अमेरिकेच्या विस्कॉन्सिनमधील एका न्यायाधीशाने भारतीय विद्यार्थ्याला हद्दपार करण्यास स्थगिती दिली आहे. या भारतीय विद्यार्थ्याचा व्हिसा विस्कॉन्सिन-मॅडिसन विद्यापीठातून पदवीधर होण्याच्या काही आठवड्यांपूर्वी अचानक रद्द करण्यात आला होता. २१ वर्षीय क्रिश लाल इस्सरदासानी हा कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण घेत आहे. त्याने आपल्या संपूर्ण अभ्यासक्रमात चांगली स्थिती कायम ठेवली होती. १० मे २०२५ रोजी त्याला पदवी प्राप्त होणार होती. मात्र, त्यापूर्वीच त्याला व्हिसा समाप्त झाला असल्याची आणि देश सोडण्याची सूचना मिळाली. परंतु, न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप कसा केला? विद्यार्थ्याच्या हद्दपारीला न्यायालयाने कसे रोखले? कोण आहे क्रिश लाल इस्सरदासानी? जाणून घेऊयात.

नक्की काय घडले?

४ एप्रिल २०२५ रोजी इस्सरदासानी याला एक ईमेल आला. ईमेलद्वारे त्याला कळवण्यात आले की, स्टुडंट अँड एक्स्चेंज व्हिजिटर इन्फॉर्मेशन सिस्टममधील त्यांचा रेकॉर्ड संपुष्टात आला आहे. इंटरनॅशनल स्टुडंट सर्व्हिसेस (आयएसएस) कडून आलेल्या ईमेलमध्ये लिहिण्यात आले होते की, विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी सेवा कार्यालयाने गुन्हेगारी कृत्यामध्ये समावेश, तसेच अन्य कारण सांगून त्याच्या विद्यार्थी व्हिसाची (स्टुडंट अँड एक्स्चेंज व्हिजिटर सिस्टीम) नोंदणी रद्द करण्यात आल्याचे कळवले. अचानक विद्यार्थी व्हिसा रद्द करत इस्सरदासानीला २ मे ही अमेरिका सोडण्याची अंतिम तारीख देण्यात आली. मात्र, व्हिसा रद्द झाल्याचा कोणताही संदेश त्याला अमेरिकी इमिग्रेशन विभाग किंवा विद्यापीठाकडून प्राप्त झाला नव्हता, यावरच न्यायालयाने जोर दिला.

व्हिसा रद्द करण्याचे कारण काय?

ईमेलमध्ये व्हिसा रद्द करण्याचे कारण, पाच महिन्यांपूर्वी झालेली अटक असल्याचे सांगण्यात आले. २२ नोव्हेंबर २०२४ च्या रात्री, इस्सरदासानी आणि त्याच्या मित्रांची बारमधून घरी जाताना दुसऱ्या एका गटाशी शाब्दिक बाचाबाची झाली, त्याच कारणास्तव चुकीच्या वर्तनाच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली. परंतु, डेन काउंटी येथील वकील इस्माइल ओझान यांनी या प्रकरणाचा आढावा घेतला आणि तो निर्दोष असल्याचे सांगितले. इस्सरदासानी याला कधीही न्यायालयीन समन्स मिळाले नाही. असे असूनही, इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्याचा एफ-१ विद्यार्थी दर्जा रद्द केला आणि त्यासाठी तो दोषी नसूनदेखील त्याच्या अटकेचे कारण दिले. विस्कॉन्सिनच्या पश्चिम जिल्हा न्यायालयातील न्यायाधीश विल्यम कॉनली यांना असे आढळले की, लागू असलेल्या इमिग्रेशन नियमांनुसार ही कारवाई केली जाऊ शकत नाही.

अमेरिकन कायद्यात त्याविषयी काय म्हटले आहे?

अमेरिकेच्या इमिग्रेशन कायद्यानुसार, जर एखाद्या व्यक्तीवर हिंसेचा आरोप असेल आणि त्यासाठी त्याला एका वर्षापेक्षा जास्त तुरुंगवासाची शिक्षा झाली असेल, तरच ते गुन्हेगारी कृत्य मानले जाते आणि त्या आधारावर विद्यार्थी व्हिसा रद्द केला जाऊ शकतो. विस्कॉन्सिनमध्ये गैरवर्तनाच्या गुन्ह्यात ९० दिवसांपेक्षा जास्तची शिक्षा होत नाही. विल्यम कॉनली यांनी त्यांच्या १२ पानांच्या निर्णयात नमूद केले की, इस्सरदासानी याने बेकायदा पद्धतीने नोकरी केली नाही, इमिग्रेशन अधिकाऱ्यांना कोणतीही चुकीची माहिती सादर केली नाही किंवा त्यांच्या F-1 व्हिसाच्या इतर अटींचे उल्लंघन केले नाही. या निर्णयात न्यायाधीशांनी होमलँड सिक्युरिटी डिपार्टमेंट (डीएकहएस) आणि इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट (आयसीई) यांनी त्यांचे स्वतःचे नियम न पळल्याने टीका केली.

