतीयांकडून कमी लेखले गेले.

भारतात राजपूत योध्दे अपमानापेक्षा मृत्युला प्राधान्य देत होते हे सर्वश्रुत आहे. पराभव झाला तरी बेहत्तर पण रणांगणातून माघार घेणं त्यांना मान्य नव्हतं. ते शक्ति आणि भक्ति या मूल्यांना प्राधान्य देत असत. मात्र, युक्ती म्हणजेच रणनितीला तुच्छ मानले जात असे.

अफगाण आणि तुर्कांची लष्करी रणनिती

याउलट, भारतात आलेल्या अफगाण आणि मध्य आशियाई योद्ध्यांनी नवीन लष्करी रणनिती आणल्या. त्यामुळे त्यांना युद्धात विजय मिळवता आला. या रणनिती त्यांच्या मध्य आशियाई स्टेपी प्रदेशातील आणि डोंगराळ भागातील जगण्याच्या अनुभवातून निर्माण झालेल्या होत्या, त्यांचा घोडे-पालनाच्या परंपरांशीही घनिष्ठ संबंध होता.

अफगाण आणि तुर्कांना पार्थियन शॉट ही प्राचीन रणतंत्रे चांगली अवगत होती. यात घोड्यावर बसलेला धनुर्धर मागे हटत असल्याचा भास निर्माण करत पाठीमागे वळून शत्रूवर बाण सोडत असे. म्हणजे माघार घेतल्यासारखे दाखवून विजयाचा भास निर्माण झाल्यावर अचानक सापळा रचला जात होता. राजपूत या तंत्राला भ्याडपणा आणि फसवणूक मानत, तर मध्य आशियाई जमातींनी याला एक अफलातून युद्धतंत्र म्हणून गौरवले.

Fight between Mahmud of Ghazni and Abu 'Ali Simjuri. Jami al-Tawarikh, 1314

राजपूतांना धनुर्विद्या अवगत नव्हती असे नाही. पृथ्वीराज रासोमध्ये वर्णन केले आहे की, राजपूत राजा डोळे झाकलेले असतानाही लक्ष्य भेदू शकतो, कारण त्याला फक्त आवाज ऐकून बाण सोडण्याची कला (शब्द-भेदी बाण) अवगत होती. मात्र, हिंदू पुराणकथांमध्ये असे लक्ष्य न पाहता फक्त आवाजावर बाण सोडणारे राजे अहंकारी समजले जातात आणि त्यांच्या गर्वामुळे त्यांना दुःख भोगावे लागते. उदाहरणार्थ, रामायणात दशरथ असा बाण सोडतो. त्याला वाटते की, पाण्याजवळ प्राणी पाणी पीत आहे. पण प्रत्यक्षात तो श्रवणकुमार असतो, जो आपल्या आंधळ्या आई-वडिलांसाठी पाणी आणत असतो. त्या चुकीमुळे श्रवणकुमाराचा मृत्यू होतो.

Mahmud of Ghazni receiving Indian elephants as tribute (Majmu al-Tawarikh, by Hafiz-i Abru, Herat,

आक्रमणाचे नवे तंत्र

आक्रमणासाठी कोणत्या प्रकारच्या गुंतागुंतीची तांत्रिक आखणी केली जात होती, याबद्दल क्वचितच संगितले जाते. सोमनाथ मंदिरावरील आक्रमणाच्या वेळी महमूद गझनीने तब्बल ३०,००० उंटांवरुन पाणी आणि घोड्यांसाठी चारा वाहून नेला होता. म्हणूनच तो थरच्या वाळवंटातून मार्ग काढून सोमनाथापर्यंत पोहोचू शकला आणि मंदिराचे रक्षण करणाऱ्यांना पूर्णपणे अनपेक्षितपणे गाठू शकला. मंगोलांचे नेग्रे हे शिकारीसारखे तंत्रही उल्लेखनीय आहे. यात घोडदळ शत्रूला चारही बाजूंनी वेढून टाकत असे. ज्याप्रमाणे शिकारी एखादी शिकार पकडताना सावजाला एका कोपर्‍यात गाठतो, त्याच प्रमाणे हे तंत्र वापरले जात होते. खिलजीने दक्षिण भारतातील अनेक मातीचे किल्ले उद्ध्वस्त केले. त्याने कॅटपल्ट आणि इतर वेढा घालण्याची शस्त्रे वापरली. कॅटपल्ट (मघ्रबी) ही अशी यांत्रिक साधने होती जी प्रक्षेपक (दगड, ज्वलनशील पदार्थ) किल्ल्यांच्या भिंतींवर फेकत, त्यामुळे भिंती कमकुवत होऊन अखेरीस भगदाड पडे.

Sultan Mahmud and his forces attacking the fortress of Zaranj in 1003 CE. Jami al-Tawarikh, 1314 CE.