न्यायालयाच्या निर्णयानुसार, स्टुडंट अँड एक्स्चेंज व्हिजिटर सिस्टीममधून निलंबित होण्यापूर्वी इस्सरदासानी याला होमलँड सिक्युरिटी डिपार्टमेंट, इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट किंवा अमेरिकन परराष्ट्र विभागाकडून कोणताही संदेश मिळाला नव्हता आणि त्याला स्पष्टीकरण देण्याची किंवा स्वतःचा बचाव करण्याची संधीही दिली गेली नाही. “इस्सरदासानी याच्या शैक्षणिक खर्चाची रक्कम आणि पदवी न घेता अमेरिका सोडल्यामुळे होणारे नुकसान पाहता, न्यायालयाने असा निष्कर्ष काढला आहे की, इस्सरदासानी यांना कोणतीही चूक नसताना नुकसान सहन करावे लागले,” असे कॉनली यांनी या निर्णयात नमूद केले.

इस्सरदासानीवर याचा काय परिणाम झाला?

व्हिसा रद्द होण्याचा इस्सरदासानीच्या भविष्यावर खोलवर परिणाम झाल्याचे न्यायाधीशांनी मान्य केले. इस्सरदासानी आणि त्याच्या कुटुंबाने त्याच्या अमेरिकेतील शिक्षणावर अंदाजे २४०,००० डॉलर्स खर्च केले आहेत. तसेच जर त्याला देश सोडण्यास भाग पाडले गेले तर त्याने चालू सत्रासाठी ट्यूशन फी म्हणून भरलेल्या १७,५०० डॉलर्सचेदेखील नुकसान होईल. मुख्य म्हणजे या आदेशानंतर त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे, ज्याचा त्याला मानसिक त्रास झाला आहे.

तसेच कोणत्याही क्षणी आपल्याला ताब्यात घेतले जाऊ शकते, अशी भीतीही त्याला आहे. इस्सरदासानी याला १० मेपूर्वी अमेरिका सोडण्यास भाग पाडले गेले तर तो त्याची पदवी पूर्ण करू शकणार नाही किंवा ऑप्शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंग (OPT) साठी अर्ज करू शकणार नाही. हे प्रशिक्षण आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षणाच्या क्षेत्रात कामाचा अनुभव मिळवून देण्याकरिता महत्त्वाचे ठरते.

अमेरिकेत व्हिसा रद्द करण्याचे प्रमाण वाढण्याचे कारण काय?

जानेवारी २०२५ पासून ट्रम्प प्रशासनाने देशभरातील एक हजारांहून अधिक आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे व्हिसा रद्द केले असल्याची माहिती आहे. विस्कॉन्सिन विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये अशा स्वरूपाची ४० हून अधिक प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना या कारवाईची पूर्वसूचना देण्यात आली नव्हती. किरकोळ गुन्हे किंवा पॅलेस्टिनी समर्थक निदर्शनांमध्ये सहभाग यांसारख्या कारणांसाठी आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना लक्ष्य केल्याचा आरोप ट्रम्प प्रशासनावर करण्यात आला आहे.

हा निर्णय का मोठा आहे

लोटफी लीगलच्या वकील शबनम लोटफी यांनी ‘विस्कॉन्सिन स्टेट जर्नल’ला सांगितले, “या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांनी काहीही चुकीचे केले नाही. त्यांनी अमेरिकन कायद्यांचे पालन केले आहे. मुख्य म्हणजे त्यांनी त्यांच्या विद्यार्थी दर्जाच्या अटींचेही पूर्णपणे पालन केले आहे.” त्या पुढे म्हणाल्या, “अमेरिकेने या अन्यायाविरुद्ध बोलणे गरजेचे आहे. प्रशासन त्यांच्या स्वतःच्या राजकीय हेतूंसाठी अशा स्वरूपाच्या कारवाया करत आहे.”

विद्यार्थी व्हिसाची नोंदणी रद्द करण्यात आल्यानंतर मिशिगन विद्यापीठातील एका भारतीय विद्यार्थ्यासह चार विद्यार्थ्यांनी त्यांच्या हद्दपारीविरुद्ध न्यायालयात धाव घेतली आहे. यात भारताचा चिन्मय देवरे, तसेच चीनमधील आणि नेपाळमधील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यांनी गृहसुरक्षा विभाग आणि इमिग्रेशन अधिकाऱ्यांविरुद्ध खटला दाखल केला आहे.