त्यांनी पशेब (मातीचे ढिग) बांधून आपली वेढा घालणारी शस्त्रे आणि सैन्य उंच किल्ल्यांच्या माथ्याजवळ पोहोचवले. त्यानंतर त्यांनी विशाल आणि शक्तिशाली युद्धहत्तींचा वापर करून किल्ल्यांचे दरवाजे फोडले, शत्रूंच्या सीमांमध्ये घुसखोरी केली आणि वेढ्यादरम्यान रक्षणकर्त्यांना धाक दाखवला. अशी तंत्र भारतासाठी नवीन होत्या, परंतु मध्य आशियात त्यांचा चांगलाच विकास झाला होता, कारण तेथे बलाढ्य मंगोलांविरुद्ध अनेक युद्धे लढली गेली होती.

घोडदळाचा ऱ्हास

मुघलांनी तोफा भारतात आणल्या आणि त्यानंतर रणांगणावर हत्तींचा वापर अप्रासंगिक ठरला. हत्तींचा दरवाजे फोडणारे शस्त्र म्हणून वापर करण्याचा काळ संपला. मुघलांनी भारतात चल राजधानीची संकल्पना रुजवली. सम्राट वर्षातील फक्त सहा महिने एका ठिकाणी वास्तव्यास असे. उर्वरित काळात तो, त्याचा दरबार आणि संपूर्ण सैन्य एका भव्य चल नगरीत प्रवास करत असे. या नगरीला उर्दू-ए-मुअल्ला (उच्च श्रेणीची छावणी) असे म्हटले जात असे. ही नगरी अनेक चौ.कि.मी. पर्यंत विस्तारत असे. यात जवळपास एक लाख लोक, जनावरे आणि त्यांच्या आवश्यकतेनुसार अन्नधान्य व अन्य सामग्री बरोबर असे. रोज या संचलनाचा प्रवास साधारण १० ते १५ किलोमीटरपर्यंत होत असे.

ही शहरे साधारण चार आठवड्यांनी एका ठिकाणी उभारली जात. मागील छावणी गुंडाळली जात असतानाच पुढे नवीन छावणी उभारली जाई. या प्रक्रियेने पाहणाऱ्यांवर गारूड केलं जात असे. एखाद्या गावातून हे संपूर्ण संचलन पार होण्यासाठी एक दिवस लागत असे. यातून मुघल साम्राज्याची ताकद, दिमाख आणि ऐश्वर्यजनक वैभव प्रकट होत असे.

अहमद शाह अब्दालीने १८ व्या शतकात भारतावर आक्रमण करताना झंबुरक या शस्त्राचा वापर केला. हे उंटांच्या पाठीवर बसवलेले छोटे फिरते तोफेचे यंत्र होते. १६ व्या शतकापासून भारतात तोफा परिचित होत्या, तरी विजयनगरातील नायकांनी त्यात फार गुंतवणूक केली नाही. त्यांना पारंपरिक युद्धपद्धतीच अधिक योग्य वाटत होत्या. त्यांच्या मते घोडदळ नव्या शस्त्रांवर सहज मात करू शकते. कारण जुन्या मॅचलॉक बंदुका घोड्यावर बसून वापरणे अवघड होते. परंतु, ब्रिटिशांनी फ्लिंटलॉक मस्केट भारतात आणल्या. यामुळे शिस्तबद्ध पायदळ हे अधिक सामर्थ्यवान झाले. हे पायदळ शेकडो वर्षे भारतावर वर्चस्व गाजवणाऱ्या घोडदळावर मात करू शकले. यामुळे ब्रिटिशांना मुघल आणि अफगाणांनी भारतात आणलेल्या जुन्या युद्धपद्धतींना मागे टाकून निर्णायक विजय मिळवता आला.

“तंत्रज्ञान संस्कृतीला कसं बदलतं, हे आपण जाणलं नाही, तर भारताचा इतिहास आपण कधीच नीट समजू शकणार नाही.”

विषयाशी संबंधित प्रश्न

  • दहाव्या शतकापासून अफगाणिस्तान आणि मध्य आशियातील घोडे-पालन करणाऱ्या गटांनी मोठ्या संख्येने भारतावर आक्रमण केले. या आक्रमकांनी भारतातील रणांगण कशाप्रकारे बदलून टाकले?
  • पार्थियन शॉट म्हणजे काय? राजपूतांनी याला भ्याडपणा आणि फसवणूक का मानले, तर मध्य आशियाई जमातींनी याला एक अफलातून युद्धतंत्र का मानले?
  • नेग्रे (वेढा), कॅटपल्ट (मघ्रबी) आणि पशेब (मातीचे ढिग) ही तंत्रे काय होती आणि ती भारतात कोण घेऊन आले?
  • मुघल आणि अफगाणांनी आणलेल्या जुन्या युद्धपद्धतींवर ब्रिटिशांनी कशाप्रकारे मात केली?